आमोद पाटील-आगरी बाणा: ऑगस्ट 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ऍड. दत्ता पाटील(Datta Patil Alibag)दत्ता पाटील(दादा)
आपल्या लढाऊ आणि प्रभावी शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारे आगरी समाजातील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ऍड. दत्तात्रय नारायण तथा दत्ता पाटील (वय ८५) यांचे शनिवारी २७ ऑगस्ट, २०११ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

राजकीय
विधानसभेतील मुलुख मैदान तोफ, शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे नेते म्हणून दत्ता पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात होते. विधिमंडळाच्या कायद्याचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांची १९८७ व १९८९ या काळात दोन वेळा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९६७ पासून १९९० पर्यंत सलग २५ वर्षे ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून गेले होते. एकूण २७ वर्षे ते विधानसभेचे आमदार होते. त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्षपद, पंचायत राज समितीचे सदस्यपद, विशेषाधिकार समितीचे सदस्यपद  आदी पदे भूषविली होती. विधानसभेत अभ्यासू व कणखर आमदार म्हणून त्यांची छाप होती. बेळगावच्या सीमाप्रश्नावरील लढ्यात त्यांनी ९ महिने कारावास भोगला होता.

शिक्षण
४ मार्च १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्मलेल्या दत्ता पाटील यांचे एल.एल.बी.पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचे वडील व शेकापचे संस्थापक नारायण नागू पाटील यांनी शेतकर्यांना व गोरगरीबांना न्याय देण्यासाठी त्यांना जाणीपूर्वक वकील केले होते. महाराष्ट्रातील निष्णात फौजदारी वकील म्हणून ते प्रसिद्ध होते.

शैक्षणिक कार्य
कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्याच्या खेडोपाडी शिक्षण नेऊन कै. ना. ना. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेला. अध्यापक विद्यालय, अभियांत्रिकी व होमिओपॅथी महाविद्यालये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालय ही त्यांच्या शैक्षणिक कार्याचे द्योतक आहेत. अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाचे ते कार्याध्यक्ष होते. अलिबाग येथील कुलाबा मॅटर्निटी हॉस्पिटल, अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती व रायगड बाजार आदी सहकार व सामाजिक क्षेत्रातील संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

सेझ विरोधी लढा
सहा-सात वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात "सेझ"चे वादळ घोंगावू लागले आणि दत्ता पाटील या झंझावाताची ताकद अनुभवायला मिळाली. उरण, पेण तालुक्यांच्या डोक्यावर महामुंबई विशेष आर्थी क्षेत्राचे संकट आले होते. रिलायन्ससारखी कंपनी सुमारे २५ हजार हेक्टर शेतजमीन संपादित करणार होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट होती. "तारणहार" समजल्या जाणऱ्या नेत्यांनी "विकास झाला पाहिजे" अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे "सेझ"च्या नावाखाली आपण देशोधडीला लागणार, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. असे चित्र असतानाच काही वकिलांनी पुढे येऊन "महामुंबई"ला विरोध करण्याची घोषणा केली. अर्थात यासाठीच सक्षम आणि निस्वार्थी नेतृत्व म्हणून एकेकाळचे झुंजार विरोधी पक्षनेते दत्ता पाटील हाच पर्याय होता. मात्र, ८२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दत्ता पाटलांनी "माझे वय झाले आहे" असे म्हणत स्पष्ट नकार दिला. हजारो शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती. अखेर वकील मंडळींनी "दादा तुमच्याशिवाय हा सेझचा राक्षस कोणीही गडू शकणार नाही" असा पवित्र घेतला. मग मात्र दत्ता पाटील ठाम उभे राहिले आणि महामुंबई संघर्ष समितीचा उदय झाला. या समितीच्या चिरनेर येथे झालेल्या पहिल्याच सभेत दत्ता पाटील म्हणजे काय हे अनुभवता आले. सत्ताधारी कॉंग्रेस, शेकाप, शिवसेना या पक्षांवर दादा तुटून पडले. रिलायन्सच्या अंबानीची तर त्यांनी घणाघाती भाषणातून लक्तरे वेशीवर टांगली. नवी मुंबई उभारायचीत.. धरणे बांधायचीत.. रेल्वे, रस्ते, बंदरे बांधायचीत तर आमचीच जमीन का? आम्ही त्याग किती करणार? एकापाठोपाठ घणाघाती प्रश्न येत होते आणि उपस्थितांना दत्ता पाटलांना वाघ का म्हणतात, याचा प्रत्यय आला. त्यानंतर या ढाण्या वाघाने वढाव, पेण, कोप्रोली, उरण, पंदिवे अशा गावांमध्ये सभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये एकात्मता, देशप्रेम आणि शेतीचे रक्षण करण्याची चेतना जागृत केली. "आमच्या वाट्याला याल तर याद राखा" अशी तंबी सरकारला सभांमधून वारंवार देत. त्यांच्या या हल्ल्यातून रायगडातील नेते तर सुटत नव्हतेच पण विलासराव देशमुख, नारायण राणे यांच्यावरही दादांचा हल्ला इतका बेफान असे की, वाटे नेता असावा तर असा!

उरण तहसील कार्यालयासमोर मोर्चा होता. एका पक्षाच्या तथाकथित निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या टोळक्याने दादांचे भाषण सुरु असताना हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी "कोण आहेत रे ते? पुढे या, तुमच्या नेत्यांविरुद्ध बोलल्यानंतर मिरच्या झोंबतात का? मग शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहायला सांगा...." अशा करारी आवाजात दम भरल्यानंतर पुन्हा कोणत्याही सभेत असे काही करण्याची हिंमत टग्यांना झाली नाही. रिलायन्स थोडीशी मागे हटल्यानंतर जुन महिन्यात महामुंबई संघर्ष समितीचा मेळावा उरण तालुक्यातील पंदिवे येथे झाला. तेव्हा त्यांनी केलेले भाषण हे "सेझ" विरोधातील लढाईतील सर्वात तडाखेबाज भाषण होते. ते ऐकणाऱ्याना दत्ता पाटील ८७ वर्षाचे तरुण आहेत, याची मनोमन खात्री पटली. गेल्या वर्षी पत्नीच्या निधनामुळे दादा काहीसे उदास होते. मात्र शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या आवाजातील धार तशीच कायम होती. शेतकऱ्यांचा हा कैवारी आता आपल्यात नाही. मात्र "जगावं तर वाघासारखं" ही त्यांची शिकवण "सेझ"विरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे.

अशा या आगरी समाजातील "ढाण्या वाघाला" समस्त आगरी बाणा परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

निवरनुका यणार हायीत............पुढील वर्षभर आपल्या परिसरात अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोणाला मत द्यायचं आणि का द्यायचं हे आत्ताच ठरवा. "आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात कोणत्याही राजकीय पक्षाला माझं मत विकणार नाही, टाकणार नाही. मत त्यालाच देईन जो माझा असेल. अन्यथा नकाराचा अधिकार वापरून सर्व उमेदवारांच्या विरोधात मत देणार." ही शपथ आपण सर्वानी घेणे खूप गरजेचं आहे. "नकाराचा अधिकार-सरकारने आपल्याला हा अधिकार दिलाय. याचा वापर करून आपण आपलं मत देऊ शकतो. पण ते सर्वांच्या विरोधात." कारण ५०० रुपयाच्या एका नोटेसाठी पुढची पाच वर्ष आपण भंगार प्रतिनिधी निवडून पाठवतो. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. नुसतचं बोलून काही होणार नाही. एकदा निवडून आल्यावर कसे आपल्या "गा@#$%" लात मारतात हे आपण पाहतोच. तेव्हा आपण आपली कामे करायला गेलो तर ते सांगणार, निवडणुकीच्या अगोदर पैसा दिलाय...............आत्ता सोच अपनी अपनी निवडणुकीच्या अगोदर एकदाच मिळणारे ५०० रुपये हवेत की विकासकामे???? लक्षात ठेवा हे राजकारणी आपले सेवक आहेत मालक नाहीत. जर या राजकीय व्यवस्थेत बदल हवा असेल तर आपल्यातला कोणीतरी या राजकीय व्यवस्थेत खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम-पंचायत सदस्य म्हणून पाठवायला हवा. नाहीतर राजकीय घराणेशाही चालूच आहे.............आपण पाहतो आहोत..........बाप झाल्यावर पोरगा..............पोरगा झाल्यावर पुतण्या...............नंतर नातू..............मुलगी...............अस हे प्रकरण वाढत जाते..............हे नव्या युगाचे राजे म्हणून वावरतात..............यांची लायकी तर काडीचीही नसते.............तरीही बापाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या जीवावर कमवलेल्या पैशातून हे असे बिनडोक लोक पुन्हा निवडून येतात...............याच्या सुरस कथा खूप आहेत पण जाऊदे................कारण आपली माणसेच निवडणुकीच्या वेळी पैसे घेऊन मते विकतात...............त्यात या बिचार्यांचा काय बर दोष????? बघा पटल तर घ्या नाहीतर जाऊद्या............. मत विका, मत देऊ नका आणि नंतर विकासकामांच्या नावाने बोंब उठवा.............


आयशा कती पिर्या जातीन, न आया कोनचे कोन म्होट व्हतीन
आर आर परकल्पग्रस्ता कवा तुज नशीब उगारतीन ||धृ||

यो सिवसेनेचा तो शाका पक्षाचा
राष्ट्रवादी न आय कांग्रेसचा
भाजपाचा न मनसेचा
बाजार मांडलाय ये आमचे काले आयचा
परकल्पग्रस्त म्हणून कवा सगलं तुजे कर पातीन????||१||

जो तो सांगतंय आमचे कर या व्ह
काय आमी करतून त्या सगल्याई बगा व्ह
सामील नय आमच्यान त कैसा तू समाजांचा
यावार काय हाय तो खऱ्या खोट्याचा
नीट इचार करुन्सी जा, नै त फुकट आफट्या पारतील||२||

मता आली का बग नै नै ते येतीन
कय बय सांगूनशी डोका आवूटूच करतीन
आमचे सारा कोन नय तुला भासवतीन
तुजा वारलेला ठावला तेच खातीन
कोनला कोयत्याशी नाय तुटणार, पुनते केसान गला कापतीन||३||

राजकारन्यांची त आवरी दुकाना
कंचे जा तरी पलसाला तीन पाना
ठरलेला सगळ्यांचा यकुच हुकाना
आमचे सार व्हा नैत मोरू माना
कुंडलीकाची त मोरलीय शाप मंग तुजी बरी ठेवतीन????||४||
कवी-पुंडलिक म्हात्रे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

होय आम्ही आगरी-कोळी(AGRI-KOLI SAMAJ) वेगवेगळे नसून एकच आहेत...........


               शंकर सखाराम यांनी 'आगरी-कोळी वेगळेच'(१६ जुलै, सकाळ) असे सांगून एका 'संवादाचे' विसंवादात रुपांतर केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आगरी-कोळी महोत्सवातून आगरी-कोळी एकच असल्याचे भासवले जाते असले तरी प्रत्यक्षात जातीसमूह म्हणून ते वेगळेच आहेत, अशी भूमिका शंकर सखाराम यांनी त्या लेखातून मांडली होती. त्या लेखाला समस्त आगरी बाणा परिवाराचा जाहीर विरोध आहे.

               वास्तविक आगरी समाज 'आगर' म्हणजेच शेती करतो. त्याचप्रमाणे उर्वरित काळात मासेमारीदेखील करतो; किंबहुना कोकणातील बहुतेक सर्व समाजाचे लोक शेतीबरोबरच मासेमारीदेखील करतात. आगरी लोक भाताच्या शेतातच मासेदेखील पाळतात. त्याचप्रमाणे कोळी लोक पावसाळ्यात जेव्हा खोल समुद्रातील मासेमारी बंद असते त्या वेळी शेती करतात. या दोन समाजातील व्यवसाय साधर्म्य जातीसंस्थेचे 'मानवनिर्मित' भेदभाव ओलांडून 'आगरी-कोळी' भवनाच्या रुपाने खरी सामाजिक 'समरसता' सकारात असेल, तर त्यात आक्षेप घेण्याजोगे असे काय आहे? उलट ही अन्याय जाती भेदांवर मत करणारी प्रक्रिया असल्याने तीचे स्वागत करायला हवे.

               शंकर सखाराम यांचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बाधित झाला आहे. 'सेझ' या कादंबरीत त्यांनी आगरी समाजाला 'आगरकर' तर कोळी समाजाला 'सागरकर' म्हटले आहे. ही अशी नावे बदलून ते काय सांगू इच्छितात? ज्यांनी जातीव्यवस्था निर्माण केली, जोपासली त्यांना काही वाटताना दिसतं नाही; परंतु जे जातीव्यवस्थेचे बळी आहेत त्यांनी असे न्युनगंडीत होऊन कसे चालेल? इतिहास असे सांगतो की, आगरी-कोळी समाजाने न्याय हक्कांसाठी वेळोवेळी बलिदान केले आहे.

               छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पहिले भारतीय नौदल आम्हां आगरी-कोळ्यांचेच! शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या ज्योतिबा फुले यांना १८८९ मध्ये मांडवी-कोळीवाडा येथे 'महात्मा' ही पदवी देणारे आगरी-कोळी लोकच होते. भारतातला सर्वात मोठा शेतकरी संप १९३२ ते १९३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळकायदा निर्माण करणारे आगरी-कोळी लोकच होते. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी-कोळी लोकच होते. स्वातंत्र्यानंतर लोकनेते मा.श्री.दि.बा.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली सिडकोच्या अन्यायी भूसंपादनाविरोधात जासई येथे पाच हुतात्मे देऊन संपूर्ण भारतात कुठेही लागू नसलेली साडेबारा टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणारी पुनर्वसन योजना साकार करणारे आगरी-कोळी लोकच होते.

               आपल्या लढाऊपणाचा गौरवशाली इतिहास जपणारा, संगीत-नृत्यप्रिय हा आगरी-कोळी समाज आजही शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला राहिला आहे. आपल्या उत्थानाचा मार्ग तो आजूबाजूच्या समाज वास्तवात शोधण्याऐवजी देवधर्म-उपासतापास, नवस-सायास अशा अध्यात्मिक उपायांत शोधीत आहे. अशा परिस्थितीत अस्मिता जागविणारे 'आगरी-कोळी' भवनासारखे प्रकल्प ही काळाची गरज आहे. या प्रकल्पातून या समाजाच्या विकासाचे आधुनिक प्रबोधनाचे मार्ग राबवायला हवेत, समाजातील शिकल्यासवरल्यांनी त्यादृष्टीने काम करायला हवे.

               आगरी-कोळी समाजात कधीही न दिसणारी दुही आणि भेदभाव स्पष्ट करण्यासाठी सखाराम यांनी अनेक दिशाभूल करणारी उदाहरणे संबंधित लेखात दिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, कोळी समाज भूमिहीन आहे. ते जर भूमिहीन असते, तर त्यांना 'आगरी-कोळी' भवन कशासाठी दिले असते? अनेक कोळी लोकांना साडेबारा टक्के भूखंड पुनर्वसन योजनेखाली सिडकोने देण्याचे काम अर्धवट ठेवले आहे. बरा बलुतेदार लोकांना असे भूखंड मिळावेत यासाठी लढणारा, नेतृत्व करणारा हा आगरी-कोळी समाजच आहे.

               ज्यांची नजरच भेदाभेद शोधणारी असेल त्यांना 'आगरी-कोळी' लोक वेगळे-वेगळे दिसतही असतील; परंतु साऱ्या भारतात सापडणार नाहीत एवढी अभेद्य नटी या दोन समाजात दिसतात. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होतो. तो नाकारण्याचे शंकर सखाराम यांनी धाडस कसे केले? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वास्तव करीत असल्यामुळे आगरी-कोळी लोकांचे भावविश्व सागरासारखे विशाल झाले आहे. उरण-पनवेल-मुरुड-अलिबाग परिसरात मुस्लिम धर्मियांबरोबर एकात्मतेने राहणारे आगरी-कोळी लोकच आहेत. एवढेच कशाला, उच्च-नीचतेच्या कल्पनांना तिलांजली देऊन वसई-विरार परिसरातील ख्रिश्चन समाजाच्या चांगल्या कल्पना स्वीकारणारे आगरी-कोळी लोकच आहेत.

               कधी एमआयडीसीसाठी, कधी सिडकोसाठी, कधी महामुंबईच्या वाढत्या शहरांसाठी आपल्या पिकत्या शेतजमिनी आणि सागरकिनारे देशासाठी त्यागणारे आगरी-कोळी लोकच आहेत. देशाच्या अठरापगड जातींना, जगाच्या सर्व धर्मियांना सामावून घेणारी संस्कृती आगरी-कोळ्यांचीच आहे. जाती-पाती, भाषिक वाद, धार्मिक वाद, धार्मिक दंगली, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सामाजिक दंगली तसेच दहशवादी कृत्ये करणाऱ्या लोकांना आगरी-कोळी लोकांनी कायमच विरोध केला आहे. मुंबईचे मूळ मालक असलेल्या आगरी-कोळी जनतेने आपल्या गावात साऱ्यांना आदरतिथ्याने स्वीकारले, तिथे छोट्या-छोट्या भेदांचे काय महत्त्व?

               स्वातंत्रपूर्व काळात या देशात जातीप्रथा प्रभावी होती. त्यातून साऱ्या बहुजनांचे शोषण चालू होते. 'पाणकोळीच' नाही सारे समाज उच्चवर्णीयांकडे पानी भरत होते. स्वतःला अभ्यासक म्हणविणाऱ्यानी फुले, शाहू, आंबेडकरी साहित्याचा यासाठी जरूर अभ्यास करावा.

               समतेच्या, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी आज लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे. सेझसाठी, एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे प्रकार होत आहेत, त्याचप्रमाणे प्रदूषणकारी रासायनिक कारखाने, कोळसा प्रकल्प, नद्या आणि सागरातील प्राणीजीवन संपवीत आहेत. मासेमारी उद्योग संपविण्याचे नवे धोरण कोळी बांधवाना उद्ध्वस्त करीत आहे व अशा विपरीत परिस्थितीत आगरी-कोळी भवन साकारत आहे ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.

               स्त्रीभ्रूणहत्येच्या अत्यंत घृणास्पद कृत्यांनी सुसंस्कृत समाजालादेखील वेठीस धरले आहे. एकविरा, मुंबादेवी, शितलादेवी, जोगेश्वरी, गावदेवी या मातृदेवताना आराध्य मानणाऱ्या आगरी-कोळी समाजात हुंडा प्रथा कधीही दिसून येत नाही. स्त्रियांना आर्थिक अधिकार देणारा हा समाज आहे. त्यांची वैशिष्टे जगासमोर यायला हवीत. त्याचबरोबर त्यांच्या आगरी धाडसाच्या कथा, पहिल्या आरमाराच्या पराक्रमाच्या कथा समोर यायला हव्यात. भारतीय शेतकऱ्यांच्या झालेल्या दोन लाख आत्महत्या देशाला लाजविणाऱ्या आहेत. या प्रश्नांवर आगरी-कोळी शेतकऱ्यांचे कुळकायदा आंदोलन, सिडको आंदोलन खूप मोठे उत्तर असू शकते. हे सारे सांगण्यासाठी आगरी-कोळी भवन अपुरे पडावे. असेच भवन मुंबईतही उभे राहावे. आता आगरी-कोळी लोकांनी आपलं दिव्य इतिहास अभ्यासावा, वर्तमानातील आंदोलने अभ्यासून, भविष्याचा वेध घ्यावा! 'भेदाभेद सारे अमंगल!' हे समजून घेऊन नव्या उमेदीने आगरी-कोळी महोत्सव, आगरी-कोळी साहित्य संमेलने उत्साहाने भरवावीत.आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.