आमोद पाटील-आगरी बाणा: आम्ही "गाववाले" आणि नवी मुंबई बंद

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, २० मार्च, २०११

आम्ही "गाववाले" आणि नवी मुंबई बंद


आम्ही "गाववाले" आणि नवी मुंबई बंद

नवी मुंबईतील जेएनपीटी, एमआयडीसी, सिडको व विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आता टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. रायगड, नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी मातीमोल भावाने विकत घेऊन प्रकल्प सुरू करताना त्यांना सेवासुविधा, नोकऱ्या आणि मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखविण्यासाठी बुधवारी २३ मार्च,२०११ रोजी संपूर्ण नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय खारी-कळवे, बेलापूर शेतकरी प्रकल्पग्रस्त संघटनेने घेतला आहे.गुरुवारी १७ मार्च,२०११ रोजी कोपरखैरणे येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे नामदेव भगत यांनी जाहीर केले आहे. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. उरण येथील केंद्र सरकारचे जेएनपीटी बंदर ग्रामस्थांच्या शेतजमिनींवर उभे आहे. या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेनुसार भूखंड मिळावेत, योग्य मोबदला तसेच बेरोजगार तरुणांना नोकऱ्या व महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च,२०११ पासून प्रकल्पग्रस्त जेएनपीटी व सिडकोविरोधात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त या आंदोलनाला पाठिंबा म्हणून २३ मार्चला संपूर्ण नवी मुंबई बंद ठेवणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावीत, हीसुद्धा प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे.कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शाळेच्या सभागृहात प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. त्या वेळी उरणचे आमदार विवेक पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते श्‍याम म्हात्रे, महेंद्र घरत, खारी कळवे-बेलापूर शेतकरी समाज संघटनेचे अध्यक्ष मोरेश्‍वर चिंतामण पाटील, ऍड. पी. सी. पाटील, राष्ट्रवादीचे नेते दशरथ पाटील, नवी मुंबई एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सिडकोचे संचालक नामदेव भगत, कॉंग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे, घणसोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील, नामदेव डाऊरकर, शिवसेना शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, कोळी समाज संघटनेचे नेते रमेश पाटील, अरविंद नाईक, घणसोली व्यापारी मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते.या वेळी आमदार विवेक पाटील म्हणाले की, आम्ही सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्तांनी हक्कांसाठी सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसीविरोधात सुरू केलेले आंदोलन २३ मार्चपासून अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आजपासून संपूर्ण नवी मुंबईत प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन आंदोलनाला सुरुवात करतील. वेळप्रसंगी शीव-पनवेल महामार्गावर आडवे पडून "रास्ता रोको' करून सरकारचे लक्ष वेधणार आहोत.माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही आपले सडेतोड विचार यावेळी मांडले. ते म्हणाले, की नवी मुंबईतील शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी मातीमोल भावाने विकत घेणाऱ्या सिडकोकडे आज १६ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ही संपूर्ण मालमत्ता गोरगरीब प्रकल्पग्रस्तांची आहे. केंद्र सरकारने उरण येथे उभारलेले जेएनपीटी बंदरही येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर आहे. हे बंदर दरवर्षी ७०० ते ८०० कोटी रुपये नफा मिळविते. तरीही प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली आहेत. त्याच्या निषेधार्थ २३ मार्चपासून संपूर्ण नवी मुंबईत बंद पाळण्यात येणार असून वाहतूक ठप्प करण्यात येईल. वाहनांच्या टायरमधील हवा काढून "रास्ता रोको'ही करण्यात येईल. दुकाने, रिक्षा, टॅक्‍सी बंद राहणार असून वेळप्रसंगी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी रक्त सांडण्याचीही आमची तयारी आहे.ऍड. पी. सी. पाटील यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, की माजी खासदार दि. बा. पाटील यांनी संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी घालविले. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना खारी-कळवे शेतकरी समाज संघटनेमार्फत निवेदन देण्यात येईल. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच उपोषण अजूनही चालूच आहे.सिडकोचे संचालक नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे पत्रकारांना सांगितले. साडेबारा टक्के भूखंडांचा ताबा प्रकल्पग्रस्तांना दिला जात नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहील, असा इशारा कामगार नेते श्‍याम म्हात्रे यांनी या वेळी दिला.गावोगावी निर्धार सभा १८मार्च,२०११ ते २२ मार्च,२०११ पर्यंत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसीच्या विरोधात प्रत्येक गावात निर्धार सभा घेणार आहेत. बेलापूर, आग्रोळी, शहाबाज, दिवाळे, करावे, दारावे, नेरूळ, शिरवणे, सारसोळे, कुकशेत, जुईनगर, पावणे, तुर्भे, खैरणे, बोनकोडे, कोपरखैरणे, घणसोली, कोपरी, जुहूगाव, वाशी, तळवली, गोठीवली, रबाळे, दिवा कोळीवाडा, ऐरोली, दिघा आणि विटावा या गावात सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या बैठका होणार आहेत....तर लोकलही बंद करूशाळा, महाविद्यालये, औषधांची दुकाने व अत्यावश्‍यक अन्य सेवांना या "बंद'मधून वगळण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अत्याचार केला तर रेल्वेमार्गावर उतरून लोकलही बंद करण्याचा निर्धार कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा