आमोद पाटील-आगरी बाणा: जून 2012

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, १५ जून, २०१२

आगरी समाजाचे आधारवड-कॉ.जी.एल.पाटील(G. L. PATIL - AGRI SAMAJ)

आगरी समाजाचे आधारवड-कॉ.जी.एल.पाटील

"अखिल आगरी समाजाचे संस्थापक सदस्य कॉ. जी. एल. पाटील यांचा २५ वा स्मृतिदिन रविवार दिनांक १० जुन, २०१२ रोजी उरण येथे साजरा केला गेला. जी. एल. पाटील हे आगरी समाजाचे एक धुरंदर नेते होते. समाजाच्या विकासासाठी तसेच कष्टकरी उन्नतीसाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. मुंबई महानगरपालिकेचे १५ वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगरी परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. समाजाच्या न्याय हक्कांसाठी विविध आंदोलने करून आगरी समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला. अशा या थोर नेत्याच्या राजकीय, सामाजिक कार्याचा आढावा घेणारा हा लेख."

आगरी समाजातील अनेकांनी स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करले आहे. १९३० सालात चिरनेरचा जंगल सत्याग्रह याच समाजातील शूर लढवय्यांनी लढवला. त्यात सात जणांनी प्राणाहुती दिली. असा हा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांशी झुंज देणारा लढवय्या समाज.

पूर्वी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा समाज तसा फार मागासलेला. शिवाय व्यवसाय शेती व मीठ पिकवण्याचा असला तरी शेती व मिठागरे त्यांच्या मालकीची अगदी नगण्यच असत. बहुतांश लोक दुसऱ्यांच्या शेतात वा मिठागरात श्रम करीत व आपल्या कुटुंबाचा कसातरी उदरनिर्वाह चालवीत. अशा समाजातून जी.एल.पाटील पहिले पदवीधर झाले. त्यांनी या सर्व मागासलेपणाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवले की, शिक्षणाच्या अभावाने आपल्या समाजाची प्रगतीच खुंटली आहे. त्यांच्यात जागृती करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कारणे जरुरीचे आहे. जी.एल. नी याबाबत आपल्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. व श्री. भाऊराव मुकुंदराव पाटील, श्री. गणपत पाटील (वाघ्रण) व स्वतः असा तिघाजणांच्या नावे जाहीर पत्रक काढून २ सप्टेंबर, १९३४ रोजी आगरी-आगळे शिक्षण फंडाची स्थापना केली. साथीला सीताराम केणी, भाऊराव गोपीनाथ पाटील होते. या संस्थेसाठी प्रसंगी अपमान सहन करूनही त्यांनी फार मोठा निधी गोळा केला. त्यांच्या धर्मपत्नी बायजी यांनीही त्यांना या कामात योग्य साथ दिली. आज आगरी शिक्षण संस्था या नावाने ही संस्था नावारूपाला आली असून पनवेल येथील खांदा कॉलनीत स्वतःच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय या संस्थेतर्फे शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिके देण्यात येतात.

१९३५ सालातील दसऱ्याच्या मुहूर्तावर वरळीच्या लादीवाला चालीत 'आगरी सेवा संघा'ची स्थापना झाली. या संघाचे पहिले अध्यक्ष म्हणून कै.जयराम बजाजी टेमकर व उपाध्यक्ष म्हणून कै. तुकाराम बेटू पाटील यांची निवड झाली. व जी.एल. हे स्वतः जनरल सेक्रेटरी झाले.

याच दरम्यान मुंबईत कॉ.डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरणीकामगारांचे लढे जोरदार सुरु होते. जी.एल. ही या संपलढ्यात सदैव सहभागी असत. सेंच्युरी, standard आदी गिरण्या वरळी-प्रभादेवी भागात असल्याने संपकाळात इतर कार्यकर्त्यांबरोबर जी.एल. ही सेंच्युरी मिलच्या उघडया मैदानात झोपत व पहाटे मिलच्या गेटवर मिटींग घेऊन कामगारांना लढ्यात सहभागी करून घेत. आगरी सेवा संघाची स्थापना केल्यानंतर जी.एल. नी तुकाराम कमल पाटील, पांडुरंग दामोदर सोनावले, प्रभाकर मोरेश्वर ठाकूर, हिराजी काळू ठाकूर, सीताराम राघोबा पाटील, मारुती दामोदर पाटील, हिराजी कर्वे, गणू चवरकर, गोविंदा जोमा पाटील आदी सहकाऱ्यांसह वादी-प्रभादेवी, वरळी येथील आगरी वस्तीत सभा बैठकी घेऊन संघाच्या कार्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.

आगरी सेवा संघामार्फत जी.एल.नी या भागात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. मोफत वाचनालय, लोकमान्य व्यायामशाळा ही त्याची उदाहरणे होत.अर्थात कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवण्यासाठी काही उत्सवप्रियही कार्यक्रम आखावे लागतात. या अनुषंगाने दसरा संमेलन, श्रीकृष्ण जन्मोत्सव सेवा संघाने सुरु केले.

मुंबईत जी.एल. चे असे उल्लेखनीय समाजकार्य सुरु असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांची व मिठागर कामगारांची स्थिती फार हलाखीची होती. विशेषतः उरण भागातील मिठागरे ही मुसलमानांची वा गुजराती लोकांच्या मालकीची होती व मिठागरात रोजंदारी करणारा आगरी मजूर हा जणू मालकाचा गुलाम बाणाला होता. वेठबिगारी पद्धत जबरदस्त होती. तीच स्थिती शेती पिकवणाऱ्यांचीही होती. मजुरांना दहशत बसविण्यासाठी त्या वेळी सार्वजनिक शिक्षा करण्यात येत असे. गाढवावरून धिंड काढली जाई. जुलूम-जबरदस्ती होई. यामुळे गावागावांत असंतोष पसरला होता. शेवटी १९३९ साली या असंतोषाचा स्फोट भेंडखळ(ता.उरण) गावी झाला.

ना. ना. पाटील यांनी हा निर्णय सावकारांना कळवला, पण सावकारांनी ही मागणी फेटाळली. तेव्हा शेतकऱ्यांनीही सावकारांची कसायचे नाकारले व संप पुकारला. तत्पूर्वी ना. ना. पाटील यांच्या नेतृत्वाखालील चरीचा संप संबंध महाराष्ट्रात गाजला होता. आता भेंडखळचा शेतकरी सावकारशाहीविरुद्ध लढ्यास सिद्ध झाला.

मुंबईत आगरी सेवा संघाच्या कार्याला बहर आला होता. याचं दरम्यान वरळी-प्रभादेवी भागात कॉ.जी.एल.पाटील यांच्या पुढाकाराने बॉम्बे एज्युकेशन लीग या संस्थेचे मराठा मंदिर वरळी हायस्कूल सुरु करण्यात आले. या संस्थेचे श्री.पी.के.सावंत हे प्रिन्सिपॉल होते तर जी.एल. काही काळ या संस्थेत शिक्षक म्हणून होते. या हायस्कूलमध्ये या विभागातील विद्यार्थ्यांची खुपच सोय झाली. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशा प्रकारची घोडदौड दुरु असताना १९५८च्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने जबरदस्त धक्का बसला. या निर्णयाने पूर्वीचा मध्यमवर्ग (इंटरमिजीएट क्लास) रद्द करण्यात आला. ज्या मध्यमवर्गात मराठी व तत्सम १६२ समाजांचा समावेश होतो, तो ओ.बी.सी. चा वर्ग रद्द केला गेला. अर्थातच ज्या समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती खुंटली होती, अशा समाजाला पुढारलेल्या समाजात समाविष्ट केल्याने त्यांच्यावर घोर अन्याय झाला होता. आगरी समाज हा त्यापैकीच एक होता.

१९५९ साली अखिल आगरी-आगळे ज्ञाती परिषदेची स्थापना करण्यात आली. गाव, तालुका, जिल्हा स्थरावरील आगरी समाजातील ही मध्यवर्ती संघटना होती. नव्हे ती या समाजाची अस्मिता जपण्यासाठी उभारलेली चळवळ होती. जी.एल. चा या परिषदेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता. या परिषदेच्या वतीने २३ व २४ मे, १९५९ रोजी उरणला पहिले अधिवेशन घेण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान कॉ.जी.एल.पाटील यांनी भूषविले होते. तर उदघाटक म्हणून त्या काळचे थोर शिक्षणतज्ज्ञ आचार्य मो.वा. ऊर्फ दादासाहेब दोंदे व स्वागताध्यक्षम्हणून लढाऊ समाज नेते श्री.तु.ह.वाजेकर हे होते. शेतकऱ्यांचे लाडके नेते कै.नारायण नागू पाटील या अधिवेशनास आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते. त्यामुळे हे पहिले अधिवेशन बरचं खऱ्याअर्थाने परिपूर्ण झालं होत.

उरणच्या पहिल्या अधिवेशनात कालेलकर कमिशनने दिलेल्या अहवालानुसार आगरी समाजाला सर्व प्रकारच्या सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हा प्रमुख ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दुसऱ्या एका ठरावान्वये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलन लढ्याचा ठराव संमत करण्यात आला.

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला व मुख्यमंत्रीपदी श्री. यशवंतराव चव्हाण आरूढ झाले. परिषदेतर्फे त्यांना मागण्यांचा जाहीरनामा सादर करण्यात आला. परिषदेच्या चळवळीने समाजातील जागृती वाढतच होती. याचं सुमारास कल्याण-शहापूर भागातून काँग्रेसचे श्री. सोनुभाऊ बसवंत खासदार म्हणून व उरण-पनवेलमधून श्री. दि. बा. पाटील, अलिबागेतून श्री. दत्ता पाटील, पेणमधून श्री. बाळासाहेब म्हात्रे व ठाण्यातून सौ.चंपूताई मोकल हे आगरी समाजातील आमदार निवडून आले होते. अखिल समाज परिषदेनेही समाजमनावरील पकड चांगली घट्ट केली होती.

इकडे सोनुभाऊ बसवंत यांनी ७५ खासदार जमवून या विषयावर संसदेत चर्चा घडवून आणली. शिवाय खासदार बसवंत यांनी अखिल आगरी समाज परिषदेचे सरचिटणीस गणेश पाटील व नाशिकचे खासदार जाधव यांच्या साने संसदेत एक पिटीशन सादर केले. त्यामुळे सरकारला या विषयावर आपली भूमिका स्पष्ट कारणे भाग पडले. या सर्व चळवळीने १३ ऑक्टोबर १९६७ रोजी ओ.बी.सी.ची यादी सरकारला प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. त्यात आगरी समाजाचा समावेश केला. शिवाय १० टक्के राखीव जागा मिळून पाच वर्षांची आत शिथिल करण्यात आली. हा एकापरीने परिषदेने उभारलेल्या आंदोलनाचा विजय होता.

२ व ३ मे, १९७० रोजी अखिल आगरी समाज परिषदेचे तिसरे अधिवेशन धामोते येथे झाले. सर्व समाजाला संघटीत करण्याची भावना सर्वांच्याच मनात होती. त्यामुळे या अधिवेशनात १८८ इतर मागास समाजातील २ कोटी कष्टकऱ्यांना संघटीत करून 'महाराष्ट्र राज्य इतर मागास फेडरेशन' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेडरेशनतर्फे पुढे ओ.बी.सी.च्या मागण्यांसाठी अनेक लढे लढवले. सप्टेंबर १९७१ रोजी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब वरळीकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. कॉ.जी.एल.पाटील त्या शिष्टमंडळात प्रामुख्याने होते, तर १२ सप्टेंबर १९७१ रोजी सचिवालयावर ओ.बी.सी.संघटनेतर्फे एक प्रचंड मोर्चा नेण्यात आला व आपल्या एकजुटीचे विराट दर्शन शासनास घडवले. जी.एल. या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. पुढे त्यांना संघटनेचे अध्यक्षपदही लाभले.

ओ.बी.सी.च्या चळवळीने मोफत शिक्षणाबरोबरच शासकीय नोकऱ्यांत व बढतीत ३५ टक्के जागा, शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्थात २५ टक्के राखीव जागा, हाउसिंग बोर्डाच्या गाळेवाटपात १० टक्के जागा, इतर मागास समाजासाठी खास महामंडळाची स्थापना इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांकडे जनतेचे लक्ष प्रकर्षाने वेधले गेले व या या मागास समाजाच्या सवलतींचा सहानभूतीने विचार सुरु झाला.

या मंडल आयोगाने भारतभर दौरा करून विविध जातीजमातींची आर्थिक, सामाजिक परिस्थिती प्रत्यक्ष पहिली. हा आयोग मुंबईत आला तेव्हा २२ जुलै १९८० रोजी परिषदेतर्फे त्यांच्यासमोर कैफियत सादर केली गेली. पण केंद्राने या मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नही. तेव्हा मागासवर्गीयांत असंतोष पसरला. या आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आंदोलन कारणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार फेडरेशनने पुढे वेळोवेळी आंदोलनही उभारले.

मृदू भाष्य व कार्यकर्त्यांत आपलेपणा निर्माण करणे या त्यांच्या वृत्तीने ते खऱ्या अर्थाने समाजमहर्षी या पदावर पोहोचले. जी.एल आगरी समाजाचे व बहुजन समाजाचे काम अत्यंत निष्ठेने व कळवळीने करत राहिले. म्हणूनच १९८६ साली आगरी सेवा संघाचा सुवर्ण महोत्सव त्यांच्याच अध्यक्षतेखाली साजरा झाला तेव्हा त्यांनाही अत्यानंद झाला होता. अशा अनेक संस्थाना जी.एल.नी जन्म दिला व त्या वटवृक्षासारख्या वाढवल्या. पण त्यांच्या छायेत स्वतः कधी वावरले नाहीत. उलट सर्व मागास समाजाला त्याचा लाभ मिळवून दिला. या सर्व सामाजिक कार्यासाठी कौटुंबिक अडचणीही त्यांनी कधी पाहिल्या नाहीत वा वैयक्तिक मान-अपमानाचाही विचार केला नाही. म्हणूनच फक्त आगरी समाजच नव्हे तर सारा मागासवर्गीय समाज कॉ. जी.एल.पाटील यांचे मोल कधीही विसरू शकत नाही.


जाता जाता एकच.........जेवढा जो समाज मागासलेला व दुर्बल आहे, तेवढ्या प्रमाणात त्यास प्रगतांनी संरक्षण व सवलती देऊन पुढे आणण्यास मदत व हातभार लावला पाहिजे. तरच तो समाज कालांतराने पुढारलेल्या समाजाबरोबर वाटचाल करू शकेल........