आमोद पाटील-आगरी बाणा: माझे गावांन बिल्डर आयलाय! (Majhe Gavan Builder Aaylay)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १० जुलै, २०१२

माझे गावांन बिल्डर आयलाय! (Majhe Gavan Builder Aaylay)
माझे गावांन बिल्डर आयलाय!

खाडींचा शेत माझा जाम भारी व्हता!
भाताचा कणगा न् खला भी व्हता!
पण आता बदल जाम झायलाय!
माझे शेताचा सौदा झायलाय!
आता फुकटचा पैसा आयलाय!
माझे गावांन बिल्डर आयलाय!

गायक जगदीश पाटील यांनी त्यांच्या बोलीभाषेतील गाण्यातून ठाणे-रायगड जिल्ह्यातील लाखो भूमिपुत्रांची जणू काही कहाणीच मांडली आहे. वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण होणारे आणि शहराला सूज आली आहे असे भासणारे अनिर्बंध नागरिकीकरण, औद्योगिकीकरणामुळे शेतीमध्ये झालेले रासायनिक सांडपाण्याचे प्रदूषण... कारणे काहीही असोत, बहुतांश शेती नष्ट होऊन गेल्या तीन दशकांमध्ये प्रथम चाळसंस्कृती आणि आता इमारतींचे इमले डोंबिवली-कल्याण परिसरात देखील उभे राहिले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
या परिसरात २७ गावे आणि २६ ग्रामपंचायती येतात. १९६५ ते १९६८ च्या सुमारास भोपर, देसलेपाडा, सागांव, सांगर्ली, सोनारपाडा, मानपाडा, आजदे, खंबालपाडा व आजूबाजूच्या परिसरांत विविध कारखाने येण्यास सुरुवात झाली. यामध्ये टेक्स्टाईल्स, केमिकल व फार्मास्युटिकल कारखान्यांचाच भरणा होता. या औद्योगिक पटट्य़ामुळे मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण सुरू झाले. रासायनिक सांडपाण्याने शेतीबरोबरच येथील खाडीचा पट्टा प्रदूषित केला.

सागांव येथील जुने रहिवासी प्रकाश म्हात्रे सांगतात की कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचा पाडा, कुंभारखाण पाडा, चोळागाव, ठाकुर्ली, खंबाळपाडा, सोनारपाडा, पाथर्ली, आयरेगाव ही ३५-४0 वर्षांपूर्वीची डोंबिवली शहराच्या वेशीवर असणारी गावे. एकेकाळी तिथे मोठय़ा प्रमाणावर भातशेती व्हायची. ती आता नष्ट झाली आहे. औद्योगिक पटट्य़ामुळे येथे कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणावर आला. नागरीकरणाच्या या बदलाचे स्वागत येथील भूमिपुत्रांनी आपल्या शेतजमिनींवर चाळींचे साम्राज्य बांधून केले. बहुतांश भूमिपुत्र वर्षातून दोन पिके घेत असत. ही दोन पिके घेतल्यानंतर पुढील वर्षाचे पीक घेण्यासाठी जमीन रणरणत्या उन्हात तापणे आवश्यक असते. प्रत्येक भरतीच्या वेळी खाडीचे पाणी शेतात शिरायचे व खाडीतल्या रासायनिक सांडपाण्यामुळे जमीन नष्ट व्हायला सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम पिकावर व्हायला लागला.
१९८0 पासून शेती कमी व्हायला लागली. नवीन पिढीतील तरुणांचा ओढा शिक्षणाकडे लागल्यानंतर अंगमेहनतीने स्वत:च्या घरच्या शेतीत राबणारे हातही कमी झाले आणि शेतात काम करणारे मजूरदेखील परवडेनासे झाले, असे म्हात्रे सांगतात.

शेतीबरोबरच मासेमारीचाही व्यवसाय होता. दिवा, दातिवली, आगासन, भोपर, कोपर, आयरे, नांदिवली या खाडीलगतच्या गावांत मासेमारीचा मोठा व्यवसाय होता. खाडीतल्या रासायनिक प्रदूषणाने मासेमारीदेखील बंद पडली.
■ कल्याणातील गांधारी, खडकपाडा, वायलेनगर, गोदरेज हिल, बारावे या हिरव्यागार परिसरात भव्य कॉम्प्लेक्समुळे दुसरे कल्याण उभे राहत आहे.
■ कल्याण ग्रामीण परिसरात उंबर्डे, सापर्डे, कोळवली या परिसरात काही प्रमाणात शेती केली जाते.
■ सध्या बी पेरणी सुरू झाली असून, त्यानंतर नांगरणीची कामे सुरू होणार आहेत.
■ गांधारी येथे राहणार्‍या सुरेश भंडारी या कुटुंबीयांची यंदाची शेवटची शेती आहे. त्यांची जमीन बिल्डरला विकण्यात आली आहे. सध्या बिल्डरने काम सुरू केले नसल्याने शेवटची शेती लावली जात असल्याचे भंडारी यांनी सांगितले. प्रदूषित झालेल्या जमिनीत शेती तर होत नाहीच, पण दोन पिके जिथे निघायची, तिथे एक पीक मुश्किलीने काढायचे. त्यासाठी लागणारा शेतीत काम करणारा मजूर महागात घेऊन यायचा. त्यापेक्षा चांगला आणि बक्कळ पैसा कमवून देणारा त्याच जोडीला आजूबाजूच्या परिसरात मान मिळवून देणारा रिअल इस्टेटचा धंदा नव्या पिढीला मिळाला. वाडवडिलांपासून मालकीची असलेली जमीन व त्यावर चढणारे इमारतींचे इमले म्हणजे या नव्या पिढीची स्वप्न पूर्ण करणारी दैवी देणगीच होती. १९८५ नंतर तर मुलुंड, घाटकोपर भागांतील बिल्डरने या भूमिपुत्रांवर आपले जाळे फेकायला सुरुवात केली. अनेक जण मग या बिल्डरबरोबर भागीदार झाले, तर काहींनी स्वत:च बिल्डर होऊन इमारती बांधायला सुरुवात केली. रेती, वाळू व विटांचा पुरवठा असा जोडधंदा पण मग अनेकांनी सुरू केला.

सौजन्य:(लोकमत-हेल्लो ठाणे आवृत्ती)

1 टिप्पणी: