आमोद पाटील-आगरी बाणा: सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

सोमवार, ११ एप्रिल, २०११

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले


आपल्या लोकांची मला हीच रीत पटत नाही. गल्लीतल्या नेत्यांचे वाढदिवस, आय.पी.एल स्पर्धेच्या संपूर्ण तारखा, गावांच्या जत्रांच्या तारखा असल्या गोष्टी लक्ष्यात ठेवतील पण ज्या माणसांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, त्याच्यामुळे आपण इथे आहोत त्यालाच विसरण म्हणजे स्वार्थीपणाच म्हणायला हवा. मग माझ्यासारख्या काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तरुण मंडळीना याचा त्रास होतो. तुम्ही श्रद्धेने देव देवतेना पूजा पण ज्यांनी तुमच्यासाठी केलंय त्यालाही विसरू नका.


आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आपल्यापैकी किती जणांना याची माहिती होती?? पाटील साहेबांच्या विचारांवर चालणारा मी आणि पाटील साहेब महात्मा फुले यांना आदर्श मानतात. त्यामुळे माझ्यावरही महात्मा फुलेंच्या विचारांचा खूप मोठा पगडा आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गोष्ट मला नेहमीच पटते. त्यानुसार मी प्रयत्न देखील करतो. आज ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती. पण अनेकांना हे माहितीच नाही. खूप वाईट गोष्ट आहे. मी नैसर्गिक शक्तीला मानतो तरीही तुम्ही मला नास्तिक म्हणा अथवा आस्तिक म्हणा मला काही फरक पडत नाही. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट वर तर आज दररोज नवीन नवीन देव निर्माण होत आहे. कधी क्रिकेटचा देव तर कधी आंदोलनाचा देव, कधी हा बुवा तर कधी हा गुरु. यांच्या भक्त्या करताना तुम्हांला वेळ नसेल भेटत ना?????????? करा करा त्यांच्याच भक्त्या करा. पण एक सांगतोय की, हे देव स्वतःच भल करून घेत आहेत. जनतेच्या नावाने ते चांगभलं करत आहेत. अजूनही त्यांच्याच भक्त्या करा, तुमच्या घरात काही अडचणी येणार तेव्हा हेच देव तुम्हांला वाचवायला येणार आहेत. जाऊदे मला काय करायचं????????? शेवटी मी कोण तुमचा????????? कोणीच नाही.................!!!!


ह्यांच्या नादात माझा विषय भरकटला. मुलींच्या तरी ही तारीख लक्ष्यात असायला हवी होती. कारण महात्मा फुलेंच्या कार्यामुळेच एक सावित्रीबाई निर्माण होऊ शकली. आणि त्यांच्यामुळेच तुम्ही आज हे वाचता आहात.

महात्मा ज्योतिबा फुले

११ एप्रिल,१८२७-२८ नोव्हेंबर,१८९०.

जीवनकार्य:


१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.

१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली

१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.

२८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.


समाजकार्य:

पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.-

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जीवन इतिहास:

महात्मा फुले म्हणाले. विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. अडाण्यांच्या, अशिक्षितांच्या आणि अज्ञान्यांच्या डोळ्यांत विद्येचे महत्त्व प्रतिपादन करणारा इतका तेजस्वी मंत्र अख्ख्या जगात कुणी दिला नसेल! अशा या पूजनीय ज्योतिबा गोविंद फुले यांचा जन्म १८२७ साली पुण्यात झाला. त्यांची आई चिमणाबाई ही ज्योतिबा अवघे नऊ महिन्यांचे असताना निवर्तली. मग ज्योतिबाचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. फुल्यांचे घराणे माळी जातीतील. त्यावेळी पुण्यात मीठगंज व भवानीपेठ यांना जोडून फार मोठा मळा होता. फुल्यांचे वडील - गोविंदराव याच ठिकाणी बागकाम करीत. मीठगंज पेठेत तेव्हा त्यांचे राहाते घर होते. अर्थातच आता तेथे फुले स्मारकाची जागा आहे. पुढे १८१८ साली पेशवाईची अखेर झाली व इंग्रजी राज्याची सुरुवात झाली. पेशवाईच्या अखेरीस कितीतरी अनन्वित व अत्याचारी कृत्ये घडली, "पुणे' हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर. राज्य वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावास भटाभिक्षुकांनी फसवले. सरकारी खजिन्यातून ब्राह्मणभोजने व दक्षिणा वाटपांच्या पुण्यसंचयामुळे आपले राज्य वाचेल अशी बिचाऱ्याची सात्विक समजूत! अशा काळात गरिबांचे व दलितांचे हाल किती झाले असतील! अस्पृश्य मानलेल्या माणसाचे घर तर भर उन्हात! अशावेळी या समाजाला सहकार्याचा सुधारणेचा, समाजप्रबोधनाचा हात कोणी दिला असेल तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यांना या कामात कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता हाल अपेष्टा, छळ सोसून मदत केली ती त्यांच्या पत्नी वंदनीय सावित्रीबाई यांनी. त्या काळात त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य म्हणजे समाजक्रांतीच होती. आपल्या या समाजक्रांतीच्या कार्याला स्थिर आणि संघटित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी म. फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली व १८८९ साली "सार्वजनिक सत्यधर्मी' हे पुस्तक लिहून त्याची तत्वप्रणाली व धर्मविधी त्यांनी लोकांपुढे ठेवले व आपल्या अनुयांयासह प्रत्यक्ष कार्यास वाहून घेतले. हे कार्य करीत असताना ज्योतिरावांनी बहुजनसमाजाच्या आणि अस्पृश्यांच्या गळ्यात, हजारो वर्षे - धार्मिक गुलामगिरीच्या, अंधश्रध्देच्या, विषमतेच्या आणि ब्राह्मण्याच्या चिकटवलेल्या जळवा नष्ट केल्या आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक समतेचा दीपस्तंभ संबंध भारताच्या मार्गदर्शनासाठी उभा केला. आज बहुजनसमाज वरील सर्व बाबतींत पुढारलेला दिसतो आहे, त्याच्या मागे फुल्यांचे अथक परिश्रम आहेत. स्त्रियांच्या, दलितांच्या आणि बहुजनसमाजाच्या वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आंदोलन करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी १८८३ साली "शेतकऱ्यांचा असूड' हे पुस्तक लिहिले व अन्नधान्य पिकवून समाजाचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची गाऱ्हाणी परखडपणे मांडली. शेतकरीवर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द दंड थोपटून उभे राहणारे भारतातील पहिले समाजचिंतक म्हणजे महात्मा फुले. असंख्य लोकांत त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वावरणाऱ्या ज्योतिरावांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. आपण सामाजिक कार्य करतो, तरी आपला सत्यशोधक समाज ही गरिबांची संघटना आहे, तेव्हा आपण आपल्या कुटुंबाचा बोजा इतरांवर लादणे बरोबर नाही, अशी त्यांची भावना होती. पाण्यासाठी त्यांनी आपला हौद तर खुला ठेवलाच, पण भुकेलेलाही त्यांच्या घरी येऊन चार घास खाऊन तृप्त मनाने जायचा. आपल्या समाजसुधारणेच्या कार्याचे मर्म सांगताना त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, "ब्रिटिश लोकांचे राज्य असूनही प्रत्यक्ष राज्यकारभाराची अंमलबजावणी करणारे लोक प्रामुख्याने ब्राह्मणच आहेत. म्हणून ब्राह्मणेतर अशिक्षित समाजाची हरएक बाबतीत नाडणूक होत आहे. जातिभेदातील उच्चनीच भाव पूर्वी इतकाच कठोरपणे पाळला जातो. मला हे सारे संपुष्टात आणायचे आहे. माझ्या कार्याचे महत्त्व कळल्यामुळे काही ब्राह्मण मित्र मला सहकार्याचा हात देत आहेत, ही ईश्वरी कृपाच म्हणायची.' मानवतावाद, विश्वबंधुत्व आणि कृतिशीलता ही ज्योतिरावांच्या जीवननिष्ठेची तीन प्रमुख अंगे होती सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका. हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


त्यांनी `ईश्वर' नव्हे, तर `निर्मिक' असाच शब्द नेहमी वापरला. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी शेतकर्यांचा आसूड या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्यांच्या वेषात शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.महात्मा फुले यांनी असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

२ टिप्पण्या: