आमोद पाटील-आगरी बाणा: मे 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, १९ मे, २०११

आगरी समाजातील लग्नसमारंभातील धवलारनीचे स्थान महत्त्वाचेAGRI SAMAJ
AGRI SAMAJ LAGN-SAMARAMBH
DHAVALARIN

धवले गीत
आगरी समाजातील लोकांच्या लग्न सोहळ्याच्या पहिल्या दिवसाला आगरी भाषेत "हलद" म्हणतात. या हळदी समारंभाप्रसंगी "धवले" गाणारी बाई आपल्या घरातील गीत म्हणून शुभ कार्याला सुरुवात करते. लाग्न्सोहोल्यातील म्हटल्या जाणाऱ्या सगळ्या गीतांहून या गीताला अधिक लोकप्रियता लाभली आहे. महाभारतात या धवले गीतांचा उगम झाल्याचे आढळते. श्रीकृष्ण विवाहात हे धवले गायले गेले असे म्हणतात.

आगरी "हलद"
सकाळची वेळ आहे. सूर्यबिंब नुकतेच वर आले आहे अन् पूर्व दिशा केसरी रंगाने न्हाली आहे. पक्षी आकाशात उडू लागले आहेत. मंद वाऱ्याबरोबर केवड्याचा सुगंध दरवळतोय. अशा वेळी सागर तीरावरील एका गावातून सनीचे सूर आणि बहारदार लोकगीत ऐकायला येते.
आगरी समाजातील लोकांच्या लग्नसोहळ्याचा तो पहिला दिवस असतो. या पहिल्या दिवसाला आगरी बोलीभाषेत "हलद" असे म्हणतात. या दिवशी नवऱ्या मुलाला रांगोळी काढलेल्या पाटावर बसविले जाते. तेवत राहिलेल्या समई शेजारी एक "आरती"(हळदीकुंकवाने भरलेल्या वाट्या व साखळदिवा असलेली परात) आणि आंबाच्या रसरसशीत पानांची एक डहाली, नारळ ठेऊन हळदीकुंकवाची बोटे ओढून सजविलेला तांब्याचा कळश इतकी शुभसाधने समोर मांडलेली असतात. पण याहून लक्ष वेधून घेते ते शेजारी बसलेल्या धवलारनीने गायलेले संथ सुरातील धवले. निसर्गातील सूर्यप्रभा जशी तेजोमय होते तसे हे "धवले गीत" फुलात जाते आणो भोवतालचे वातावरण सुगंधित करते. ते हे गीत................

"चालत बोलत पाहिले वनी गेला गा,
तव्ह त्या माल्यांनी दंडू उकरीला गा,
तव्ह त्या मालनिनी हाल्दू करही वेळी गा."

या गीतात एक माली आणि त्याची बायको यांचे श्रमिक जीवन सांगितले आहे. रात्र नुकतीच सरली आहे. अशा वेळी पक्ष्यांच्या आवाजाने या गीतातील नायिका 'मालिन बाय' जागी होते आणि आपल्या कामाला लागते. असे या गीतात व्यक्त केलं आहे. टिमकी, ढोलके आणि सनई या वाद्यांची साथ घेऊन रंगणाऱ्या या गीतात निसर्गवर्णन रंजक करणारे आहे. हे गीत गाणाऱ्या बाईला "धवलारीन" असे आगरी बोली भाषेत म्हटले जाते. खरे तर "धवलागर" या संस्कृत शब्दापासून "धवळार" या शब्दाची निर्मिती होऊन त्याचा अर्थ "मंगलोत्सवाचा प्रारंभ" असा होतो आणि हळदी समारंभाप्रसंगी धवले गाणारी बाई आपल्या घरातील हे गीत म्हणून शुभकार्याला सुरुवात करते.

"नायला धुतेला बालू करसाने बसइला,
हात जोरीत चांदा-सूर्य देवाना
रजा मांगीत भारजा परजाया
देर दिवराजा जन्म जोगाचा राजा"

हे गीत म्हणजे नवर्या मुलाकडून केलेली परमेश्वराची आळवणी. नवर्या मुलाचे अभंग्य स्नान झाले आहे आणि त्यानंतर तो म्हणतो- "माझी भारजा गुणसंपन्न असू दे." भारजा हा या गीतातील मूळ शब्द संस्कृत "भार्या" या शब्दापासून मराठीत रूढ झाला आहे. आगरी लोकगीतात रस निर्मितीसाठी अशा अनेक शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो, त्यामुळे गीतात गोडी निर्माण होते.
हळदीनंतरचा दुसरा दिवस लग्नमुहूर्ताचा दिवस असतो. वराची मिरवणूक नाचत गाणी गात वाद्यांच्या जल्लोषात नवऱ्या मुलीकडे येते आणि "आम्ही आलो आहोत" हे सूचित करणारे एक गीत म्हटले जाते. या गीतातील शृंगारिक वर्णन औचित्यपूर्ण आहे आणि आगरी तरुणी ते निसंकोचपणे गातात-

"राम येचीत होता कल्या
शीताबाय गुंफित व्हती माला
अग अग शीताबाये
लवकर लवकर गुंफा माला
भरल्या बालाच्या लग्नाच्या येला"

राम कळ्या वेचीत होता आणि सीता माळा गुंफित होती. रामाचे कळ्या वेचण्याचे काम भरभर होत होते. पण सीतेचे माळा गुंफण्याचे काम मंदगतीने चालू होते. आता लग्नघटिका जवळ आली आहे. म्हणून माळा लवकर गुंफा असे सीतेला सांगण्यात आले आहे. हे या गीताचे कथानक. लग्नासाठी नवरा मुलगा वरात घेऊन आला आहे. अजून नवरीचा साजशृंगार व्हायचा आहे हे प्रत्यक्ष न सांगता राम-सीतेला मध्यस्थी करून रंजन शब्दातून ते आविष्कृत केले आहे. हे गीत ऐकताना मांडवातल्या मुलींना आनंद होतो. यानंतर यथासांग विधीने वाजंत्र्यांच्या निनादात लग्न लागते. जन्माची गाठ मारली जाते आणि इतका वेळ शब्दांच्या तपशिलात असलेली "नवरा-नवरी" एकमेकांची जन्माची सोबती होतात. दोन्ही पक्षांकडील माणसे नात्यांच्या बंधनात बांधली जातात. विवाह सोहळा पार पडल्या नंतर करवल्यांच्या आनंदाला उधान येते. त्या आनंदात त्या नाचतात गातात-

"तलीयेच्या हो पारी
मारा रेशीम गाठी
या दोघांच्या झाल्या भेटी
राय रुक्मिनी दोघी वहिनी
घालती तुलशीला पानी
तुलशीचा हिरवा पाला
खुरीयेला टाल्हा परडी टाकीला
देवाची रुक्मिनी खरी"

हे गीत एखाद्या अवखळ झऱ्यासमान वळणे घेत गायले जाते. दोन जीवांची भेट होऊन त्यांनी रेशीम गाठही बांधली आहे, अशी या गीताची सुरुवात होते.

लग्न लागल्यानंतर रात्री वरातीची मिरवणूक निघते. वर आकाश चांदण्यांनी फुलून निघालेले असते. चंद्राच्या पिठूर चांदण्याने आख्खे गाव दुधाळून निघते. क्षणभर असा भास होतो की, वसंतोस्तव चालू आहे आणि तेथून पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांचा खाली वर्षाव होत आहे. अशा सुखद वातावरणात निघालेली वरात अवर्णनीय असते. त्या चांदुन्या राती आगरी वऱ्हाडी मंडळीनी लावलेल्या अत्तराचा सुगंध ती चांदणी रात दरवळून टाकते. अशा वातावरणात मायेचे कढ आलेल्या नवऱ्या मुलीच्या मनाला समजवताना करवल्या म्हणतात-

"सासूऱ्या हो जाताना
नाही आलं डोल्यान पानी
****ची आईची म्हने लेक शानी
सासूऱ्या हो जाताना
नाही आलं डोल्यान पानी
****चा बाप म्हने लेक शानी"

लेक सासरी जाताना तिला जड वाटणे स्वाभाविक आहे. परंतु या वेदनेवर हळुवार फुंकर घालून तीचे आईच्या पदराने डोळे पुसणारे हे त्या तरण्या करवलीचे गीत म्हणजे नववधूचे हुंदके आवरणारी एक जादू आहे. या गीताने मुलगी विरहाचे क्षण तर विसरतेच, पण तीचे आई-बापदेखील "बाय शानी" म्हणून तिला धीर देऊन तिची पाठवणी करतात. ही या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे.
आणि मग रात्र तारुण्यात प्रवेश करते. चंद्राचे झुंबर आकाश महालाच्या मध्यभागी चमचम करते. करून रसाचा पूर ओसरू लागतो. अशा वेळी वरातीची मिरवणूक इष्टस्थळी येते. स्वतंत्र शैलीने गायिलेल्या आगरी लोकगीतांची धून आनंदी वातावरणात विरून जाते. आभूषणांनी नटलेली, बावरलेली आगरी नववधू नव्या घरात प्रवेश करते.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी एकतेची नवीन ओळख.

बुधवार, ११ मे, २०११

आगरी समाजातील लग्नसमारंभ:बदल हवाच

AGRI SAMAJ
AGRI SAMAJATIL LAGN-SAMARAMBH

पूर्वीचे कालान लग्नांना मजा असाची,
पंगती वाराला आजीस होती, काकीस होती, मामीस होती, आईस होती बाईस पुन होती,
पाणी देवाला पावणे मांडली होती,
इचारपूस कराला डोकरी माणसा होती,
आता मात्र ताटल्या झेवूनशी कुत्र्यासारखा आखर-तखर फिराचा,
जया जागा भेटल तया फतकाल मांडाचा,
त्याचा पापर याचे घशान,
याचा भात त्याचे ताटान,
सगला कसा येर्यासारखा चाललाय,
पैसा आयला,
पुन माणसा मराला लागली,
नको ती नाती जोराला लागली.
ये नवे काळांची लग्ना चालालीन काय..............???????????

सुरुवात
सुरुवात होते मुलगा अथवा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातूनच. मुलगी पाहण्यासाठी मुलगा त्याची आई, वडील किंवा अन्य नातेवाईकांसह मुलीच्या घरी येतो. त्यावेळी यांचा रुबाब पाहण्यासारखाच असतो. जसे हे कुठे देशासाठी युद्धात लढून देशाच्या सीमेवर झेंडे लावून आलेत आणि त्यांना त्याचा खूप अभिमान झालाय. मुलगी पाहण्याचा सोपस्कार पार पडल्यानंतर ही मंडळी काही वेळा तिथेच तर बहुतेकदा एका दिवसानंतर काय देणार प्लॉट की ब्लॉक, तुमच्या नावावर जमिनी किती आहेत, मुलीला अंगावर सोने किती देणार, तुमचे वडील कुठे कामाला आहेत, नसल्यास त्यांचा उद्योगधंदा कोणता, नोकरीत अथवा उद्योगातून कमाई किती, मुलगी किती शिकलीय, नोकरीला कुठे आहे, नोकरीला नसल्यास नोकरीला का नाही, नोकरीला लावणार आहात का, तुमची कोणा राजकीय नेत्याबरोबर ओळख आहे का, कारण आमचा राजपुत्र अजून कुठेही नोकरीला नाही, त्याला नोकरीवाली बायको आम्ही शोधतोय आणि जर तुमची कुठे ओळख-पाळख असेल तर याला तसेच तुमच्या मुलीला नोकरीला लावा. मग आम्ही लग्नाला तयार आहोत. असे प्रश्न सर्रास आपल्या आगरी समाजात गेल्या ४-५ वर्षापासून विचारले जात आहेत. कोणीही कितीही फुशारक्या मारल्या की आमच्या आगरी समाजात हुंडा घेत नाही, तर त्याला मी उदाहरणे देऊन सांगेन की हुंडा कश्याप्रकारे आणि किती प्रमाणात घेतला जातो. आणि जर त्यांना ही रक्कम अथवा वस्तू दिली नाही तर मुलींना त्रास दिला जातो. अशा राजपुत्रांची लायकी नसताना उगाच मुलीकडच्या मंडळीना झुकवल जातंय. आणि मुलीकडचे सुद्धा अनेक वेळा या त्रासाला कंटाळून ४ लाख देऊ, ५ लाख देऊ अस सांगताना दिसून येतात. कारण त्याचं घोड अडलेलं असत. आणि हेच मुख्य कारण आहे, मुलींना जन्मअगोदरच मारलं जातंय. जर मुलींचा गर्भ वाचवायचा असेल तर ह्या हुंडा पध्दतीला थांबवायला हवं.

नंतर साखरपुडा
वरील सर्व सेटलमेंट झाल्या नंतर गाडी साखरपुड्याच्या मांडवात येते. हा मांडव देखील खूप खर्चिक असतो. इथे २००-३०० किलो मटण, ५०-१०० किलो चिकन, शाकाहारी वऱ्हाडी मंडळींसाठी १०-२० वेगळ्या दोन भाज्या, हजारो तांदळाच्या भाकरी, भात, (सध्या बियरच्या बाटल्या देखील अनेक मांडवात दिसायला लागल्या आहेत.) हा झाला फक्त जेवणाचा खर्च. विधींचा खर्च वेगळा, तिथे ब्राह्मणांची दक्षिणा, पेढे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चैनी, घड्याळे यांचा खर्च वेगळा.(हल्ली साखरपुड्याला नवरा/नवरीची बुटे पळवून पैसे मागतात तो खर्च वेगळा)

नंतर मुख्य कार्यक्रम
साखरपुडा आणि मुख्य कार्यक्रम यांच्या मध्ये अनेक मानपानाचे प्रकार घडतात, त्यांचा इथे विचार केलेला नाही. नंतर येतात आपले हळदी समारंभ...............आगरी समाज या हळदी समारंभामुळे नाव गाजवतोय की समाजाच नाव मातीत डूबवतोय...........विचार कण्याची गोष्ट आहे. पूर्वी लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदी समारंभ असे पण हल्ली गेल्या २-३ वर्षापासून विविध सामाजिक संघटनांकडून दबाब येण्यास सुरुवात झाल्या कारणाने बहुतेक मंडळी एका दिवसातच हळद आणि लग्न समारंभ उरकून घेत आहेत. ही चांगली सुरुवात आहे. पण अनेकांनी इथेही पळवाट शोधून काढली आहे.........हळदीच्या आदल्या दिवशीच हळद साजरी केली जातेय.........संध्याकाळी तळण काढल जातंय आणि रात्री धांगड-धिंगाणा...........२-३ वर्षापूर्वी हाच प्रकार हळदीच्या दिवशी रात्री केला जात असे. त्या दिवशी सकाळी संपूर्ण गावातून, आजूबाजूच्या परिसरातून नातेवाईक हळदी समारंभाला येत असत. हळद लागल्यावर जवला-वांगा आणि पोळे हा खास आगरी प्रकार हमखास असे. पण नंतर त्याला देखील पर्याय शोधून काढला "कांदेपोहे किंवा समोसे" कारण अस सांगण्यात येत की, आजच्या पोरींनी पोळे करता येत नाहीत, त्रास होतो, अवघड असतात, लग्नाच्या धावपळीत वेळ मिळत नाही, अश्या अनेक सबबी सांगितल्या जात आहेत. अश्या सबबी सांगून आपण आपल्या संस्कृती पासून दूर चाललो आहोत हे आपल्या कधी लक्ष्यात येईल. तर सकाळचा हा हळदीचा प्रकार झाल्या नंतर संध्याकाळी तळण काढल जात. या तळनात खास घाऱ्या, पापड्या, भोकाचे वडे(वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचं तळण काढल जात. मी आमच्या परिसरातील माहिती सांगितली आहे.) पूर्वी हा तळणाचा प्रकार रात्री उशिरा केला जात असे. सर्व जेवण-खावन झालं की कुटुंबातील सर्व स्त्री वर्ग तळण काढण्यासाठी बसत असे. हे तळण त्याच दिवशी फारच कमी वेळा खात असत. ते दुसऱ्या दिवशी सकाळी खात असत. पूर्वीच्या काळी वाहतुकीच्या सोयीसुविधा नसल्या कारणाने पाहुणे मंडळी सकाळीच येत असतं. त्यांच्यासाठी ही तळणाची सोय असे.(मातोश्रींकडून माहिती) पण नंतर नंतर जसा जसा हातात पैसा खेळायला लागला तस तळण लवकर काढून, ते खाऊन, संपवून रात्रीच्या तयारीला लागत असत. तळण लवकर काढण्यात येण्याचा कारण अस सांगितलं गेलं की, लवकर तळण काढल तर रात्री खूप नाचायला भेटेल. तर हा तळणाचा प्रकार संपल्यानंतर आपण मुद्याकडे परत येऊया.

नवीन वाईट गोष्टींची रेलचेल
तळण काढून झाल्यानंतर सुरु होतात नवीन वाईट गोष्टी ज्यांचा पूर्वी आगरी लग्नात समवेश नव्हता. पण जमिनी विकून आलेले १२.५ टक्के आगरी समाजाला वेड करत आहेत. अगोदर आगरी समाजाकडे इतका पैसा नव्हताच. आणि आगरी समाजाला हा पैसा मिळाला देखील नसता. जर आगरी समाजाचे आधारस्तंभ मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांनी या प्रश्नांत उडी घेतली नसती तर आगरी समाज उध्वस्त झाल्यातच जमा होता. पण पाटील साहेबांनी आगरी समाज वाचवला. पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर मागच्या पिढीने तसेच या पिढीने अक्षरशः पाणी ओतले आहे. आगरी समाजातील अनेकांजवळ करोडो खेळू लागले, पण पैशाचं योग्य नियोजन त्यांना काही करता आलं नाही. पैसा येतो आहे आणि जातो आहे. पुढच्या पिढीच काय? याचा विचार कोणी करताना दिसून येत नाही. तर ही आगरी हळद जिच्यात दारूचा पूर येतोय, मटणाचा रतीब घातला जातोय, लाख-दोन लाखाचे डी.जे. वाजवून इतरांना त्रास दिला जातोय, गोल्डन मेन अशी पदवी मिळालेला गायक रात्र-रात्र जागत आहे, गाणे बोलत आहे, तो बोलणारच कारण त्याच्यावरच त्याचं पोट आहे, पण कुठेतरी त्याला देखील वाईट वाटत असेल ना त्याच्या समोर दारू पिऊन लोळणारी आगरी माणसे बघून????? पण तो मनातल्या मनात हे बोलत असेल, कारण त्याचं पोट गाण्यावर आहे. दारू चढल्यावर भांडण केली जात आहेत, मागची उनिधुनी काढली जात आहे, मारामाऱ्या केल्या जात आहेत, पोलीस केस होत आहेत. अहो हे लाख-दोन लाखाचे डी.जे. वाजवून आमच्या कानाला भोक पडायची वेळ येते एप्रिल आणि मे या दोन महिन्यात. खरतरं रात्री १० वाजता हे सर्व बंद करावं असा नियम असताना देखील हे सर्रास वाजवत आहेत, नाचत आहेत. स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास दिला जात आहे. कधी थांबणार हे सर्व?? की कायद्याचा बडगा दाखवून आम्हांला थांबवावं लागेल??

शेवटी लग्न
सध्या लग्नात लाखोंची स्टेज उभारली जातेय, सर्व पाहुण्यांना काहीतरी मानाची वस्तू दिली जातेय, शाली-फेटे बांधले जात आहेत, पैशाची उधळण केली जात आहे. २५० रुपये ताट अस कमीत कमी ४-५ लाख बुफे पद्धतीच्या जेवणावर खर्च केले जात आहेत, वरून मोठ्या फुशारक्या मारून सांगितलं जात आहे की किती रूपयाच ताट होत ते. पण बहुतेकांना ते जेवण आवडलेलं नसतचं. कारण त्या जेवणात आपुलकी नसते असते ती फक्त दाखवेगिरी पैशाची आणि नवश्रीमंतीची. शेवटी आपल्या गावातील रांध्यानी(जेवण करणारी माणसे) केलेल्या जेवणाला जी चव असते ती या बुफे-फुफे ला कधीच येणार नाही. हल्ली जेवणही हवं तसेच आईस्क्रीम देखील हवी असा आग्रह वर पक्ष करताना आढळून येतो. वधू पक्षाला देखील दाखवेगीरीची सवय लागलीय मग ते देखील तयार होतात. खर्चाला कोणतीही मर्यादा नाही कारण मिळालेला पैसा हा कष्टाचा नाही त्याचं मोल कस असणार यांना???? पण माझ्यासारख्याला दुखः होत कारण माझ्या कुटुंबाने, पाटील साहेबांनी हा पैसा मिळवीन देण्यासाठी जीवच रान केलं, ते जीवावर उदार झाले, पण ह्याचं काय चालू आहे सध्या??????

परंपरा आणि चालीरीती
हा लेख प्रकाशित झाल्यानंतर फेसबुकवर अनेक प्रतिक्रिया आल्या. तरुणांना बदल हवा आहे. पण जुन्या परंपरा मोडू नयेत अस सर्वांचं मत आहे. माझं देखील मत काही वेगळ नाही. परंपरा हव्यात, पण परंपरेच्या नावाखाली आज-काल जो धांगड-धिंगाणा चालतो तो थांबवला पाहिजे. कारण ह्या आपल्या परंपरा नाहीत. त्या उसन्या आहेत, इतर समाजाच पाहून आपण तसे वागायला लागलो आहोत, आलेला १२.५% पैसा देखील कारणीभूत आहेच. मा.श्री.लोकनेते. दि.बा.पाटील साहेबांशी आज झालेल्या घरगुती भेटीत(दि.१६ मे, २०११) हा विचार त्यांच्या समोर बोलून दाखविला की, तरुणांना बदल हवा आहे, पण त्यांना परंपरा देखील जपायच्या आहेत. त्यामुळे माझा परंपरा आणि चालीरीती यांना विरोध नाही. तर विरोध आहे मोठमोठ्या खर्चाला, दारूच्या पुराला, मटणाच्या डोंगराला.

सुधारणा करायची आहे
आगरी बाणा मार्फत एक झालो आहोत, सुधारणा करण्याच्या चर्चा देखील करायला सुरुवात केली आहे. आत्ता गरज आहे प्रत्येकानी स्वतःपासून सुरुवात करण्याची, मी अस वागणार नाही याची शपथ घेण्याची, तेव्हा कुठेतरी हे थांबेल. चला तर मग सुरुवात तर करुया........यश, अपयशाची विचार आताच कशाला???????? पाटील साहेबांचे विचार आणि आई एकविरेचा आशीर्वाद आगरी बाणाच्या पाठी असताना, आपल्या आगरी बाणाला भीती कोणाची???? पर्वा कोणाची????

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
एक ध्येय, एक नेतृत्व.

शनिवार, ७ मे, २०११

दि.बा.पाटील साहेब जनजागृती करणार

माझे प्रेरणास्थान मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब
(फोटो-अनुप पाटील)


D.B.PATIL
Ex.M.P-KOLABA/RAIGAD
Ex.M.L.A-URAN-PANVEL
AGRI SAMAJ


प्रकल्पग्रस्तांकडून होणाऱ्या उधळपट्टीबाबत चिंता
प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळवून देण्याचे आंदोलन यशस्वी करणाऱ्या आपल्या लाडक्या आगरी वाघाने प्रकल्पग्रस्तांच्या उधळपट्टीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वारसांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे संकेत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहे.

साडेबारा टक्के
राज्य सरकारने नवी मुंबईच्या उभारणीसाठी सिडकोमार्फत बेलापूरपट्टी आणि उरण-पनवेल तालुक्यातील हजारो एकर जमीन संपादित केली होती. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक जमीन आगरी समाजातील शेतकऱ्यांची होती. भूसंपादानामुळेभातशेतीबरोबरच जोडव्यवसायही नष्ट झाल्याने येथील शेतकरी व त्यांचे वारस आता आपल्याच परिसरात दुसऱ्यांचे गुलाम होत आहेत. सरकारने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु केल्यापासून येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. माजी खासदार, प्रकल्पग्रस्त आगरी जनतेचे एकमेव नेते मा.श्री. दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली १९८४ मध्ये झालेल्या लढ्याने शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी दिली आहे. १९९० मध्ये महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेतला.

सुरुवात उधळपट्टीची
या निर्णयामुळे मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीलगत असणऱ्या विकसित जमिनींना मुंबईच्या खालोखाल किंबहुना अनेक ठिकाणी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जमिनींच्या बरोबरीने भाव मिळू लागला आहे. समाजात यापूर्वी लग्न व सार्वजनिक समारंभातून अवास्तव खर्च न करण्याच्या प्रथा होत्या, लग्नाच्या हळदी समारंभावर अनेक गावात बंदी होती; तर अनेक गावात सामुहिक लग्नसमारंभाची प्रथा होती. २० वर्षात या प्रथा आणि परंपरा मोडीत निघाल्या आहेत. अनेकांच्या हाती लाखो रुपये येऊ लागल्याने उधळपट्टी सुरु झाली आहे. आगरी समाजात लग्नात हुंडा देण्याची प्रथा नसली तरी आपल्याकडील श्रीमंती दाखविण्यासाठी मौल्यवान दागिने व वस्तू देण्याची प्रथा नव्याने रुजू लागली आहे. साडेबारा टक्केच्या आलेल्या पैशाची होणारी अवास्तव उधळण ही परिसरातील चर्चेचा विषय बनला आहे. ही उधळपट्टी चिंतेचा विषय असल्याने शेतकऱ्यांना करोडपती बनविणारे लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांनी समाजाच्या उन्नती व विकासाचे स्वप्न पाहिले असून आपल्या आयुष्याच्या उतरत्या काळातही समाजाचा विकास होण्यासाठी त्यांनी या उधळणीसंदर्भात जनजागृती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगरी वाघाची डरकाळी आगरी छाव्यांसाठी प्रेरणादायक
पाटील साहेबांनी जनजागृती करण्याची व्यक्त केलेली इच्छा आम्हां आगरी बाणाच्या सर्व आगरी छाव्यांना प्रेरणादायक आहे. पाटील साहेबांच्या जनजागृती मोहिमेत आगरी बाणाचे सर्व आगरी छावे नेहमीच सामील आहेत. आगरी समाज एक झाला पाहिजे, आगरी समाज सुधारला पाहिजे, आगरी समाजातील सर्व वाईट रुढी-परंपरा, आगरी समाजात सध्या सुरु असलेल्या उधळणी विरुध्द आम्ही आगरी बाणाचे नव्या दमाचे, नव्या युगाचे आगरी छावे मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांबरोबर आहोत. पाटील साहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही आगरी बाणाचे आगरी छावे निघालो आहोत आगरी एकतेचा झेंडा घेऊन..................आगरी समाज सुधारण्यासाठी.............आगरी समाज एक करण्यासाठी................!!

"आगरी बाणाच्या, आगरी छाव्यांनी,
हाती झेंडा घेतलाय आगरी एकतेचा, दि.बा.पाटील साहेबांच्या विचारांचा"

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

सोमवार, २ मे, २०११

सिडको विरुध्द नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचा लढा


सिडको प्रकल्पग्रस्तांची नेरूळमध्ये सभा
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडकोने हातोडा मारल्यामुळे नवी मुंबईत सर्वत्र असंतोष खदखदत आहे. गावागावांतील प्रकल्पग्रस्तांनी एकजुटीने याविरोधात उभे ठाकण्याचा निर्धार केला आहे. नेरूळ येथेही याबाबत सभा झाली. यावेळी अनेकांनी टीकेची झोड उठवली. प्रकल्पग्रस्तांचा रक्तावर सिडको नावाचा ढेकूण पोट भरत आहे, अशी जहाल टीका यावेळी करण्यात आली.

कृती समितीची स्थापना
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्यांबाबत एकजुटीने आवाज उठविण्यासाठी 'नवी मुंबई शेतकरी प्रकल्पग्रस्त कृती समिती'ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सिडकोविरोधात प्रखर लढा देण्यात येणार आहे. नेरूळच्या सेक्टर २ येथील शिरवणे विद्यालयात झालेल्या या सभेला नेरूळ, करावे, शिरवणे, कोपरखैरणेसह नवी मुंबईतील १७ गावांचे प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रश्नांवर चर्चा
साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप,एम.आय.डी.सी. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, गरजेपोटी बांधलेली घरे, गावठाण विस्तार, प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक सुविधा, अशा अनेक प्रश्नांबाबत अनेकांनी आपली मते ठामपणे मांडली. डॉ.राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करून अनेक प्रश्नांवर आवाज उठविण्याचे ठरविण्यात आले आहे.

स्थानिक नेते चोर
मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर वसविताना सिडकोने आमची वडिलोपार्जित जमीन घेतली आणि आमच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका करून या वेळी अनेकांनी स्थानिक आमदार, खासदार, महापौर व नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविला. आमच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा चालविला असताना ही नेतेमंडळी कोणत्या बिलात शेपूट घालून बसली होती, असा राग यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडणुकीच्या वेळी हात जोडत मतांचा जोगवा मागणार्यानी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे होते, पण हे नेते चोर आहेत, ते येणार नाहीत.

सिडकोचा हुकुमशाही कारभार
सिडको साडेबारा टक्के भूखंडाऐवजी प्रत्यक्षात केवळ साडेनऊ टक्के भूखंड देते, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. १९७० नंतर गावठाण विस्तारच झालेला नाही. गावठाणाजवळील २०० मीटरची सीमारेषा ठरवलेली नाही. सिडकोच्या या चुका प्रकल्पग्रस्तांच्या माथी मारल्या जात आहेत, असा आरोप अनेकांनी केला.

सिडकोवर हातोडा
डॉ.राजेश पाटील यांनीही यावेळी घणाघाती भाषण केले. ते म्हणाले, की प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर यापुढे कारवाई कराल तर सगळी गावे पेटून उठतील आणि सिडकोवर हल्ल्बोल करतील. आमच्या वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांच्या शैक्षणिक संस्थाना दिल्या जातात आणि आमच्याच मुलांना तिथे प्रवेश मिळत नाही. त्यासाठी लाखो रुपये त्यांच्या घशात घालावे लागतात. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्थांसाठी फक्त ११, तर राजकारणातील पवार, देशमुख,कदम,मेघे यांच्यासाठी ४३३ भूखंड दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांना डिवचाल तर ते तुम्हांला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

रविवार, १ मे, २०११

स्त्री म्हणजे पायपुसणी?????????


आमच्या आगरी बाणा संघटनेच्या मुलगी वाचवा मोहिमेचा हा एक छोटासा प्रयत्न.

मी पुरुष आहे कारण.........
मी पुरुष आहे कारण मला एखाद्या तरुण मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याची ताकद आणि हक्क आहे. मी पुरुष आहे कारण माझं प्रेम नाकारणाऱ्या एखाद्या मुलीच्या अंगावर एसिड फेकण्याची माझी हिम्मत आहे. शेवटी, मी पुरुष आहे कारण मी भारतात जन्म घेतलाय, हा देश जिथे जन्मापासून मला पुरुषी अधिकार गाजविण्याचा परवाना मिळालाय. आणि या देशात माझा जन्म होऊन दिला कारण मी पुरुष आहे............

स्त्री सुरक्षितता
आत्ताच झालेल्या जनगणनेची आकडेवारी मागे आपण पाहिलीच आहे. मोठमोठ्या शहरात ही आकडेवारी ८६५-८७० च्या दरम्यान आहे. जर मोठमोठ्या शहरात ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागाची कल्पना न केलेली उत्तम. स्त्री-पुरुष समानतेच्या बाता मारायच्या पण काम काहीच नाही करायचं वर्षानुवर्षे हेच चाललय. आत्ता ते ५०% आरक्षणाचा भूत राजकारण्यांच्या बायकांसाठी आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. बलाक्तार, भ्रूणहत्या, लैगिक अत्याचार...........अश्या वाईट बातम्या वाचल्याशिवाय आपला एक दिवस तरी गेलाय का????? आपण कधीतरी अशी बातमी वाचतो की, अमुक-अमुक राज्य, अमुक-अमुक शहर स्त्रियांसाठी धोकादायक होत आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, भारतातील कोणताही राज्यच काय तर एखाद्या गावातील गल्ली सुद्धा स्त्रीवर्गासाठी सुरक्षित नाही.

अनुभव आणि वास्तव
एका डॉक्टरच्या मुलाखतीचा काही भाग सांगत आहे,"मी एकदम स्तब्ध उभा राहतो जेव्हा एखादा पालक आपल्या मुलीला मोजण्याचं विसरतो. मी त्यांना जेव्हा असा प्रश्न करतो की, तुम्हांला मुले किती? जेव्हा माझ्या रुग्णालयात एखादी स्त्री मुलीला जन्म देते तेव्हा तीच्या माहेरच्या-सासरच्या मंडळींची तोंडे पाहण्यासारखी होतात. कुटुंबातील अनेक स्त्रिया दुखःद स्थितीत बोलत असतात की, बिचारीला मुलगी झाली...........!! मला तरी अस वाटतंय की, जगाच्या पाठीवर आपलाच देश असा असेल जिथे मुलीला जन्म देऊन देखील तिची आई खुश होत नसेल."

जन्माची लढाई
भारतीय स्रियांच्या जगण्याची लढाई आईच्या गर्भाशयातून सुरु होते. जर तीचे भाग्य खूप बलवान असतील तर ती जन्म घेते, जन्मानंतरच्या लढाईला तोंड देण्यासाठी. मी पुरावे देऊन सांगू शकतो की, एखाद्या मुलीची छेड काढणे हे एखाद्या मोबईलचा कनेक्शन घेण्यापेक्ष्या खूप सोप आहे. आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण या घटना आपण दररोज पाहत असतोच. आपण दुर्गामातेची पूजा करतो, सीतेला पुज्यनीय मानतो, पण आपण मुलींचा आदर करण्याचं सोयीस्कररीत्या विसरतो. ही चूक, आपल्या नवीन पिढीची नाही. याची पाळेमुळे आपल्या जुन्या भारतीय समाजातच आहेत. पुरुषसत्ताक पद्धतीचा स्वीकार करताना काही अनिष्ट गोष्टी त्याच्यात घुसविण्यात आल्या आहेत, त्याचा आपण विचार देखील करत नाहीत.

बदल हवा आहे
आपल्या देशातील लक्ष्मी केवळ मंदिरातच उरली आहे का? आपल्या देशातील सरस्वती केवळ पुस्तकी ज्ञानात उरली आहे का? भारतीय मातीतल्या दुर्गेला न्याय कधी मिळणार?बदल तेव्हाच घडू शकतील जेव्हा तुम्हा आम्हांला बदल घडविण्याची इच्छा असेल. आपल्या समाजाने देखील काही गोष्टीचं भान राखण्याची गरज आहे. सर्वानी हे समजण्याची गरज आहे की, आपणा सर्वाना आई,आजी,काकी,बायको,बहिण अश्या सर्वजणी आहेत. जर स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली नाही तर पुढची शिकार कदाचित तुमच्या घरातील एखादी स्त्री असू शकते.............

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

सर्व आगरी बाणा सदस्यांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद!! जय महाराष्ट्र!!
आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.