आमोद पाटील-आगरी बाणा: जून 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ३० जून, २०११

मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची


आमचा बापूस पुनं आनचा न आमची आय येच गावांची,
मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची????

प्रसिद्ध आगरी कवी पुंडलिक म्हात्रे लिखित हरकत काय तुमची ही कविता म्हणजे नवी मुंबई आणि जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांची सध्याची परिस्थिती वर्णन करणारी अशीच आहे. आम्हां शेतकरी आगरी कुटुंबियांच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या जमिनींवर शेती करत होते. तिच्यावर सरकारची काळी नजर पडली. आणि नवी मुंबई-उरण-पनवेल या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ४० वर्षापूर्वी हिसकावून घेतल्या. तोंडावर फक्त काही रुपये फेकले. आश्वासन दिली गेली, स्वप्न दाखविली गेली......... तुमच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होईल, तुम्ही खूप मोठी माणसे बनाल. पण आज चाळीस वर्षानंतर काय परिस्थिती आहे?????

लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांनी दिलेल्या लढ्यामुळे येथी आगरी माणूस जिवंत राहिला. त्याला काही प्रमाणात त्याचे हक्क मिळाले. पण जे काही हक्क मिळत होते त्यात आमच्याच अनेक चोर राजकीय नेत्यांनी अक्षरशः डल्ला मारला. ज्यांची लायकी नव्हती ते आज राजकारणाच्या फुशारक्या मारत आहेत. राजकारणी पण हेच अन् बिल्डर पण हेच. सिडको कडून भूखंडाचे श्रीखंड खाणारे पण हेच. सिडको घाटावरून आलेल्या राजकारण्यांच्या कॉलेजेसना भूखंड देते. पण प्रकल्पग्रस्तांच्या इंजिनिरिंग कॉलेजला मात्र भूखंड मंजूर केला जात नव्हता?????? आमचा समाज शिकू नये, पुढे जाऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे. तरी देखील सर्वांच्या नाकावर टिच्चून प्रत्येक क्षेत्रात आम्ही आहोतच...........तेदेखील स्वतःच्या हिमतीवर.........

पण आम्ही मात्र इथे आद्य नागरिक असून देखील आमच्या हक्कांची पायमल्ली केली जातेय. प्रकल्पग्रस्तांच्या जागी दुसऱ्याच लोकांची या जागेवर भारती केली जातेय. आमच्या पोरांना मात्र नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्याचं योग्य शिक्षण झालं असताना देखील नोकरी दिली जात नाही. पण हे चोर राजकारणी तसेच सिडकोत बसलेले अधिकारी, संचालक मंडळ बाहेरच्या लोकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकऱ्या देतेय, पण माझ्या माणसाला मात्र झुलवत ठेवलं जातंय. सर्व महत्वाची पदे या चोर राजकारण्यांच्या घरात त्यांना वाटेल तस ते आगरी जनतेचं वापर करून घेत आहेत.

ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे सिडको अनधिकृत ठरवून सिडको त्याच्यावर जेसीबी चालवतेय. तेव्हा मात्र हे राजकारणी कोणत्या बिलात जाऊन लपतात तेच समजत नाही. तर मग आम्हां सर्व तरुण आगरी प्रकल्पग्रस्तांना प्रश्न विचारावासा वाटतो की, आमाला नोकरीला लावाला हरकत काय तुमची???????????

जमीन आमच्या हक्काची,
नाही कुणाच्या बापाची

हरकत काय तुमची

आमचा बापूस पुनं आनचा आमची आय येच गावांची,
मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची????

आवारे वारसां बाबा राजकारणात व्हता
सोतासाठी काय बगतुचा नवता
पकक्षा साठी आयुष घालवला
शेवटी शेवटी पाणी डोळ्यांशी आला
खुटावाले कावळ्यांनी पाय काय दैना उरवातव आमची || ||

कनचापून राजकारणी यातन
नय नय त्या उलट सुलट तुमा सांगतान
मतलबा साठी लय जमतान लोका
चार पाच लाखांसाठी चालवतान डोका
पाखर तरी कैशी करताव तुमी ये राजकारणाची || ||

खारे म्हलानानच ये रानाना आमी
मिठाची अन मावरा काट्याची भूमी
वार वरलांच्या कती जेल्या पिऱ्या
खोट्यांचे होट -याचे बे-या
गंगा दरांशी येऊन आमचे पाणी धाय धाय डोळ्यांशी || ||

गाववाल आसून आमी भिक मागतून
गोर बंगाल काय त्या अमिपून समजातून
परके लांडग्यांच ते सवसार चंगळ
प्रकल्पग्रस्तानच सपान भंगल
ज्यांचा संमंद नय कारीचा पोरा कामाला त्यांची || ||

इतिहास बगलावं नय तरी आयाकावा
काय काय आयाशी घडलाय त्या बगावा
कती आयाशी पा चोराव मोर
कोणाचे जीवाव ती नाचे लांडोर
कुंडलिक सांगतोय घरलेली कहाणी प्रकल्पग्रस्तानची || ||

कवी-पुंडलिक म्हात्रे.

आगरी कवी पुंडलिक म्हात्रे यांचे आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग तर्फे मनापासून आभार.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा.

सोमवार, २७ जून, २०११

आगरी बाणाची पहिली बैठक.









*आगरी बाणाची पहिली भेट*


लढतोय....
आगरी माणसांच्या न्यायासाठी,
स्वाभिमानी आगरी अस्मितेसाठी.



उपस्थित मान्यवर:
रामनाथ म्हात्रे(तुर्भे,नवी मुंबई).
रामेश्वर गवई(ऐरोली,नवी मुंबई)).
सागर पाटील(वाघबीळ,कावेसार,ठाणे).
संदेश पाटील(ठाणे).
कुणाल म्हात्रे(पडलेगाव,ठाणे).
दत्ता संते(पडलेगाव,ठाणे).
सर्वेश नवाली(विन्धणे,उरण).
सुनील पाटील(जुहूगाव, वाशी,नवी मुंबई ).
शान पाटील(मोरावे,पनवेल).
रुपेश पाटील(मोरावे,पनवेल).
चेतक ठाकूर(चिर्ले,उरण).
आमोद पाटील(जासई,उरण).



अनेक महिन्यांपासून मनात होत की, आगरी बाणातील सर्वानी एक यावं, एकमेकांचे विचार ऐकावेत, स्वताचे विचार मांडावेत. पण भेटीचा योग काही जुळून येत नव्हता. पण गेल्या रविवारी(१९ जून,२०११) रोजी हा विचार ग्रुप समोर मांडला, की खूप झाली ऑनलाईन टाईमपासगिरी. ऑनलाईन बोलून काही होणार नाही. जर काही करायचं असेल, बदल घडवायचा असेल त्यासाठी कुठेतरी एकत्र भेटूया. त्या दिवशी फेसबुकवर अनेकांशी चर्चा केल्या. चर्चेअंती खारघर या सर्वाना सोयीस्कर पडणाऱ्या मध्यवर्ती जागी भेटायचं निश्चित झालं. मग रविवारी सर्व तयारीची प्रत्यक्ष सुरुवात केली. भेटायची निश्चित वेळ, निश्चित ठिकाण ठरवण्यात आले. असा सर्व अंतिम मसुदा तयार करून फेसबुकवर टाकण्यात आला. हे वाचून काहीजण मनापासून तयार झाले. त्यांच्या मनात ही भावना होतीच की समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आणि जर काही करायचं असेल तर एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. नुसते फेसबुकवर बोंबलून समाज बदलणार नाही याची जाणीव आम्हांला झाली होती. तर मग ठरलं, ११ जण मनापासून येण्यास तयार झाली. आता सर्वजण प्रत्यक्ष भेटीची वाट पाहत होते. आणि भेटीचा दिवस रविवार(२६ जून,२०११) उजाडला.....................



प्रत्यक्ष भेटीचा दिवस..................
येणारा प्रत्येकजण नेहमीपेक्षा लवकरच उठला होता. समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून हे आपोआपच घडलं होत, त्यात कृत्रिमपणा अजिबात नव्हता. सकाळी .३० वाजता सागरदादांचा मेसेज आला की, बरोबर ११ वाजता मी खारघर स्टेशनवर पोहोचतोय. मग लगेच जे येणार होणार होते अश्या सर्वाना माझा मेसेज गेला. दोन जण सोडून सर्वजण येणार होते. भूषण . पाटील यांचा मेसेज मिळाला की, काही कारणास्तव मला येण्यास जमणार नाही. तुम्हाला पहिल्या भेटीच्या मनापासून शुभेच्छा. एका कडून काही उत्तर आलं नाही, म्हणजे तो येणार नव्हता हे निश्चित झालं. आत्ता फक्त ...........!!!!! कुणाल दादांचा मेसेज आणि लगेच फोन देखील आला. मी निघालोय, ११ वाजेपर्यंत पोहोचतोय. नंतर सुनील दादांचा फोन आला, गाडीचा टायर खराब झालाय, मला थोडा उशीर होईल. पण मी येतोय. मग चेतक भाईचा फोन मी पण निघालोय. लोकल मध्ये असताना शान भाईचा फोन मी पण आलोय. मग प्रत्यक्ष ठिकाणावर पोहोचल्यावर रामेश्वर दादांचा आणि सर्वेश भाईचा फोन, ते देखील तिथेच होते. पहिल्यांदा एकमेकांना भेटत होतो. त्यामुळे - मिनेटे प्रत्येकाला शोधायला जात होती. असे एक एक जमत गेलो. पण आमची संख्या खरतर असायला हवी होती. पण आम्ही प्रत्यक्ष १२ जण जमलो होतो. हे तर लय बेस्ट झालं. म्हणजे प्रत्यक्ष संख्येपेक्षा तसेच गृहीत संख्येच्या ने अधिक. कुणाल दादा बरोबर दत्ता दादा पण आले होते. आणि शान भाई रुपेश भाईला घेऊन आले.( ये दोस्ती हम नही छोडेंगे..................) तर मग असे आमचे आगरी बाणाचे अजून दोन सरदार आले. आपले आगरी समाजाचे कवी रामनाथ दादांना मी आग्रहाने बोलावलं होत. पण मनात थोडी शंका होती की, दादा तर कवी, गायक, संगीतकार. आमच्यात येऊ शकतील???? पण प्रत्यक्ष दादांना जेव्हा भेटलो त्यांच्याशी बोललो तेव्हा मात्र मनातील शंका लगेच नाहीशी झाली. अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व. कुठेही अंहकाराचा लवलेश नाही. जी गोष्ट रामनाथ दादांची तीच सर्वांची. सागर दादा एका आगरी संस्थेचे अध्यक्ष असून देखील कोणतीही मोठेपणाची भावना नाही. सुनील दादा बिल्डर असून देखील मी कोणीतरी आहे अशी भावना नव्हती. रामेश्वर दादा वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत पण तरीदेखील मी तुमच्यापेक्ष्या मोठा आहे असा रुबाब नव्हता. अगदी साधे-सोपे. कुणाल दादांचा आणि दत्ता दादांचा पण स्वताचा व्यवसाय आहे. पण ही माणसं मात्र खूप साधी. शान भाई, संदेश भाई, रुपेश भाई, सर्वेश भाई, चेतक भाई आणि मी वयाने छोटे. काहीजण शिकत आहेत, काहीजण नोकरी आणि स्वतःच्या व्यवसायात आहेत. मोठ्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हां छोट्यांना झालाच. त्यांनी कधीही जाणवू दिल नाही की, तुम्ही छोटे आहात आणि आम्ही मोठे. प्रत्येकजण मुक्त वातावरणात चर्चेत सहभागी होत होता.



आमची बैठक
अगोदर सर्व जमेपर्यंत आम्ही खारघर रेल्वे स्टेशन समोरील छोट्याश्या हॉटेलमध्ये बसलो होतो. पण जेव्हा सर्वजण आले. तेव्हा थोडी गर्दी वाटू लागली. त्यामुळे बाहेर कुठेतरी बसण्याचा निर्णय एकमुखाने संमत झाला. त्यावेळी त्या हॉटेलवाल्याच्या धंद्याचा देखील विचार केला. उगाच बिचाऱ्याचा लॉस नको. तशी रविवारी गर्दी नव्हतीच. त्याचा हॉटेल पण सुनासुना होता. पण तरीदेखील आमची स्वारी जागा शोधत दुसऱ्या ठिकाणी निघाली. वरती फलाटावर बसण्याची खूप जागा होती. पण ती सरळ लाईन मध्ये. आणि आम्हांला तस अजिबात नको होत. मग खाली उतरलो. खाली तर खूप जागा आहे. खालीच गोलाकार बैठक मारली. आमचा त्रास इतरांना नाही आणि इतर प्रवाशांचा त्रास आम्हांला नाही. अगदी दोन तास आम्ही तिथे मस्त आरामात बसलो होतो. आता फोटो पाहणाऱ्यांना हे जरा वेगळ वाटेल. की ही कसली यांची भेट???? कुठेही बसतात!!!! पण जेव्हा समाजासाठी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असते, त्यावेळी हेवेदावे, मानापमान विसरले जातात. "करके देखो अच्छा लगता है". इथे जे अनुभव आम्हांला भेटले ते खरेच खूप अनमोल होते. फेसबुकवर वटवट करून समाज बदलाच्या गोष्टी करणे सोपे असते. त्यावेळी शब्दांचे फुगे हवेत सोडले जातात. पण काम मात्र शून्य. पण ही आमची गोलाकार बैठक आम्हांला खूप काही शिकवून गेली. आमच्यातील अनेकजण आयुष्याची खरी सुरवात आहोत, विशी पालटून आयुष्याच्या वेगळ्या वळणावर, वाटेवरून जाण्यासाठी सज्ज असताना मिळालेले हे अनुभव खरेच खूप योग्य अशाच प्रकारचे. ती गोलाकार बैठक आमच्या नवीन वाटचालीला योगदान देणारी ठरली आहे.



आगरी समाजात वाद नको, संवाद घडावा.
पाटील साहेबांनी दिलेला आगरी एकतेचा झेंडा उंच गगनी भिडावा



चर्चा
अनेक चर्चा झाल्या, पुढचे ध्येय आखण्यात आले. त्यातील काही.

फेसबुकवर वटवट
फेसबुकवर वटवट करणारे खूप आहेत. त्यांना समाजाशी लेन-देन नाही. फक्त आणि फक्त टाईमपास साठी ते तिथे असतात. फक्त आगरी-आगरी बोंबलायचं. शब्दांचे बुडबुडे करायचे आणि उडवत बसायचे. तुमच्या बुडबुड्यानी समाज सुधारणार नाही हे आम्हांला माहित आहे. आणि जी काही मोजकी मंडळी मनापासून काम करत असतात, त्यांना त्रास देणे हे यांचे धंदे. पण स्वार्थासाठी, फायद्यासाठी मात्र सर्वजण पुढे असतात. दुसऱ्यांच्या कविता ढापून त्या कॉपी-पेस्ट करून त्यावर कॉमेंट्स मिळवून समाज सुधारणार नाही. जर इतकच आहे तर स्वतःच्या कविता तयार करा. आगरी बाणा त्यांना प्राधान्य देईल, तसेच त्यांची प्रसिद्धी देखील केली जाईल. फेसबुकवर वाद करणाऱ्यांकडे, नुसते आगरी-आगरी बोंबलून वाद करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं. या मताशी आम्ही सर्व सहमत झालो. कारण ह्या लोकांच्या हातून समाज सुधारणार नाही. हे फक्त इंटरनेट राजे. समोरासमोर बोलण्याची, समाजासाठी काम करण्याची ह्यांची हिंमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आगरी बाणा पुढे नेण्याच काम आम्ही करणार आहोत.


आगरी बाणाची भावी वाटचाल
आगरी समाज एकता, आगरी समाज विकास हे उद्दिष्ट असले तरी आगरी बाणा फक्त आगरी पुरता मर्यादित ठेवता इतर समाजातल्या आपल्या मित्र परिवाराला देखील त्यात सामवून घ्यायला हवं, अस मत प्रत्येकाने मांडले. आगरी बाणाला धर्म, पंथ, जातीची सीमा नसावी. आगरी-आगरी करताना इतर समाजाला त्रास दिला जाणार नाही याची काळजी देखील सर्वानी घ्यायला हवी. जे जुने वादविवाद असतील ते इथेच गाडून नवीन वाटचालीसाठी सर्वानी सज्ज राहायला हवं. ते आपले दुश्मन नाहीत आणि आपण त्यांचे दुश्मन नाहीत, हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. मात्र जर उगाच कोणी अंगावर येत असेल तर मात्र त्याला शिंगावर घेण्यात येईल. जो मनापासून आपल्याबरोबर येऊ इच्छितो त्याला आगरी बाणा नेहमीच आपल्या बरोबर घेईल ही भावना प्रत्येकाने व्यक्त केली. आक्रमकता असावी, पण ती आक्रमकता योग्य कामात लावावी. भांडण करून वाया घालवू नये.


भविष्यातील योजना
भविष्यातील काय करायला हवं आणि काय नको त्यावर गोपनीय स्वरुपाची सविस्तर चर्चा झाली. अनेक राजकीय, सामाजिक घडामोडीवर फक्त चर्चाच नव्हे तर काही ठोस निर्णय देखील घेण्यात आले आहेत. ते येत्या काळात दिसून येतीलच. ही चर्चा गोपनीय असल्याकारणाने त्यावर इथे अधिक सांगणे योग्य ठरणार नाही.



नेतृत्व योग्य, पण............
तर सर्वानी मला एक सुचना केली की, राग आवर. अजून खूप काही करू शकशील. नेतृत्व योग्य आहे, विचार योग्य आहेत. निर्णय घेण्याची क्षमता देखील योग्य आहे. पण कधीतरी तुला राग येतो आणि मग तू आर या पार ची भूमिका घेतोस. ती निश्चितच योग्य नाही. समर्थनीय नाही. शांत राहून निर्णय घेतलेस तर अधिक परिणामकारक ठरतील. तरी सर्वांच्या सूचनांचा मान राखून निश्चितपने बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा या बैठकीचा अजून एक फायदा. कारण मी कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहे हे मला प्रत्यक्ष सांगण्यात आलं.



अजून परिणामकारक धोरण
अजून परिणामकारक धोरण ठरविण्यासाठी लवकरच आगरी बाणाची अशीच अजून एक भेट आयोजित करण्याचा मानस बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात मांडण्यात आला.

धन्यवाद.
"आजुसचा नंगोट"
आगरी कवितांचा खजिना.


उपस्थित सर्व आगरी बाणा परिवाराकडून रामनाथ दादांचे धन्यवाद.
मला रामनाथ दादांचा कवितासंग्रह वाचायचा होता. त्यासाठी मी दादांना विनंती केली होती की, दादा येताना आपला कविता संग्रह घेऊन यावा. वरती फोटो आहेच बघा "आजुसचा नंगोट". अतिशय दर्जेदार अश्या आगरी कवितांचा खजिना. त्या मागची प्रेरणा कोणाची, त्या कविता संग्रहाची निर्मिती कशी झाली, काही अडचणी कश्या आल्या, पण अडचणींवर मात करीत हा कविता संग्रह प्रकाशित झाला, ह्या सर्व गोष्टी दादांनी आम्हां सर्वाना सांगितल्या. आणि "आजुसचा नंगोट" ह्या कविता संग्रहाची प्रत आम्हां सर्वाना दिली. तसेच आगरी संस्कृती सांगणाऱ्या काही व्हीसीडी देखील दिल्या. लवकरच त्या युट्युबवर पाहायला मिळतील. असा आगरी कवितांचा तसेच आगरी संस्कृती जतन करणाऱ्या व्हीसीडीचा खजिना आमच्यासाठी उघडून दिल्या बद्दल दादांचे मनापासून आभार. आपणा सर्वाना त्या कविता लवकरच आपल्या ब्लॉगवर वाचायला मिळतीलच तसेच युट्युबवर आगरी संस्कृतीचे अनोखे दर्शन देखील पाहायला मिळेल.


बैठकीची सांगता
ह्या संपूर्ण बैठकीत कधीच जाणवलं नाही की, आम्ही सर्वजण पहिल्यांदाच भेटतोय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक चालू होती. कोणत्याही प्रकारचे हेवे-दावे नव्हते. जे काही होत ते आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा. अश्या बैठकीच यशस्वी आयोजन केल्याबद्दल मनाला खूप मस्त वाटतंय. जे स्वप्न होत ते सत्यात उतरताना पाहताना खूप आनंद होतो. अजून खूप लांबचा टप्पा गाठायचा असला तरी पाया मजबूत होऊन सुरुवात चांगली झाली आहे. लोकनेते.मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या विचारांचं पाठबळ घेऊन भविष्यकाळात आमच्या हातून असचं कार्य घडत राहो ही आई एकविरेकडे प्रार्थना.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा.

बुधवार, २२ जून, २०११

पलाट इकला त आमी काय काय करू

पलाट इकला त आमी काय काय करू

आगरी कवी, गायक, संगीतकार श्री.रामनाथ म्हात्रे यांच्या शब्दातून साकारलेली ही कविता. जो माझ्या सारखा सच्चा प्रकल्पग्रस्त आहे, त्याला या कवितेतील भावना लगेच समजतील. आपल्याच लोकांच काहीतरी चुकत आहे याची जाणीव होईल. लोकनेते.मा,श्री.दि.बा.पाटील साहेब यांनी अनेक वर्षे लढा देऊन, ५ हुतात्म्यांच बलिदान देऊन, आमच्या जासई गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व कर्ते पुरुष महिनाभर तुरुंगात राहून, जासई नाक्यावर, जासई दास्तान फाट्यावर, पागोटे येथे झालेल्या आंदोलनात अनेकांनी मार खाऊन हे १२.५% मिळालेत. याची जाणत या लोकांना नाही. मग लाज वाटते, अशी लोक स्वतःला प्रकल्पग्रस्त म्हणून "मिरवून" घेतात तेव्हा. "मिरवून" हा शब्द समर्पक आहे या लोकांना. बायकांच्या अंगावर किलो-किलो सोना, उंची दारूच्या बाटल्या, मोठ-मोठी घरे, लाखोचे साखरपुढे, लाखोच्या हळदी, लाखोचे लग्न.............लाज वाटली पाहिजे अशा लोकांना प्रकल्पग्रस्त म्हणवून घेताना.

पाटील साहेबांनी, माझ्या कुटुंबांनी, अनेक शेतकरी कुटुंबांनी जेव्हा सरकारने केलेले हाल सहन केले तेव्हाच तुम्हांला १२.५% मिळालेत. १९८४ च्या लढ्याच्या वेळी माझी आई गरोदर होती, पण त्याही परिस्थितीत अनेक स्त्रियांच्या बरोबरीने ती लढ्यात होती. वरून पाटील साहेबांच्या सुना म्हणून तर माझी मोठ्याई आणि आई दोघीनाही पुढे राहणे भाग होते. पण त्यावेळी तुमचे आत्ता मी-मी करणारे नेते ***** शेपट्या टाकून पळून गेले होते, जनतेला वाऱ्यावर सोडून. जनता मरत होती, रडत होती, हाल सहन करत होती. पाटील साहेब खंबीर होते म्हणून सर्व नीट झालं. पण हा वटवृक्ष जर त्यावेळी कोलमडला असता तर आजचे दिवस कोणाला पाहायला मिळाले नसते. आपला वटवृक्ष नेहमी खंत व्यक्त करतो, पण डोळ्यावर पैशाची, नशेची झापड लावलेल्या समाजाला त्यांची खंत कधीच दिसून आली नाही.

बाकी त्या सर्व मिरवणाऱ्या लोकांना एकच सांगतो की, ही तुमची स्वतः कमवलेली मालमत्ता नाही. दुसऱ्या कोणत्याही नेत्याने नव्हे तर फक्त आणि फक्त दि.बा.पाटील साहेबांनी तुम्हांला मिळवून दिलेली मालमत्ता आहे. थोडीशी जांची नाही तर मनाची लाज असेल तर सुधारा!!!! माझ्या माणसाचं रक्त गेलंय यासाठी. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची आमोद पाटीलला जाणीव आहे. म्हणून तो बोंबलतोय की आत्ता तरी सोडा हे सर्व, सुधारा.....जर भविष्य घडवायचं असेल तर सुधारा नाही तर चालू द्या...........दारू...........साखरपुढे............हळदी...........



" या प्रकल्पग्रस्तांना सांगा अक्कल हाय कुठली????
लोका बाहेरशी येउनी आपले जीवावर उठली"




जय आगरी बाणा



पलाट इकला त आमी काय काय करू
पयल्या गारया झेव,घोरया झेव
एकीरेला जावून नवस फेरू
दोस्ताना झेवून फिरफिर फिरू
न पलाट इकला त आमी काय काय करू || १ ||

बार मदी जाव, दारू पीव
बारचे पोरीव लाईन मारू
त्यांचे बरोबर मज्जा करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || २ ||

सायटी झेव, न सप्लाय करू
शिरकोचे सायबाला दम भरू
प्री मान्सूनची काम नय दिली त तयाच मारु
न पलाट इकला त आमी काय काय करू || ३ ||

सायटीव जाव, न हाप्त झेव
हप्ता नय दिला त तंगरया तोरू
आवाज क्याला त शिरेस करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ४ ||

शिवा देव, न दुश्मनी करु
दुस्मनांचे घराव डगरा मारू
ऐशा नाना प्रकारच्या आवकरन्या करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ५ ||

श्री.रामनाथ म्हात्रे.
आगरी कवी, गायक, संगीतकार.



आपलाच
,

आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, २१ जून, २०११

Elder Citizen Abuse Awareness-ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय






"World Elder Abuse Awareness-ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय"
15 June-World Elder Abuse Awareness Day.
१५ जून-जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विषयक जागृती दिन.

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ. सिंगांनी मुलगा व सुनेला आपले घर खाली करायला सांगितले तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ते तिथेच राहत आहेत व डॉ. सिंगांचे हालही अजून चालूच आहेत.

१२९८ ह्या मुंबईतील हेल्पलाईन क्रमांकावर बांद्र्यातील एका निनावी व्यक्तीचा फोन आला. तिने सांगितले की एक वृद्ध महिला गेले ४ दिवस रस्त्यावर बेवारशी वावरत आहे व पावसाची गेले अनेक दिवस संततधार चालू आहे. त्या महिलेचे आरोग्य धोक्यात होते. हेल्पलाईनने १०९० ह्या पोलिस क्रमांकावर कॉल ट्रान्स्फर केला. कॉलनंतर १५ मिनिटांत पोलिसांची व्हॅन तिथे आली व त्या महिलेस हॉस्पिटलामध्ये दाखल करून तिचा जीव वाचविता आला.

ह्या दोन्ही केसेस इथे देण्याचे कारण म्हणजे नुकताच १५ जून रोजी "World Elder Abuse Awareness Day-जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विषयक जागृती दिन" पार पडला.

भारतात दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आयुर्वर्धमान तंत्रांमुळे म्हातार्‍या माणसांची संख्या वाढत आहे. सध्या भारतात ९० दशलक्ष वृद्ध व्यक्ती असून पुढील दशकात त्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यातील ३३% वृध्द हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर ७३% अशिक्षित आहेत किंवा शारीरिक श्रमांतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून आहेत. ह्या पार्श्वभूमीवर वृद्ध व्यक्तींचे हक्क, त्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अत्याचाराविषयी जागृती निर्माण होणे व त्यांना निरोगी, सुदृढ व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे येत्या काळातील मोठे आव्हान ठरणार आहे.

कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्यात आधुनिक काळात झालेले बदल लक्षात घेता कुटुंबातील वृद्धाचे स्थान व त्यांची देखभाल हे आता अडचणीचे ठरू लागले आहे ह्याचा पुरावा आपल्याला सध्याची परिस्थिती देते. घरात पूर्वी त्यांचे हवे-नको बघण्यासाठी जे मनुष्यबळ होते ते आता सर्व प्रौढ गृहसदस्य उपजीविकेच्या कामात गुंतल्यामुळे शक्य होत नाही. शहरांमध्ये राहण्याच्या अपुर्‍या जागा, महागाई, मनुष्यबळाची कमतरता व घरी कोणी नसणे यामुळे घरात वृद्ध व्यक्ती असणे हे सध्याच्या पिढीत लोकांना अडचणीचे वाटते हे वास्तव आहे. त्यातच आपापसांत न पटणे, इस्टेट - पैसा - जमीन जुमला इत्यादी संदर्भात भांडणे, गैरसमज वगैरेंची भर पडली की त्या घरातील वृद्ध व्यक्तीला तिथे राहणे म्हणजे एक ओझे वाटू लागते. बरं, शहरांतील वृद्धाश्रमाची किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या निवासांची व्यवस्था सर्वांनाच परवडते किंवा रुचते असे नाही. शिवाय वृद्धाश्रमांमध्येही सध्या प्रतीक्षा यादी असते.अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्ती अनेकदा अत्याचाराच्या बळी पडू शकतात.
जिथे विश्वासाचे नाते / अपेक्षा असते त्याला तडा जाणारी व वारंवार घडणारी कृती, ज्यामुळे वृद्ध व्यक्तीस शारीरिक/ मानसिक / भावनिक / आर्थिक इजा अथवा दु:ख होते त्याला वृद्ध व्यक्तीवर होणारा अत्याचार असे म्हणता येईल.

हे अत्याचार गरीब/ मध्यम वर्गीय/ श्रीमंत / सुशिक्षित / अशिक्षित/ कोणत्याही धर्म - जातींत घडू शकतात व घडत असतात. अनेकदा तीर्थक्षेत्री, मोठ्या शहरांमध्ये अगर वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना सरळ सोडून दिले जाते. किंवा त्यांच्याशी असलेला सर्व संपर्क तोडण्यात येतो. त्यांना घराबाहेर हाकलले जाते, किंवा अडगळीच्या जागेत डांबले जाते. शहरांत - खेड्यांत सर्रास आढळणारे हे प्रकार आहेत. वृद्धांवर कोणकोणत्या प्रकारे अत्याचार केले जातात हे सर्वप्रथम जाणून घेऊ.


हे अत्याचार म्हणजे :
१. शारीरिक छळ
२. मानसिक / भावनिक छळ (ह्यात शिवीगाळ होण्याचाही अंतर्भाव)
३. आर्थिक स्वरूपाचे / वस्तूंशी निगडित शोषण
४. दुर्लक्ष
५. लैंगिक छळ
६. वृद्ध व्यक्तीचा त्याग करणे
७. स्वतःकडे दुर्लक्ष करणे


वृद्ध व्यक्तींवर होणार्‍या अत्याचारांविषयी भारतातील काही बोलकी आकडेवारी :
  • जवळपास ५० % वृद्ध हे आर्थिक दृष्ट्या परावलंबी आहेत.
  • ३५% वृद्धांनी अत्याचाराचा कोणता ना कोणता प्रकार सोसला आहे. (अनादर, दुर्लक्ष, आर्थिक शोषण, शिवीगाळ)
  • जवळपास ३० % वृद्ध भावनिक आधार व मूलभूत सोयींच्या अभावापायी अत्याचाराचे बळी ठरतात. (अनुक्रमे ३०% व २९%)
  • ४०% वृद्धानं आपण दुर्लक्षित आहोत असे वाटते. आपले कुटुंबिय कामात किंवा त्यांच्या व्यापांत व्यस्त आहेत व त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे त्यांना वाटते.
  • ५०% पेक्षा जास्त वृद्ध त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध काही अ‍ॅक्शन घेण्यास राजी नाहीत, कारण त्यांना आपल्यावर अत्याचार होत आहेत ह्याचीच जाणीव नाही, आणि त्यांनी काही अ‍ॅक्शन घेतली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही ही भीती वाटते. तसेच समाज काय म्हणेल ह्याची भीती व भविष्यात आणखी अत्याचार सहन करावे लागतील ह्याची भीती. ह्या सर्वांमुळेही अत्याचार ग्रस्त व्यक्ती त्याविरोधात काही करण्यासाठी नाखूष असतात.
  • शहरांमधील वृद्धांचे सर्वसाधारण वय हे ६८ आहे. तर कोलकाता येथील ५४ % वृद्धांचे सर्वसाधारण वय ७०+ वर्षे आहे.
  • तीन पंचमांश वृद्धांचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे.
  • ५७% पेक्षा जास्त वृद्ध आपल्या मुलावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत. तर एक चतुर्थांश वृद्ध आपल्या जोडीदारावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत.
  • अत्याचार करणारे लोक घरातीलच असतात. (मुलगा, सून, मुलगी, जावई इत्यादी). काही ठिकाणी नोकरांकडून अत्याचार होतात. बर्‍याचदा अत्याचार होण्याचे कारण प्रॉपर्टी विषयक वाद, मतभेद इत्यादी असते. (३५% वृद्ध)
  • अत्याचाराविरुद्ध तक्रार केलेल्यांपैकी ३३% वृद्धांनी तक्रारीनंतर काहीच झाले नाही असे सांगितले, तर २७ % वृद्धांनी पोलिसांनी घरी भेट दिल्याचे सांगितले.
  • वृद्धांविषयीचे कायदे, योजना, कल्याण कार्यक्रम तसेच मदत करणार्‍या संघटना, त्यांची भूमिका - कार्य ह्यांविषयी वृद्धांमध्ये जागरूकतेचे प्रमाण तुलनेने खूप कमी आढळले. (जेमतेम ३३%)


वृद्धांनी मदत संघटनांकडून ह्या प्रकारची मदत मिळावी असे सुचविले :
१. घरी येऊन भेट देणे.
२. सुरक्षा पुरविणे.
३. पोलिसांनी मुलांकडून मेन्टेनन्स मिळण्यासाठी ( The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizen’s Act) मदत करावी.



वृद्ध व्यक्तींना सहन करावा लागणारा अत्याचार रोखण्यासाठी वृद्धांनीच सुचविलेले उपाय :
१. वृद्धांना नियमित व पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
२. कुटुंबियांशी तडजोड / मतभेद मिटविणे.
३. आर्थिक परावलंबित्व टाळण्यासाठी स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी बाळगणे.
४. मानसिक आधार, मदत ह्यासाठी आवश्यकतेनुसार वृद्धांचे व कुटुंबियांचे समुपदेशन.




मदत संस्था / संघटना कशा प्रकारे वृद्धांना साहाय्य करू शकतात?
  • वृद्धाश्रमांची माहिती देणे. तसेच परवडणार्‍या वृद्धाश्रमात प्रवेशासाठी मदत.
  • वृद्धांना कायदेशीर बाबींमध्ये मदत.
  • अत्याचार रोखण्यासाठी घरी भेट देणे, मदत करणे.
  • वैद्यकीय देखभाल करणारी व्यक्ती / केअर टेकर मिळविण्यासाठी मदत.
  • वृद्धांचे हक्क, त्यांच्याविषयीच्या सरकारी योजना, कार्यक्रम, मदत सुविधा, मदत संस्था इत्यादींविषयी जागृतीसाठी मदत.



वृद्धांना मदत करणार्‍या संस्थांची ही काही संस्थळे :

हेल्प एज इंडिया :
* http://www.helpageindia.org/

हार्मनी इंडिया :
* http://www.harmonyindia.org/

सिल्व्हर इनिंग्ज :
* http://www.silverinnings.com/
* http://silverinnings.blogspot.com/


मेन्टेनन्स वेल्फेअर ऑफ पेरन्ट्स अ‍ॅन्ड सिनियर सिटिझन्स अ‍ॅक्ट, इंडिया (हिंदी) :
(माता - पिता और वरिष्ठ नागरिकोंका भरणपोषण तथा कल्याण अधिनियम, २००७.)

http://www.voice4india.org/wp-content/uploads/2009/03/maintenance-and-welfare-of-parents-and-senior-citizens-act-2007-hindi1.pdf

  • ह्या कायद्यानुसार ''बालक'' म्हणजे मुलगा, मुलगी, नातू, नात हे आहेत.
  • भरणपोषण ह्याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय मदत व उपचार असा आहे.
  • माता-पिता म्हणजे परिस्थितीनुसार जैविक, दत्तक, सावत्र माता-पिता. ते वरिष्ठ (ज्येष्ठ) नागरिक नसले तरी.
  • ह्या कायद्यानुसार वरिष्ठ नागरिक म्हणजे भारताचे वय वर्षे साठ पूर्ण केलेले नागरिक.
  • जे माता-पिता आपल्या वृध्दापकाळात आपल्या उत्पन्नातून अथवा संपत्तीतून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत त्यांना आपल्या सज्ञ अशा मुलगा/ मुलगी/ नातू/ नात यांकडून योग्य भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो, जेणे करून त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येईल. नि:संतान ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट स्थितीत आपल्या नातेवाईकांकडूनही भरणपोषणाचा हक्क हा कायदा देतो.

मदतीसाठीचे काही दूरध्वनी क्रमांक :

पुणे

पुणे पोलिस ज्येष्ठ नागरिक मदत दूरध्वनी क्रमांक : १०९१

डिग्निटी हेल्पलाईन : ०२०-३०४३९१००

मुंबई

मुंबई पोलिस ज्येष्ठ नागरिकांसाठी : १०९०, १०३

डिग्निटी हेल्पलाईन :०२२ - ६१३८११००

हेल्प एज इंडिया : २६३७०७४०, २६३७०७५४
ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन : २३८९८०७८, २३८९८०७९

जसे वृध्दांनी येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ होणे गरजेचे आहे तसेच नव्या पिढीनेही वृध्द व्यक्तींची कौटुंबिक व सामाजिक जीवनात असलेली उपयुक्तता, त्यांचा समृध्द जीवन-अनुभव हे ध्यानात घेऊन त्यांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने पसरलेल्या जाळ्यामुळे कुटुंबातील माणसांनी एकमेकांपासून दूर न जाता त्याचा आपले संबंध सशक्त करण्यासाठी वापर करणेही तितकेच आवश्यक आहे. तरुणाई ह्या कामी विशेष प्रयत्न करु शकते व करत आहे. मोठ्या शहरांमधून अनेक युवा गट आणि ज्येष्ठ नागरिक मदत गट संयुक्त विद्यमाने वृध्दांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. परंतु मुळातच घरातील विसंवाद टाळले, एकमेकांना सामावून घेत थोडी तडजोड केली व म्हातारपणाच्या दृष्टीने योग्य आर्थिक तरतूद केली तर बाहेरून मदत घेण्याची वेळ येणार नाही. वृध्दत्वात येणारे नैराश्य, एकटेपण, शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य यांसाठी वेळीच वैद्यकीय उपचार केले, समुपदेशन घेतले तर त्यामुळेही पुढील समस्या टळू शकतील.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, ७ जून, २०११

आमच्या गावांची सावरखेड एक गाव सारखी परिस्थिती


आजकाल भीती वाटते
परवाच माझ्या जवळच्या माणसांपैकी एकाचा मोबाईलवर मेसेज आला की,"आमच्या वरती राहणारे एक काका काल रात्री २.३० च्या सुमारास लग्न वरात आटोपून उरणवरून पनवेल कडे येत होते, तेव्हा नवघर फाटा येथे त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न दरोडेखोरांकडून करण्यात आला. गाडीवर चाकूचे वर करण्यात आले, टायरवर चाकूचे वर केले, त्यावेळी पाऊस पडत होता म्हणून गाडीच्या काचा बंद ठेवल्या होत्या. गाडीत त्याचं सर्व कुटुंब होत. थोडे पुढे गेल्यावर गाडीचा टायर देखील फुटला. पण तिथे माणसे होती, आणि हे दरोडेखोरांच्या लक्ष्यात आल्यावर ते तेथून निसटले. हल्ली अश्या खूप घटना घडत आहेत. त्या का घडत आहेत? खूप भीती वाटते."

हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. पण गेल्या काही दिवसात आपल्या परिसरात घडलेल्या घटनांमुळे भीती वाटणे स्वाभाविक आहे.

बातमी क्रमांक.
दरोडेखोरांचा हल्ला; आई-मुलगा ठार
२८ मे,२०११
"कुटुंबातील चौघांवर प्राणघातक हल्ला करून दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना पनवेलमधील पळस्पे भागात शनिवारी पहाटे घडली. या हल्ल्यात आई आणि मुलगा जागीच ठार झाले असून वडील आणि मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी पहाटे चिखले गावातील गणेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून दरोडेखोरांनी घरातील ऐवज लुटला होता.

पनवेलमधील पळस्पे येथील गणेशवाडी भागात बाळाराम फुलोरे हे पत्नी रमाबाई फुलोरे (४७), मुलगा संदीप फुलोरे (२२), मुलगी स्वप्नाली (१८) यांच्यासह राहतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास फुलोरे कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. फुलोरे कुटुंबीयांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चौघांवरही प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील लाखोंचा ऐवज लुटून पोबारा केला.

शनिवारी सकाळी फुलोरे यांचे जावई घरी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळले. ते घराच्या मागील बाजूस गेले असता त्यांना पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. घरात कुटुंबातील चौघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी तत्काळ पनवेल पोलिसांना कळविले. पनवेल पोलिसांनी पाहणी केली असता रमाबाई फुलोरे आणि मुलगा संदीप हे दोघेही ठार झाल्याचे आढळून आले. तर बाळाराम फुलोरे आणि त्यांची स्वप्नाली यांना तत्काळ पनवेलमधील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृती चिंतानजक आहे. एकूण किती दरोडेखोर घरात घुसले होते आणि त्यांनी किती किमतीचा ऐवज लुटून नेला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे."


बातमी क्रमांक.
ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोर यमसदनी
३० मे,२०११
"गेल्या काही दिवसांत पनवेल भागात दरोडेखोर आणि चोरांनी धुमाकूळ घातला असताना, चिखले गावात रविवारी पहाटे हाती सापडलेल्या दोघा चोरांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यात एक चोराचा मृत्यू झाला असून, दुसरा जायबंदी झाला आहे.
पनवेलजवळील पळस्पे येथे शनिवारी पहाटे फुलारे कुटुंबातील चौघांवर चोरांनी प्राणघातक हल्ला करून दोघांचा जीव घेतला आणि लाखोंचा ऐवज लुटला. या पार्श्वभूमीवर चिखले गावात रविवारी पहाटे गस्त घालणाऱ्या तरुणांना बीएआरसी कॉलनीच्या गेटजवळ चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पाठलाग करताच ते पळ काढू लागले. त्यातील किरण शिंदे आणि राजू भोसले हे दोघे सापडले. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत किरण जागीच ठार झाला. जखमी राजूला वाशीतील महापालिका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नवीन पनवेल पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात याच चिखले गावातील महिलेचा कान कापून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटून नेला होता
गेल्या काही दिवसांत पनवेल भागात दरोडेखोर आणि चोरांनी धुमाकूळ घातला असताना, चिखले गावात रविवारी पहाटे हाती सापडलेल्या दोघा चोरांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यात एक चोराचा मृत्यू झाला असून, दुसरा जायबंदी झाला आहे. चिखले जवळील पळस्पे येथे शनिवारी पहाटे फुलारे कुटुंबातील चौघांवर चोरांनी प्राणघातक हल्ला करून दोघांचा जीव घेतला आणि लाखोंचा ऐवज लुटला. या पार्श्वभूमीवर चिखले गावात रविवारी पहाटे गस्त घालणाऱ्या तरुणांना बीएआरसी कॉलनीच्या गेटजवळ चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पाठलाग करताच ते पळ काढू लागले. त्यातील किरण शिंदे आणि राजू भोसले हे दोघे सापडले. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत किरण जागीच ठार झाला. जखमी राजूला वाशीतील महापालिका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नवीन पनवेल पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात याच चिखले गावातील महिलेचा कान कापून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटून नेला होता"

तर बातमी क्रमांक. च्या आत मध्ये देखील अजून एक बातमी आहे, जी मला त्या गावात राहणाऱ्या माझ्या मित्रांकडून मिळाली. त्या दरोडेखोरांकडून धमकी देण्यात आली आहे की, तुम्ही आमचे मारलेत, आम्ही तुमचे २० मारू. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्री स्वतःच्या राहत्या घरात राहून देखील झोपणे मुश्किल झालंय.

या समस्येवर फेसबुकवर चर्चा करता अशीच परिस्थिती ठाणे,कल्याण, डोंबिवली येथी ग्रामीण भागात देखील आहे. पण पोलीस आणि राजकीय नेते मात्र एकमेकांकडे बोटे दाखवून आपापली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या घटना गेले ७-८ महिने जोम धरून आहेत. तरीदेखील आजपर्यंत पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही???????? उरण परिसरातील अनेक गावात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात घरफोडीच्या घटनांना उत आलेला असताना देखील पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका आजही आम्ही ग्रामस्थ विसरलो नाहीत. उलट धुतूम या गावात राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी ग्रामस्थांना अक्षरशः धो-धो धुतले. अनेकांची डोकी फोडली, हात तोडले. पण याची नोंद कोणीच घेतली नाही. त्यांची चुकी इतकीच होती की, संशय घेऊन त्यांनी एका गावाबाहेरच्या व्यक्तीला जो गावात संशयास्पद रीतीने फिरताना आढळला होता, त्याला बेदम मारला. हो आम्हांला माहित आहे की, हे काय"द्या"चं राज्य आहे. जर तुम्ही अगोदरच त्या चोरांना पकडून दिले असते, तर ही वेळ आली नसती. नंतरची घटना आमच्या गावातील. एका रात्री आमच्या गावातील घरे फोडली. मग दुसऱ्या दिवशी पोलीस आले पण त्यांना त्या घटनेशी लेन-देन नव्हतचं. त्यांनी तीच जुनी टेप वाजवली. कायदा हातात घेऊ नका, हे करू नका, ते करू नका. ग्रामस्थांना कृती हवी होती, भाषण नव्हे. आजतागायत ते चोर पकडले गेले नाहीत. यावरून पोलिसांची लायकी दिसून येते. आत्ता ही पनवेलची घटना झाली, त्यावेळी देखील पोलिसांनी असमर्थता दर्शविली. त्याचं म्हणने असे होते की, आम्ही त्या दरोडेखोरांच काही करू शकत नाही. ते क्रूर आहेत. तुम्ही सरकारकडून राज्य राखीव दलाची कुमक मागवावी. अहो मग तुम्ही कशासाठी??????????? फक्त हफ्ते खाण्यासाठी का?????????? राजकारणी देखील फक्त भाषणे ठोकून मोकळे झाले, आम्ही असे करू, तसे करू. अरे पण कधी???????? आमच्या लोकांचे अजून मुडदे पडल्यावर. तुमचं बर आहे. तुमच्या जवळ बॉडीगार्ड आहेत, तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुखात झोप घेत आहात. पण माझ्या सामान्य माणसंच काय????????????? आहे का कोणा राजकारण्याजवळ अथवा पोलिसांजवळ यांच उत्तर??????????? जनतेचे सेवक म्हणून मिरवताना लाज वाटायला हवी तुम्हांला.

माझ्या काही सुचना:
आलेली घटना टाळू शकत नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून सावध तरी राहू शकतो.

सावध रे...!
सध्याचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेकदा बेसावधपणे वागतात. अनेकदा त्यांच्या हातून नकळत काही चुका होतात. त्याचाच फायदा गुन्हेगार उठवीत असतात. गुन्हा घडल्यावर पोलिसांत तक्रार करून उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे आपणच थोडीशी सावधगिरी बाळगली, तर फसले जाण्याचे प्रकार टाळता येऊ शकतात. त्यासाठी या काही "टिप्स'.

घराबाहेर पडताना...

- घराचे कुलूप दणकट असल्याची खात्री करावी.

- जास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी.

- बाहेरगावी कोठे जाणार, तेथील संपर्काचा क्रमांक द्यावा.

- दागिने अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.

- रात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहील अशी व्यवस्था असावी.


प्रवास करताना....

- बसमध्ये बॅगा व्यवस्थित "लॉक' करून ठेवाव्यात.

- मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा शक्‍यतो जवळच ठेवाव्यात.

- अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत.

- जादा सलगी करू पाहणाऱ्या सहप्रवाशापासून सावध राहावे.

- गर्दीत बसमध्ये चढताना आणि उतरताना खिसेकापूपांसून सावध.

- अपरिचित भागातून रात्रीचा प्रवास टाळावा.

- अनोळखी व्यक्तींना "लिफ्ट' देऊ नये.


सदासर्वदा सावधान...

- बॅंकेतून मोठी रक्कम काढताना विश्‍वासू व्यक्तीस बरोबर घेऊन जावे.

- रोख रक्कम वाहनाच्या डिकीत ठेवू नये.

- पैसे काढल्यावर बॅंकेच्या आसपास कोठेही न थांबता सरळ निघून यावे.

- रस्त्यात पडलेली चिल्लर उचलण्याचा मोह टाळावा.
- आपल्या हातातील ऐवज कोणाही परक्‍या व्यक्तीच्या हाती देऊ नये.

- महिलांनी घराबाहेर पडताना दागिन्यांची काळजी घ्यावी.

- बॅंका, पतसंस्था, पेट्रोल पंप, व्यापारी पेढ्या यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

- नोकर ठेवताना त्याची संपूर्ण चौकशी करावी.

- अडचणीच्या प्रसंगी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेचा नेमका तपशील व चोरट्यांचे वर्णन सांगावे.
किमान दक्षता
- गुन्ह्याला सामोरे जावे लागल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

- चोरट्याचे वर्णन, भाषाशैली, लकब आदी तपशील लक्षात ठेवावा.

- अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याचे वर्णन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

- रस्त्यात कोणी विनाकारण थांबवत असेल तर, थांबणे टाळावे.

- अंगावर घाण टाकूण किंवा पैसे पडल्याचे सांगून कोणी लक्ष विचलित करीत असेल तर, जवळचा ऐवज पहिल्यांदा सांभाळा.

- अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे.

- विनाकारण कोणी ओळख काढून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या व्यक्तीला दूर ठेवा.

आपलाच,
आमोद पाटील.
युवा.
आगरी बाणा.