आमोद पाटील-आगरी बाणा: महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ऍड. दत्ता पाटील(Datta Patil Alibag)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ऍड. दत्ता पाटील(Datta Patil Alibag)



दत्ता पाटील(दादा)
आपल्या लढाऊ आणि प्रभावी शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारे आगरी समाजातील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ऍड. दत्तात्रय नारायण तथा दत्ता पाटील (वय ८५) यांचे शनिवारी २७ ऑगस्ट, २०११ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

राजकीय
विधानसभेतील मुलुख मैदान तोफ, शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे नेते म्हणून दत्ता पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात होते. विधिमंडळाच्या कायद्याचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांची १९८७ व १९८९ या काळात दोन वेळा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९६७ पासून १९९० पर्यंत सलग २५ वर्षे ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून गेले होते. एकूण २७ वर्षे ते विधानसभेचे आमदार होते. त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्षपद, पंचायत राज समितीचे सदस्यपद, विशेषाधिकार समितीचे सदस्यपद  आदी पदे भूषविली होती. विधानसभेत अभ्यासू व कणखर आमदार म्हणून त्यांची छाप होती. बेळगावच्या सीमाप्रश्नावरील लढ्यात त्यांनी ९ महिने कारावास भोगला होता.

शिक्षण
४ मार्च १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्मलेल्या दत्ता पाटील यांचे एल.एल.बी.पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचे वडील व शेकापचे संस्थापक नारायण नागू पाटील यांनी शेतकर्यांना व गोरगरीबांना न्याय देण्यासाठी त्यांना जाणीपूर्वक वकील केले होते. महाराष्ट्रातील निष्णात फौजदारी वकील म्हणून ते प्रसिद्ध होते.

शैक्षणिक कार्य
कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्याच्या खेडोपाडी शिक्षण नेऊन कै. ना. ना. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेला. अध्यापक विद्यालय, अभियांत्रिकी व होमिओपॅथी महाविद्यालये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालय ही त्यांच्या शैक्षणिक कार्याचे द्योतक आहेत. अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाचे ते कार्याध्यक्ष होते. अलिबाग येथील कुलाबा मॅटर्निटी हॉस्पिटल, अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती व रायगड बाजार आदी सहकार व सामाजिक क्षेत्रातील संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

सेझ विरोधी लढा
सहा-सात वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात "सेझ"चे वादळ घोंगावू लागले आणि दत्ता पाटील या झंझावाताची ताकद अनुभवायला मिळाली. उरण, पेण तालुक्यांच्या डोक्यावर महामुंबई विशेष आर्थी क्षेत्राचे संकट आले होते. रिलायन्ससारखी कंपनी सुमारे २५ हजार हेक्टर शेतजमीन संपादित करणार होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट होती. "तारणहार" समजल्या जाणऱ्या नेत्यांनी "विकास झाला पाहिजे" अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे "सेझ"च्या नावाखाली आपण देशोधडीला लागणार, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. असे चित्र असतानाच काही वकिलांनी पुढे येऊन "महामुंबई"ला विरोध करण्याची घोषणा केली. अर्थात यासाठीच सक्षम आणि निस्वार्थी नेतृत्व म्हणून एकेकाळचे झुंजार विरोधी पक्षनेते दत्ता पाटील हाच पर्याय होता. मात्र, ८२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दत्ता पाटलांनी "माझे वय झाले आहे" असे म्हणत स्पष्ट नकार दिला. हजारो शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती. अखेर वकील मंडळींनी "दादा तुमच्याशिवाय हा सेझचा राक्षस कोणीही गडू शकणार नाही" असा पवित्र घेतला. मग मात्र दत्ता पाटील ठाम उभे राहिले आणि महामुंबई संघर्ष समितीचा उदय झाला. या समितीच्या चिरनेर येथे झालेल्या पहिल्याच सभेत दत्ता पाटील म्हणजे काय हे अनुभवता आले. सत्ताधारी कॉंग्रेस, शेकाप, शिवसेना या पक्षांवर दादा तुटून पडले. रिलायन्सच्या अंबानीची तर त्यांनी घणाघाती भाषणातून लक्तरे वेशीवर टांगली. नवी मुंबई उभारायचीत.. धरणे बांधायचीत.. रेल्वे, रस्ते, बंदरे बांधायचीत तर आमचीच जमीन का? आम्ही त्याग किती करणार? एकापाठोपाठ घणाघाती प्रश्न येत होते आणि उपस्थितांना दत्ता पाटलांना वाघ का म्हणतात, याचा प्रत्यय आला. त्यानंतर या ढाण्या वाघाने वढाव, पेण, कोप्रोली, उरण, पंदिवे अशा गावांमध्ये सभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये एकात्मता, देशप्रेम आणि शेतीचे रक्षण करण्याची चेतना जागृत केली. "आमच्या वाट्याला याल तर याद राखा" अशी तंबी सरकारला सभांमधून वारंवार देत. त्यांच्या या हल्ल्यातून रायगडातील नेते तर सुटत नव्हतेच पण विलासराव देशमुख, नारायण राणे यांच्यावरही दादांचा हल्ला इतका बेफान असे की, वाटे नेता असावा तर असा!

उरण तहसील कार्यालयासमोर मोर्चा होता. एका पक्षाच्या तथाकथित निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या टोळक्याने दादांचे भाषण सुरु असताना हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी "कोण आहेत रे ते? पुढे या, तुमच्या नेत्यांविरुद्ध बोलल्यानंतर मिरच्या झोंबतात का? मग शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहायला सांगा...." अशा करारी आवाजात दम भरल्यानंतर पुन्हा कोणत्याही सभेत असे काही करण्याची हिंमत टग्यांना झाली नाही. रिलायन्स थोडीशी मागे हटल्यानंतर जुन महिन्यात महामुंबई संघर्ष समितीचा मेळावा उरण तालुक्यातील पंदिवे येथे झाला. तेव्हा त्यांनी केलेले भाषण हे "सेझ" विरोधातील लढाईतील सर्वात तडाखेबाज भाषण होते. ते ऐकणाऱ्याना दत्ता पाटील ८७ वर्षाचे तरुण आहेत, याची मनोमन खात्री पटली. गेल्या वर्षी पत्नीच्या निधनामुळे दादा काहीसे उदास होते. मात्र शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या आवाजातील धार तशीच कायम होती. शेतकऱ्यांचा हा कैवारी आता आपल्यात नाही. मात्र "जगावं तर वाघासारखं" ही त्यांची शिकवण "सेझ"विरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे.

अशा या आगरी समाजातील "ढाण्या वाघाला" समस्त आगरी बाणा परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा