आमोद पाटील-आगरी बाणा: वासुदेव बळवंत फडके-एक झंझावात

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

वासुदेव बळवंत फडके-एक झंझावात


वासुदेव बळवंत फडके-एक झंजावात

" ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरूद्ध मी बंड पुकारले !""अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी इश्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे !""मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही."- वासुदेव बळवंत फडके

राजघोषणा :-"या उंच आणि सडपातळ शरीरयष्टीच्या, सरळ तरतरीत नाकाच्या, निळसर डोळ्याच्या, दाट दाढी आणि मिशा राखणार्‍या, इंग्रजी सफाईदार पणे बोलाणार्‍या, बंडखोरास (वासुदेव बळवंत फडकेस) पकडून देणार्‍या किंवा पकडून देण्यात सरकारला सहाय्य देणार्‍या कोणत्याही मनुष्यास एकूण चार सहस्त्र (हजार) रूपयांचे पारितोषिक घोषीत करण्यात येत आहे."- मुंबई राज्यपाल.

प्रति राज घोषणा :-"मुंबईच्या राज्यपालाचे मस्तक जो आणून देईल त्याला दहा सहस्त्र (हजार) रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे- पेशव्यांचा नवा मुख्य प्रधान - भाऊ साहेब (वासुदेव बळवंत फडके)

"मी व्याख्याने देण्यास सुरूवात केली. ती पुणे, पळस्पे, पनवेल येथे दिली. ती कितीकांजवळ असतील. पण उपयोग झाला नाही. ती झाडाच्या पानावर पडलेल्या पाण्याप्रमाणे ठरली. आमच्यापैकी बरेच हिंदी लोक मूर्ख आहेत. आम्हांला त्वरित फायदा पाहिजे ! पण त्यासाठी त्याग करायला नको.""पुण्याचा खजिना लुटण्याची माझी योजना पुरी झाली होती. पण आयत्या वेळेला एका मुसलमानाने ती बाहेर फोडली. त्यामुळे तो बेत मला सोडून द्यावा लागला. त्यानेच सर्व हिंदुस्थानचा घात केला."आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची कोर्टात साक्ष.

वासुदेव बळवंत फडके-आगरी बाणाच स्फुर्तीस्थान
इ. स. १८०० चं शेवटचं पर्व सुरू झालं. ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. भारतमाता ब्रिटिशांच्या आणि पारतंत्र्याच्या जोखडात जखडू लागली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. या स्वातंत्र्ययुद्धात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, दिल्लीचा बादशहा असे अनेकजण सामील झाले. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके!प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण व नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तिपत्रक नको म्हणून त्यांनी फायनल परीक्षेपासून दूर राहणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्‍या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. यावेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असताना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले. पण ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. १८७६ ते ७८ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत करीत नाही हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले.
वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याची व भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता व शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले, पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना व ठाणी लुटली. इ.स. १८७९ मध्ये त्यांच्या बंडांनी पुणे व रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने ५००० रुपयांचे इनामही लावले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी व आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले. पण देवरनावडगी या ठिकाणी अखेर ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटल्याचा फार्स करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी एडनला करण्यात आली. निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा व क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आजारपण व अन्नत्यागामुळे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला! १७ फेब्रुवारी रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला आद्यक्रांतिवीराला आगरी बाणाचा मानाचा मुजरा!
पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडक्यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर कै. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतिमंदिर आहे. या स्मृतिमंदिरात वासुदेवरावांचे फोटो, माहिती, पुतळे आणि ते लहानपणी वापरत असलेली बोकडाची गाडी ठेवण्यात आली आहे. कर्नाळा किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि मुंबईजवळ असलेल्या शिरढोण येथील वासुदेवरावांच्या जन्मभूमीस आणि वाड्यास आवर्जून भेट द्या. ज्या क्रांतिवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली त्या सशस्त्र क्रांतींचे प्रवर्तक आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर नतमस्तक सारेजण होतात.आगरी बाणा कडून आद्यक्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके यांना मानाचा मुजरा.
आपलाच,
आमोद पाटील
(आगरी बाणा)
-आमोद पाटील.
आगरी युवा.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा