आमोद पाटील-आगरी बाणा: जुलै 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, २७ जुलै, २०११

आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-३

विशेष सुचना:
खालील माहिती हा आगरी समाजासाठी अमुल्य ठेवा आहे. भावी पिढीपर्यंत हा अमुल्य ठेवा इंटरनेटच्या माध्यमातून पोचवण्याचे काम मी करीत आहे. त्यामुळे या अमुल्य माहिती बरोबर कॉपी-पेस्टचे खेळ करून या अमुल्य माहितीचा वाटोळा लावण्याचे काम करू नका.


अगोदरचे लेख
१.आगरी समाजातील लग्नसमारंभातील धवलारनीचे स्थान महत्त्वाचे
इथे भेट द्या.

२.आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-१
इथे भेट द्या.

३.आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-२
इथे भेट द्या.


माल्लनीच्या मल्यामधी
माल्लनीच्या मल्यामंधी, राम येती येचीत कल्या
सीताबाई का गुंफित कल्या
अग, सीताबाई गुंफमाला लवलाही
आल्या बालाच्या लग्नाच्या येला

लगुनाच्या येला देव येती बहिरी
चारीव इग्ना देव टालूनी घेती
चारी इग्नावर दिला देवाही डावा पायी
नोवरा इजयबाल लग्नाला जाई

लगुनाच्य्या येला देव येती चंद्रम, सूर्य
चारीव इग्ना देव टालूनी घेती
चारी इग्नावर दिला देवाही डावा पायी
नोवरा इजयबाल लग्नाला जाई

उचघाला मांडव
उचघाला मांडव कुरघाला जाईच
जानोस येती गणपती देवाच
गणपती देवाही येवावा आम्हा घरी
चिंतील कार्य सिद्धीस नेवावा

उचघाला मांडव कुरघाला जाईच
जानोस येती मारोती देवाच
मारोती देवाही येवावा आम्हा घरी
चिंतील कार्य सिद्धीस नेवावा

उचघाला मांडव कुरघाला जाईच
जानोस येती विठोबा देवाच
विठोबा देवाही येवावा आम्हा घरी
चिंतील कार्य सिद्धीस नेवावा

गणा र गणपती
गणा र गणपती, गणा र गणपती
नमियेली सरस्वती, नमियेली सरस्वती
पार्वतीचे पती शंकरदेव लगुना जाती

गणा र गणपती, गणा र गणपती
नमियेली सरस्वती, नमियेली सरस्वती
जोगेश्वरीचे पती बहिरीदेव लगुना जाती

गणा र गणपती, गणा र गणपती
नमियेली सरस्वती, नमियेली सरस्वती
लक्ष्मीचं पती विष्णूदेव लगुना जाती

गणा र गणपती, गणा र गणपती
नमियेली सरस्वती, नमियेली सरस्वती
रुक्मिणीचे पती विठ्ठलदेव लगुना जाती
गणा र गणपती, गणा र गणपती
नमियेली सरस्वती, नमियेली सरस्वती


देवक बसवताना
हळदी कुकवाचे रंगायेली
नारळा पोफलाचे रंगायेली
तिला तांदलाचे रंगायेली
पानाफुलाचे रंगायेली
घारी फेनीचे रंगायेली
दर्भा दुधानाचे रंगायेली
भरली रंगायेल सोभितू दिसे.....||१||

देवू आलं हो चंद्र सूर्य
देवू आलं हो राधाकृष्ण
देऊ आलं हो नलनील
येऊन बैसले रंगायेली
भरली रंगायेल सोभितू दिसे.....||२||

देऊ आलं हो वरसुबाई
देऊ आलं हो पाटनेश्वरी
देऊ आलं हो चुकल, माकल
येऊन बैसले रंगायेली
भरली रंगायेल सोभितू दिसे.....||३||


हळद खणण्याचे गीत
घेतल्या कुदल्या
बाय घेतल्या कुदल्या
देव गेले माल्याच्या मल्या
काय हलदी खनु
खनिल्या हलदी
त्याही भरील्या परड्या
त्या हलदी नेल्या काय
गंगेच्या तीरी धुवायाला
धुविल्या चोलील्या
गायीच्या गोमित्री उकलील्या
सूर्याच्या किरनी हलदी वालविल्या
त्या हलदी चढविल्या - धवले बैलावरी
हलदीच बैल दनानती
त्या हलदी आनन पाटील मंडपी उतरविल्या
त्या हलदी चढविल्या - रंजना बाईला


हळद लावण्याची तयारी
हाती घेतीला गाईचान शेनु ग
हाती घेतीला गंगेचान पानी ग
तया सारविली धरतरी असतुरी ग
हाती घेतीला कनिकाचा पिठू ग
कनकापिठाचा मोरील चवकु ग
चौकान ठेविला चंदनाचा पाटू ग
ऐसा यो गनेसू नोवरा पाटा येऊन बैसला ग
उमापती का माऊली येऊन मागे बैसली ग
ऐसा यो गनेसू नोवरा पाटा येऊन बैसला ग
सीतापती का माऊली येऊन मागे बैसली ग
गिरजापती का माऊली येऊन पाटा बैसली ग


तव्याचे गीत
हलदी कुकवाचा मानू
देऊ तव राजाला
आंब्या तुलशीच्या माला
देऊ मुर्त्याच्या हाती

तीन धोंड्यांचा मांगोला
वरती तवया चरवा हो
आण सायानी शोभना
तवया करिती जालुहो
काले तिलाचा तेलु हो

गणपती देवा धारा मुलू हो
येईल गणपतीची शारजा
ती वधील तवया तेलु हो
येईल इस्नुची लक्ष्मी

बरम्याची सावित्री
येईल बहिरी देवाची जोगेश्वरी
ती वाढील तवया तेलु हो
तवया करिती जळू हो

तवा बोलता झाला हो
धरती मातेने ठाऊ सा दिला हो
तवा वरती चरवीला

सावरील पाचू वर
वर आल्या गुलाबाच्या कल्या
सावरील्या पाचू फेन्या
वर आल्या दुधाच्या उकल्या
सावरील पाचू पापर
वर आल्या मोगरीच्या कल्या


न्हाव पडते तेव्हा..
पहिले भौरी भौता फिरे नाहे, उंबर माये
रामानी पर्नीला जानकी त यौगा आहे
दुसरे भौरी भौता फिरे नाहे, कलशी नाहे
इस्नुनी पर्नीला लक्षुमी त यौगा आहे
तिसरे भौरी भौता फिरे नाहे, उंबर माये
शंकरानी पर्नीला पार्वती त यौगा आहे
चौथे भौरी भौता फिरे नाहे, कलशी नाहे
गणपतीनी पर्नीला शारदा त यौगा आहे
पाचवे भौरी भौता फिरे नाहे, कलशी नाहे
शांतारामानी पर्नीला रेश्माबाय त यौगा आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, २६ जुलै, २०११

आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-२

विशेष सुचना:
खालील माहिती हा आगरी समाजासाठी अमुल्य ठेवा आहे. भावी पिढीपर्यंत हा अमुल्य ठेवा इंटरनेटच्या माध्यमातून पोचवण्याचे काम मी करीत आहे. त्यामुळे या अमुल्य माहिती बरोबर कॉपी-पेस्टचे खेळ करून या अमुल्य माहितीचा वाटोळा लावण्याचे काम करू नका.


अगोदरचे लेख
१.आगरी समाजातील लग्नसमारंभातील धवलारनीचे स्थान महत्त्वाचे

२.आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-१घाटावरशी आला पाथरवटू
घाटावरशी आला पाथरवटू
आधी लावला पाट्याचा कामू हो
आधी घरविली पाट्याची पाठू हो
मग घरविला पाट्याचा पोटु हो
तो पाटाशोभिवंत दिसे हो


घाटावरशी आला पाथरवटू
त्यांनी लाविला मालत्याचा कामू हो
आधी घरविली मालत्याची पाठू हो
मग घरविला मालत्याचा पोटु हो
तो मालटा शोभिवंत दिसे हो
चून दळण्याचे गीत
धवला नंदी शिनगारीला
गला घागुरांच्या माला.....||धृ||


तो नंदी धारीला बहिरी देवाच्या द्वारी
तो नंदी धारीला मुर्ता चुणू दलायला
बहिरी देवाने धारीली जोगेश्वरी
मुर्ता चुणू दलायला
धवला नंदी शिनगारीला.....||धृ||


तो नंदी धारीला शंकर देवाच्या द्वारी
शंकर देवाने धारीली पार्वती
मुर्ता चुणू दलायला
धवला नंदी शिनगारीला.....||धृ||


तो नंदी धारीला गणपती देवाच्या द्वारी
गणपती देवाने धारीली सरस्वती
मुर्ता चुणू दलायला
या गोऱ्या येती ग
या गोऱ्या येती ग
चुना दलुनी देती ग
वृंदा बायच्या चुनाला
गोऱ्या आऊख दती ग
धवला नंदी शिनगारीला.....||धृ||माल्यानी माती ग कालविली
माल्याने माती ग कालविली
मालीन बाईनी माती सारखी केली
त्यावर लाविले चाफ्याचे रोप
चाफ्याचन रोप मालनीच गगनी जेल
गगनी जाऊनी चाफा ग फुलाभर झाला
परडूल्या घेऊन मालिन जेली फुला येचाला
माळी येचीत व्हता ग कल्या
परडूल्या भरून मालिन आली ग जासई गावाला
जासई गावाच्या लांब रुंद बिधि
उभे ग बिधि मालनिनी केला इकरा
'फुला घ्या फुला' मालनिनी केला सादुला
अंतू वरम्यांच लेक मारुती वरमे घाऊन आलं
काय ग मालनी फुलाचा मोलू?
काय ग मालनी फुलाचा मोलू?
माझीये फुलाचा मोलू हाय एकशे एकू दामू
फुला न साटली आणिली मंडपाचे दारा
त्यांचे ये मंडपी हायी काय लेकीचा सोला
मामाचे गीत(भाग-१)
पाहिले पाट्याचा कोंबूरला आरवला हो
तो नांद परला मामाच्या कानी हो
तव तो मामा निजला जागा झाला हो
दावे भूजनी भरज हालविली हो


तवती मामी निजली जागी झाली हो
उठून लाविले साकुल्याचे दिवे हो
उठून लाविल्या पल्लाच्या समया हो
तवते समईनतेलून वर्हीला हो
तवते समईची वातून पिलीली हो
तव त्या समईला कांडा न उजलीला
तव त्या समईनी उजेरू सा दिला हो
मामीने लाविल्या माल्याला निसनी हो
मामीने काढिली चंदनी शोभना हो
मामीने पेटविल्या तांबीयाच्या चुली हो
मामीने तापविली घंगाळे पानी हो
उपसुनी नेली धर्मशिले वारी हो
तव ते मामानी आंघोळी सारील्या हो
मामा नेसले चौधारी धोतरा हो
सूर्य देवांची आराधना केली हो
धरतरी मातेला लोटांगना घातली हो
तुलसूबाईला पान्यान सोरीली हो
तवते मामींनी भोजना उतरली हो
तवते मामींनी भोजना वारिली हो


मोरीला बत्तीस पानांचा इरा हो
अंगान घातला कुसुंबीसा झगा हो
माथ्यान घातीली लालुसा मुंडासा हो
पायान घातली किरुमिरू जोता हो
कमरे घेतले रोकडा दामू हो


खांद्या घेतला काला काय कांबूला हो
खांद्या मारिल्या तासन्या कुऱ्हाडी हो
हातात घेतली घोळाची काठी हो
तवते मामा घरातून निघाले होमामाचे गीत(भाग-२)
चालत बोलत गेले पहिले वन्नाला हो
चालत बोलत गेले दुसरे वन्नाला हो
चालत बोलत गेले तिसरे वन्नाला हो
चालत बोलत गेले चौथे वन्नाला हो
चालत बोलत गेले पाचवे वन्नाला हो
चालत बोलत गेले सहावे वन्नाला हो
चालत बोलत गेले सातवे वन्नाला हो


राम धुंडूनी चंदन शोधिला हो
तव ते मामला चंदन सापडला हो
सुर्यदेवाना आराधना केली हो
तव ते चंदना घावूसा टाकीला हो
खालचा बुंधा खालीसा पाडीला हो
वरचा शेंडा वर उरविला हो
मधला करंदा धरणी परीला हो


निघून गेले सुताराच्या वले हो
सुतारुदादु निजला काय जागा रे?
एवढे रातीचे तुला काय कामू रे?
आम्हां घरी हाई भाचीयाचा सोला रे
आम्हां लागला उमताराचा कामा रे
तव ते सुतार वंड्याजवळ आले हो
तव ते वंड्याचा मेजर घेतला हो
तव ते मामा निघूनशानी गेले हो
मामा गेले वानिया दुकानी हो
वानिया दादा निजला काय जागा रे?
एवढे रातीचा तुला काय लागला कामू रे?
आम्हां घरी हाई भाचीयाचा सोला रे
तव ते मामानी खिले साठविले हो
मामानी काढिले रोकड दामू हो
मामानी दिले वानिया हाती हो


निघून गेले रंगर्याच्या वले हो
रंगर्यादादा निजला काही जागा रे?
एवढे रातीचा तुला काम लागला कामू रे?
आम्हां घरी आहे भाचीयाचा सोला हो
मला हायी उमताराचा कामू हो
मामानी काढिले रोकडा दामू हो
तव ते मामा तेथुनी निघाले हो
तव ते उमताराचा कामू झाला हो
मामाचे गीत(भाग-३)
मामा निघुनी गेले भिंगार्याच्या वले हो
भिंगारीदादा निजला काई जागा रे?
एवढ्या रातीचा तुला काय लागला कामू रे?
आम्हां घरी हाई भाचीयाचा सोला रे
आम्हां लागला कांकनाचा कामू हो
आम्हां लागला बाशिंगाचा कामू हो
मामाने रोकडा दामू काढून दिला हो
तेथून मामा गेले मोचीया दुकानी हो
तेथून जोडे साठविले हो
तेथून मामा गेले वानिया दुकानी हो
वानियादादा निजला काई जागा रे
एवढ्या रातीचा तुला काई कामू रे?
आम्हां घरी आहे भाचीयाचा सोला रे
साडी चोली टोपी चा कामू रे
मामाने दिला रोकडा दामू हो
तेथुनी मामा निघाले हो
गेले कोलीयाच्या वले हो
कोलीयादादा माला आहे होडीचा कामू हो
मामा होडीत बसले हो
वारा वाजतंय जो काई जेरी हो
तारु चालतंय उठाकायी उठी हो
तारू आले जंबूकायी बेटी हो
जंबू बेटाला मामा उतरले हो
राजालुगो तल्यावरी
वरमाय वृंदाबाय
वाटपाते आपल्या बंधवाची हो
काकनाचे जोर घेऊन
बाशिंगाचे जोर घेऊन
पातलाच्या धर्या घेऊन
बंधू माझा कोण्या वाटे येतो?
बंधू आला बहिनीच्या गावा हो
तवत्या बहिणींनी दुरुनी न्याहलीला हो
तांब्याभर पानी पायधुवाला दिला हो
तव त्या बहिणींनी, रांगोल्या काढिल्या हो
तव त्या बहिणींनी, पाटूस मांडिले हो
तवत्या पाटावर घर्याश्या टाकिल्या हो
तव ते मामा पाटावर बसले हो
तव ते मामाने साऱ्या चोल्या दिल्या हो
काकान बाशिंगे काढली हो

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

सोमवार, २५ जुलै, २०११

आगरी लग्न परंपरेतील 'धवला' भाग-१

विशेष सुचना:
खालील माहिती हा आगरी समाजासाठी अमुल्य ठेवा आहे. भावी पिढीपर्यंत हा अमुल्य ठेवा इंटरनेटच्या माध्यमातून पोचवण्याचे काम मी करीत आहे. त्यामुळे या अमुल्य माहिती बरोबर कॉपी-पेस्टचे खेळ करून या अमुल्य माहितीचा वाटोळा लावण्याचे काम करू नका.

आगरी लग्न पद्धती
आगरी लग्न पद्धती ही आजही पूर्वपरंपरेप्रमाणे चालत आलेली आहे. आजच्या आधुनिक युगात ही परंपरा या समाजात आजही टिकून आहे. आगरी समाजाने चांगल्या प्रकारे जतन केल्याचे या लग्न परंपरेतून दिसून येते. आजही आगरी समाजामध्ये ज्या काही चांगल्या परंपरा आहेत, त्यातील एक लग्न परंपरा आहे. लग्न म्हटले की, हुंडा वैगेरे आलाच पण आगरी समाजाच्या या लग्न परंपरेत हुंड्याला अजिबात थारा नाही, कुणीही हुंडा घेत नाही किंवा हुंडा देत नाही. म्हणूनच आगरी लग्नपरंपरा या दृष्टीने व पारंपारिक लग्नगीताच्या दृष्टीने चांगली आहे.


या लग्नगीतातून हा सोहळा कसा असतो याचे आपण आता दर्शन घेऊया.

ही लग्नगीते धवला या नावाने प्रचलित आहेत. ही धवलागीते धवलारीण गाते.ते कसे ते पहा.


चाऊल रासाच्या वेळचा धवला
चाऊल रासताना
पापानि उखला खयरी मुसला
कोनाचे भारज चाऊल रासियले
लक्षूमन भरताऊ जेलं उंबई शाराला
तनशी हानली सारी-चोली
नेसबाय गो सारी-चोली
घाल भारज इनी फनी
चल भारज मुक्या घरी चाऊल रासु
मुकिया पुसशी सरल का येन चाऊल

नंतरचा धवला चून दलताना
चून दलताना
सोर घोरे घोरीचा दावा त्या गोऱ्या स्वार
झालं ग लणीमन पाटलू
जेले ग निंगरे बंदरा बऱ्या बऱ्या मेरी साठा मंडपाला
मंडपाचे मंडपमेरी मुरुताचे मुरुतमेरी
मुरतामेरी बसते नवरे सिंधू बाये
धरतरी फोरून उबदाण तारुला
ते गो तारावरी कशियाचा भारुला
ते गो तारावरी पातीयाचा भारुला
ते गो पातीयाच्या इनिल्या मांदऱ्या
वर बसते राजीया गनपती देवू
तुमच्या रान्या र घालती इंजनू वारा
तुमच्या रान्या र घालती पालवी वारा
हातीचा इंजुना ढीलू परुला
श्रीकिसना देवाला राधा घाली इंजनू वारा
श्रीकिसना देवाला डोला
त्याचे भरतारा डोला लागला
निन्गुन गेला बयनीचे गावा
नामू बाय बयनीनी बंधवाला दुरून वलखिल
कसा बंधवार येना झाला
आमचे घरी हाय लेकीचा सोला
सोलीया कारना बयनी तुला आलू नेवाला

मांडव थापनी करतानाचा धवला
मांडव थापनी
मांडव थापनी कशीयाची होत हो
मांडव थापनी तीली चाऊलाची हो
मांडव थापनी हलदी कुंकवाची हो
आंबा पुसत जांबूलीला हो
कोनाचे मंडपी जावा हो
आंबा जनमला निरमले भूमी हो
जांबूल जनमली तलीयाचे पाली हो
उंबर जनमला रानी का वनी हो
उंबर जनमला करे का कपारी हो
आसा उंबरू कपटी फुलला मदाने राती हो
देवाई घातील्या बाजा नाय मिल उंबराचा फुलू हो

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, २२ जुलै, २०११

सिडको(CIDCO, NAVI MUMBAI) प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या कधी देणार??????नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या "टेक ऑफ" साठी भूसंपादनाच्या हालचाली सुरु झाल्या असताना, सिडको प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मात्र जश्याच्या तश्याच आहेत. असे असताना मुजोर सिडकोची मजल नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलण्यावर गेलीय. ही दंडेलशाही "जमिनीवर" आणण्यासाठी सिडकोला पुन्हा दणका देण्याची वेळ आली आहे.

 
मुजोरी सुरूच
"शहरांचे शिल्पकार-WE MAKE CITIES" अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सिडकोने नवी मुंबई(CIDCO-NAVI MUMBAI) निर्मितीचा हेतू साध्य केला. शिवाय ज्यांच्या जमिनीवर नवी मुंबई उभारण्यात आली त्या प्रकल्पग्रस्तांच्या आश्वासनांना हरताळ फासण्याचे कामही चोखपणे केले. न्याय हक्कांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांना लोकनेते.मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध मार्गांनी आंदोलने करावी लागली. त्याच्या फलस्वरूप साडेबारा टक्के भूखंड देण्याची कार्यवाही सुरु झाली, प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करून गावठाण विस्तार करण्याबाबत महत्वाचे पाऊल उचलले गेले असे भासवून सिडकोने सध्या अशी घरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा सपाटा चालू ठेवला आहे. घरटी नोकरी देण्याची पूर्तता आजही होत नसल्याचे चित्र आहे. हा सारा इतिहास ताजा असताना लेख लिपिक, सुरक्षा रक्षक, संगणक चालक या तृतीय श्रेणीतील रिक्त पदे भरण्याकरिता ३ एप्रिल २०११ रोजी लेखी परीक्षा घेण्याचे सिडकोने जाहीर केले. त्याचवेळी या नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचे अन्यायकारक धोरण अवलंबिले.


शासनाचा आदेश
प्रकल्पग्रस्तांच्या १०० टक्के सहभागाशिवाय होणारी ही नोकरभरती रद्द करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केली आहे. ती रद्द न झाल्यास सिडको भवनावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. संघर्ष समितीचा हा पवित्रा पाहून शासनाने सिडकोची नोकरभरती रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच या नोकरभरती संदर्भात चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे सूचित केले. त्यावर, सिडकोने १७ जुलै रोजी बैठक बोलावली, मात्र बैठकीचे निमंत्रण सिडकोचे चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक यांनी न काढता एका कनिष्ठ अधिकाऱ्याने काढले. त्यामुळे संघर्ष समितीतील सदस्यांचा पर चढला आणि उच्चपदस्थ अधिकारी बैठक बोलवीत नाहीत, तोवर बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समितीने घेतला. अखेर सिडकोला जग आली आणि सिडकोने संचालक तानाजी सत्रे व सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्यात लोकनेते मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या "संग्राम" निवासस्थानी १८ जुलै रोजी बैठक पार पडली.


बैठकावर बैठका
या बैठकीत यशस्वी तोडगा न निघाल्याने नोकरभरती संदर्भात चर्चा करण्यासठी सिडको अधिकारी आणि संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्यात सोमवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता सिडकोच्या "निर्मल भवन" या कार्यालात होणार आहे. खरं तर घराती एका व्यक्तीला नोकरी देण्याचे मान्य केले असताना, नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना द्वालाने ही सिडकोची दंडेलशाही आहे.

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी योग्य दर, साडेबारा टक्के भूखंड, घरटी नोकरी आदी मागण्यांसाठी १९८४ च्या लढ्यात पाच शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले. तरीही उरण-पनवेल-नवी मुंबई परिसरातील शूर शेतकरी मागे हाताला नाही आणि कधीही हटणार नाही. हा सारा इतिहास ध्यानात घेता, सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय द्यावा; अन्यथा "संग्राम" होतच राहतील आणि त्याची किंमत सिडको पर्यायाने शासनाला चुकवावी लागेल एवढे मात्र नक्की.

प्रकल्पग्रस्त आक्रमक
नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील ९५ गावांच्या जमिनी ४० वर्षापूर्वी सिडकोने जबरदस्तीने संपादित केल्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्यात संपादित जमिनीच्या मोबदल्यापोटी साडेबारा भूखंड देणे, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घेणे, गावठाण विस्तार करणे, प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे आदी आश्वासनांचा समावेश होता, मात्र या आश्वासनांची अजूनही १०० टक्के पूर्तता झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये(CIDCO NAVI MUMBAI) सिडकोविषयी चीड आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलून सिडको त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यामुळे दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकवटलेले प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचा हा आक्रमकपणा स्वाभाविकच आहे.

 
भूमिपुत्रांची वाताहात
‘आवळा देऊन कोहळा काढणे’ ही म्हण सिडकोच्या कार्यपद्धतीला चपखलपणे लागू पडावी अशा पद्धतीने सिडकोने आतापर्यंत भूमीपुत्रांबाबत भूमिका बजावली आहे. मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी शासनाने सिडको महामंडळाच्या माध्यमातून नवी मुंबई निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला. सिडकोमार्फत १९७० साली शासनाने ठाणे जिल्ह्यातील बेलापूरपट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील पन्नास हजार हेक्टर जमीन संपादित करुन नवी मुंबईची उभारणी केली आहे. याच भूमीपुत्रांच्या शेतजमिनींवर सिडकोने आतापर्यंत अब्जावधी रुपये कमाविले.ह्या सिडकोचे बोधचिन्ह "WE MAKE CITIES" असे आहे. पण ज्यांच्या जमिनींवर सिडको ही शहरे वसवत आहात त्यांना मात्र जिवंतपणी ठार मारत आहे.

सिडकोची सध्याची वार्षिक उलाढालच ३ हजार कोटी रुपयांची आहे. असे असताना आजही या भूमीपुत्रांच्या जमीन परताव्याच्या, ९५ गावांच्या विकासासह घरटी रोजगार देण्याच्या प्रश्नांबाबत सिडको उदासीनच आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने व सिडकोने वेळीच लक्ष घातले नाही तर, १९८४ सारखा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. १९८४ च्या लढ्यातील पाच शेतकर्यांच्या हौतात्म्यातून साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा निर्णय झाला. मात्र, अद्याप किती शेतकर्यांना याचा लाभ झाला? याचे आत्मपरीक्षण सिडकोच्या अधिकार्यांनी करण्याची गरज आहे. परतावा मिळालेले काही शेतकरी कोट्यधीश बनले आहेत, तर काहींनी व्यसनाच्या नादी लागून सगळे पैसे उडविले आहेत. मात्र, योग्य गुंतवणूक केलेल्या शेतकर्यांचे कुटुंब पुढे गेले आहे, हेही नाकारता येणार नाही.

कष्टकरी शेतकर्यांच्या त्यागावर नवी मुंबईचा व उद्योजकांचा, कंपन्यांचा डोलारा उभा राहिला आहे, हे सिडकोच्या अधिकार्यांनी विसरता कामा नये. आजही येथील शेतकर्यांचे वारस सिडकोकडून मिळणार्या रोजगारासह योग्य पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत गेली ४१ वर्षे सिडकोकडे अपेक्षेने पाहात आहेत. मात्र या गावांमध्ये ग्रामविकास व नागरी सुविधांसाठी ४१ वर्षांत अवघे ३४१ कोटी रुपये खर्च केले आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. विकासाच्या नावाने भूमीपुत्रांच्या हाती धुपाटणे आल्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांची प्रतिक्रिया चुकीची नाही. मात्र, हेच धुपाटणे सिडकोच्या अधिकार्यांच्या टाळक्यात पडण्याच्या अगोदर १९८४ च्या आंदोलनाचा इतिहास स्मरण करुन त्यांनी शहाणे होऊन त्या ९५ गावांमध्ये झपाट्याने विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, २१ जुलै, २०११

SEZ GO BACK
आज शेती कुठं आहे? शेतकरी कुठं आहे? रायगडच्या या ऐतिहासिक भूमीवरून शेतकरीच हद्दपार होत आहे. खरोखरच, निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणला विविध प्रश्‍नांचा अजगरी विळखा पडलेला आहे.

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची
ही प्रश्‍नांची कोंडी कायम राहावी, असा प्रयत्न करणारे पश्चिम महाराष्ट्रातील घाटावरचे राज्यकर्ते आणि त्यांना साथ असलेले कोकणातील दलाल नेते कोकणी माणसांची कशी फसवणूक करीत आहेत, हे सेझच्या वास्तवावरून लक्षात येते. रायगड जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय येत आहे. येथील भूमीपुत्रांनी पिटाळून लावलेला सेझ(sez) पुन्हा परत येत आहे, ही संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा येथील भूमीपुत्रांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास नवल नाही. केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने रिलायन्सच्या रायगडातील सेझ(sez) प्रकल्पाला भूसंपादनासाठी ७ ऑगस्ट २०१२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वास्तविक, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ ही पेण, उरण, पनवेलच्या ४५ गावांतील शेतकर्‍यांची एकमुखी घोषणा आहे. पेण व उरणच्या शेतकरी संघर्ष समितीने सातत्याने विविध प्रकारची आंदोलने केली, मोर्चे काढले. स्थानिक आमदारांनी विधान परिषदेत, विधानसभेत सेझविरूद्ध आवाजही उठविला. परिणामी ११ फेब्रुवारी २०११ रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रकल्पासाठी २००४ साली काढलेली ४(१) ची अधिसूचना रद्द केली.

रिलायन्सच्या सेझचा राक्षस
परंतु येथील भूमीपुत्रांना जगू द्यायचं नाही, असाच सरकार आणि रिलायन्सने चंग बांधला असावा. जिल्ह्यातील ५०७० हेक्टर क्षेत्रामध्ये सेझ(sez) प्रस्तावित असून, आतापर्यंत एक हजार ८७४ हेक्टर जमीन रिलायन्सने शासनाच्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित केली आहे. त्यासाठी १७८६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुळात रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी निगडीत महामुंबई सेझ(MahaMumbai SEZ) प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या ४५ गावातील सुमारे ३० हजार हेक्टर जमीन संपादन करण्याचा घाट घालण्यात आला होता. देशातील सर्वात मोठा सेझ प्रकल्प म्हणून त्याचे मार्केटिंगही करण्यात आले होते. त्यात ७५ हजार कोटी रुपयांची निर्यातक्षमता कशी आहे आणि सुमारे २० लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार कसा मिळणार आहे, याची स्वप्ने दाखवण्यात आली होती. परंतु विकासाच्या या तथाकथित महास्वप्नात रंगण्याइतका स्वप्नाळूपणा स्थानिक शेतकर्‍यांकडे नाही म्हणून किंवा अंबानींच्या उद्योगसमूहाची विश्‍वासार्हता कमी आहे म्हणून किंवा भरपाईच्या रकमेपेक्षा आपल्या शेतजमिनीचा आधारच पुढच्या पिढ्यांच्याही कामी येईल हा भावनिक विश्‍वास प्रभावी ठरला म्हणून... कारण काही असो; पण कंपनीला कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीत अत्यल्प जमीनच शेतकर्‍यांकडून खरेदी करता आली. तीही सलग पट्ट्यातील नव्हती. त्यामुळे जे कंपनीला खासगी प्रयत्नांतून जमले नाही, ते सरकारी अधिकार वापरून जमवून देण्याची जबाबदारी २००६ साली महाराष्ट्र सरकारने घेतली.

लोकविरोधी नीती
तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे हे स्वत:ला कोकणचे विकास पुरुष मानतात. त्यांनी रायगडच्या शेतकर्‍यांना त्यांच्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक हिताच्या कामाचे कारण दाखवून खाजगी जमिनी ताब्यात घेण्यासाठी असलेल्या जमीन संपादन कायद्याचे हत्यार खासगी कंपनीच्या सेझ(SEZ) प्रकल्पासाठी उचलण्यात आले. सरकारी यंत्रणेमार्फत गावोगावी दबाव आणण्यात आला. एजंटांचा गावात सुळसुळाट सुरू झाला. अनेक कुटुंबात पैशाचे आमिष दाखवून फूट पाडण्यात आली. अनेक ठिकाणी महसूल यंत्रणेच्या साथीने बनावट मालक उभे करून गरिबांच्या जमिनी प्रकल्पासाठी विकल्या जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. या अनुभवांनी अस्वस्थ झालेल्या गावकर्‍यांना आदिवासी आणि शोषित वर्गात काम करणार्‍या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आधार दिला.प्रामुख्याने हेटवणे धरणाच्या लाभक्षेत्रातील २४ गावे या संघर्षात आघाडीवर राहिली. हेटवणे धरणातील पाणी वापरासाठी उपलब्ध व्हायच्या वेळेसच त्याचा लाभ शेतकर्‍यांना द्यायच्याऐवजी ते सेझ(SEZ) प्रकल्पाच्या हवाली करण्याच्या लोकविरोधी नीतीने या संतापातच भर पडली होती. या पाण्यामुळे शेती अधिक लाभदायी होऊ शकते, याची जाणीव शेतकर्‍यांनी दाखविली.

सेझ(SEZ), चले जाव
एकरकमी पैशांच्या भरपाईचे आमिष निष्प्रभ ठरले, हेही एक कारण होते. उपोषणासारख्या शांततामय मार्गाचा त्यांनी अवलंब केला असला तरी, पोलिसी बळाचा वापर केल्यास नंदीग्रामसारखी स्थिती ओढवू शकते, याची जाणीव सरकारला झाली असावी. त्यामुळेच या गावात सार्वमताचा पर्याय अवलंबण्यात आला आणि लोकशक्तीपुढे सरकारने मान तुकवली; पण हे पुन्हा मान वर काढण्यासाठीच होते, असे आता दिसून येत आहे. सरसकट सेझ(SEZ) प्रकल्पांना विरोध करण्याचे कारण नसले, तरी लोकांना विश्‍वासात घेऊन आणि सिंचित शेतजमिनी वगळून हे प्रकल्प राबवले गेले पाहिजेत, परंतु तेच करायला सरकार तयार नाही. आमचा विकासाला विरोध नाही. कंपन्यांना विरोध नाही. परदेशी गुंतवणूक देशात आली तर ते चांगलेच आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. परंतु शेतकर्‍यांच्या तोंडचा घास काढून सेझसाठी पायघड्या घातल्या जात असतील, तर त्याला आमचा विरोध आहे. हा विरोध कायम असणार आहे.‘सेझ(SEZ), चले जाव!’ ही आता आमची घोषणा आहे आणि ‘सेझ’(SEZ) रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणे निखळ अशक्यच आहे. सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या लुटारूंच्या टोळ्यांना आता आमचा एकच निरोप आहे... चले जाव!


सावधान....रिलायन्सच्या ‘सेझ’साठी दलाल सक्रीय 
रिलायन्सच्या महामुंबई सेझचे पुनरागमन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने उरण, पेण, पनवेल तालुक्यातील ४५ गावांतील कंपनीचे दलाल सक्रीय झाले आहेत. या दलालांनी या परिसरात जमिनी खरेदीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकरी एक कोटी रूपये दर मिळावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय तर ४ वर्षे सेझला विरोध करणाऱ्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी कायदेशीर तयारी सुरू केली आहे. २००६ साली उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ गावांतील तीस हजार एकर जमिनींवर महामुंबई सेझची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने १८९४ च्या भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादनाच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. या भूसंपादनास येथील शेतकर्यांनी तीव्र विरोध केला होता. या भूसंपादनाच्या विरोधात पेणमध्ये २४ गाव संघर्ष समिती तर उरण-पनवेलमध्ये महामुंबई शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा विरोध सुरू होता. महामुंबई सेझच्या भूसंपादनाला आव्हान देणारी याचिका महामुंबई संघर्ष समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील चार वर्षांत महामुंबई सेझ कंपनीच्या साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही आमिषांना बळी न पडता शेतकर्यांनी कंपनीपासून आपल्या जमिनी वाचवून आपला लढा यशस्वी केला आहे.

मात्र, करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याने महामुंबई सेझ उभारणीसाठी सेझ कंपनीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. शेतकऱ्यांनीही सर्व पातळीवरील आपला लढा तीव्र केल्याने केंद्र सरकारला महामुंबईचा देशातील सर्वात मोठा असलेला सेझ प्रकल्प छोट्या तुकड्यात करणे भाग पडले आहे. त्यासाठी शासन दरबारी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महामुंबई सेझऐवजी खोपटा सेझ असे नामकरण केले आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू असल्याने नव्या सेझसंदर्भात कोणतेही आदेश तहसीलदार किंवा भूसंपादन कार्यालयांना देण्यात आलेले नाहीत. २००९ साली शासनाने कायद्याने महामुंबई सेझकरिता दिलेली भूसंपादनाची मुदत संपल्याने तिसर्यांदा मुदतवाढ देता येत नसल्याने २००६ ची भूसंपादनाची अधिसूचना रद्दबातल ठरवित शासनाने २००६ च्या अधिसूचनेनुसार शेतकर्यांच्या सातबार्यावर सेझ भूसंपादनाचे असलेले शिक्के काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला आहे. सातबारा कोरा होताच नव्याने शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याने या भूसंपादनालाही तीव्र विरोध करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्वीकारली आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शनिवार, १६ जुलै, २०११

सेझ(SEZ) पुन्हा येतोय.................


महामुंबई सेझ आता ‘खोपटा सेझ’ या नावाने
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हाकलून लावलेल्या महामुंबई सेझ आता ‘खोपटा सेझ’ या नावाने शेतकऱ्यांचे काळीज चिरण्यासाठी अवतीर्ण होत आहे. होय, येथील भूमीपुत्रांची जमीन ही त्यांच्यासाठी काळीजच आहे. ते जपण्यासाठी शेतकरी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे केंद्र सरकार आणि रिलायन्सला माहीत आहे. तरीही सेझच्या नावावर येथील भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचा डाव खेळला जात आहे. हा डाव संघटितपणे मोडून काढण्यासाठी येथील जनता सज्ज आहे. परंतु, प्रश्न सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी किती काळ खेळणार हा आहे.

 राज्य सरकारच रिलायन्सचे दलाल
शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करुन हाकलून लावलेला महामुंबई सेझ आता पुन्हा ‘खोपटा सेझ’ हे नवीन नाव धारण करुन चोरपावलाने येण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने रिलायन्सच्या रायगडमधील सेझ प्रकल्पाला तिसऱ्यांदा भूसंपादनासाठी ७ ऑगस्ट २०१२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुळातच कायद्यात तिसरी मुदतवाढ देण्याची तरतूद नाही. दोन्ही वेळेला वेळेत भूसंपादन होऊ न शकल्याने महाराष्ट्र सरकारने रिलायन्सचा सेझ रद्द करत असल्याची घोषणा केली होती. आता मात्र रिलायन्सने केंद्राकडे नवीन प्रस्ताव दाखल करुन सेझ मान्य करून घेतला. एकूण ५ हजार हेक्टर जमिनीपैकी १२०० हेक्टर जमीन भूसंपादनासाठी बाकी आहे. या भूसंपादनासाठी राज्य सरकारच रिलायन्सचे दलाल बनले आहे. २००८ साली घेतलेल्या जनमत चाचणीत ९६ टक्के शेतकऱ्यांनी महामुंबई सेझला विरोध दर्शवला. राज्य सरकारला हे चांगले माहीत आहे. लोकशाही मार्गाने मत नोंदवलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. त्यांची फसवणूक केली जात आहे. रिलायन्सने सरकारच विकत घेतल्याचे आता चित्र दिसतेय.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध व्हायला हवे.

 शेतकऱ्यांची मुस्कटदाबी
रायगड, ठाणे, नवी मुंबई येथे ७४ सेझचा प्रस्ताव आहे. यासाठी ६३ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक जमीन रिलायन्सच्या सेझला आहे. आता याच सेझला खोपटा सेझ नाव देऊन शेतकर्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. यापूर्वी राज्य सरकारने रिलायन्सचे दलाल बनून महामुंबई सेझसाठी ज्या जमिनी संपादित केल्या त्या जमिनीला अवघे १० लाख रुपये एकरी भाव दिला. मात्र याच एकराचा आज कोट्यवधी रुपये भाव आहे. ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्याही खुशीने दिल्या नाहीत. कारण जी जमीन संपादित करायची आहे ती जमीन शेतकऱ्यांना गहाण ठेवता येणार नाही, अशी सेझच्या कायद्यात तरतूद केली आहे. येथेही शेतकऱ्यांची मुस्कटदाबी. अडचणीच्या वेळी शेतकऱ्याला एकमेव जमिनीचा पर्याय असतो. ही जमीन गहाण ठेवून तो पैसा उभा करतो. मात्र या तरतुदीमुळे जमीन गहाण ठेवता येणार नसल्यामुळे त्यांना मजबुरीने जमिनी द्याव्या लागल्या. मात्र त्यांना मिळालेला पैसाही आता संपला.

बहुतांश जमिनी आगरी समाजाच्या
एका वर्षात शेतकरी उघड्यावर आला. सरकारच या जमिनींचे व्यापारी बनले. प्रकल्पासाठी जमिनी घेतात आणि त्या दुसरीकडे विकून त्यातून कोट्यवधी रुपये कमावतात. शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होतेय. आता शेतकरीही जमिनी द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात, हा पैसा टिकणारा नाही. नोकरीही मिळत नाही आणि पैसाही संपतो, मग आम्ही करायचे काय? मोबदला वाढवून दिला तरी शेतकरी आज जमीन द्यायला तयार नाही. याची तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे, यातील बहुतांश जमिनी आगरी समाजाच्या आहेत. पिढ्यान्पिढ्या ते जमिनी कसत असल्याने त्यांचे जमिनीशी भावनीक नाते तयार झाले आहे. जमिनीशी ते पूर्वजांचे नाते मानतात. त्यांनी मेहनत करून या जमिनी तयार केल्या आहेत. दुसरे म्हणजे, या खारपट्ट्यातील जमिनी कसदार आहे. यातून चौपट पीक येते. तिसरे कारण म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील त्यांना सेझमध्ये नोकरीची शाश्वव नाही. नोकरीचे कसलेही ठोस आश्वासन मिळाले नाही. याअगोदर कोकण रेल्वे, व्हिडीओकॉन प्रकल्पात जमिनी गेलेल्यांचे अजूनही पुनर्वसन वा नोकरी मिळाली नाही. तो अनुशेष बाकी असताना आता काय खात्री? शेतीशी जोडणारा मजूर, शेतीवर आधारित असणारे दुय्यम उद्योग अशी रोजगाराची साखळीच मोडेल. पिढ्यान्पिढ्यांची जमीन शेतकऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीसारखी आहे. दिवसेंदिवस जमिनींची किंमत वाढत असताना ती तोट्यात का विकावी? अशा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आता जमिनी सेझसाठी तर देणारच नाही.

 जमिनीच्या लुटीबरोबर पाण्यावरही दरोडा
एखादा लोकहिताचा प्रकल्प आला तर जमिनी देऊ. मात्र त्याही लिजवरच, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. आज देशातील कोट्यवधी लोकांना दोन वेळचे पोटभर पुरेल एवढेही अन्न मिळत नाही. देशात पुरेशी अन्नसुरक्षा नसताना सरकार औद्योगिक प्रकल्पांसाठी आणखी किती शेतजमीन वळविणार? जमिनी घेण्यासाठी सरकारकडून अडवणूक चालू आहे. कंपनी महसूल अधिकार्यांना हाताशी धरून पीक येणारी जमीन नापीक ठरवत आहे. जमिनीच्या लुटीबरोबर पाण्यावरही दरोडा घातला जात आहे. पेण तालुक्यातील २२ गावांतील जमिनी सिंचनक्षेत्रात येतात. त्यांचे सिंचन सरकारने थांबवले आहे. सरकारच विकले गेले आहे. शेतकर्यांचे हित ते काहीच बघत नाहीत. हेटवणे प्रकल्पातील पाणी २९ वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता त्यांना द्यायची वेळ आली तेव्हा ते पाणी सेझला (प्रत्यक्षात प्रकल्प उभा नसतानाही) दिले. हे दरोडेखोरांचे सरकार आहे का? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असलेल्या अंबांनीनी लाखो शेतकर्यांना त्यांचे जीवन हलाखीचे करून देशोधडीला लावले आहे.

 सरकारी तिजोरीवर डाका
रिलायन्स, व्हिडीओकॉन, जिंदाल या कंपन्यांनी आतापर्यंत सरकारला बुडवले. संसदीय लेखा समितीने २००६ साली आपल्या अहवालात या कंपन्यांनी विविध सवलती लाटून राज्य सरकारला ७० हजार कोटींचा गंडा घातला असल्याचे म्हटले. आज गैरवापर करणाऱ्यांना सरकार जमिनी देते. सरकारी तिजोरीवर हा डाकाच आहे. सरकारने तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच दिल्या आहेत का? राज्यात मंजूर झालेल्या ७४ सेझनी सामान्यांच्या आयुष्याची धूळधाण केली आहे. सेझ तपासणीच्या संसदीय समितीने २००७ साली आपला अहवाल सादर केला. समितीने अहवालात म्हटले आहे की, सेझचे धोरण मुळापासून तपासावे. तोपर्यंत त्यांना मान्यता देऊ नये. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सरकारने सेझला मंजुरी दिली. कॅगनेही सेझवर ताशेरे ओढले आहेत. सेझमधील निर्यातीतून विदेशी चलनाचा फायदा झाल्याचे दिसून येत नाही.

 सेझ कायदा घातक
नियोजन आयोगाच्या ‘जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी तपासणी समिती’ने सेझ कायदा घातक असून तो रदद् करावा, अशी शिफारस केली आहे. या सगळ्या यंत्रणांची मते डावलून सरकारने सेझला मंजुरी दिली. यातून सरकार विकले गेले आहे हे दिसतच आहे. त्यामुळे आता हे लोकशाही सरकार आहे का हा प्रश्न पडतो.

आता अंबानीसारखे आधुनिक संस्थानिक तयार होणार
सेझ क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असणार नाहीत. त्यामुळे या क्षेत्राचा कारभार विकास प्राधिकरणाकडे असेल. यामध्ये पाच सदस्य असतील व त्यापैकी एक आयुक्त असून आयुक्तांना सर्वाधिकार दिले आहेत. सदस्यांपैकी ३ सदस्य विकासकाचे आणि केंद्र व राज्याचा प्रत्येकी १ सदस्य असेल. आयुक्तपदी विकासक किंवा त्यांचा सदस्यच असणार आहे. म्हणजे आता अंबानीसारखे आधुनिक संस्थानिक तयार होणार.

पर्यावरणाचा मोठा प्रश्न
सेझला राज्यात २५ वर्ष १०० टक्के करमाफी दिली आहे. नफ्यावरही कर आकाराला जाणार नसून पाणी, वीजही करमुक्तआहे. सरकारची मुदत फक्त पाच वर्ष असताना सरकारने कोणत्या आधारावर सेझला २५ वर्षे करमाफी दिली. उद्योजकांनीच आता निर्णयप्रक्रिया ताब्यात घेतल्याचे व तेच कायदे करत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीचा गळा दाबला जातोय. देशाच्या सार्वभौमत्त्वावरही घाला घातला जातोय. कारण असे अधिकार परदेशी कंपन्यांनाही आहेत. समुद्रकिनारपट्टीच्या सेझमुळे संरक्षणाचाही प्रश्नही निर्माण होणार आहे. कस्टमचे अधिकारीही सेझमुळे प्रवेश करु शकत नाहीत. उद्या दाऊदसारखा गुंडही सेझमध्ये कंपन्या उभारेल. कोकण किनारपट्टीवर १५ सेझला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टीच धोक्यात आली आहे. रिलायन्सच्या एका सेझमुळेच पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. जमीन तयार करण्यासाठी मातीचा मोठा भराव घालावा लागणार आहे. त्यासाठी डोंगर फोडूनच माती मिळणार आहे.संपूर्ण जिल्ह्याचे पर्यावरणच धोक्यात आले आहे. सेझमध्ये बहुपर्यायी उद्योग असल्याने शेतकरी, मजूर, मच्छीमार, लहान उद्योजक बुडणार. आता शेतकर्यांनी जागरूक राहावे. दलालांचे जाळे पसरलेय. त्यांच्यापासून सावध राहावे. शेतकऱ्यांनी पुढच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे.

नागरिकांनी या लढ्यात साथ द्यावी
सेझमध्ये कामगार कायदे लागू नाही.कामगार वर्गानेही लढ्यात उतरायला हवे. आपल्या पोटाला घास पुरवणारा शेतकरी अडचणीत आला असताना सामान्यांनी गप्प राहून चालणार नाही. नागरिकांनी या लढ्यात साथ द्यावी. वाघोली, गोराई, लोणावळा, पुण्याजवळील चाकण ही आताची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. जेथे-जेथे शेतकरी उभा राहिला तेथील अहितकारक प्रकल्प परतवून लावले.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

लढ्याला पूर्णविराम नाही

लढ्याला पूर्णविराम नाही
विकासासाठी जमीन ही मूलभूत घटक आहे. मात्र देश आणि राज्याच्या विकासाच्या नावाखाली केंद्राच्या भूसंपादन कायदा १८९४ नुसार सक्तीने इंग्रजांच्या अंमलाप्रमाणे भूसंपादन केले जाते. तत्पूर्वी पुनर्वसन कायदा १९५६ नुसार सरकार शेतकऱ्यांना नोटीस बजावते मात्र परिपूर्ण व सन्मानकारक पुनर्वसन होत नसल्याने देशभरात शेतकरी प्रकल्पग्रस्त व भूमीपूत्रांना वर्षानुवर्षे लढावे लागत आहेत.

गणूचा गणपत
भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढेही सुरु आहेत. नवी मुंबईची निर्मिती करुन मुंबईवरील वाढत्या लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी सिडको या महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाची स्थापना करुन रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल तसेच ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टीतील पन्नास हजार हेक्टर जमीन शासनाने एकाच वेळी संपादित केली. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ही पहिलीच घटना आहे. त्यावेळी येथील शेतकर्यांना त्यांच्या दारी सरकार विकास गंगा आणणार असल्याचे व परंपरेने शेती आणि मच्छिमारी करणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांचा ‘गणूचा गणपत’ करण्याचे स्वप्न दाखविले होते. सक्तीच्या भूसंपादनानंतर सिडकोच्या वतीने विकास झाला देशभरातील आणि मुंबईतील लोकवस्तीही नवी मुंबईत वसली आहे.

 साडेबारा टक्के
१९८४ साली शेतकऱ्यांनी लोकनेते श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वात लढविलेल्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्याने शेतकऱ्यांना भारताच्या इतिहासात प्रथम संपादित जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित जमिनीही मिळाल्या यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले मात्र या विकासाला मर्यादा आल्या. शेतकरी कोट्याधीश झाला असला तरी त्यांचे वारस मात्र रोजगारांच्या हक्कांपासून वंचित राहिल्याने, कोट्यावधी रुपये एकदम हाती आल्याने त्याची वासलात लागली आहे.
स्थानिक  भूमिपुत्र भिकेला लागतोय
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपाचे लाखो रोजगार निर्माण झाले मात्र शासनाने येथील भूमीपूत्रांना त्यात स्थान प्राप्त करून देण्यासाठी जे नियोजन करावयास हवे होते ते न केल्याने विकास झाला असला तरी विकासात भूमीपूत्रांना स्थान नाही. कारण परंपरागत शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षण नाही. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात जागतिक दर्जाचे इन्फोटेक तंत्रज्ञानाचे कार्यालय आहे. या कार्यालयात पंचवीस हजारच्या आसपास काम करणारे कर्मचारी आहेत. मात्र यात स्थानिक भूमीपूत्र शोधून सापडत नाही.

स्थानिक भूमीपूत्रांना वाटाण्याच्या अक्षता
तर उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावर आधारीत अनेक उद्योगात स्थानिक भूमीपूत्रांना प्राधान्य देण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरु आहे. या परिसरातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामाचे उद्घाटन केंद्रीय कृषी शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची विनंती या दोन्ही मातब्बरांनी पणन मंत्री यांना केली होती. तरीही या गोदामात चार वर्षांनंतर आजही स्थानिक भूमीपूत्र वंचितच राहिले आहेत. याचा अर्थ शासनाचे प्रमुख असलेल्या व शासनाच्याच आस्थापनातही स्थानिक भूमीपूत्रांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची स्थिती आहे. तर खाजगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यात काय स्थिती असेल ते न सांगितलेले बरे.

भूसंपादन  कायदा अन्यायकारक
शासनाचा पुनर्वसन कायदा परिपूर्ण नाही. तसेच केंद्राचा कायदाच नसल्याने अनेकदा भूमीपूत्रांना साधा आधारही मिळत नाही. सध्या देशातील विविध भागात सुरु असलेल्या भूसंपादन व त्या विरोधातील भूमीपूत्रांच्या लढ्याच्या परिणामी आणि खासकरुन सेझ करीता केंद्र सरकारने केंद्रीय भूसंपादन कायदा करण्याच्या विचारात आहे. तसेच भूसंपादन कायद्यातही दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र कायदा करुन भागणार आहे का? कायदा केवळ कागदावरच राहणार असेल आणि शेतकरी आणि भूमीपूत्रांना न्याय न मिळाल्याने त्यांना आंदोलने करावी लागणार असतील तर मग काय?

 नवीन भूसंपादन कायद्याची आवश्यकता
पुनर्वसनाचा कायदा हा शेतकऱ्यांच्या सहभागाने, देशाची अन्न सुरक्षा अबाधीत ठेवून राबवला गेला पाहिजे. केवळ आवश्यक ठिकाणची पिकती शेती संपादीत करण्याची पूर्वअट तसेच संपादित जमीन मालकाला (भूमीपूत्राला) त्याच्या जमिनीच्या मोबदल्यात भागीदारी देऊन त्याच्या कुटूंबाचा कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न निकालात काढण्याच्या दृष्टीने भूमीपूत्राला शाश्वत आश्वासन आणि पर्याय दिल्यासच यापुढे शेतकरी आपल्या जमिनी देतील. त्याचप्रमाणे पुनर्वसन आधी की प्रकल्प आधी याची चर्चा होऊन, गरजेनुसार आधी पुनर्वसन आणि शेतकऱ्यांचे समाधान करुनच प्रकल्पाची उभारणी केल्यास पुनर्वसनासाठी वर्षानुवर्षे लढे करावे लागणार नाहीत आणि खर्या अर्थाने भूमीपूत्रांना विकासाची फळे चाखावयास मिळू शकतील.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, ७ जुलै, २०११

पांडवकडा साद घालतोय!!!!!
(वरील सर्व फोटो गेल्यावर्षी आम्ही गेलो होतो त्यावेळचे आहेत)

   आमच्या निसर्गरम्य रायगड मध्ये सर्व पांडवकडा प्रेमी पर्यटकांचे स्वागत.  

PLACE:
Pandavkada Waterfall,
Kharghar, Panvel,
Raigad.

पांडवकडा साद घालतोय...........
पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत अंगावर हिरवी शाल लपेटलेला. उंच कडेकपारीतून अंगावर जणू शॉवरचा सपाटून मारा करणारा. सर्वागात उत्साहाच वार संचारण्यास भाग पाडणारा. महाभारतील पांडवांच ऐतिहासिक वास्तव्य सांगणारा. ‘पांडवकडा’ पावसाचे तुषार अंगावर झेलत निसर्गाची कुस शोधणा-या पर्यटकांना साद घालू लागला आहे. उंच  कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याची फेसाळलेली शुभ्र आणि थंड धार अंगावर घेत मस्तीत भिजत राहणे, यापेक्षा वेगळा असा आनंद कोणता! नवी मुंबईतील "नायगारा" म्हणून प्रसिध्द असणाऱ्या खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर आता गर्दी होऊ लागली आहे.
जुन-जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळताच मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील पर्यटक येथे येतात. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पोलीस आणि सिडकोने बंदी घातली होती, परंतु हा नैसर्गिक धबधबा पर्यटकांना खुला करण्यासाठी काही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. दोन वर्षांपासून पर्यटक या धबधब्याचा आनंद घेत आहेत. बेलपाडा व खारघर टेकडीच्या पायथ्याशी भारती विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी पावसाळ्यात छोट्या-मोठ्या डोंगरदऱ्यातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत असत. काही ग्रामस्थांकडून या परिसरात पांडवकडा असल्याची माहिती त्यांना मिळाली. तरुणाईची गर्दी येथे होऊ लागल्यावर त्याचे नाव सर्वतोमुखी झाले.

ओळख पांडवकड्याची....
सिडकोने खारघरचा विकास हाती घेतल्यावर खारघर शहराची निसर्गरम्य शहर अशी ओळख करून देताना पांडवकड्याचाही उल्लेख करावा लागतो. या धबधब्याशेजारी धामोला हा आदिवासी पाडा आहे. पावसाळ्यात येथे सव्वाशे फुटावरून डोंगरावरून पानी खाली कोसळते. पनवेल, तळोजा, खारघर परिसरातून हे विलोभनीय दृश्य दिसते. हा धबधबा जणू सर्वाना साद घालत असतो. दहा-पंधरा वर्षापासून येथे पर्यटकांची गर्दी असते. धबधब्याच्या मध्यभागी डोंगरात सगळीकडे काळाकुट्ट अंधार असलेली मोठी गुंफा आहे. या गुंफेतून मुंब्रा, कल्याणपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. धामोला पाड्यातील काही मंडळीनी दीड-दोनशे फुट आत जाऊन पाहिले असल्याचे सांगतात. आत मिट्ट काळोख असून काहीच दिसत नाही. पूर्वी या गुंफात पाच पांडवांनी वास्तव्य केल्याचेही सांगितले जाते. गुंफात जाऊन शांत बसल्यास मुंब्रा येथून जाणाऱ्या रेल्वेचा आवाज देखील कानी पडतो. पूर्वी पांडवकडा म्हणण्याऐवजी आगरी भाषेत "पंडोकरा" असे म्हटले जात असे.

 हिरवे हिरवे गार गालिचे.......
 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ती खेळत होती,
गोड निळ्या वातावरणात - अव्याज मने  होती डोलत,
प्रणयचंचल त्या भृलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी,
याहूनी ठावे काय तियेला? - साध्या भोळ्या त्या फुलराणीला.

पूर विनोदी संध्यावात - डोल डोलवी हिरवे शेत,
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला,
"छानि माझी सोनुकली ती - कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून?
तो रवीकर का गोजिरवाणा - आवडला आमच्या राणीला? "
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी.

स्वर्भूमीचा जुळवीत हात - नाच नाचतो प्रभातवात,
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागली लपावयाला,
आकाशीची गंभीर शांती - मंदमंद ये अवनी वरती,
विरू लागले संशयजाल - संपत ये विरहाचा काल,
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्ष निर्भर नटली अवनी,
स्वप्न संगमी रंगत होती - तरीही अजुनी ती फुलराणी.

तेजोमय नव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशेला,
जिकडे तिकडे उधळीत मोती - दिव्य वऱ्हाडी गगनी येती,
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी,
कुणी बांधिला गुलाबी फेटा - झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोळ चालला - हा वाङनिश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे? - साध्या भोळ्या या फुलराणीचे.

गाऊ लागले मंगल पाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना,
नाचू लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पख्वाज,
नवरदेव सोनेरी रवीकर - नवरी ही फुलराणी सुंदर,
लग्न लागले सावध सारे - सावध पक्षी सावध वारे,
दवमय हा अंतःपाट फिटला - भेटे रवीकर फुलराणीला.
-बालकवी. पांडवकड्या संबंधीत काही  जुन्या दंतकथा
खारघर  परिसरातील सर्वग्रामस्थ भाताचे पिक घेत असत. सर्व परिसर घनदाट पर्नाराजीने व्यापलेला होता. आज पांडवकड्यावरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा सर्वत्र दिसतात. पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. जंगलात वाघ, कोल्हे, ससे असे प्राणी आढळत. घनदाट जंगलामुळे पांडवकडा धबधब्याचा आनंद केवळ गुराखी घेत असत. पूर्वी या धबधब्याजवळ लग्नकार्यासाठी वधू-वरांना लागणारे दागदागिने मिळत, अशीही दंतकथा आहे. लग्नकार्यापूर्वी या ठिकाणी देवीची पूजा केल्यास थोड्या वेळाने दागिने मिळत असत. लग्नकार्य झाले की पूजापाठ करून दागिने परत केले जात असत: परंतु कालांतराने लग्नकार्यासाठी गेलेले दागिने परत न केल्याने ही प्रथा बंद झाल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी काही बुवा मंडळीनी भजन-कीर्तन करून मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला: परंतु त्यात त्यांना यश आले नाही, असे गावातील ग्रामस्थ मंडळी सांगतात. खारघरच्या विकासामुळे पांडवकडा धबधब्याची ओळख सर्वाना झाली. आता तिथे दाट जंगल राहिलेले नाही. त्यामुळे दूरवरून धबधबा दिसतो.


माझी  सिडकोला विनंती
 आमचा मित्र परिवार गेल्या वर्षी पांडवकड्यावर गेला होता. त्यावेळी माझं आजूबाजूला निरीक्षण चालू होत. त्या निरीक्षनांती माझी सिडकोला विनंती असेल की, डोंगरावर एक छोटस धरण बांधल्यास खूप चांगल होईल. कारण धरणात पानी साठून राहील. आणि पांडवकडा पावसाळ्याच्या फक्त ४ महिने न कोसळता पूर्ण वर्षभर कोसळून पर्यटकांना आनंद देत राहील, तसेच तेथील आदिवासी पाड्यांना देखील वर्षभर पाण्याचा मुबलक पुरवठा होईल. धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याच्या वेगावर देखील नियंत्रण करता येईल. आणि काही प्रमाणात अपघातांना थांबवता येईल. ज्या काही धोकादायक दरडी, तसेच मोठमोठे दगड तेथून हटवायला हवेत. पांडवकड्याला जाणाऱ्या पाऊलवाटांची पक्की बांधणी करायला हवी. पांडवकड्याकडे जाताना लागणाऱ्या ओढ्यांवर छोटेसे पक्के कायमस्वरूपी पूल बांधायला हवेत. सुरक्षारक्षक तसेच जीवनरक्षकांची नेमणूक करायला हवी. वाहनतळाची उभारणी खूप दूर करण्यात यावी आणि तिथेच हॉटेल्सची उभारणी करायला हवी. म्हणजे निसर्गाला कोणत्याही स्वरूपाचा धक्का बसणार नाही.


पांडवकड्याला कसे जाणार?
आता  इतकं मस्त-मस्त वाचल्यानंतर, फोटो पाहिल्यानंतर तुम्ही विचारणार ना की, इथे जायचं कसं????
मुंबईहून जाणा-यासाठी हार्बर लाइनने पनवेल गाडी पकडावी लागेल. त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशनला उतरून तिथून खाजगी रिक्षा पकडून जावे लागते. त्यासाठी रिक्षावाले ५० ते ७० रुपये आकारतात. ठाणे, कल्याण डोंबिवलीकरांसाठी ठाण्याहून पनवेल गाडीचा पर्याय खुला झाल्याने त्यांनाही हे ठिकाण सहज गाठता येईल. अन्यथा रेल्वे स्टेशनवर उतरून पायी जाऊ शकता. पण त्यासाठी २ तास चालायची तयारी ठेवावी लागेल.(म्हणजे पुढचे ४ दिवस तंगड्या गळ्यात घेऊन बाहेर निघण्यासाठी तयार, कारण आम्ही ते अनुभवलंय!!!!!) उस्तव चौक मार्गे डाव्या हाताचा नाल्याचा रस्ता पकडून सरळ चालत जायचं.


पांडवकड्याला जाणार असाल तर काही सुचना:
१. पांडवकड्याला जाताना घरात सांगून निघणे.
२. ७-८ जणांच्या ग्रुप बरोबरच जाणे. एकट्या-दुकट्याने जाण्याची शहाणपणा करू नये.
३. बरोबर मोबाईल बाळगणे. खूप डोंगरात असला तरी मोबाईलला खूप रेंज असते. अडीअडचणीच्या वेळी कामास येईल.
४. चप्पल घालून जाणे. कारण कच्ची पाऊलवाट असल्याकारणाने पाय मातीत रुतून बसण्याचा धोका आहे. आणि बूट असतील तर ते अधिक रुतून खराब होतील. तुटलेल्या चपला तिथेच टाकून स्वतःची अक्कल विकायला काढू नये. निसर्गाला घाण करण्याचा तुम्हांला अधिकार नाही. मुकाट्याने ती चप्पल ब्यागेत टाकावी आणि पुढचा मार्ग धरावा.
५. प्रत्येक पाऊल जपून टाकावे. कारण वाट खूप निसरडी आहे. आणि खाली जागो-जागी भले मोठे दगड आहेत. पडलात तर खूप महागात पडेल.
६. वरती सांगितल्या प्रमाणे दोन जणांनी येण्याचा शहाणपणा दाखवू नये. काही प्रेमवीर जर "त्यांच्या" "तिला" स्वर्ग दाखवायला घेऊन येणार असतील, तर तुमच्या स्वर्गाचा मार्ग नरकातून जातो याची नोंद असावी.
७. ही आपली खाजगी प्रॉपर्टी नाही याचं भान असुद्या. बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचे वेष्टन तेथे टाकू नये. तो कचरा स्वतःच्या ब्यागेत टाकावा.
८. धबधब्याच्या प्रवाहात उतरताना पाण्याचा जोर किती आहे, हे जाणून घ्या. प्रवाहाला खूप वेग असल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. या धबधब्यांच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
९. धबधब्याच्या पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या. जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढा येण्याचा संभव असतो.
१०. पाणी वाढल्यामुळे एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यास पाणी उतरेपर्यंत सुरक्षित जागी थांबा. जास्त वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल, मात्र मोठ्या प्रवाहातून पलीकडे जाण्याचे साहस अंगावर बेतू शकते.
११. भुसभुशीत मातीचा अंदाज न आल्याने खाली घसरण्याच्या घटना घडू शकतात.
१२. नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून प्रवाह ओलांडावा.
१३. ग्रुपमधील सगळ्यांनी पाण्यात उतरू नये. स्वत:च्या तसंच, सोबतच्या सामानाच्या सुरक्षेसाठी एक-दोन जणांनी काठावर थांबणं आवश्यक आहे.
१४. अशा ठिकाणी कपड्यांचं भान आवश्यक आहे. मुलीनी विशेष काळजी घ्यावी. ज्या ग्रुप बरोबर जाणार आहात त्या ग्रुप मधली पोरं ओळखीची असावीत. किरकोळ शेरेबाजी, कमेंट्सचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची उदाहरणं घडतात. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी हे भान राखणं आवश्यक आहे.
१५. निसर्गाचा आदर राखून वागणं आवश्यक आहे. नदीच्या परिसरात कचरा टाकू नये, आपल्यासोबतचे बिस्किट, चॉकलेटचे रॅपर आपल्यासोबत परत आणावेत.
१६. दारूच्या बाटल्या पिऊन तमाशे करू नयेत. स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालाल. पांडवकडा हे दारू पिण्याचे ठिकाण नाही. त्या बाटल्या तुमच्या घरी जाऊन आई-वडिलांसमोर ढोसाव्यात आणि तुमचे नको ते रंग दाखवावेत.
१७.. दुदैर्वाने काही अपघात झाल्यास स्थानिक गावकऱ्यांना, गावातील पोलीस पाटीलाला, जवळील पोलीस स्टेशनला कळवावे. अशा वेळी काही जणांनी तरी घटनास्थळी थांबावे.

   निसर्गाचा मान राखून आनंद लुटायला येणार असाल तर एक रायगडवासी या नात्याने आपलं स्वागत आहे.  
आपलाच,
आमोद पाटील.