आमोद पाटील-आगरी बाणा: होय आम्ही आगरी-कोळी(AGRI-KOLI SAMAJ) वेगवेगळे नसून एकच आहेत...........

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

होय आम्ही आगरी-कोळी(AGRI-KOLI SAMAJ) वेगवेगळे नसून एकच आहेत...........


               शंकर सखाराम यांनी 'आगरी-कोळी वेगळेच'(१६ जुलै, सकाळ) असे सांगून एका 'संवादाचे' विसंवादात रुपांतर केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आगरी-कोळी महोत्सवातून आगरी-कोळी एकच असल्याचे भासवले जाते असले तरी प्रत्यक्षात जातीसमूह म्हणून ते वेगळेच आहेत, अशी भूमिका शंकर सखाराम यांनी त्या लेखातून मांडली होती. त्या लेखाला समस्त आगरी बाणा परिवाराचा जाहीर विरोध आहे.

               वास्तविक आगरी समाज 'आगर' म्हणजेच शेती करतो. त्याचप्रमाणे उर्वरित काळात मासेमारीदेखील करतो; किंबहुना कोकणातील बहुतेक सर्व समाजाचे लोक शेतीबरोबरच मासेमारीदेखील करतात. आगरी लोक भाताच्या शेतातच मासेदेखील पाळतात. त्याचप्रमाणे कोळी लोक पावसाळ्यात जेव्हा खोल समुद्रातील मासेमारी बंद असते त्या वेळी शेती करतात. या दोन समाजातील व्यवसाय साधर्म्य जातीसंस्थेचे 'मानवनिर्मित' भेदभाव ओलांडून 'आगरी-कोळी' भवनाच्या रुपाने खरी सामाजिक 'समरसता' सकारात असेल, तर त्यात आक्षेप घेण्याजोगे असे काय आहे? उलट ही अन्याय जाती भेदांवर मत करणारी प्रक्रिया असल्याने तीचे स्वागत करायला हवे.

               शंकर सखाराम यांचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बाधित झाला आहे. 'सेझ' या कादंबरीत त्यांनी आगरी समाजाला 'आगरकर' तर कोळी समाजाला 'सागरकर' म्हटले आहे. ही अशी नावे बदलून ते काय सांगू इच्छितात? ज्यांनी जातीव्यवस्था निर्माण केली, जोपासली त्यांना काही वाटताना दिसतं नाही; परंतु जे जातीव्यवस्थेचे बळी आहेत त्यांनी असे न्युनगंडीत होऊन कसे चालेल? इतिहास असे सांगतो की, आगरी-कोळी समाजाने न्याय हक्कांसाठी वेळोवेळी बलिदान केले आहे.

               छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पहिले भारतीय नौदल आम्हां आगरी-कोळ्यांचेच! शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या ज्योतिबा फुले यांना १८८९ मध्ये मांडवी-कोळीवाडा येथे 'महात्मा' ही पदवी देणारे आगरी-कोळी लोकच होते. भारतातला सर्वात मोठा शेतकरी संप १९३२ ते १९३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळकायदा निर्माण करणारे आगरी-कोळी लोकच होते. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी-कोळी लोकच होते. स्वातंत्र्यानंतर लोकनेते मा.श्री.दि.बा.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली सिडकोच्या अन्यायी भूसंपादनाविरोधात जासई येथे पाच हुतात्मे देऊन संपूर्ण भारतात कुठेही लागू नसलेली साडेबारा टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणारी पुनर्वसन योजना साकार करणारे आगरी-कोळी लोकच होते.

               आपल्या लढाऊपणाचा गौरवशाली इतिहास जपणारा, संगीत-नृत्यप्रिय हा आगरी-कोळी समाज आजही शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला राहिला आहे. आपल्या उत्थानाचा मार्ग तो आजूबाजूच्या समाज वास्तवात शोधण्याऐवजी देवधर्म-उपासतापास, नवस-सायास अशा अध्यात्मिक उपायांत शोधीत आहे. अशा परिस्थितीत अस्मिता जागविणारे 'आगरी-कोळी' भवनासारखे प्रकल्प ही काळाची गरज आहे. या प्रकल्पातून या समाजाच्या विकासाचे आधुनिक प्रबोधनाचे मार्ग राबवायला हवेत, समाजातील शिकल्यासवरल्यांनी त्यादृष्टीने काम करायला हवे.

               आगरी-कोळी समाजात कधीही न दिसणारी दुही आणि भेदभाव स्पष्ट करण्यासाठी सखाराम यांनी अनेक दिशाभूल करणारी उदाहरणे संबंधित लेखात दिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, कोळी समाज भूमिहीन आहे. ते जर भूमिहीन असते, तर त्यांना 'आगरी-कोळी' भवन कशासाठी दिले असते? अनेक कोळी लोकांना साडेबारा टक्के भूखंड पुनर्वसन योजनेखाली सिडकोने देण्याचे काम अर्धवट ठेवले आहे. बरा बलुतेदार लोकांना असे भूखंड मिळावेत यासाठी लढणारा, नेतृत्व करणारा हा आगरी-कोळी समाजच आहे.

               ज्यांची नजरच भेदाभेद शोधणारी असेल त्यांना 'आगरी-कोळी' लोक वेगळे-वेगळे दिसतही असतील; परंतु साऱ्या भारतात सापडणार नाहीत एवढी अभेद्य नटी या दोन समाजात दिसतात. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होतो. तो नाकारण्याचे शंकर सखाराम यांनी धाडस कसे केले? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वास्तव करीत असल्यामुळे आगरी-कोळी लोकांचे भावविश्व सागरासारखे विशाल झाले आहे. उरण-पनवेल-मुरुड-अलिबाग परिसरात मुस्लिम धर्मियांबरोबर एकात्मतेने राहणारे आगरी-कोळी लोकच आहेत. एवढेच कशाला, उच्च-नीचतेच्या कल्पनांना तिलांजली देऊन वसई-विरार परिसरातील ख्रिश्चन समाजाच्या चांगल्या कल्पना स्वीकारणारे आगरी-कोळी लोकच आहेत.

               कधी एमआयडीसीसाठी, कधी सिडकोसाठी, कधी महामुंबईच्या वाढत्या शहरांसाठी आपल्या पिकत्या शेतजमिनी आणि सागरकिनारे देशासाठी त्यागणारे आगरी-कोळी लोकच आहेत. देशाच्या अठरापगड जातींना, जगाच्या सर्व धर्मियांना सामावून घेणारी संस्कृती आगरी-कोळ्यांचीच आहे. जाती-पाती, भाषिक वाद, धार्मिक वाद, धार्मिक दंगली, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सामाजिक दंगली तसेच दहशवादी कृत्ये करणाऱ्या लोकांना आगरी-कोळी लोकांनी कायमच विरोध केला आहे. मुंबईचे मूळ मालक असलेल्या आगरी-कोळी जनतेने आपल्या गावात साऱ्यांना आदरतिथ्याने स्वीकारले, तिथे छोट्या-छोट्या भेदांचे काय महत्त्व?

               स्वातंत्रपूर्व काळात या देशात जातीप्रथा प्रभावी होती. त्यातून साऱ्या बहुजनांचे शोषण चालू होते. 'पाणकोळीच' नाही सारे समाज उच्चवर्णीयांकडे पानी भरत होते. स्वतःला अभ्यासक म्हणविणाऱ्यानी फुले, शाहू, आंबेडकरी साहित्याचा यासाठी जरूर अभ्यास करावा.

               समतेच्या, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी आज लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे. सेझसाठी, एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे प्रकार होत आहेत, त्याचप्रमाणे प्रदूषणकारी रासायनिक कारखाने, कोळसा प्रकल्प, नद्या आणि सागरातील प्राणीजीवन संपवीत आहेत. मासेमारी उद्योग संपविण्याचे नवे धोरण कोळी बांधवाना उद्ध्वस्त करीत आहे व अशा विपरीत परिस्थितीत आगरी-कोळी भवन साकारत आहे ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.

               स्त्रीभ्रूणहत्येच्या अत्यंत घृणास्पद कृत्यांनी सुसंस्कृत समाजालादेखील वेठीस धरले आहे. एकविरा, मुंबादेवी, शितलादेवी, जोगेश्वरी, गावदेवी या मातृदेवताना आराध्य मानणाऱ्या आगरी-कोळी समाजात हुंडा प्रथा कधीही दिसून येत नाही. स्त्रियांना आर्थिक अधिकार देणारा हा समाज आहे. त्यांची वैशिष्टे जगासमोर यायला हवीत. त्याचबरोबर त्यांच्या आगरी धाडसाच्या कथा, पहिल्या आरमाराच्या पराक्रमाच्या कथा समोर यायला हव्यात. भारतीय शेतकऱ्यांच्या झालेल्या दोन लाख आत्महत्या देशाला लाजविणाऱ्या आहेत. या प्रश्नांवर आगरी-कोळी शेतकऱ्यांचे कुळकायदा आंदोलन, सिडको आंदोलन खूप मोठे उत्तर असू शकते. हे सारे सांगण्यासाठी आगरी-कोळी भवन अपुरे पडावे. असेच भवन मुंबईतही उभे राहावे. आता आगरी-कोळी लोकांनी आपलं दिव्य इतिहास अभ्यासावा, वर्तमानातील आंदोलने अभ्यासून, भविष्याचा वेध घ्यावा! 'भेदाभेद सारे अमंगल!' हे समजून घेऊन नव्या उमेदीने आगरी-कोळी महोत्सव, आगरी-कोळी साहित्य संमेलने उत्साहाने भरवावीत.



आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

२ टिप्पण्या: