आमोद पाटील-आगरी बाणा: 2013

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, १४ जून, २०१३

आगरी कथा-जिंदगी (agri bhasha story)


आगरी कथा-जिंदगी

मी स्टेशनावरशी घरा येत व्हतो. बायेर जोरान पावूस परत व्हता, माजे जवल छत्री नवती तेचेमुल मी स्टेशनाचे बायेर पत्र्याचे शेरचे खाली पावूस थांबाची वाट बगत उभा रायलो. स्टेशनाकरचे दुसरे बाजेचे रस्त्याचे करला यक फाटक कपर घातलेली पोर येनारे-जानारे लोकांचे करशी भीक मांगत व्हती. ते एरियान ती नवीच दिसत व्हती. काईजना तीला शिवा देत पूर जात व्हती त काईजना तीचेकर पावून १-२ ची चिल्लर तीचे डब्ब्यान टाकून पूर जात व्हती. पुन ती येनारे जानाऱ्यांचे करशी खावाला मांगत व्हती. "सेठ, चार दिन से कुच खाया नयी है...कुच खानेकु हो को दो..."

तीचे कर पावून आसा वाटत व्हता की ती कनचेतरी लांब गावांशी पलुन आलेली हाय. सुजलेला न आजारी थोबार, फाटलेले कपर आशे आवस्थेन, आशेले जोराचे पावसान ती स्टेशनाचे बायेर भीक मांगत व्हती. पुन तीच्याशी कोनला लेना-देना नवता. जो-तो आपले-आपले गरबरीन. पुन ते गरबरीन पुन काइ नासक्या नजरा व्हत्याच...ज्या तीचे फाटलेले कपर्यांचेकर लागल्या व्हत्या. त जानारे-येनारे बायकांचे घोलक कानांचे कानान फूसफूसत पूर जात व्हत.

ते गर्दींशी एक इन-बिन करून त्यांचे त्यान जुरुसा सभ्य दिसनारा मानुस ते पोरीचे बाजूला येवून उभा रायला. मना त वाटला यो कनचा तरी यन.जी.वो. वाला आसल. त्यानी तीला डोल्यांशी वरखाली बगुन झेतली आनी हालूच तीला बोलला, " ये लरकी, यहा कितने टाईम तक भीक मांगती रेगी? तुझे कही जाना नही हय क्या? तुझे जहा जाना हे वहा मइ तुझे लेके जायेंगा." ती पोर ते मानसाचे थोबाराचे कर पावाला लागली.

"अभी क्या सोच रेली हे? तुझे खाना मंगता हय ना..मय तुझे दो टाईम का फोकट मे बडिया वाला खाना खिलायेगा."

त्या आयकून तीचे चेर्याव जरासा तेज दिसाला लागला. ती खुश झाली व्हती. आनी तेच खुशीन ती बोलली, " सेठ, आप सच मे मेरेको खानेको देगा?"

तो सभ्य दिसनारा मानुस, "मय तुझे हाटल मे अच्चा वाला खाना खिलायेगा, तेरेको पहनेके वास्ते अच्चा वाला कपडा भी देगा. लेकिन बाद तुने मेरेको खुश करना मंगताय..."

ती पोर, "सेठ, आपको खुश करना होगा यानेके? और कैसे?"

तो सभ्य दिसनारा मानुस, "अबी ये कैसा, क्या, कहा का नाटक बंद कर... तेरेको सब बता देता है... अब चल यहासे..."

ती पोर त्याचे मंगारी-मंगारी दुसरे साइड ला जेली...पावूस पुन आता पराचा थांबला व्हता...मी माजे रस्त्याव चालाला लागलो....

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, २ मे, २०१३

आगरी कथा-फेसबूक प्रेम (Agri Language Story)


आगरी कथा: फेसबूक प्रेम

आजूबाजूची सगली पोरा फेसबुक लय भारी आसत, पोरींशी बोलाला भेटत, फोटो पावाला भेटतान. लय मजा आसत फेसबुकव आशी बोलत आसतान. जया तया पावावा त जो तो हातान मोबाईल झेवून फेसबुकव आसत. आवरा सगला आयकून, पावून निखिल ला पुन फेसबुकव खाता खोलाची हावूस करून झेतली. पोरींची थोबारा पावून त्यानी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवाला सुरवात केली. दिसला चिकना थोबार पाठव फ्रेंड रिक्वेस्ट. हालूहालू त्याचे प्रोफाईलव लोकांची गर्दी वाराला लागली. दिवसभ काम करून सांचे घरा आल्याव एक-दोन तास तो फेसबुक उगरून बसाला लागला. लोकांच फोटो बग, त्याव कमेंट मार, अपडेट ला ४-५ आखरून-तखरून उचाललेल्या वली टाक या आसा सगला कराची त्याला जशी सवयुच झाली व्हती. चाटींग कराला त्याला मजा वाटाची. पुन हालूहालू त्याला समजाला लागला आया लोका खोटी थोबारा लावून मजा करत व्हती, फेसबुकव कतीतरी आशी थोबारा हायीत ज्यांची खरी थोबारा दुसरीच हायीत. पोरींचे नावाशी प्रोफाईल करून ते प्रोफाईलव पोऱ्या मजा मारतय, एकादे जातीचे, भाषेचा, धर्माचा, देवाचा नाव लावून कोणतरी प्रोफाइल उगरतय न कयतरी ऐसा टाकतय तेचेमुल लोकांची डोकी भरकतान. निखिल या सगला पात व्हता. तेचेमुल तो जुरुसा चाटींग पासून लांबुच रावाला लागला.

लय दिसा पासून त्याला चाटींगव नेहा नावाचे पोरीच मेसेज येत व्हत. त्यान "hi, hello, hw r u, whr r u" आसा कयनकय लिवलेला आसाचा. निखिल त्याव कय मेसेज पाठवत नस. एके दिशी निखिल ला सुट्टी व्हती, तेमुल तो दिवसभ फेसबुकवरूच टाईमपास करत व्हता.
त्याला चाटींगव नेहाचा मेसेज आला,"hw r u"
मंग निखिलनी पुन पयले टायमालाच तिला मेसेज पाटवला, "fine"
मंग परत नेहाचा मेसेज आला,"maine aapki profile dekhi hai, aap bahut handsome ho, mujhe aapse baat karni hai....:) "
त्याव निखिलनी मेसेज पाठवला,"chatting pe hi baat karenge...:)"
त्याचाव ते बाजुशी आजून मेसेज आला,"gv me ur mbl nmbr...i wnt 2 tlk 2 u"
निखिलनी थोरासा मनांचे मनान लाजून तिला मोबाईल नंबर दिला. भाई एकदम खुश झायला. खुश होईल नय ट काय करील...आसा पयल्यांदाच झाला व्हता की, यके पोरिनी त्याचा नंबर मांगला व्हता.
तिनीव तिचा नंबर त्याला दिला न सांगला रातचे आरामान बोलू.
तेच रातचे नेहाचा निखिलचे मोबाईलव मेसेज आला...माजेशी बोल.
निखिल ला कय समजला नय, त्याला पोरींशी बोलाचा कयपुन अनभव नवता.
मंग निखिलनी तिला मेसेज पाठवला...तुला बोलाचा आसल त तू बोल.
त्याच्याव नेहानी मेसेज केला...तुजे जवल रिचाज कराला पैशे नसतीन त मी देतय.
तरीपून निखिलनी तिला काय फोन केला नाय.

त्याचेनंतर निखिलनी नेट बंद केला न झोपाला जेला. सांचे अचानक त्याला यके ओलख नसलेले नंबरवरशी फोन आला.
निखीननी इचारला,"कोन बोलतय"
मंग तखरूनशी आवाज आला,"वलखलास नय...!!"
निखिल बोलला,"पयले कवा बात झायली नय त मंग वलखू कैसा"
त्याव उत्तर मिलला,"मी नेहा."
आयला तखर नेहाचा नाव आयकून आखर निखिलच्या गोट्या कपालान. निखिल त पुरा भिला. त्याला वाटला कनचा तरी रांडचा पोरीचा आवाज कारूनशी मना फशीवतय. ती पोर पुन एकदम खालचे आवाजान बोलत व्हती. निखिलनी पुन मंग फोनव जास्त शेर बात नय केली. फोनव बोलनारी ती पोर हाय का पोऱ्या या जानुन झेवासाठी निखिलनी त्याचे दुसरे नंबर वरशी तिला फोन लावला. दुसरे बाजुशी परत तेच पोरीचा आवाज. आता निखिलला वाटाला लागला ती खरोखुरच पोर हाय. आता बोलालाच नको यो भाई एकदम सातवे आसमान पे. दरोज तीचेशी फोनव काय बोलल, चाटींगव काय बोलल. सगला मजेन चालला व्हता. पुन आवरे सगले लफर्यान त्याला ते पोरीची जशी नशा चरत व्हती. तीचेशी फोनव बोलला नय, चाटींग केली नय त त्याला झोप यत नवती. कोल्याचे जाल्यान जशी मासोली फसत तैसा तो तीचे जाल्यान फसत चालला व्हता. आगोदर त्याला जी टाईमपास वाटत व्हती, आज त्याला ती त्याचे दिलाचे जवलची दिलजानी वाटाला लागली.

तरीपून मदिनुच त्याला हुकी आल्याव तो तिला इचाराचा तू खरोखरूच पोर हायीस ना? तवा ती त्याला सांगाची मी तुला काय खोटा सांगतय, तुजा माजेव इश्वास नय? तवा निखिल तिला बोलला तुझा फोटो दाखीव, मंग बसल इश्वास. त्याव ती बोलाची दाखवीन...दाखवीन...माजा फोटू दाखवीन तुला. पुन तिनी कवा त्याला फोटू दाखवला नय. जवा पावावा तवा आखरून-तखरून डाऊनलोड करून ती कनची तरी नटी नायत मग भारी माल दिसनारी भाभीच तीचे प्रोफाईलव लावत अस. पुन नेहानी त्याला सांगला क ती नर्सिंगला शिकाला हाय न हास्टेलला रात. जवा येल जाय नय नयत यकटा यकटा वाटाला लागत तवा तिनी निखिलला तिचा मैतर बनवून तिचा यकटेपना दूर केला. निखिलला आजून तिच्याव सवशय व्हताच. तेचेमुल तो तिला फोनव जोक सांगाचा. त्याला वाटाचा आस जोक सांगल त जोरजोरान हासून मानसाचा खरा हासना बायेर पडतच. निखिलनी तिला रास जोक सांगल पुन दरयेली हासाचा आवाज पुन पोरीचेच आवाजान. पुन निखिलला हासाचा तो आवाज खोटाच वाटत व्हता. तसा निखिलला या मायती व्हता क हाल्ली मोबाईल पुन आवर भारी आलन ज्यान आवाज पुन बदलू शकतून. हालूहालू निखिलचे डोक्यान पयले पयले प्यारची नशा आजून जोरान चराला लागली. जवा बगावा तवा यो भाई सगल कामधंद सोरून तिचीच सपना बगाला लागला व्हता. त्याला वाटाचा ती पोरुच हाय, न तिला मी लय आवरतय, तेमुल ती माजेशी खोटा बोलाची नय, माजी नेहा मना कवाच धोका देवाची नय. फोनव बोलाचा झाला तरी पिरमाच्याच गोष्टी, त्या निखीलूच बोलाचा, ती गप बसून आयकाची न मदीन-मदीन हालूच हासाची.

निखिल या समजाला येल नाय लागला क जवा जवा तो नेहाला फोन लावाचा तवा तवा तिचा फोन बीजी येवाचा. त्याला वाटाचा ती त्याचा पोपट बनवतय. फकस्त तोच नाय आजून दुसरे पोराना पुन तिनी नांदी लावलाय असा त्याला वाटाच. नेहा बोलाची तू दिवसाचे २४ तासान कवाव फोन कर मी तुज्याशी बोलीन. तुला माजेशी बोलाचा जवा मन करल तवा फोन कर. तसा पावाला जेला त तीच फोन रातचेच लागच, न तवाच त्याच्या बाता होवाच्या. फोन कट केल्याव तिचा फोन परत बीजी.

एके दिशी खरा काय न खोटा काय या जानुन झेवाला निखिलनी सकालचे लय लवकर कोंबरा आरवनीचे टायमाला तिला मायती नसलेले नंबरवरशी फोन केला. दुसरे बाजुशी फोन उचालला न सुरुवातुच शिव्यांशी झाली, न शिव्या देनारा आवाज बापयाचा...!! निखिल आखर येर्यासारखा वर पातय, खाली पातय. त्याला आता इश्वास झाला व्हता दुसरे बाजूला पोर नाय त बाप्या हाय न आवरे दिस यो नेहा नावाशी बोलनारा बाप्या त्याचा पोपट करत व्हता. नेहा नावाशी बोलनारा यो बाप्या सकालचे त्याची झोप मोरल्याव त्याचे खरे रूपान आला व्हता. झोप मोरल्याव तो त्याचे खरे रुपान येईल नय त कय करल...दिसपाली न रातपाली करून लोकांना येरा बनवत व्हता, त्याला सकालची थोरीशीपुन झोप नको का मिलाला...!!

पयले पयले प्यार ची नशा आता निखिलचे डोक्यांशी उतारली व्हती. निखिलनी फेसबुकव जावूनशी ते नेहाची आख्खी प्रोफाईल बगली. तीचे प्रोफाइलव ४५६० फ्रेंड...!! न सगल फोटू पुन नेटवरचे आयटम भाभ्यांच...न वरशी ते फोटूनव कमेंट पुन रास भारी...भारी...!! आवरा सगला पावून निखिल समजून चुकला आपले सारकी आजून कतीतरी पोरा येरी झालेली हायीत. ज्या सुरवातीला कराला पायजे व्हता त्या निखिलनी आता केला...तीचे प्रोफाईलला ब्लॉक केला, त्यानी त्याच सगल फोन नंबर बंद केल, सगल सीमकार्ड तोरून फेकून दिल.

निखिल त वाचला. पुन आपले सारकी, आपले वयाची आजून कतीतरी पोरा आशे लोकांचे नादी लागली असतीन त्यांचा भविष्य काय....??

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

प्रकल्पग्रस्तांना गुड न्यूज...!! (Land Acquisition Bill)


प्रकल्पग्रस्तांना गुड न्यूज...!! (Land Acquisition Bill)

आज १८ एप्रिल रोजी प्रस्तावित भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात विरोधी पक्षांनी सुचविलेल्या सुधारणा सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे जाहीर केले.

संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी २२ एप्रिल, २०१३ पासून सुरु होणार आहे. सरकारने आणि विरोधी पक्षांनी प्रस्तावित भूमी अधिग्रहण विधेयक नवीन सुधारणासहित या अधिवेशनात मांडायची भूमिका जाहीर केली आहे. सरकारच्या आणि विरोधी पक्षांच्या या भूमिकेचे एक प्रकल्पग्रस्त या नात्याने मी स्वागत करत आहेत. आजपर्यंत देशात इंग्रजांच्या काळातला भूमी अधिग्रहण कायदाच लागू होता, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची खऱ्या अर्थाने मुस्कटदाबी होत होती.

आता या प्रस्तावित भूमिअधिग्रहण कायद्यातील अनेक तरतुदी नक्कीच प्रकल्पग्रस्तांच्या हिताच्या आहेत.
एखाद्या भागात भूमी अधिग्रहण चालू झालं की तेथील दलाल नेत्यांना ऊत येतो. सरकारने या भूमी अधिग्रहण कायद्याद्वारे या दलालांचा बरोबर बंदोबस्त करायला हवा. डायरेक्ट ज्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी. तसंही, या कायद्यातील काही तरतुदी पाहिल्यावर दलाल चोर पुढाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

भूमी अधिग्रहण कायदा लागू झाल्यावर खाजगी विकसकांना देखील तो बंधनकारक आहे. त्यातील सर्व तरतुदीनुसारच त्यांना जमीन मालकांना लाभ द्यावा लागणार आहे. यामुळे बिल्डर, एजंट, पुढारी ही जी साखळी आहे ती नक्कीच तुटू शकते. आज बिल्डर त्याला वाटेल तितकीच रक्कम पुढारी, एजंट यांना पैसा चारून दबावतंत्र राबवून जमीन मालकांना देत असे. एकदा का कायदा लागू झाला की, सगळ्यांचे बारा वाजणार आहेत. आता सर्व प्रकल्पग्रस्तांच्या हातात आहे, सर्व कायदे वाचूनच जमिनी द्यायला हव्यात. उगाच एजंट सांगतोय म्हणून जमिनी विकाल तर नंतर पस्तवाल.

प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्यातील २ नवीन मुख्य तरतुदी:
१. ज्या जमीन मालकांनी आपली जमीन सप्टेंबर २०११ नंतर एखाद्याला विकली असेल आणि त्या एखाद्याने ती जमीन भूमी अधिग्रहण कायदा लागू झाल्यावर तिसऱ्याला विकली तर मूळ जमीन मालकाला ५०% मोबदला मिळेल. याला कारण हे आहे की, सरकारने सप्टेंबर २०११ मध्ये भूमी अधिग्रहण विधेयक पहिल्यांदा मांडले. त्यातील फायदेशीर तरतुदी पाहून अनेक भू-माफियांनी अनेक भागात मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या. आता भूमी अधिग्रहण कायदा लागू झाला की, ते लोक त्या जमिनी विकून चौपट रक्कम कमवू शकत होते. या बाबीचा विचार करून ह्या नव्या तरतुदीचा विचार केला.
२. जमीन विकण्यापेक्षा वार्षिक भाडेतत्त्वावर घेतली तरी चालू शकेल. जर एखाद्या विकसकाने खूप जमिनी घेतल्या आणि काही जमिनी खूप वर्षे पडीक राहिल्या तर त्या जमिनी पुन्हा जमीन मालकाला परत मिळू शकतील.

बाकी दुसऱ्या तरतुदी याअगोदर ब्लॉगच्या माध्यमातून सांगितल्या आहेतच. तरी काही मुख्य तरतुदी पुन्हा एकदा:
१. ग्रामीण भागात जमिनीला बाजारभावाच्या चौपट रक्कम मिळणार.(म्हणजे जर एका गावात जमीन आहे. तिची बाजारभावानुसार एकरी १ कोटी किंमत असेल तर त्या जमिनीला ४ कोटी द्यावे लागतील.)
२. शहरी भागातील जमिनीला बाजारभावाच्या दुप्पट रक्कम मिळणार.(म्हणजे एका शहरात जमीन आहे. तिची बाजारभावानुसार किंमत एकरी १५ कोटी किंमत असेल त्या जमिनीला ३० कोटी द्यावे लागतील.)
३. एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्ट मध्ये जमीन मालकाला शेअर होल्डर करून घ्यावं लागणार आहे.

तरी आता प्रकल्पग्रस्तांनी चोर, दलाल नेत्यांच्या भरोश्यात राहू नये, ही नवीन दलाल जमात कधीच खर सांगत नाही. जर खर सांगितलं तर लोक सुधारतील, त्यांच्या पेक्षा मोठी होतील, आपली पदे जातील, आपली सत्ता जाईल, सत्ता स्वतःच्या कुटुंबाखेरीज दुसऱ्या सामान्य लोकांच्या हातात जाईल. आणि सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकदा त्यांच्या सर्व पक्षातील नेत्यांचे धंदे शोधावेत. कोणी बिल्डर आहे, कोणी जमिनींचा, साडेबाराच्या प्लॉटचा एजंट आहे, कोणी हायवे, रस्ते, सरकारी काम यांचा ठेकेदार आहे. शोधल्यावर सर्वच राजकीय पुढाऱ्यांचा डायरेक्ट संबंध जमिनींशी दिसून येतो, त्यामुळे ज्या कोणाला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्यानी ठेवावा. मधल्या मध्ये त्यांच्या शाळा-कॉलेज, मैदान आणि इतर साम्राज्याला स्वस्तात अथवा फुकट प्लॉट मिळतात. पण, आपण खरे प्रकल्पग्रस्त असून आपण जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यासाठी प्लॉट मागायला जातो तेव्हा आपल्याला प्लॉट मिळतो का?

दलालांवर भरोसा ठेवू नका, कायदा वाचा, कायद्यानुसार वागा. लवकरच कायदा येत आहे. आता गरज आहे सर्वांनी कायद्याबाबत जागृत होण्याची. अन्यथा पुन्हा फसवणूक, राजकारणी येणार, दलाल येणार त्यांना वाटेल तशी खोटी माहिती सांगणार आणि प्रकल्पग्रस्ताला येडा बनवून स्वतः पेढा खाणार. हा दलालीचा पेढा खाताना खाताना यांच्यात कोणतेही राजकीय मतभेद नसतात वा एकमेकांच्यावर खालच्या पातळीवरची टीका नसते. सर्वच पक्षातील पुढारी मिळून मिसळून हा पेढा खातात...

सरकार आणि विरोधी पक्षांनी प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा याच अधिवेशनात संमत करण्याचे मनात आणले आहे. या विधेयकाच काय होतंय ते आता लवकरच दिसून येईल........आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

सोमवार, १५ एप्रिल, २०१३

आगरी कथा-आरवा (Story In Agri Language)


आगरी कथा-आरवा

ओवले गावांचा कालूशेट जमिनीच, सारेबाराचे पलाटांच व्यवार कराचा. आसाच, एके दिशी शिरकोचे पलाटांचा मोटा व्यवार कालूशेटनी मध्यस्ती करून केला. बिल्डरला पुन रास फायदा झाला न पलाटा इकणारे सगले शेतकार्यांना पुन कोटी-कोटीचे वर रुपय मिलल. ते व्यवाराव खुश होवून शेतकऱ्यांई कालूशेट ला भूजलेली गावठी कोंबरी न मवाची पयले धारची बाटली दिली. कालूशेटनी त्याचे आया काम करनारे आज्याला बोलावला न तो सामान घरा नेवाला सांगल्या. यो आज्या म्हंजे पक्की उलटी खोपरी, कालूशेटचा गल्ला उताना कसा कराचा त्या त्याला बरब मायती. पुन हालूहालू कालूशेटला पुन आजाच धंद समजल व्हत. ते मूल कालूशेट त्याला बोलला, "आज्या, ये फरक्यान जिता पोपट हाय न ते बाटलीन उंदीर माराचा इश हाय. ध्यानान ठेव, रस्त्यान फरका उगारलास त तो पोपट उरून जाईल. न ती बाटली उगरून तिचा वास जरी झेतलास त तू तनचे तया वरती पोचशील. समाजला का मी कय सांगला त्या?"

आवरे वर्सा कालूशेटचे आया काम केल्याव आता आज्याला पुन कालूशेट काय चीज हाय त्या बरब मायती परला व्हता. रस्त्यानशी जाताना त्यानी तल्याचे बाजूला येके झाराचे खाली जागा बगली. कोन येय जाय नाय या बगून ते भूजलेले कोंबरीव आरवा हात मारला. न बाटलीन जी मवाची पयले धारची व्हती ती घश्याचे खाली वतून आज्याची गारी टाइट.

तिकर जेवनाचे टायमाला कालूशेट घरा जेला. न घरा जेल्या-जेल्या बायकोला जेवान वाराला सांगला.
त्याची बायको बोलली, "आवो, थोरा टाइम आजून धीर धरा, आजून जेवान चुलीवरुच हाय."
त्याव कालूशेट बोलला,"मंगाशी मी भूजलेली कोंबरी न येक बाटली आज्याचे बरब घरा पाठवूनशी दिली."
कालूशेटची बायको बोलली," सकाल पासून आज्या घराच आला नाय, मंग भूजलेली कोंबरी न बाटली घरा कशी येईल?"

मंग तेच रागान तनतनत कालूशेट त्याचे हाफिसान जेला. तया बगतय त हाफिसांची एशी-बिशी चालू करून आज्या गांड वर करून आरवा झोपला व्हता. कालूशेटनी आज्याला चार-पाच हाका मारल्या. पुन आज्याव त्याचा कय परिनाम नय. परिनाम होईल तरी कैसा, आगोदरुच मवाची न त्यान ती पुन पयले धारची आवरा सगला असल्याव आज्या कला उठतय. आज्या उठ नय बगून कालूशेटनी तेच रागान कोपर्यांची फली उचालली न आज्याचे गांडीव तिची उपट मारली. आखर आज्या उपट टाकणाराचे सगले खानदानाची आय-माय घालत सूजलेले जागव हात लावत कोकलत उठला. तुजे आशीची... याचे पुरचा आज्याचा वाक्य पुरा होवाचे आगोदरुच आज्याचे गांडीव दुसरी उपट. आता मातूर आज्याची पिलेली सगली उतारली. समोर बगतय त कालूशेट हातान फली झेवून उभा.

"शेट, कय झाला? मारताव कनाला?",आज्यानी इचारला.
"मारतय कला...मारतय कला...माजी बाटली पिलीस न आया गांड वर करून झोपलास न वरती इचारतस मारतय कला...",कालूशेट रागान बोलला.
"मंगाशी, मी तुजे जवल जो सामान दिलेला त्याचा कय केलास?",कालूशेटनी इचारला.

त्याव आज्या बोलला,"शेट, मी तुमचे घराच जात व्हतो. पुन रस्त्यान जोराचा वारा सुटला न ते वाऱ्याचे बरब तो फरका पुन उरला. न मंगाशी तुमीच बोलल व्हतव फरका उरला त तो पोपट पुन उरून जाईल. न म तसाच झाला ते फरक्याचे बरब तो पोपट पुन उरून जेला. न मी भिलो, मना वाटला तुमचे घरा जेल्याव तुमी मना जीता कापशिव. त्याचा मना टेंशन आला न मी तो बाटलींचा उंदीर माराचा इश पिला. न आता आयाशी थोरा शेर आरवा परून मरन येवाची वाट बगत व्हतो."

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, २१ मार्च, २०१३

आगरी कथा-झंगाट (Story In Agri Bhasha)


आगरी कथा-झंगाट

दा-पंदरा दिस झाल असतीन सगले बेलपारे गावान येकुच इशय चालू व्हता. यो इशय चालू होवाला पुन मोटा कारण व्हता. गावांचे शीता ववणीसचा पोऱ्या जेले दोन मयन गावान दिसला नाय. यक बोलतय त्याचा मडर झाला त बीजा बोलतय त्याचा बायेर येके भैय्यानी बरब लफरा व्हता, त आजून दुसरा कोन बोलतय उदारीचे मूल नाम्यानी जीव दिला आसल. ज्याला ज्या-ज्या सुचतय तसा त्यो-त्यो त्याची डोकी चालवतय. सगल्याना निसता ऊत आला व्हता. त्या बोलतान ना "बोलनारेचा तोंड धरवल, पुन पादनार्याचा पाद नाय धरवाचा"

बेलपारे गावांचे सगले घरान यो येकुच इशय, नाम्या कया जेला, नाम्याचा कय झाला. यके नाम्यानी सगल्याना येरा बनवला व्हता. तसा यो नाम्या नय बोलाला आवली मनुष. कवा कय करल याचा कय भरोसा नाय. रोज राचचे तीन-चार गलासा पिले शिवाय याला झोप येवाची नाय, आता मी कनचे गलासांची बात करतय त्या तुमाला समाजलाच आसल. याचा बापूस त्याचे लान पनीच वर जेला. तवा पासून शीता ववनीसनी याला सांबालला. नवरा वर जेल्या पासून सगले पावसाल्यान शीता ववनीसनी यकटीनी सगली शेता सांबालली, उनाल्यान काश्या लावल्या. आवरे कष्टामुल आज घरन पैसा आसाचा. तेमुलच आवरा सगला चंगला चालू आसताना नाम्या जेला कया, त्याला कय झाला यो इशय गावान जोरान चालू व्हता.

त आसा यो नाम्या, गावान जवरी-जवरी लफरी होतान त्यान याचा नय आला त लोकाना कयतरी येगलाच वाटत. जया-जया लफरा तया-तया नाम्या. नाम्याला त्याचे पक्षाचा लय मोटा पुलका. गावान जवा-जवा निवरनुका लागतान तवा-तवा नाम्या दुसरे पार्टीचे लोकाना हायरान करून सोरतो. रातचे दारू पिऊन ते लोकांचे घराव दगरा फेक, शिवा दे, मारामाऱ्या कर आस सगल उदयोग करण्यान याची सगली निवरनुक जात. गावांचे याचे सरके सगले लोकांचा यो पुडारी. तेमुल आवरे सगले कामान याचे हातान पैसा कवा पूर नाय. दुनयेची सगली उदारी याचे नावाव. खानार-पिनार सगलीजना पुना पैसा भराचे टायमाला नाम्या शेट पूर.

आवरे सगले कामान नाम्याला समाजला त्याचे मामासचे कोपरोली गावान ये मयन्यान निवरनुका हायीत. नाम्याचा मामुस पुन नाम्याचे पक्षाचा. नाम्यानी कोपरोलीला जावाचा इचार केला, निवरनुका हायीत तेमुल दा-पंदरा दिस पायजे तवरा खावा-पिवाला भेटल, पैशेव भेटतीन, सगली मजा आसल.  घरन आशीला सांगला दा-पंदरा दिस बायेर फिराला जातय. जर आशीला सांगला आसता मामासचे कर चाललोय त तिनी जावून दिला नसता. तीलाव मायती हाय ते गावान निवरनुका हायीत, यो तखर जावून पुन नसता झंगाट करल.

धन्या शेट नाम्याचा मामुस, कोपरोली गावान त्याचा येकट्याचा गावठीचा धंदा. धन्या शेटचा गावठीचा धंदा मनजे ज्याम भारी काम. दिसाला गुत्याव हाजार-दीर हाजार गलासांचा धंदा, न त्याचे कतीतरी जास्त माल रोज खुजे न पोटल भरून बायेर जात व्हता. मामसचा धंदा आवरे जोरान व्हता क मामासला मुताला पुन येल नवता मिल. भाचास घरा आलाय पावून मामुस खुश झाला. मामासला वाटला भाचास घरा आलाय त त्याचे तीन-चार दिस धंदा देवून पुन्याला जावून यव. मामासची पुन्याचे एके बाबाव रास भक्ती. घरन, धंद्याव सगलेकर ते बाबाचा ये आशेल मोट-मोट फोटू. मामुस खुशी-खुशीन पुन्याला जेला. मामासला तरी काय मायती पूर कय व्हनार हाय. त्याला तरी कय मायती नाम्या गल्ल्याव मनजे गल्ला गललाच मनून.

झालाव तसाच, नाम्याचे सारकी कोपरोली गावांशी सात-आठ पोरा न बरब पयले धारची निकली जलती दारू. आदीच तो नाम्या न वरशी पिवाला पयले धारची दारू...मंग काय बोलालाच नको...हालूहालू गावांच्या कोंबर्या, न खलाटीनच्या वालाच्या शेंगा गायब व्हवाला लागल्या. गावांचे लोकाइ त्याव सन केला. न मंग निवरनुकीचे चार-पाच दिस आगोदर राती नाम्यानी न दुसरे सात-आठ पोराई रमनशेटचे घराव दगरा मारून घराची सगली कौला फोरून टाकली, न तेच दगरांशी दोन-चार दगरा रमनशेटचे डोकरे आशीचे न त्याचे पोरीचे लागली. यो रमनशेट दुसरे पार्टीचा मानुस व्हता मनून नाम्यानी त्याचे घराची कौला फोरली. नाम्याला वाटला आता त्याचे पार्टीची लोका त्याला लय मान देतीन, पैसा देतीन.

पुन झाला सगला भलताच, निवरनुका जेल्या चुलीन आसा बोलून सगली गावांची लोका येक झाली. त्याला कारण पुन तसाच व्हता, रमनशेट डोकरी दवाखान्यान शिरीयस व्हती. नय बोलला तरी रमनशेटनी गावाला जवा-जवा मदद लागली तवा-तवा मदद केली व्हती. सगले कोपरोलीचे लोकाइ नाम्या न त्याचे बरब होत ते सगले लोकाना पकरल, मरस्तोव मारल. गावकी जमली, गावांचा शाम नाई बोलवला, न ये सगल्याचं चमनगोट केलं न गांडीव उपटी मारत-मारत गावचे बायेर कारल.

आज नाम्याचे घराचे समोर सगली डोकरी लोका, बायका-बापये, पोरी-पोरा सगलीजना जमली व्हती....इ लोकांची रास गर्दी...गर्दी क झायली असा तुमी इचारताव मनून मी सांगतय....तिरुपतीशी जावून आल्याव गावजेवान नको का घालाला....!!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

आगरी भयकथा: रातीचा खेल (Haunted Story)


आगरी भयकथा:  रातीचा खेल

जुनी डोकरी लोका पयलेपासून सांगतान, आमावसेचे राती जवा सगलीकर कालोख असत, तवा सगली भूता, हारली, मुंजे त्यांची नेमीची रावाची ठिकाना सोरून माणसांचे दुनयेन येतान. आमावसेचे रातीला त्या सगल्यांची ताकत एक होवून जात आन त्या सगल्यांचे ताकतीसमोर माणसाची ताकत कमी व्हत जाते...

रातीचे कालोखान जवा मित्रान बरब फिराला जातून तवा कवरी मजा असत ना. मजा कराची, गानी बोलाची, खावा-पिवाचा असा सगला करताना रस्ता कवा संपून जात समजच नय. पन परत्येक येली या असाच होईल असा नाय. कवा-कवा असा कय व्हत की, कोनालाच समज नाय या कय व्हतय...

समीर न त्याचे मित्रान बरब पन ते राती असाच कयतरी झाला. आजूनशेर त्याचे मनांशी ती घटना बाजूला व्हत नवती. कालेज चे दिवसान मित्रांचे बरब फिराला जावाला सगले पोरांना आवरत. समीर आनी त्याचे मित्रांनी पुन असाच एक प्लान केला की पुरचे शनवार आन रयवारी मंग्याचे गावाला जावाचा. मंग्याचा गाव कोकनान. घराचे बाजूला नारलाची मोठमोठी झारा हायीत, ५ मिनटाव दर्या हाय आनी आता आंबा-काजूचा सीजन पन चालू झालाय. असा सगला इचार करुनुच मंग्याचे गावाला जावाचा इचार फिक्स झाला.

शुकरवारी सांचे ५ वाजता सगलीजना पनवेल वरशी निगाली. कर्नाल्याची खिंड येईस्तोवर गारीन जोरजोरान गप्पा चालू झाल्या. सगलीजना मजेन व्हती. रात व्हत जेली तसा एकेकजन झोपाला लागला. गारी पुन आता रत्नागिरीला माग सोरून सिंधुदुर्गचे रोडला लागली व्हती.

आरदे रातीला गारी एके सुनसान रस्त्याव बंद परली. डायवरनी शाटकट माराचे नादान गारी हायवे सोरून सुनसान रोडवर नेली व्हती. मंग्याला सोरून दुसरे कोनाला ते रोडची कायपून मायती नवती. आजूबाजूचे गावांची लोका ते सगले भागाला भुताचा वारा म्हनुनुच बोलतान. पन ये टायमाला मंग्या त डाराडूर व्हता, त्याला तरी कसा समजाचा डायवरनी काय उद्योग केलन ते.

गारी बंद परल्यावर गारींशी ३-४ लोका डायवरची मदद कराला गारींशी खाली उतारली. गारींशी खाली उतरल्यावर बायेर एगलाच वास येवाला लागला. असा बोलतान की, कायपन कारन नसताना असा वास येवाला लागला की समजाचा वाईट आत्मा आपले आजूबाजूलाच हाय. गारीन बसलेले समीर आनी त्याचे मित्रांना बायेर काय चाललाय या समजत नवता. तवर्यान सगल्यांची नजर गारीचे टायरवर जेली. ते टायर वर रगत लागला व्हता, आजून जुरुसा खाली बगल्यावर टायरचे खाली काली माजर मेलीय या सगल्यांना समाजला.

मंग्याची त जाम टरकली व्हती, काली माजर गारीचे खाली आलीय ह्या एक लय मोठा आपशकुन हाय असा तो सगल्याना सांगाला लागला. पुन दुसरे मित्राई त्याचे बोलन्याला हासावर नेला. सगले जनाना ती फालतू गोष्ट वाटाला लागली. गारींची सगलीजना खाली उतारली. तवर्यान समीर ची नजर एके झाराखाली जेली, एक बाय ते झाराखाली बसली व्हती. लाम्बशी तवरा काय क्लिअर दिसत नवता. पुन त्याला वाटला की, कोनतरी त्याला हात हालवून बोलवतय. सगलीजना डायवरचे जवल जावून त्याला गारी चालू करासाठीच सल्ल देत व्हत. समीर एकटाच तिकर जावाला लागला. जैसा-जैसा समीर तीचे जवल जावाला लागला, तैसा-तैसा तो वास आजून जास्तीच येवाला लागला. त्यानी लांबशीस ते बायला इचारला आया कला बसलीस? त्याव ती कय बोलली नाय, नुसतीच जोर-जोरान हात हालवाला लागली. आता समीरला पुन भिवाला लागला, पुन त्याचे मनान परत इचार आला भूत-बीत त कय नसत ये जगान. लोका त चांदावरशी पुन जावुंशी परत आयलीन मंग आपून कला भिवाचा. ज ते बायला मदद पायजेल असल् त असा इचार करत समीर ते बाय जवल जात. तिनी साधच कपर घातल व्हत आन केस पुन अंबारा बांदला व्हता. आवरा सगला ठीक असताना त्याची नजर तीचे जललेले हाता कर जात. तीच जललेले हात बघुंशी समीर मनांशी पुरा भिला. ती बाय कय तरी बोलाला लागली आन समीर त पुरा कापाला लागला. बगाला जेला त तशी ती बाय साधीच दिसत व्हती, पुन तिचा आवाज मातूर लय डेंजर. तिचा आशेला आवाज आयकून चड्ड्या तयाच वल्या व्हतीन. समीर आता लयूच भिला आन गारीचे कर पला साठी पावला उचलाला लागला, पुन कनचा काय. त्याच पाय त जस एके जागी आरकून परल्यासारख झाल व्हत. समीर जोरजोरान कापत व्हता. ती बाय बोलली, मनाव तुजे बरब झेवून चल, मना आया नय रावाचा. त्या आयकून समीर आजून भिला. तो मंग्याला हाका माराचा परयत्न कराला लागला, पुन कसला काय त्याचे घशांशी आवाज बायेर परत नवता. तवर्यान त्याला आवाज आयकाला आला, समीर चल बस चालू झालीय. आंगांचा सगला जोर करून समीर धावाचा परयत्न कराला लागला, पुन येवेली ते बाय नी त्याच केस पकरल. तरीपून परत सगला जोर कारून तो धावाला लागला. समीर पलत-पलत गारी जवल पोचला पुन त्यानी डोक्याव हात लावल्याव त्याला समाजला की, त्याचे डोक्यावच थोरस केस ते बायनी वरल व्हत, ते तीचे हातान जेल. त्यानी डायवरला तनशी लवकर-लवकर गारी पलवाला सांगली. समीर गारींशी माग बगाला लागला तशी ती बाय जोर जोरान वरडाला लागली, मनाव तुजे बरब झेवून चल...मनाव तुजे बरब झेवून चल...

गारीन समीर नी ती गोष्ट सगल्याना सांगली. पुन कोनीच त्याचाव भरोसा ठेवला नय. तो बाता मारतय असाच सगल्याना वाटत व्हता.

पुन काय जानो का ती बाय आता समीरला सगलेकर दिसत. तो जया-जया जात तया-तया ती त्याचे मंगारी सावली सारखी दिसत आसत. समीर भिलेला असत, पुन कोणाला कय सांग नय. त्याला मायती हाय कोनीपून त्याचे बोलण्याव इश्वास ठेवाचा नाय. डोक्यावच उपटलेल केस आता जैस-जैस उगवाला लागलन तैशी-तैशी ती बाय आजून समीर चे मंगारी-मंगारी जास्तीच फिराला लागलीय. समीर पुन आता आमावसे चे राती उठून जोर जोरान कोकलाला लागलाय. घरांचे लोकाई समीरला डाक्टरचे कर नेला व्हता, डाक्टर बोलला सगला नार्मल हाय, त्याला कय नय झाला. आता ते डाक्टरला तरी काय मायती समीरचे बरब ते राती काय झाला व्हता त्या....

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

© Photo Copyrights: Hrishikesh Thakur


जागतिक महिला दिन विशेष:स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

१९०८ साली न्यूयॉर्क येथील महिलांनी न्याय, हक्क, सुरक्षितता आणि समान संधी यांची मागणी केली आणि त्यांना त्यांचा हक्क मिळाला. पण, आज २१ व्या शतकात देखील भारतातील महिलांना त्यांचा हक्क नाकारला जातोय.

८ मार्च १८५७ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, या आंदोलनाची तीव्रता इतकी अधिक होती की, जागतिक स्तरावर देखील याचे पडसाद उमटू लागले. १९०८ साली न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर महिलांनी त्यांच्या "कामाच्या जागी सुरक्षितता आणि चांगली वागणूक" या दोन प्रमुख मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने निदर्शने केली.

त्या घटनेनंतरच्या १५६ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही आपल्या भारतात काही अपवाद वगळता त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. कामाच्या ठिकाणी पुरुषांना अधिक मानधन, अधिक मानसन्मान, बढतीमध्ये पुरुषांचा अधिक विचार अश्या गोष्टी अजूनही दिसून येतात. २०१३-१४ च्या वित्तीय अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री श्री.पी.चिदंबरम यांनी खास महिलांसाठी स्वतंत्र बैंकेची घोषणा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करून करून सरकारच्या दृष्टीने सुरक्षित पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्ली बलात्कार घटनेनंतर महिलांबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा घडताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखिल भारतातील विविध राज्यातून महिलांच्या विटंबनेच्या घटना समोर येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार २०१३ या वर्षातील पहिल्या दोन महिन्यात जवळपास १८२ बलात्काराच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी आहे. ही फक्त नोंद केलेल्या घटनांची आकडेवारी आहे. दुर्गम भागात अश्या किती कळ्या दररोज निस्तेज होत असतील याचा विचार करवत नाही. दिल्ली येथे मिडीयाच्या क्रेन्स उपलब्ध असतात त्यामुळे त्या घटनेला जवळपास १०-१२ दिवस २४*७ करून सबसे तेज करून टाकले जाते. महाराष्ट्रात भंडारा येथे घडलेल्या घटनेची १५ दिवसापर्यंत कोणत्याही हिंदी अथवा इंग्लिश मिडीयाने नोंद घेण्याचे कष्ट घेतले नव्हते. जेव्हा लोकसभेत हा प्रश्न मांडला गेला तेव्हाच त्यांचे लक्ष महाराष्ट्रातील घटनेकडे वेधले गेले.

एका बाजूला शहरी भागातील महिलांचा स्त्रियांच्या समान हक्कांसाठी, सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रस्थापित पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध लढा चालू आहे. भारत सरकारचा अंतरिक्ष कार्यक्रम चालू आहे, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. सरकार लढाऊ विमानांसाठी हजारो करोड रुपयांची तरतूद करते, जी अनेक वेळा दुर्घटनाग्रस्त होतात. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील महिला योग्य शिक्षण, दैनंदिन गरजा, आवश्यक स्वच्छता आणि पानी या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत.

महिला आणि मुलींसाठी एक करियर नेहमीच तयारीत असते. त्या संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही मोबदल्याशिवाय पानी भरणे, जेवण बनवणे आणि धुणीभांडी करने ह्यात व्यतीत करतात. शालेय शिक्षण हे तर नावालाच दिले जाते, अनेक भागात शाळा हे प्रकरण लग्नाच्या अगोदर वेळ घालविण्यासाठी केलेली तरतूद इतपतच असते. या प्रकाराला आजच्या काळात अपवाद निर्माण झालेले आहेत. शाळा मागे पडली असली तरीदेखील कॉलेजनंतर लग्न हे देखील याचं प्रकारात मोडतं.

ग्रामीण भागातील बँका आणि ग्रामीण भागाला कर्जपुरवठा हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील धनिकांना SUV वैगेरे खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मुख्य प्रवाहातील बँका महिलांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज अनेक सहकारी बँका पुढे येत आहेत. ठोक विक्रेते, घरगुती नोकर, शेतमजूर अश्या असंघटीत आणि अपरिचित क्षेत्रात ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत आणि ह्याच क्षेत्राला सर्वात जास्त पैशाची गरज असते.

सातारा जिल्ह्यांमध्ये, चेतना गाला सिन्हा यांच्या माणदेशी महिला बँकेच्या आज अनेक ठिकाणी शाखा निर्माण झालेल्या आहेत, ग्रामीण महिला सक्षमीकरण ह्या एकमेव उद्देशाने माणदेशी महिला बँकेची स्थापना करण्यात आली होती. चेतना गाला सिन्हा सांगतात की, "महिलांच्या बँकेला परवानगी मिळणे की काही सोपी गोष्ट नव्हती, आणि प्रामुख्याने त्यातील सदस्य अशिक्षित असताना तर परवानगी मिळवणे कठीण गोष्ट होती. बँकेची नोंदणी करण्यास नकार देण्यात आला. परंतु महिलांनी हार मानली नाही. त्यांनी तेथील व्यवस्थापनातील वाणिज्य शाखेतील पदवीधराना गणकयंत्र(कैलकुलेटर) शिवाय अवघड स्वरूपातील व्याजाची रक्कम काढण्यास सांगितली. परंतु कोणालाही ती रक्कम काढणे जमले नाही याउलट महिलांनी ती रक्कम सहजरीत्या काढली. बँकेला परवानगी देण्यात आली आणि महिलांनी ३ रुपयांच्या अधिक रक्कम ठेव म्हणून ठेवली. अश्या प्रकारे बँक चालविणे नक्कीच सोपे नव्हते."

ग्रामीण भागातील शाळांना सोयीसुविधांचा अभाव आहे, तेथील शिक्षक देखील जबाबदारीने वागताना दिसून येत नाहीत, शाळांच्या इमारती ह्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत, शाळेमध्ये स्वच्छतागृह असणे ही आश्चर्याची गोष्ट असते. घरकाम आणि भावंडांची देखभाल करने या कारणांमुळे मुलींचे शाळेमधून गळती होण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना दिवसाचा भत्ता पुरुषांच्या मनाने खुपच कमी मिळतो आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थावर होतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामधील अनेक आदिवासी जमातीपैकी एक असलेल्या कोरकू जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण देशाच्या इतर भागातील तुलनेत खूप अधिक आहे. पैशाच्या अभावी या महिलांना प्रसुती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतावर कामावर जावे लागते. प्रसूतीनंतर मिळणारी रजा वैगेरे गोष्टी यांच्यासाठी अलिशान मौजमजा या प्रकारात मोडतात. जर त्या महिलांनी काम केलं नाही तर त्या भुकेने व्याकुळ होवून मरून जातील. त्यांची मुले कुपोषित आणि कमी वजनाची जन्माला येतात. यापैकी अनेकजण वर्षभर देखील जगत नाही.

दिल्ली बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या अनेकांना इरोम शर्मिला किंवा सोनी सोरी किंवा यांच्यासारख्या शेकडो महिलांविषयी काहीच माहिती नसते. काश्मीर, उत्तर पूर्वेकडील राज्ये, मावोवादी, नक्षलवादी विभागातील महिलांना सुरक्षा यंत्रणांकडून त्रास सहन करावा लागतो. पण सुरक्षा यंत्रणांच्या धाकामुळे अशा घटना देशासमोर येत नाहीत.

जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात तेव्हा, चकचकीत मिडिया आणि जाहिरात क्षेत्र महिलांमध्ये असलेल्या भीतीचे खाद्य करून स्वतःच्या झोळ्या भरण्याचे उद्योग करत असते. टीव्हीवर कशा प्रकारच्या जाहिराती देत असतात हे आपणा सर्वांना माहिती आहेच. महिलांना शोभेची वस्तू म्हणून वापर घेतला जातो. गरज असो-नसो शोभेच्या बाहुल्या ह्या हव्यातच असा या क्षेत्राचा समज आहे. डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये भपकेबाजपणा.

या भपकेबाज दुनियेत, पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध, सामाजिक सुरक्षिततेसाठी, चांगल्या मानधनासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याची वाट बिकट आहे. तरुण पिढी आश्वासक असली तरी, महिलांमधील असुरक्षिततेची भावना सर्व ठिकाणी वाढू लागली आहे. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, लोकलमध्ये, बसमध्ये कधी काय होईल याची कोणीही खात्री देत नाही. सुरक्षा व्यवस्था आश्वासक नाही. गोरे असणे, सडपातळ असणे किंवा तरुण असणे हा  आजच्या गुन्हेगारी आणि निर्दयी जगतात अपराध आहे, अशाच गोष्टी आजूबाजूला घडत आहेत.

अजून काही काळानंतर पेपर स्प्रे सारखे प्रकार महिलांच्या पर्समध्ये सहज दिसू शकतील. पण ह्या प्रकारांची गरजच का भासतेय याचा यंत्रणा कधी विचार करणार आहेत. न्यूयॉर्क येथे साहसी आंदोलन करणाऱ्या महिला आजची परिस्थिती पाहून जरूर निराश असतील. ८ मार्च ह्या एका दिवशी स्त्रियांचे गोडवे गाणारा समाज, वर्षातील ३६४ दिवस मात्र स्त्रियांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक छळ करण्यास मोकळा..........

आपलाच,
आमोद पाटील.

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

११ फेब्रुवारीपासून बेमुदत सिडको बंद (CIDCO BAND)


११ फेब्रुवारीपासून बेमुदत सिडको बंद
मा.श्री. लोकनेते. दि.बा.पाटील यांच्या निवास्थानी मंगळवार दिनांक २९ जानेवारी झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी जेएनपीटी-सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने ११ फेब्रुवारीपासून बेमुदत सिडको बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या विभागवार बैठकांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

१.दिनांक: ४ फेब्रुवारी २०१३, सायंकाळी ५.०० वाजता
ठिकाण: कामोठे-हनुमान मंदिर (खारघर ते खांदा विभाग)

२.दिनांक: ५ फेब्रुवारी २०१३, सकाळी ११.०० वाजता
ठिकाण: फुंडे कॉलेज (द्रोणागिरी विभाग)

३.दिनांक: ५ फेब्रुवारी २०१३, सायंकाळी ५.०० वाजता
ठिकाण: पारगाव हनुमान मंदिर (गव्हाण ते वडघर विभग)

४.दिनांक: ६ फेब्रुवारी २०१३, दुपारी ३.०० वाजता
ठिकाण: सिडको भवन हॉल (सिडकोमधील सर्व कामगार संघटनांसोबत बैठक)

५.दिनांक: ६ फेब्रुवारी २०१३, सायंकाळी ५.०० वाजता
ठिकाण: शिरवणे गाव (कळवा ते बेलापूर विभाग)

६.दिनांक: ९ फेब्रुवारी २०१३, सायंकाळी ४.०० वाजता
ठिकाण: जासई येथे सिडको प्रकल्पग्रस्तांचा जाहीर मेळावा (लोकनेते दि.बा.पाटीलसाहेब सभागृह, हुतात्मा मैदान, जासई)

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

MTHL प्रकल्पग्रस्तांची भूमिका:मागण्या आणि विरोधMTHL प्रकल्पग्रस्तांची भूमिका:मागण्या आणि विरोध

शिवडी-न्हावाशेवा-जासई सागरी सेतूला केंद्र सरकारने १,९२० कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. पण या बातमीसोबत MMRDA चे आयुक्त राहुल अस्थाना यांनी प्रसारमाध्यमांसमोर या प्रकल्पाची माहिती देताना एक विधान केलेले आहे, ते पुढीलप्रमाणे," रायगड जिल्ह्यातील चिर्ले, जासई व गव्हाण या तीन गावांतील प्रकल्पग्रस्तांचा आणि ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध नाही." तर हे केलेले विधान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सरकार यापुढे विचार करणार नाही हेच सूचित करते. प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की, जोपर्यंत मागील सर्व प्रकल्पांच्या प्रलंबित मागण्या सरकार, सिडको, जे.एन.पी.टी. सोडवणार नाही तोपर्यंत या प्रकल्पाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. सरकारी यंत्रणा जर प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात धूळफेक करणार असतील तर, त्यांना "योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या स्वरुपात" प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दिसायला सुरुवात होईल.

अगोदर देखील प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अनेकवेळा धूळफेक करून काही मंडळींनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला आहे. उरण, नवी मुंबई, पनवेल या परिसरात याअगोदर झालेल्या प्रकल्पांबाबत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत. सर्वच प्रकल्पांनी केलेली आश्वासने पूर्ण न करता येथील स्थानिकांची फसवणूकच केलेली आहे. माजी खासदार व लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या घरी MMRDA सोबत झालेल्या बैठकीत देखील जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या प्रकल्पासाठी जमिनी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.


प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या:
JNPT, NH-4B, MIDC, जासई येथील रस्त्याचे चौपदरीकरण, रेल्वे लाईन अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून प्रकल्प उभारले गेले असून या प्रकल्पग्रस्तांचे बरेसचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याशिवाय शिवडी-न्हावाशेवा-जासई या MTHL प्रकल्पाला जमिनी देण्यास प्रकल्पग्रस्तांचा विरोध राहणार आहे.

१.सर्वप्रथम JNPT प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनींबाबत:
JNPT प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावयाच्या १२.५ टक्के जमिनींबाबत सरकार गेली ३० वर्षे आश्वासनेच देत आहे. १९८४ साली झालेल्या आंदोलनात ५ हुतात्म्यांचा बळी जाऊन देखील हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या आंदोलनाचा फायदा नवी मुंबईतील CIDCO प्रकल्पग्रस्तांना झाला, पण ज्यांनी हे आंदोलन केले अशी JNPT प्रकल्पग्रस्त जनता अजूनही न्याय होण्याची वाट बघत आहे. आता केंद्र सरकारतर्फे JNPT प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के देण्यात यावे अशी मंजुरी मिळाली असतानाही अजूनही त्यांचे वाटप करायला सरकारी यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसते. हे १२.५ टक्के मंजूर करताना देखील सरकारने धूर्तपणा केल्याचे उघड होत आहे. सरकार म्हणतंय की, जासई तसेच अजून काही गावातील जागा याअगोदरच "गावठाण विस्तारासाठी" देण्यात आल्या आहेत, त्यामुळे या गावातील प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंड मिळणार नाहीत. प्रत्यक्षात अशी "गावठाण विस्तारासाठी" कोणत्याही प्रकारची जागा ना सरकारी यंत्रणांनी दिलीय ना JNPT ने. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अशी धूळफेक करने थांबवून १२.५ टक्के लवकरात लवकर सर्व प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावेत.

२.NH-4B हा JNPT ची वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात आला. सिडकोतर्फे अतिशय अल्प मोबदल्यात ह्या प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या आणि नंतर सदर जमिनी JNPT कडे हस्तांतरित करण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे १२.५% या जमिनींना देण्यात आले नाहीत. त्यामुळे NH-4B प्रकल्पग्रस्तांना सिडकोने १२.५% द्यायलाच हवेत. कारण आता MTHL प्रकल्पासाठी देखील सिडको जमिनी संपादित करून नंतर त्या जमिनी MMRDA कडे हस्तांतरित करणार आहे. आणि या MTHL प्रकल्पग्रस्तांना सिडको १२.५% किंवा नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडाइतकेच भूखंड देणार आहे. त्यामुळे सिडकोचा हाच न्यायाने NH-4B प्रकल्पग्रस्तांना देखील लागू होतो.

३.उरण ते पामबीच मार्ग या नव्याने झालेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जासई येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांना अजूनही कोणत्याही स्वरुपाची नुकसानभरपाई वा जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर ती नुकसानभरपाई देण्यात यावी. सदर रस्त्याला जोडूनच होणारे अपघात टाळण्यासाठी जासई गावाला सर्विस रोड व जासई नाका आणि दास्तान फाटा येथे रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पूल(स्कायवॉक) ची उभारणी करण्यात यावी.

४.रेल्वे लाईन्ससाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांच्या देखील अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.

५.JNPT ची निर्मिती करताना शेवा आणि अन्य काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना JNPT तर्फे घरे बांधून देण्यात आली. सुरुवातीची १-२ वर्षे उलटल्यानंतर ह्या घरांनी रंग दाखविणे सुरु केले. अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधकाम केल्यामुळे तेथील घरांना वाळवी लागणे, सिमेंट-रेती वैगेरे बांधकाम मटेरियल बाहेर येणे या सारख्या घटना घडू लागल्या. त्यामुळे ज्या ठेकेदारानी हे बांधकाम तसेच जमिनीचा भराव केले होते, त्या सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांना पुन्हा घरे बांधून देणे.
या व अशा सर्वच प्रलंबित मागण्या मान्य केल्याशिवाय "शिवडी-न्हावाशेवा-जासई सागरी सेतू" MTHL प्रकल्पासाठी येथील जमिनी संपादित करण्यास सर्वच प्रकल्पग्रस्त स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे.

MTHL प्रकल्पग्रस्तांची भूमिका:

१.केंद्रीय कृषिमंत्री मा.शरद पवार यांनी डोंबिवली येथे पार पडलेल्या आगरी महोत्सवात तसेच पनवेल येथे पार पडलेल्या अखिल आगरी समाज परिषदेच्या महाअधिवेशनात बोलताना त्यांनी," ग्रामीण भागातील प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या कूपात रक्कम आणि २० टक्के भूखंड देणार असल्याची घोषणा केली." त्यामुळे MTHL प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे आणि MMRDA ही मागणी राहिलं.
२.केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन भू-संपादन कायद्याला मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिलंय की, येत्या अर्थसंकल्प अधिवेशनात हे विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत मंजूर करणार आहोत. त्यामुळे हा कायदा मंजूर झाला तर ह्या कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळायला हवा.
नवीन भू-संपादन कायद्यातील काही तरतुदी:
  • ग्रामीण भागातील जमिनींना बाजारभावाच्या चौपट रक्कम मिळणार.
  • शहरी भागात बाजारभावाच्या दुप्पट रक्कम मिळणार.
  • प्रकल्पग्रस्त कुटुंबाला २० वर्षे घरबसल्या पगार मिळणार (हा पगार सुरुवातीला एकरकमी हवा असेल तर तश्या स्वरुपात देखील मिळणार)
  • प्रकल्प जर खाजगी मिळकतीतून उभारला जाणार असेल तर ८०% शेतकऱ्यांची मंजुरी आवश्यक.
  • प्रकल्प सरकारी आणि खाजगी भागीदारीतून उभारला जाणार असेल तर शेतकरी शेअर होल्डर राहणार.
२.MTHL हा प्रकल्प सरकारी आणि खाजगी भागीदारीतून उभारला जात असल्याने शेतकरी शेअर होल्डर राहायला हवा.
केंद्र सरकार-२०%
MMRDA-२०%
खाजगी क्षेत्र-६०%
म्हणजेच या प्रकल्पांमध्ये ४०% सरकारी आणि ६०% खाजगी गुंतवणूक होणार आहे. MMRDA ने दिनांक ८ ऑगस्ट, २०१२ रोजी माजी खासदार मा.श्री.दि.बा.पाटील(अध्यक्ष-जे.एन.पी.टी. आणि सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती) यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की, हा प्रकल्प खाजगी गुंतवणुकीतून उभारला जाणार असल्याने शेतकऱ्यांना शेअर होल्डर करू शकत नाही. आत्ता मात्र हे स्पष्ट होतंय की, हा प्रकल्प सरकारी आणि खाजगी भागीदारीतून उभारला जातोय, त्यामुळे सदर प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांना शेअर होल्डर करायलाच हवं.
३.ज्या प्रकल्पग्रस्तांचे(जे याअगोदर देखील विविध प्रकल्पांत प्रकल्पग्रस्त होते आणि आता देखील होणार आहेत) उद्योगधंदे(जसे खाणकाम, कंटेनर यार्ड आदी) या प्रकल्पामुळे बंद पडणार आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना उद्योगधंद्यासाठी जमिनी आणि विविध परवानग्या बिनशर्त द्याव्यात.
४.प्रकल्पग्रस्त परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
५.सर्व वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात यावेत.
६.भविष्यात प्रकल्पामध्ये निघणारी छोटी-मोठी कामे प्रकल्पग्रस्तांना द्यावीत.
७.जमिनी संपादनासाठी कोणत्याही प्रकारच्या दलालांचा अथवा मध्यस्थांचा वापर न करता MMRA अध्यक्ष, MMRDA आयुक्त, सिडको आयुक्त आणि ज्या कंपनीला ह्या प्रकल्पाचे काम मिळणार आहे त्या कंपनीच्या उच्चपदस्थांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर चर्चा करावी. MMRDA आणि CIDCO ने प्रकल्पासंदर्भात त्यांची भूमिका प्रकल्पग्रस्तांचे नेते मा.दि.बा.पाटील साहेब यांच्या समोर मांडावी.
८.प्रकल्पांमध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्त युवकांना प्रकल्पाशी संबंधित व्यावसायिक व औद्योगिक शिक्षण देण्यात यावे.
९.या विभागामध्ये या अगोदरच अनेक मोठमोठे रस्ते आहेत आणि त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील खूप जास्त आहे. त्यामुळे जासई येथे अपघातांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी.
१०.मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १३ हेक्टर जमिनीसाठी त्यांनी जवळपास २८० कोटी(यातील १५७ कोटी "air space" साठी आणि १२३ कोटी जागेसाठी) मागणी केलेली आहे. आणि MMRDA चे आयुक्त रायगड मधील प्रकल्पग्रस्तांच्या २७ हेक्टर(जासई-१६ हेक्टर, गव्हान-८ हेक्टर, चिर्ले-४ हेक्टर) जागेसाठी २०० कोटी देणार आहेत. मग सिडको आणि MMRDA बाजारभाव नक्की कसा ठरवणार??

आपलाच,
आमोद पाटील.
(युवा प्रकल्पग्रस्त-जासई)मंगळवार, १ जानेवारी, २०१३

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांनो सावधान Navi Mumbai International Airport Land Acquisition


प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ आणि एम.एम.आर.डी.ए(जासई-चिर्ले-शिवडी सागरी सेतू) प्रकल्पग्रस्तांनो सावधान....

अगोदर आपणा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०१३ हे वर्ष आपणास आणि आपल्या कुटुंबियास सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगवर दाखविलेल्या आपुलकीबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

२०१३ हे वर्ष नवी मुंबई विमानतळ आणि जासई-शिवडी सागरी सेतू(MTHL) प्रकल्पग्रस्तांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याची चिन्हे आगरी समाज अधिवेशनातून दिसून आली. त्यामुळे नूतन वर्षाचे स्वागत करतानाच येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेली आहे. त्याच संदर्भात एक युवा प्रकल्पग्रस्त या नात्याने मी प्रत्यक्ष वाचलेले, पाहिलेले आणि ऐकलेले अनुभव आणि त्या अनुभवातून निर्माण झालेली भूमिका आपणा सर्वांसमोर मांडत आहे. तर आत्ताच झालेल्या आगरी समाज महाअधिवेशनात मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडलेली भूमिका आणि त्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी घेतलेली गप्प बसण्याची भूमिका बऱ्याच गोष्टी स्पष्ट करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर आपल्या भाषणात, तुम्ही जमिनी लवकरात लवकर द्या अशीच भूमिका घेतली होती. सरकार तुम्हांला नोकऱ्या देणार नाही अस बरच काही मुख्यमंत्री सूचित करून गेले. एक-दोन दिवसांनी मुख्यमंत्री दिल्लीला गेले, त्यांनी तेथे चर्चा केली आणि ती बातमी प्रसारमाध्यमांनी जनतेला सांगितली. तर ती बातमी अशी होती की,"विमानतळ प्रकल्पग्रस्त अतिशय अवास्तव मागणी करत आहेत. ते जमिनीला २ कोटी ते २० कोटी एकरी मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांना पैशाऐवजी २०-२२% विकसित जमीन देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा विचार चालू आहे."

तर ही माहिती प्रसारमाध्यमातून आम्हांला समजली आणि त्याचबरोबर येथील सर्वच स्थानिक पुढारी "सेटलमेंट" करण्यासाठीही तय्यार असल्याची बातमीही समजली. आत्ता जर या बातम्या खऱ्या असतील तर २०१३ हे वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी धोकादायक आहे. JNPT ला जमिनी देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला होता, त्या आंदोलनात ५ शेतकऱ्यांचा बळी गेला होता. तोच प्रकार यावेळी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस बंदोबस्तात जमिनी ताब्यात घेऊन प्रकल्पग्रस्तांचा विरोध मोडून काढला जावू शकतो.

मुख्यमंत्री अधिवेशनात एक मागणी करून गेले की, आम्हांला जमिनीचा सर्वे करून द्या. तर अशा प्रकारे सर्वे करून देणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या होत नाहीत तोपर्यंत जमीन संपादित करू द्यायची नाही, इतकेच काय तर जमिनीचा सर्वे देखील करून द्यायचा नाही. आजघडीला या जमिनींचा SATELLITE MAP रेडी आहे, त्यांना आत्ता फक्त प्रत्यक्ष जमिनींचा सर्वे करायचा आहे. एकदा का प्रत्यक्ष पद्धतीने जमिनींचा सर्वे झाला की ते प्रकल्पग्रस्तांच्या ढुंगणावर लाथ मारणार. त्यामुळे जमिनीला योग्य मोबदला,  योग्य पुनर्वसन आदी बाबींची खात्री सर्व प्रकल्पग्रस्त गावांना मिळत नाही तोपर्यंत या जमिनींवर कोणाही परक्याला पाय ठेवून देऊ नका.

जशी परिस्थिती विमानतळ (Navi Mumbai International Airport Land Acquisition) प्रकल्पग्रस्तांची तशीच परिस्थिती जासई-शिवडी सागरी सेतू (Mumbai Trans Harbour Link Land Acquisition) प्रकल्पग्रस्तांची. विमानतळाचा खर्च १५ हजार कोटी तर जासई-शिवडी सागरी सेतूचा (MTHL) खर्च १० हजार कोटी. भविष्यात मुंबई शहर उरण, पेण विभागात विस्तारीत करून तिसरी मुंबई उभारण्याची योजना या प्रकल्पाद्वारे साधण्याचा सरकारचा हेतू आहे. गेल्या पावसाळ्याच्या सुरवातीला(जून-२०१२) शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता जासई ते गव्हान येथील जमिनींचा सर्वे करने चालू केले. अनेक ठिकाणी Soil Testing साठी Borehole करण्यात आले. पण ही बातमी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना समजली आणि त्यांनी हा सर्वे बंद पाडला. पुढे प्रकल्पग्रस्तांनी अधिक माहिती मिळविली असता भेटलेली माहिती धक्कादायक होती. जमिनींचे दलाल असणाऱ्या नेते मंडळीनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विचारात न घेता सर्वे करण्यास परवानगी दिली होती. जर शेतकऱ्यांच्या जमिनी असतील तर त्यावर परवानगी देण्याचे अधिकार या दलालांना कोणी दिले? प्रकल्पग्रस्तांना इतकं मात्र जरूर समजलंय की, स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी सर्व पक्षांचे नेते आतून एकमेकांना मिठ्या मारत असतात आणि फक्त जनतेला फसविण्यासाठी निवडणुकांमध्ये एकमेकांना मारल्यासारखे करतात. येथे होणाऱ्या विकासकामांचा मलिदा कोण खातो, येथे येणाऱ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये कोणाला कंत्राट मिळतात, भविष्यात विमानतळ, सागरी सेतू यामध्ये मुख्य कंत्राटदार वेगळे असतील पण या प्रोजेक्टवर खरी हुकुमत कोणाची असेल, हायवे-टोलनाके कोणाच्या ताब्यात आहेत इ. सर्व गोष्टी सामान्य जनतेला, सामान्य प्रकल्पग्रस्तांना माहिती आहेत.

नवीन भू-संपादन कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. आगामी अधिवेशनात हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल आणि लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यसभेत मंजुरीसाठी पाठविले जाईल. त्यामुळे कदाचित हे विधेयक मार्च/एप्रिल-२०१३ च्या सुमारास मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अजून काही महिने तरी सर्व शेतकऱ्यांनी WAIT & WATCH ची भूमिका घ्यावी. मी ते सर्व विधेयक स्वतः वाचलेले आहे. या विधेयकातील अनेक तरतुदी आपल्या भागाच्या दृष्टीने चांगल्या आहे. इंटरनेटवर सरकारी वेबसाईटवर हे विधेयक डाऊनलोड करून ENGLISH/HINDI मध्ये वाचता येईल अशी सोय आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी हे विधेयक संपूर्ण वाचावे. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर जाण्याअगोदर त्यातील काही तरतुदींमध्ये बदल केले तरी बहुतेक विधेयक तसच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी डोंबिवली येथील आगरी महोत्सवात, पनवेल येथील आगरी समाज महाअधिवेशनात आणि खारघर येथील गोल्फकोर्स आणि स्कायवॉक उद्धाटनप्रसंगी सांगितल्याप्रमाणे आणि त्या कायद्यातील तरतुदीनुसार
१. ग्रामीण भागातील जमीन जर भूसंपादित होणार असेल तर त्या जमिनीला बाजारभावाच्या ४ पट रक्कम मिळणार.
२. प्रकल्प जर पूर्णपणे सरकारी मालकीचा असेल तर ७०% शेतकऱ्यांची/जमीन मालकांची संमती आवश्यक.
३. प्रकल्प जर खाजगी आणि सरकारी मालकीचा असेल तर(म्हणजेच बी.ओ.टी. तत्वावर आधारित-बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर) ८०% शेतकऱ्यांची/जमीन मालकांची संमती आवश्यक.
४. प्रकल्पग्रस्त कुटुंबाला २० वर्षे पगार(हा पगार एकदम हवा असल्यास एकदम देखील मिळू शकतो).
५. प्रकल्पग्रस्त कुटुंब त्या प्रकल्पामध्ये भागधारक राहणार(प्रकल्प पूर्णपणे सरकारी, पूर्णपणे खाजगी अथवा बी.ओ.टी. तत्वावर उभारलेला असला तरी प्रकल्पग्रस्त शेअरहोल्डर्स राहणार)
अजून बऱ्याच तरतुदी या नवीन भूसंपादन कायद्यामध्ये आहेत.

त्यामुळे कोणीही, कितीही, कसलीही लालूच दाखवली तरी जोपर्यंत हा कायदा संमत होत नाही तोपर्यंत आपल्या जमिनी संपादित होऊन द्यायच्या नाही. लवकर जमिनी हस्तांतरित केल्या पुढे हा कायदा मंजूर झाला तर आपलाच तोटा होऊ शकतो. हा कायदा मंजूर होऊदे, त्यातील तरतुदी आपल्या सर्वांसमोर येउदे मग पाहू काय करायचं ते. आत्ता कोणतेही मोठे सोंडे-गोंडे येउदे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्या सोंड्या-गोंड्याना त्यासाठीच नेमेलेले आहे, ते जमिनेंचे दलाल आहेत. ते नेते म्हणून मिरवत असले तरीही त्या लोकांनी स्वतःच इमान विकलेले आहे, आपल्या मातीशी गद्दारी केलेली आहे.


सर्व प्रकल्पग्रस्त गावांनी सर्वच राजकीय पक्षांना, त्यांचा स्थानिक पुढाऱ्यांना दूर ठेवूनच आपला विकास करवून घेणे गरजेचे आहे. कारण राजकीय नेते स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी जनतेला फसवायला तयार असतात. सर्व प्रकल्पग्रस्त गावांनी गावातील सर्वच ग्रामस्थांसोबत ग्रामसभेत,गावखीत गावाच्या हिताचे निर्णय घ्यावेत. राजकीय नेत्यांना जर मध्ये आणलंत तर ते स्वतःच्या राजकीय प्रचारासाठी, आर्थिक फायद्यासाठी आपला वापर करणार हे उघड सत्य आहे. जमिनी आपल्या जाणार आहेत, कुटुंब आपली उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाला याचं सोयरसुतक असण्याचं काहीच कारण नाही. उलट प्रकल्पग्रस्तांच्या वैतिरिक्त इतरांना हे विमानतळ लवकरात लवकर हवं आहे, कारण त्यांनी या परिसरात खरेदी केलेल्या प्रॉपर्टीला २० पट किंमत प्राप्त होईल. आत्ता ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे तर येथील स्थानिक पुढारी, घाटावरचे पुढारी, बिल्डर, जमिनेंचे दलाल, बाहेरून आलेला श्रीमंत वर्ग यांच्या नावावर येथील जमिनी, शाळा-कॉलेजेस, प्लॉट, बिल्डिंगमध्ये ब्लॉक इ. संपत्ती आहे, त्यांना या विमानतळाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे लोक मागे लागलेत विमानतळ लवकर करा, विमानतळ लवकर करा म्हणून. मात्र येथील स्थानिक आगरी माणूस पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करत बसणार आहे, इतरांच्या भल्यासाठी पुन्हा एकदा उध्वस्त होणार आहे....

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.