आमोद पाटील-आगरी बाणा: स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

© Photo Copyrights: Hrishikesh Thakur


जागतिक महिला दिन विशेष:स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

१९०८ साली न्यूयॉर्क येथील महिलांनी न्याय, हक्क, सुरक्षितता आणि समान संधी यांची मागणी केली आणि त्यांना त्यांचा हक्क मिळाला. पण, आज २१ व्या शतकात देखील भारतातील महिलांना त्यांचा हक्क नाकारला जातोय.

८ मार्च १८५७ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, या आंदोलनाची तीव्रता इतकी अधिक होती की, जागतिक स्तरावर देखील याचे पडसाद उमटू लागले. १९०८ साली न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर महिलांनी त्यांच्या "कामाच्या जागी सुरक्षितता आणि चांगली वागणूक" या दोन प्रमुख मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने निदर्शने केली.

त्या घटनेनंतरच्या १५६ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही आपल्या भारतात काही अपवाद वगळता त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. कामाच्या ठिकाणी पुरुषांना अधिक मानधन, अधिक मानसन्मान, बढतीमध्ये पुरुषांचा अधिक विचार अश्या गोष्टी अजूनही दिसून येतात. २०१३-१४ च्या वित्तीय अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री श्री.पी.चिदंबरम यांनी खास महिलांसाठी स्वतंत्र बैंकेची घोषणा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करून करून सरकारच्या दृष्टीने सुरक्षित पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्ली बलात्कार घटनेनंतर महिलांबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा घडताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखिल भारतातील विविध राज्यातून महिलांच्या विटंबनेच्या घटना समोर येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार २०१३ या वर्षातील पहिल्या दोन महिन्यात जवळपास १८२ बलात्काराच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी आहे. ही फक्त नोंद केलेल्या घटनांची आकडेवारी आहे. दुर्गम भागात अश्या किती कळ्या दररोज निस्तेज होत असतील याचा विचार करवत नाही. दिल्ली येथे मिडीयाच्या क्रेन्स उपलब्ध असतात त्यामुळे त्या घटनेला जवळपास १०-१२ दिवस २४*७ करून सबसे तेज करून टाकले जाते. महाराष्ट्रात भंडारा येथे घडलेल्या घटनेची १५ दिवसापर्यंत कोणत्याही हिंदी अथवा इंग्लिश मिडीयाने नोंद घेण्याचे कष्ट घेतले नव्हते. जेव्हा लोकसभेत हा प्रश्न मांडला गेला तेव्हाच त्यांचे लक्ष महाराष्ट्रातील घटनेकडे वेधले गेले.

एका बाजूला शहरी भागातील महिलांचा स्त्रियांच्या समान हक्कांसाठी, सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रस्थापित पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध लढा चालू आहे. भारत सरकारचा अंतरिक्ष कार्यक्रम चालू आहे, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. सरकार लढाऊ विमानांसाठी हजारो करोड रुपयांची तरतूद करते, जी अनेक वेळा दुर्घटनाग्रस्त होतात. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील महिला योग्य शिक्षण, दैनंदिन गरजा, आवश्यक स्वच्छता आणि पानी या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत.

महिला आणि मुलींसाठी एक करियर नेहमीच तयारीत असते. त्या संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही मोबदल्याशिवाय पानी भरणे, जेवण बनवणे आणि धुणीभांडी करने ह्यात व्यतीत करतात. शालेय शिक्षण हे तर नावालाच दिले जाते, अनेक भागात शाळा हे प्रकरण लग्नाच्या अगोदर वेळ घालविण्यासाठी केलेली तरतूद इतपतच असते. या प्रकाराला आजच्या काळात अपवाद निर्माण झालेले आहेत. शाळा मागे पडली असली तरीदेखील कॉलेजनंतर लग्न हे देखील याचं प्रकारात मोडतं.

ग्रामीण भागातील बँका आणि ग्रामीण भागाला कर्जपुरवठा हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील धनिकांना SUV वैगेरे खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मुख्य प्रवाहातील बँका महिलांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज अनेक सहकारी बँका पुढे येत आहेत. ठोक विक्रेते, घरगुती नोकर, शेतमजूर अश्या असंघटीत आणि अपरिचित क्षेत्रात ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत आणि ह्याच क्षेत्राला सर्वात जास्त पैशाची गरज असते.

सातारा जिल्ह्यांमध्ये, चेतना गाला सिन्हा यांच्या माणदेशी महिला बँकेच्या आज अनेक ठिकाणी शाखा निर्माण झालेल्या आहेत, ग्रामीण महिला सक्षमीकरण ह्या एकमेव उद्देशाने माणदेशी महिला बँकेची स्थापना करण्यात आली होती. चेतना गाला सिन्हा सांगतात की, "महिलांच्या बँकेला परवानगी मिळणे की काही सोपी गोष्ट नव्हती, आणि प्रामुख्याने त्यातील सदस्य अशिक्षित असताना तर परवानगी मिळवणे कठीण गोष्ट होती. बँकेची नोंदणी करण्यास नकार देण्यात आला. परंतु महिलांनी हार मानली नाही. त्यांनी तेथील व्यवस्थापनातील वाणिज्य शाखेतील पदवीधराना गणकयंत्र(कैलकुलेटर) शिवाय अवघड स्वरूपातील व्याजाची रक्कम काढण्यास सांगितली. परंतु कोणालाही ती रक्कम काढणे जमले नाही याउलट महिलांनी ती रक्कम सहजरीत्या काढली. बँकेला परवानगी देण्यात आली आणि महिलांनी ३ रुपयांच्या अधिक रक्कम ठेव म्हणून ठेवली. अश्या प्रकारे बँक चालविणे नक्कीच सोपे नव्हते."

ग्रामीण भागातील शाळांना सोयीसुविधांचा अभाव आहे, तेथील शिक्षक देखील जबाबदारीने वागताना दिसून येत नाहीत, शाळांच्या इमारती ह्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत, शाळेमध्ये स्वच्छतागृह असणे ही आश्चर्याची गोष्ट असते. घरकाम आणि भावंडांची देखभाल करने या कारणांमुळे मुलींचे शाळेमधून गळती होण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना दिवसाचा भत्ता पुरुषांच्या मनाने खुपच कमी मिळतो आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थावर होतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामधील अनेक आदिवासी जमातीपैकी एक असलेल्या कोरकू जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण देशाच्या इतर भागातील तुलनेत खूप अधिक आहे. पैशाच्या अभावी या महिलांना प्रसुती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतावर कामावर जावे लागते. प्रसूतीनंतर मिळणारी रजा वैगेरे गोष्टी यांच्यासाठी अलिशान मौजमजा या प्रकारात मोडतात. जर त्या महिलांनी काम केलं नाही तर त्या भुकेने व्याकुळ होवून मरून जातील. त्यांची मुले कुपोषित आणि कमी वजनाची जन्माला येतात. यापैकी अनेकजण वर्षभर देखील जगत नाही.

दिल्ली बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या अनेकांना इरोम शर्मिला किंवा सोनी सोरी किंवा यांच्यासारख्या शेकडो महिलांविषयी काहीच माहिती नसते. काश्मीर, उत्तर पूर्वेकडील राज्ये, मावोवादी, नक्षलवादी विभागातील महिलांना सुरक्षा यंत्रणांकडून त्रास सहन करावा लागतो. पण सुरक्षा यंत्रणांच्या धाकामुळे अशा घटना देशासमोर येत नाहीत.

जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात तेव्हा, चकचकीत मिडिया आणि जाहिरात क्षेत्र महिलांमध्ये असलेल्या भीतीचे खाद्य करून स्वतःच्या झोळ्या भरण्याचे उद्योग करत असते. टीव्हीवर कशा प्रकारच्या जाहिराती देत असतात हे आपणा सर्वांना माहिती आहेच. महिलांना शोभेची वस्तू म्हणून वापर घेतला जातो. गरज असो-नसो शोभेच्या बाहुल्या ह्या हव्यातच असा या क्षेत्राचा समज आहे. डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये भपकेबाजपणा.

या भपकेबाज दुनियेत, पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध, सामाजिक सुरक्षिततेसाठी, चांगल्या मानधनासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याची वाट बिकट आहे. तरुण पिढी आश्वासक असली तरी, महिलांमधील असुरक्षिततेची भावना सर्व ठिकाणी वाढू लागली आहे. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, लोकलमध्ये, बसमध्ये कधी काय होईल याची कोणीही खात्री देत नाही. सुरक्षा व्यवस्था आश्वासक नाही. गोरे असणे, सडपातळ असणे किंवा तरुण असणे हा  आजच्या गुन्हेगारी आणि निर्दयी जगतात अपराध आहे, अशाच गोष्टी आजूबाजूला घडत आहेत.

अजून काही काळानंतर पेपर स्प्रे सारखे प्रकार महिलांच्या पर्समध्ये सहज दिसू शकतील. पण ह्या प्रकारांची गरजच का भासतेय याचा यंत्रणा कधी विचार करणार आहेत. न्यूयॉर्क येथे साहसी आंदोलन करणाऱ्या महिला आजची परिस्थिती पाहून जरूर निराश असतील. ८ मार्च ह्या एका दिवशी स्त्रियांचे गोडवे गाणारा समाज, वर्षातील ३६४ दिवस मात्र स्त्रियांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक छळ करण्यास मोकळा..........

आपलाच,
आमोद पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा