आमोद पाटील-आगरी बाणा: 2014

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, २१ डिसेंबर, २०१४

सिडको म्हणजे खोटेपणा...!!


सिडको म्हणजे खोटेपणा...!!

1. सिडकोचे अधिकारी आणि स्थानिक दलाल पुढारी मोठमोठ्या जाहिराती करत विमानतळ प्रकल्पग्रस्त जनतेला सिडको 22.5% विकसित भूखंड देणार असल्याच्या बाता मारत होती. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त जनतेच्या ताब्यात फक्त 15.75% विकसित भूखंड मिळणार आहेत.(7% जमीन पायाभूत सुविधा बोलून वजा करणार). जर सिडकोला हाच रडीचा डाव खेळायचा होता तर प्रकल्पग्रस्त जनतेला 30% भूखंड द्यायला हवे होते आणि त्यातून पायाभूत सुविधा वजा करून 22.5% भूखंड देणे गरजेचे होते. सदरील भूखंडास सिडको 2 FSI देणार. FSI चा फायदा सरळ-सरळ बिल्डर लोकांना भेटतो. सामान्य जनतेला याचा काही फायदा होत नाही. देण्यात येणारे भूखंड 60 वर्षे कालावधी करता भाडेपट्टीने देण्यात येणार आहेत. प्रकल्पग्रस्त जनतेची मालकीची जमीन घ्यायची आणि त्याला मात्र भाडेपट्टीने जमीन देऊन भूमिपुत्र म्हणून हद्दपार करायचे.

2. पुनर्वसन करताना सिडको स्वतः घर बांधून देणार नाही, त्याबदल्यात 1000/-₹ प्र.चौ.फुट घर बांधनी करण्यासाठी देणार. वरून ही रक्कम सिडको पायाच्या तीनपट जागा देणार आहे त्या जागेला लागु नाही. फक्त घराचा जितका पाया असेल तितकीच जमीन विचारात घेणार. 50% रक्कम अगोदर आणि 50% रक्कम बांधकाम झाल्यावर. एकापेक्षा जास्तबांधकाम असतील तर एकच बांधकाम पात्र.!!

3.भविष्यातील पिढीचा सिडकोचा दृष्टिकोण पाहा...सिडको जिल्हा परिषदेच्या शाळा बांधणार...!!
म्हणजे सिडको राजकीय शिक्षणसम्राट यांच्यासाठी सदरील जमिनीत पायघड्या घालणार...त्यांना 1 रुपया वार्षिक दराने 999 वर्षाच्या भाडेकरारावर जमीनी देणार. जर हेच उद्योग करण्यापेक्षा सिडकोने स्वताची पहिली ते बारावी शिक्षण देणारी शाळा तिथे उभे करावी. आणि इंगिनीयरिंग, मेडिकल कॉलेजची उभारणी करून प्रकल्पग्रस्त जनतेच्या पाल्यास तिथे मोफत प्रवेश देण्यात यावा.

4. एक विकसित आणि अत्याधुनिक शहर सिडको प्रकल्पग्रस्त जनतेसाठी निर्माण करू शकते. पण, सिदकोची ती नियत कधीही नव्हती. सिडकोला फक्त श्रीमंत लोकांची व्यवस्था करायची आहे. सिडकोला सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त जनतेसोबत काहीही लेनेदेने नाही. जमीनी दिल्यात आता बोम्बला हाच सिडकोचा न्याय असतो...!!
आता विमानतळ प्रकल्पग्रस्त जनतेने भीतिपोटी संमतीपत्रे देऊन स्वतःला अडचणीत आणले आहे. कायद्यात एक तरतूद होती की, कोणालाही आमिष दाखवून, शारीरिक ईजा पोहोचवुन जमीन संपादित करता येणार नाही. जर तश्या प्रकारे जमीन संपादित झाली असती तर तो व्यवहार मान्य झाला नसता.

5.सिडको माती भरणी वैगेरे कामे प्रकल्पग्रस्त जनतेला देणार, पण ही कामे विशिष्ट लोकांना मिळणार. मोजकेच राजकीय लोक यावर डल्ला मारणार. आज 80 कोटींची भरावाची कामे चालू आहेत. कोण करतोय ही भरावाची कामे?

6.विमानतळ प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभा राहणार आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित जनतेला विमानतळ नोकरीत आरक्षण नाही. त्यामुळे नोकरी मागायचा हक्क प्रकल्पग्रस्त जनतेला नाही. अशी तरतूद सिडकोने करुन ठेवलिय. आज मुख्य समस्या रोजगार आहे. पण, सिडको फक्त जमीनी घेणार, रोजगार देणार नाही.

विकास जर स्थानिक भूमिपुत्रांची ओळख संपवनारा असेल तर हा विकास भकास आहे. या विकासात फक्त श्रीमंतांचे हित लक्षात घेतले जातेय आणि गरीबांची गळचेपी होते. त्यामुळे सिडको म्हणजेच मुठभर लोकांचे हित साधन्यासाठी गावेच्या गावे उठवने, त्यांना योग्य मोबदला न देणे, त्यांच्या नोकरीची सोय न करने, भावी पिढीसाठी उच्च शिक्षणाची सोय न करने अश्या प्रकारे भूमिपुत्राला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

एक होता भूमिपुत्र आगरी...(Bhumiputra Agri Samaj)


एक होता भूमिपुत्र आगरी...!!

आगरी म्हणजे आगर पिकवणारा, मग त्यात मिठागर आणि शेती दोन्ही आले. गेल्या २० वर्षांपर्यंत तरी आगरी समाजासाठी हीच व्याख्या अतिशय सुसंगत होती. पण आज...

"पण आज" इतकचं लिहून का थांबलो याची कल्पना आपल्या सर्वांना लगेच आलीच असेल. गेल्या २० वर्षांतील शहरीकरणाचा वेग थक्क करणारा आहे. याच वेगात आपल्या परिसरात देखील अनेक प्रकल्प आले. उरण,पनवेल,नवी मुंबई परिसरात सुरुवातीला सिडको आली, जे.एन.पी.टी आली. ठाणे परिसरात औद्योगिक वसाहती आल्या. प्रकल्प येणार म्हणजे त्यासाठी जमिनी लागणार. आणि जमिनी तर आगरी समाजाच्या जवळच होत्या. सुरवातीला आगरी समाज आपल्या जमिनीला आपली आई मानत होता. शासनाने जेव्हा या सर्व प्रकल्पांसाठी जमिनीची मागणी केली तेव्हा आपल्या आगरी समाजाने त्याला प्रखर विरोध केला, शासनाच्या अन्यायकारक भुसंपादनाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील यांनी प्रखर विरोध केला. प्रचंड मोठे आंदोलन १६ जानेवारी १९८४ उरण तालुक्यातील जासई या गावी झाले. स्थानिक आगरी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. घरातील सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रचंड विरोध पाहून प्रशासन बिथरले आणि आंदोलन करणाऱ्या जनतेवर गोळीबार केला. १६ आणि १७ जानेवारी १९८४ रोजी अनुक्रमे जासई आणि पागोटे या उरण तालुक्यातील गावात झालेल्या गोळीबारात ५ आगरी शेतकरी शहीद झाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाला परंतु अजूनही स्थानिक जनता प्रशासनाच्या अत्याचाराला बळी पडत होती.

या आंदोलनाचा परिणाम असा झाला की नवी मुंबईमधील शेतकरी वर्गाला दि.बा.पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने १२.५% भूखंड योजनेच्या स्वरूपात याचा फायदा झाला, त्यात देखील पूर्ण १२.५% न देता काही कापून दिले जात आहेत, ही शासनाची धूर्त खेळी स्थानिक जनतेला मान्य नाही. परंतु ज्या उरण भागात हे आंदोलन केले गेले तो भाग मात्र अजूनही शासनाच्या लाल फितींच्या निर्णयात अडकला गेला आहे. अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत येथील आगरी प्रकल्पग्रस्त आहेत. हाच मुद्दा ठाणे परिसरातील औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या त्या आगरी बहुल भागात आहे. वसाहती स्थापन करताना शासनाने जे रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन येथील स्थानिक आगरी जनतेला दिले गेले ते आजतागायत पूर्ण झालेले नाही, परंतु इतर उरलेल्या शेतजमिनी नापिक करण्याचे काम मात्र येथील औद्योगिक वसाहतीनी केले.

अश्या रीतीने ठाणे, रायगड येथील बहुतेक आगरी जनतेची जमीन अगोदर शासनाने प्रकल्प उभारणी करता अन्यायकारक स्वरूपात संपादित केली आणि त्यानंतर शहरीकरणाच्या वेगात येथील आगरी गावांचा श्वास गुदमरायला सुरुवात झाली. प्रकल्प सुरु झाले, रोजगार निर्माण झाला आणि त्या रोजगारावर हक्क सांगायला बाहेरचा माणुस आला. बाहेरचा माणुस आला, त्याने पैसे कमावले आणि आता इथेच कायमचे निवासी होऊ असा विचार त्याने केला. त्यासाठी त्याने घर बघायला सुरुवात केली. परिसर नवीन होता, त्यामुळे त्याच्या आर्थिक मर्यादेत त्याला घर मिळत होत, त्यासाठी सिडको, म्हाडा स्वस्त घरांची निर्मिती करत होती. या स्वस्त घराचा लाभ त्याने उठवला. आता त्याने त्याच्या गावात ही माहिती दिली. अशी माहिती पसरत राहिली, अजुन लोक इकडे येत गेले, घर घेवुन रहायला गेले आणि आपला परिसर आपल्या नकळत कधी भरुन गेला तेच आपल्याला समजल नाही.

आपल्या परिसरात ही "बाहेरची भरती" होत असताना आपला त्या त्या परिसरातला आगरी समाज काय करत होता...!! आपला त्या त्या परिसरातील समाज मोजके अपवाद सोडले तर जमीनी गेल्या, त्याचे आलेले पैसे मोजत होता. बाहेरच्या लोकान सोबतच स्थानिक नेत्यांनी मौका साधला, जागोजागी बार सुरु केले. बारच्या आडून डान्सबार, लेडीज बार सुरु झाले. आणि त्याच्या आतून त्याच बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरु झाला. स्थानिक पुढारी, प्रशासन यांना वेळच्या वेळी हफ्ता पोहोचत होता आणि इतका पैसा पहिल्यांदाच हाती आलेल्या लोकांना बाई आणि बाटलीचे वेड लागले. घरी बायकांच्या अंगावर तोल्यांची स्पर्धा सुरु झाली होती. लग्न आणि हळद जोरातच झाली पाहिजे यावर जोर येवू लागला. डीजे आले, २००-३०० किलो मटनाचे डोंगर सजायला लागले, त्या डोंगरातुन दारुची नदी वाहायला लागली. आणि नदीत लहान-थोर सर्वच पोहायला लागले. जिथे मुलींच्या बापाला पैसे आले असतील तिथे मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. मुलीचा बाप देखील काहीही न बोलता मुलीला "आहेर" देऊ लागला. अगोदरच उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांची कमी आणि त्यात आलेली ही पैश्याची मस्ती, त्यामुळे शिक्षण अर्धवट सुटायला सुरुवात झाली. मात्र आलेल्या पैशांच्या गाड्या घेउन त्याच गाड्या महाविद्यालयांच्या बाहेर घिरट्या घालू लागल्या.

हळूहळू आलेला पैसा संपत गेला आणि पैसा कसा संपला याच्या सुरस कथा सर्व गावांत सांगितल्या जाऊ लागल्या. जिथे जमीन गेली त्याच जमिनीवर रखवालदार म्हणून उभे रहायची वेळ आली. कारण उद्योग क्षेत्रात आवश्यक ते शिक्षण ना शासनाने दिले ना पैसे असताना त्याची गरज वाटली. दागिने गेले, गाड्या गेल्या, इंग्लिश वरून देशी वर वेळ आली. जमिनीच्या व्यवहारात भाऊ बहिणीला फसवू लागले, बहिणी देखील कोर्टात हक्क सांगू लागल्या. नात्यांना नाती भिडू लागली. पोरांच्या भीतीने म्हातारे झालेले बाप हे सर्व असह्य होऊन आत्महत्या करू लागले. परंतु जेव्हा गावांच्या बाजूला बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्यातील नवीन लोक बघितली तेव्हा लक्षात येण्यास सुरुवात झाली की, "बाजूची नगरी झाली सोन्याची पुन यो आगरी मात्र उपाशी...!!"

गाव बदलत गेले, गावात राजकारण आले. लोक स्थानिक पुढारी सांगेल तसे वागू लागली. गावातील एकही सण २-३ तीन पोलिस केस झाल्याशिवाय संपन्न होत नव्हता. दहीहंडीच्या दिवशी सकाळी हंडी फुटत होती आणि रात्री डोकी. जत्रेच्या दिवशी लहान पोर दिवसभर आपटीबार फोडत होते आणि रात्री मोठी माणसे घरांची कौले...!!

आता गेल्या ८-१० वर्षांपासून पैसा नाही, रोजगार नाही त्यामुळे गावातील दलालांची डोकी जास्त चालायला लागली. गावात ५०-५० ची चर्चा घडू लागली. गावकीच्या जमिनीवर दलालांचे, नेत्यांचे आणि बिल्डर जमातीचे डोळे लागले. आमचेच काही लोक बिल्डर झाले, मोठमोठी स्वप्ने दाखवून इतर लोकाना या धंद्यात आकर्षित करू लागले. गावातली उरली-सुरली सर्व जमीन आता ५०-५० च्या धंद्यात "मोकळी" होऊ लागलीय कायमचीच...

पण, जशी परिस्थिति दिसत होती त्यात आता फरक पडू लागलाय. युवावर्ग इंटरनेटच्या माध्यमातून आपले हक्क, आपले कायदे याबाबतीत जागरूक होऊ लागलाय. नवीन जमीन अधिग्रहण कायदा-२०१३ नुसार भविष्यातील भुसंपादन व्हावे ही मागणी त्याच गोष्टीचा एक प्रतिक आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी आगरी लोकसंख्या असलेल्या गावातील जमीन जाणार आहे. तेथील युवा वर्गाने सिडको प्रशासनाच्या खोट्या आश्वासनाना अथवा राजकीय स्वार्थासाठी स्वतःचे इमान विकणारे स्थानिक दलाल राजकीय पुढारी यांच्या भूलथापाना बळी न पडता आपल्या हक्कांसाठी एकजूट होऊन आपल्या अस्तित्वाचा लढा चालू ठेवला आहे. भविष्यासाठी चालू असलेल्या भुमिपुत्रांच्या या लढ्यास नेहमीच पाठिंबा राहील. शेवटी आपली आई, आपली जमीन आणि आपला माणुस ह्यासाठीच आपला भूमिपुत्र लढत असतो. ३००-४०० वर्षांपुर्वीचा इतिहास वाचून छाती पुढे करण्यापेक्षा आपण गेल्या २० वर्षातला स्वतःच्या डोळ्यासमोर घडलेला आपला भूतकाळ बघायला हवा. कारण ३००-४०० वर्षांचा इतिहास खरा की खोटा हे बघायला आपण नव्हतो. आणि तो जो काही इतिहास असेल तो कोणीतरी लिहिलेलाच असेल, त्यात लिहाणारा व्यक्ति कशावरून स्वतःला हवा तितकाच भाग टाकणार नाही..!! त्यामुळे तमाम भूमिपुत्राना आवाहन आहे की, गेल्या २०-३० वर्षाच्या भूतकाळात झालेल्या चूका वर्तमानात सुधारून आणि आपण सर्व मिळून भविष्यातील नव्या युगाची उभारणी करण्यास सुरुवात करुया.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

ब्लॉग:

फेसबुक पेज:

गुरुवार, २६ जून, २०१४

आगरी कविता-पुढाऱ्याचा पोऱ्या(pudhari)पुढाऱ्याचा पोऱ्या


होलीचे दिवशी जनमला,
येके पुढाऱ्याचा पोऱ्या

जनमला आनी
बोंबाट भरला
उठला, बसला
न डायरेक्ट जावून बापासचे खुर्चीव बसला

या पावून डाक्टर घाबारला
बोलला-आर्, या त नवल झाला
याचे समोर त आज देवपुन येरा झाला...!!
याला पकरा, आरवा करा
न दुद पाजा

दुदाच्या बाता आयकून
पोऱ्या उभा रायला
जवल उभे नर्सचा
त्यानी हात पकरला
न बोलला-
आज हाय होली
कया हाय बसंती
बसंती नाय त नाय
तू कवा कामाला येशील...
मवाची पयले धारची
मना गलासान पाजशील

पुढारी न डाक्टर
सांगून सांगून दमला
पुन त्यानी जोर-जोरान वरडत
आक्खा हास्पिटल डोक्याव झेतला
आनी गावाला लागला शिलाचे जवानीचा गाना

त्याचे लानपनीच
त्याचे आंगान
शिलाची जवानी नाचाला लागली
मून्नी बदनाम नको होवाला म्हणून
नर्सबाय गुत्त्यावरशी पयले धारची लाच झेवून आयली

पोऱ्याला गावठी पिताना पावून
पुढाऱ्याची टरकली
आनी बोलला-
र बाबा तू हायीस कोन
न कनाला करतस माझ्याव अत्याचार
आवरा आयकून तो पोऱ्या बोलला-
र साल्या मी तुझीच हाय अमानत
आनी नाव हाय भष्टाचार...!!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, १३ जून, २०१४

आगरी कविता-जोराजोरा

सकाल सकालचे भेटला चा
सोफ्याव बसून म्हात्रे
बायकोकर पावून हासला

हात पकरून बायकोचा
म्हात्रे बोलला
अय माजे रानी
आज गाव चल गानी
आज हाय रयवार
चल जोरान उरवू बार

आशेल्या बाता आयकून
म्हात्रेची बायको तापली
बोलली नवऱ्याला
बसून सोफ्याव,
आमलन तुमच कुल
आत मदे येवा
आठवर्याचा काम पावून जावा

आज तुमचा रयवार
माजा जीव चाललाय कामान
पोरांची अभ्यासा झेवाची
रायलेल कपर धुवाच
आठवर्याची भाजी आनाची

आता तय्यार व्हा
भेटलव आयतच
तवर्या त्या कोलब्या सोला
लसून सोला
आन मार्केटान जावून भाजी आना

बायकोचा आवरा सगला आयकून पुन
आज म्हात्रेची गारी जोमान होती
म्हात्रे बोलला आज सोर या सगला
काम त रोजचाच हाय
आज जोरीन जावू चल फिराला
थेटरान पिच्चर पावाला

आज म्हात्रेची गारी जोमान होती
बायको त्याची खुश होती
कॅलेंडर मदे पायला
त आज ते दोघांचे लग्नाची तारीख होती...

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.