आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी समाजातील लग्नसमारंभातील धवलारनीचे स्थान महत्त्वाचे

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, १९ मे, २०११

आगरी समाजातील लग्नसमारंभातील धवलारनीचे स्थान महत्त्वाचेAGRI SAMAJ
AGRI SAMAJ LAGN-SAMARAMBH
DHAVALARIN

धवले गीत
आगरी समाजातील लोकांच्या लग्न सोहळ्याच्या पहिल्या दिवसाला आगरी भाषेत "हलद" म्हणतात. या हळदी समारंभाप्रसंगी "धवले" गाणारी बाई आपल्या घरातील गीत म्हणून शुभ कार्याला सुरुवात करते. लाग्न्सोहोल्यातील म्हटल्या जाणाऱ्या सगळ्या गीतांहून या गीताला अधिक लोकप्रियता लाभली आहे. महाभारतात या धवले गीतांचा उगम झाल्याचे आढळते. श्रीकृष्ण विवाहात हे धवले गायले गेले असे म्हणतात.

आगरी "हलद"
सकाळची वेळ आहे. सूर्यबिंब नुकतेच वर आले आहे अन् पूर्व दिशा केसरी रंगाने न्हाली आहे. पक्षी आकाशात उडू लागले आहेत. मंद वाऱ्याबरोबर केवड्याचा सुगंध दरवळतोय. अशा वेळी सागर तीरावरील एका गावातून सनीचे सूर आणि बहारदार लोकगीत ऐकायला येते.
आगरी समाजातील लोकांच्या लग्नसोहळ्याचा तो पहिला दिवस असतो. या पहिल्या दिवसाला आगरी बोलीभाषेत "हलद" असे म्हणतात. या दिवशी नवऱ्या मुलाला रांगोळी काढलेल्या पाटावर बसविले जाते. तेवत राहिलेल्या समई शेजारी एक "आरती"(हळदीकुंकवाने भरलेल्या वाट्या व साखळदिवा असलेली परात) आणि आंबाच्या रसरसशीत पानांची एक डहाली, नारळ ठेऊन हळदीकुंकवाची बोटे ओढून सजविलेला तांब्याचा कळश इतकी शुभसाधने समोर मांडलेली असतात. पण याहून लक्ष वेधून घेते ते शेजारी बसलेल्या धवलारनीने गायलेले संथ सुरातील धवले. निसर्गातील सूर्यप्रभा जशी तेजोमय होते तसे हे "धवले गीत" फुलात जाते आणो भोवतालचे वातावरण सुगंधित करते. ते हे गीत................

"चालत बोलत पाहिले वनी गेला गा,
तव्ह त्या माल्यांनी दंडू उकरीला गा,
तव्ह त्या मालनिनी हाल्दू करही वेळी गा."

या गीतात एक माली आणि त्याची बायको यांचे श्रमिक जीवन सांगितले आहे. रात्र नुकतीच सरली आहे. अशा वेळी पक्ष्यांच्या आवाजाने या गीतातील नायिका 'मालिन बाय' जागी होते आणि आपल्या कामाला लागते. असे या गीतात व्यक्त केलं आहे. टिमकी, ढोलके आणि सनई या वाद्यांची साथ घेऊन रंगणाऱ्या या गीतात निसर्गवर्णन रंजक करणारे आहे. हे गीत गाणाऱ्या बाईला "धवलारीन" असे आगरी बोली भाषेत म्हटले जाते. खरे तर "धवलागर" या संस्कृत शब्दापासून "धवळार" या शब्दाची निर्मिती होऊन त्याचा अर्थ "मंगलोत्सवाचा प्रारंभ" असा होतो आणि हळदी समारंभाप्रसंगी धवले गाणारी बाई आपल्या घरातील हे गीत म्हणून शुभकार्याला सुरुवात करते.

"नायला धुतेला बालू करसाने बसइला,
हात जोरीत चांदा-सूर्य देवाना
रजा मांगीत भारजा परजाया
देर दिवराजा जन्म जोगाचा राजा"

हे गीत म्हणजे नवर्या मुलाकडून केलेली परमेश्वराची आळवणी. नवर्या मुलाचे अभंग्य स्नान झाले आहे आणि त्यानंतर तो म्हणतो- "माझी भारजा गुणसंपन्न असू दे." भारजा हा या गीतातील मूळ शब्द संस्कृत "भार्या" या शब्दापासून मराठीत रूढ झाला आहे. आगरी लोकगीतात रस निर्मितीसाठी अशा अनेक शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो, त्यामुळे गीतात गोडी निर्माण होते.
हळदीनंतरचा दुसरा दिवस लग्नमुहूर्ताचा दिवस असतो. वराची मिरवणूक नाचत गाणी गात वाद्यांच्या जल्लोषात नवऱ्या मुलीकडे येते आणि "आम्ही आलो आहोत" हे सूचित करणारे एक गीत म्हटले जाते. या गीतातील शृंगारिक वर्णन औचित्यपूर्ण आहे आणि आगरी तरुणी ते निसंकोचपणे गातात-

"राम येचीत होता कल्या
शीताबाय गुंफित व्हती माला
अग अग शीताबाये
लवकर लवकर गुंफा माला
भरल्या बालाच्या लग्नाच्या येला"

राम कळ्या वेचीत होता आणि सीता माळा गुंफित होती. रामाचे कळ्या वेचण्याचे काम भरभर होत होते. पण सीतेचे माळा गुंफण्याचे काम मंदगतीने चालू होते. आता लग्नघटिका जवळ आली आहे. म्हणून माळा लवकर गुंफा असे सीतेला सांगण्यात आले आहे. हे या गीताचे कथानक. लग्नासाठी नवरा मुलगा वरात घेऊन आला आहे. अजून नवरीचा साजशृंगार व्हायचा आहे हे प्रत्यक्ष न सांगता राम-सीतेला मध्यस्थी करून रंजन शब्दातून ते आविष्कृत केले आहे. हे गीत ऐकताना मांडवातल्या मुलींना आनंद होतो. यानंतर यथासांग विधीने वाजंत्र्यांच्या निनादात लग्न लागते. जन्माची गाठ मारली जाते आणि इतका वेळ शब्दांच्या तपशिलात असलेली "नवरा-नवरी" एकमेकांची जन्माची सोबती होतात. दोन्ही पक्षांकडील माणसे नात्यांच्या बंधनात बांधली जातात. विवाह सोहळा पार पडल्या नंतर करवल्यांच्या आनंदाला उधान येते. त्या आनंदात त्या नाचतात गातात-

"तलीयेच्या हो पारी
मारा रेशीम गाठी
या दोघांच्या झाल्या भेटी
राय रुक्मिनी दोघी वहिनी
घालती तुलशीला पानी
तुलशीचा हिरवा पाला
खुरीयेला टाल्हा परडी टाकीला
देवाची रुक्मिनी खरी"

हे गीत एखाद्या अवखळ झऱ्यासमान वळणे घेत गायले जाते. दोन जीवांची भेट होऊन त्यांनी रेशीम गाठही बांधली आहे, अशी या गीताची सुरुवात होते.

लग्न लागल्यानंतर रात्री वरातीची मिरवणूक निघते. वर आकाश चांदण्यांनी फुलून निघालेले असते. चंद्राच्या पिठूर चांदण्याने आख्खे गाव दुधाळून निघते. क्षणभर असा भास होतो की, वसंतोस्तव चालू आहे आणि तेथून पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा खाली वर्षाव होत आहे. अशा सुखद वातावरणात निघालेली वरात अवर्णनीय असते. त्या चांदुन्या राती आगरी वऱ्हाडी मंडळीनी लावलेल्या अत्तराचा सुगंध ती चांदणी रात दरवळून टाकते. अशा वातावरणात मायेचे कढ आलेल्या नवऱ्या मुलीच्या मनाला समजवताना करवल्या म्हणतात-

"सासूऱ्या हो जाताना
नाही आलं डोल्यान पानी
****ची आईची म्हने लेक शानी
सासूऱ्या हो जाताना
नाही आलं डोल्यान पानी
****चा बाप म्हने लेक शानी"

लेक सासरी जाताना तिला जड वाटणे स्वाभाविक आहे. परंतु या वेदनेवर हळुवार फुंकर घालून तीचे आईच्या पदराने डोळे पुसणारे हे त्या तरण्या करवलीचे गीत म्हणजे नववधूचे हुंदके आवरणारी एक जादू आहे. या गीताने मुलगी विरहाचे क्षण तर विसरतेच, पण तीचे आई-बापदेखील "बाय शानी" म्हणून तिला धीर देऊन तिची पाठवणी करतात. ही या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे.
आणि मग रात्र तारुण्यात प्रवेश करते. चंद्राचे झुंबर आकाश महालाच्या मध्यभागी चमचम करते. करून रसाचा पूर ओसरू लागतो. अशा वेळी वरातीची मिरवणूक इष्टस्थळी येते. स्वतंत्र शैलीने गायिलेल्या आगरी लोकगीतांची धून आनंदी वातावरणात विरून जाते. आभूषणांनी नटलेली, बावरलेली आगरी नववधू नव्या घरात प्रवेश करते.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी एकतेची नवीन ओळख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा