आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी समाजातील लग्नसमारंभ:बदल हवाच

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, ११ मे, २०११

आगरी समाजातील लग्नसमारंभ:बदल हवाच

AGRI SAMAJ
AGRI SAMAJATIL LAGN-SAMARAMBH

पूर्वीचे कालान लग्नांना मजा असाची,
पंगती वाराला आजीस होती, काकीस होती, मामीस होती, आईस होती बाईस पुन होती,
पाणी देवाला पावणे मांडली होती,
इचारपूस कराला डोकरी माणसा होती,
आता मात्र ताटल्या झेवूनशी कुत्र्यासारखा आखर-तखर फिराचा,
जया जागा भेटल तया फतकाल मांडाचा,
त्याचा पापर याचे घशान,
याचा भात त्याचे ताटान,
सगला कसा येर्यासारखा चाललाय,
पैसा आयला,
पुन माणसा मराला लागली,
नको ती नाती जोराला लागली.
ये नवे काळांची लग्ना चालालीन काय..............???????????

सुरुवात
सुरुवात होते मुलगा अथवा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातूनच. मुलगी पाहण्यासाठी मुलगा त्याची आई, वडील किंवा अन्य नातेवाईकांसह मुलीच्या घरी येतो. त्यावेळी यांचा रुबाब पाहण्यासारखाच असतो. जसे हे कुठे देशासाठी युद्धात लढून देशाच्या सीमेवर झेंडे लावून आलेत आणि त्यांना त्याचा खूप अभिमान झालाय. मुलगी पाहण्याचा सोपस्कार पार पडल्यानंतर ही मंडळी काही वेळा तिथेच तर बहुतेकदा एका दिवसानंतर काय देणार प्लॉट की ब्लॉक, तुमच्या नावावर जमिनी किती आहेत, मुलीला अंगावर सोने किती देणार, तुमचे वडील कुठे कामाला आहेत, नसल्यास त्यांचा उद्योगधंदा कोणता, नोकरीत अथवा उद्योगातून कमाई किती, मुलगी किती शिकलीय, नोकरीला कुठे आहे, नोकरीला नसल्यास नोकरीला का नाही, नोकरीला लावणार आहात का, तुमची कोणा राजकीय नेत्याबरोबर ओळख आहे का, कारण आमचा राजपुत्र अजून कुठेही नोकरीला नाही, त्याला नोकरीवाली बायको आम्ही शोधतोय आणि जर तुमची कुठे ओळख-पाळख असेल तर याला तसेच तुमच्या मुलीला नोकरीला लावा. मग आम्ही लग्नाला तयार आहोत. असे प्रश्न सर्रास आपल्या आगरी समाजात गेल्या ४-५ वर्षापासून विचारले जात आहेत. कोणीही कितीही फुशारक्या मारल्या की आमच्या आगरी समाजात हुंडा घेत नाही, तर त्याला मी उदाहरणे देऊन सांगेन की हुंडा कश्याप्रकारे आणि किती प्रमाणात घेतला जातो. आणि जर त्यांना ही रक्कम अथवा वस्तू दिली नाही तर मुलींना त्रास दिला जातो. अशा राजपुत्रांची लायकी नसताना उगाच मुलीकडच्या मंडळीना झुकवल जातंय. आणि मुलीकडचे सुद्धा अनेक वेळा या त्रासाला कंटाळून ४ लाख देऊ, ५ लाख देऊ अस सांगताना दिसून येतात. कारण त्याचं घोड अडलेलं असत. आणि हेच मुख्य कारण आहे, मुलींना जन्मअगोदरच मारलं जातंय. जर मुलींचा गर्भ वाचवायचा असेल तर ह्या हुंडा पध्दतीला थांबवायला हवं.

नंतर साखरपुडा
वरील सर्व सेटलमेंट झाल्या नंतर गाडी साखरपुड्याच्या मांडवात येते. हा मांडव देखील खूप खर्चिक असतो. इथे २००-३०० किलो मटण, ५०-१०० किलो चिकन, शाकाहारी वऱ्हाडी मंडळींसाठी १०-२० वेगळ्या दोन भाज्या, हजारो तांदळाच्या भाकरी, भात, (सध्या बियरच्या बाटल्या देखील अनेक मांडवात दिसायला लागल्या आहेत.) हा झाला फक्त जेवणाचा खर्च. विधींचा खर्च वेगळा, तिथे ब्राह्मणांची दक्षिणा, पेढे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चैनी, घड्याळे यांचा खर्च वेगळा.(हल्ली साखरपुड्याला नवरा/नवरीची बुटे पळवून पैसे मागतात तो खर्च वेगळा)

नंतर मुख्य कार्यक्रम
साखरपुडा आणि मुख्य कार्यक्रम यांच्या मध्ये अनेक मानपानाचे प्रकार घडतात, त्यांचा इथे विचार केलेला नाही. नंतर येतात आपले हळदी समारंभ...............आगरी समाज या हळदी समारंभामुळे नाव गाजवतोय की समाजाच नाव मातीत डूबवतोय...........विचार कण्याची गोष्ट आहे. पूर्वी लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदी समारंभ असे पण हल्ली गेल्या २-३ वर्षापासून विविध सामाजिक संघटनांकडून दबाब येण्यास सुरुवात झाल्या कारणाने बहुतेक मंडळी एका दिवसातच हळद आणि लग्न समारंभ उरकून घेत आहेत. ही चांगली सुरुवात आहे. पण अनेकांनी इथेही पळवाट शोधून काढली आहे.........हळदीच्या आदल्या दिवशीच हळद साजरी केली जातेय.........संध्याकाळी तळण काढल जातंय आणि रात्री धांगड-धिंगाणा...........२-३ वर्षापूर्वी हाच प्रकार हळदीच्या दिवशी रात्री केला जात असे. त्या दिवशी सकाळी संपूर्ण गावातून, आजूबाजूच्या परिसरातून नातेवाईक हळदी समारंभाला येत असत. हळद लागल्यावर जवला-वांगा आणि पोळे हा खास आगरी प्रकार हमखास असे. पण नंतर त्याला देखील पर्याय शोधून काढला "कांदेपोहे किंवा समोसे" कारण अस सांगण्यात येत की, आजच्या पोरींनी पोळे करता येत नाहीत, त्रास होतो, अवघड असतात, लग्नाच्या धावपळीत वेळ मिळत नाही, अश्या अनेक सबबी सांगितल्या जात आहेत. अश्या सबबी सांगून आपण आपल्या संस्कृती पासून दूर चाललो आहोत हे आपल्या कधी लक्ष्यात येईल. तर सकाळचा हा हळदीचा प्रकार झाल्या नंतर संध्याकाळी तळण काढल जात. या तळनात खास घाऱ्या, पापड्या, भोकाचे वडे(वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचं तळण काढल जात. मी आमच्या परिसरातील माहिती सांगितली आहे.) पूर्वी हा तळणाचा प्रकार रात्री उशिरा केला जात असे. सर्व जेवण-खावन झालं की कुटुंबातील सर्व स्त्री वर्ग तळण काढण्यासाठी बसत असे. हे तळण त्याच दिवशी फारच कमी वेळा खात असत. ते दुसऱ्या दिवशी सकाळी खात असत. पूर्वीच्या काळी वाहतुकीच्या सोयीसुविधा नसल्या कारणाने पाहुणे मंडळी सकाळीच येत असतं. त्यांच्यासाठी ही तळणाची सोय असे.(मातोश्रींकडून माहिती) पण नंतर नंतर जसा जसा हातात पैसा खेळायला लागला तस तळण लवकर काढून, ते खाऊन, संपवून रात्रीच्या तयारीला लागत असत. तळण लवकर काढण्यात येण्याचा कारण अस सांगितलं गेलं की, लवकर तळण काढल तर रात्री खूप नाचायला भेटेल. तर हा तळणाचा प्रकार संपल्यानंतर आपण मुद्याकडे परत येऊया.

नवीन वाईट गोष्टींची रेलचेल
तळण काढून झाल्यानंतर सुरु होतात नवीन वाईट गोष्टी ज्यांचा पूर्वी आगरी लग्नात समवेश नव्हता. पण जमिनी विकून आलेले १२.५ टक्के आगरी समाजाला वेड करत आहेत. अगोदर आगरी समाजाकडे इतका पैसा नव्हताच. आणि आगरी समाजाला हा पैसा मिळाला देखील नसता. जर आगरी समाजाचे आधारस्तंभ मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांनी या प्रश्नांत उडी घेतली नसती तर आगरी समाज उध्वस्त झाल्यातच जमा होता. पण पाटील साहेबांनी आगरी समाज वाचवला. पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर मागच्या पिढीने तसेच या पिढीने अक्षरशः पाणी ओतले आहे. आगरी समाजातील अनेकांजवळ करोडो खेळू लागले, पण पैशाचं योग्य नियोजन त्यांना काही करता आलं नाही. पैसा येतो आहे आणि जातो आहे. पुढच्या पिढीच काय? याचा विचार कोणी करताना दिसून येत नाही. तर ही आगरी हळद जिच्यात दारूचा पूर येतोय, मटणाचा रतीब घातला जातोय, लाख-दोन लाखाचे डी.जे. वाजवून इतरांना त्रास दिला जातोय, गोल्डन मेन अशी पदवी मिळालेला गायक रात्र-रात्र जागत आहे, गाणे बोलत आहे, तो बोलणारच कारण त्याच्यावरच त्याचं पोट आहे, पण कुठेतरी त्याला देखील वाईट वाटत असेल ना त्याच्या समोर दारू पिऊन लोळणारी आगरी माणसे बघून????? पण तो मनातल्या मनात हे बोलत असेल, कारण त्याचं पोट गाण्यावर आहे. दारू चढल्यावर भांडण केली जात आहेत, मागची उनिधुनी काढली जात आहे, मारामाऱ्या केल्या जात आहेत, पोलीस केस होत आहेत. अहो हे लाख-दोन लाखाचे डी.जे. वाजवून आमच्या कानाला भोक पडायची वेळ येते एप्रिल आणि मे या दोन महिन्यात. खरतरं रात्री १० वाजता हे सर्व बंद करावं असा नियम असताना देखील हे सर्रास वाजवत आहेत, नाचत आहेत. स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास दिला जात आहे. कधी थांबणार हे सर्व?? की कायद्याचा बडगा दाखवून आम्हांला थांबवावं लागेल??

शेवटी लग्न
सध्या लग्नात लाखोंची स्टेज उभारली जातेय, सर्व पाहुण्यांना काहीतरी मानाची वस्तू दिली जातेय, शाली-फेटे बांधले जात आहेत, पैशाची उधळण केली जात आहे. २५० रुपये ताट अस कमीत कमी ४-५ लाख बुफे पद्धतीच्या जेवणावर खर्च केले जात आहेत, वरून मोठ्या फुशारक्या मारून सांगितलं जात आहे की किती रूपयाच ताट होत ते. पण बहुतेकांना ते जेवण आवडलेलं नसतचं. कारण त्या जेवणात आपुलकी नसते असते ती फक्त दाखवेगिरी पैशाची आणि नवश्रीमंतीची. शेवटी आपल्या गावातील रांध्यानी(जेवण करणारी माणसे) केलेल्या जेवणाला जी चव असते ती या बुफे-फुफे ला कधीच येणार नाही. हल्ली जेवणही हवं तसेच आईस्क्रीम देखील हवी असा आग्रह वर पक्ष करताना आढळून येतो. वधू पक्षाला देखील दाखवेगीरीची सवय लागलीय मग ते देखील तयार होतात. खर्चाला कोणतीही मर्यादा नाही कारण मिळालेला पैसा हा कष्टाचा नाही त्याचं मोल कस असणार यांना???? पण माझ्यासारख्याला दुखः होत कारण माझ्या कुटुंबाने, पाटील साहेबांनी हा पैसा मिळवीन देण्यासाठी जीवच रान केलं, ते जीवावर उदार झाले, पण ह्याचं काय चालू आहे सध्या??????

परंपरा आणि चालीरीती
हा लेख प्रकाशित झाल्यानंतर फेसबुकवर अनेक प्रतिक्रिया आल्या. तरुणांना बदल हवा आहे. पण जुन्या परंपरा मोडू नयेत अस सर्वांचं मत आहे. माझं देखील मत काही वेगळ नाही. परंपरा हव्यात, पण परंपरेच्या नावाखाली आज-काल जो धांगड-धिंगाणा चालतो तो थांबवला पाहिजे. कारण ह्या आपल्या परंपरा नाहीत. त्या उसन्या आहेत, इतर समाजाच पाहून आपण तसे वागायला लागलो आहोत, आलेला १२.५% पैसा देखील कारणीभूत आहेच. मा.श्री.लोकनेते. दि.बा.पाटील साहेबांशी आज झालेल्या घरगुती भेटीत(दि.१६ मे, २०११) हा विचार त्यांच्या समोर बोलून दाखविला की, तरुणांना बदल हवा आहे, पण त्यांना परंपरा देखील जपायच्या आहेत. त्यामुळे माझा परंपरा आणि चालीरीती यांना विरोध नाही. तर विरोध आहे मोठमोठ्या खर्चाला, दारूच्या पुराला, मटणाच्या डोंगराला.

सुधारणा करायची आहे
आगरी बाणा मार्फत एक झालो आहोत, सुधारणा करण्याच्या चर्चा देखील करायला सुरुवात केली आहे. आत्ता गरज आहे प्रत्येकानी स्वतःपासून सुरुवात करण्याची, मी अस वागणार नाही याची शपथ घेण्याची, तेव्हा कुठेतरी हे थांबेल. चला तर मग सुरुवात तर करुया........यश, अपयशाची विचार आताच कशाला???????? पाटील साहेबांचे विचार आणि आई एकविरेचा आशीर्वाद आगरी बाणाच्या पाठी असताना, आपल्या आगरी बाणाला भीती कोणाची???? पर्वा कोणाची????

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
एक ध्येय, एक नेतृत्व.

३ टिप्पण्या:

  1. parampara ya japlyach pahijet fakta tyancha atirek hou deu naye...agri samajachi takat hi thyanchi ekjut ahe..anni tyanchi paramapara hi tyanchi asamita ahe..ani yacha anukaran sadhya itar samajatil lok hi karu lagle ahet. aani far mothi abhimanachi goshtha ahe mazhyasathi...ho mi agri ahe

    उत्तर द्याहटवा
  2. Parampara japayalach havyat. Pan navin vait pratha band karaylach havyat. Aani aapan sarv milun tya karuch.

    उत्तर द्याहटवा
  3. लग्नात पारंपारिक विधी हवेत. पण उगाचच बडेजावपणा करण्यासाठी महागडे डीजे बोलावणे, महागडे मंडप लावणे, जेवणावळींवर उगाच खर्च करणे, हे काही पटत नाही.

    उत्तर द्याहटवा