आमोद पाटील-आगरी बाणा: मार्च 2013

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, २१ मार्च, २०१३

आगरी कथा-झंगाट (Story In Agri Bhasha)


आगरी कथा-झंगाट

दा-पंदरा दिस झाल असतीन सगले बेलपारे गावान येकुच इशय चालू व्हता. यो इशय चालू होवाला पुन मोटा कारण व्हता. गावांचे शीता ववणीसचा पोऱ्या जेले दोन मयन गावान दिसला नाय. यक बोलतय त्याचा मडर झाला त बीजा बोलतय त्याचा बायेर येके भैय्यानी बरब लफरा व्हता, त आजून दुसरा कोन बोलतय उदारीचे मूल नाम्यानी जीव दिला आसल. ज्याला ज्या-ज्या सुचतय तसा त्यो-त्यो त्याची डोकी चालवतय. सगल्याना निसता ऊत आला व्हता. त्या बोलतान ना "बोलनारेचा तोंड धरवल, पुन पादनार्याचा पाद नाय धरवाचा"

बेलपारे गावांचे सगले घरान यो येकुच इशय, नाम्या कया जेला, नाम्याचा कय झाला. यके नाम्यानी सगल्याना येरा बनवला व्हता. तसा यो नाम्या नय बोलाला आवली मनुष. कवा कय करल याचा कय भरोसा नाय. रोज राचचे तीन-चार गलासा पिले शिवाय याला झोप येवाची नाय, आता मी कनचे गलासांची बात करतय त्या तुमाला समाजलाच आसल. याचा बापूस त्याचे लान पनीच वर जेला. तवा पासून शीता ववनीसनी याला सांबालला. नवरा वर जेल्या पासून सगले पावसाल्यान शीता ववनीसनी यकटीनी सगली शेता सांबालली, उनाल्यान काश्या लावल्या. आवरे कष्टामुल आज घरन पैसा आसाचा. तेमुलच आवरा सगला चंगला चालू आसताना नाम्या जेला कया, त्याला कय झाला यो इशय गावान जोरान चालू व्हता.

त आसा यो नाम्या, गावान जवरी-जवरी लफरी होतान त्यान याचा नय आला त लोकाना कयतरी येगलाच वाटत. जया-जया लफरा तया-तया नाम्या. नाम्याला त्याचे पक्षाचा लय मोटा पुलका. गावान जवा-जवा निवरनुका लागतान तवा-तवा नाम्या दुसरे पार्टीचे लोकाना हायरान करून सोरतो. रातचे दारू पिऊन ते लोकांचे घराव दगरा फेक, शिवा दे, मारामाऱ्या कर आस सगल उदयोग करण्यान याची सगली निवरनुक जात. गावांचे याचे सरके सगले लोकांचा यो पुडारी. तेमुल आवरे सगले कामान याचे हातान पैसा कवा पूर नाय. दुनयेची सगली उदारी याचे नावाव. खानार-पिनार सगलीजना पुना पैसा भराचे टायमाला नाम्या शेट पूर.

आवरे सगले कामान नाम्याला समाजला त्याचे मामासचे कोपरोली गावान ये मयन्यान निवरनुका हायीत. नाम्याचा मामुस पुन नाम्याचे पक्षाचा. नाम्यानी कोपरोलीला जावाचा इचार केला, निवरनुका हायीत तेमुल दा-पंदरा दिस पायजे तवरा खावा-पिवाला भेटल, पैशेव भेटतीन, सगली मजा आसल.  घरन आशीला सांगला दा-पंदरा दिस बायेर फिराला जातय. जर आशीला सांगला आसता मामासचे कर चाललोय त तिनी जावून दिला नसता. तीलाव मायती हाय ते गावान निवरनुका हायीत, यो तखर जावून पुन नसता झंगाट करल.

धन्या शेट नाम्याचा मामुस, कोपरोली गावान त्याचा येकट्याचा गावठीचा धंदा. धन्या शेटचा गावठीचा धंदा मनजे ज्याम भारी काम. दिसाला गुत्याव हाजार-दीर हाजार गलासांचा धंदा, न त्याचे कतीतरी जास्त माल रोज खुजे न पोटल भरून बायेर जात व्हता. मामसचा धंदा आवरे जोरान व्हता क मामासला मुताला पुन येल नवता मिल. भाचास घरा आलाय पावून मामुस खुश झाला. मामासला वाटला भाचास घरा आलाय त त्याचे तीन-चार दिस धंदा देवून पुन्याला जावून यव. मामासची पुन्याचे एके बाबाव रास भक्ती. घरन, धंद्याव सगलेकर ते बाबाचा ये आशेल मोट-मोट फोटू. मामुस खुशी-खुशीन पुन्याला जेला. मामासला तरी काय मायती पूर कय व्हनार हाय. त्याला तरी कय मायती नाम्या गल्ल्याव मनजे गल्ला गललाच मनून.

झालाव तसाच, नाम्याचे सारकी कोपरोली गावांशी सात-आठ पोरा न बरब पयले धारची निकली जलती दारू. आदीच तो नाम्या न वरशी पिवाला पयले धारची दारू...मंग काय बोलालाच नको...हालूहालू गावांच्या कोंबर्या, न खलाटीनच्या वालाच्या शेंगा गायब व्हवाला लागल्या. गावांचे लोकाइ त्याव सन केला. न मंग निवरनुकीचे चार-पाच दिस आगोदर राती नाम्यानी न दुसरे सात-आठ पोराई रमनशेटचे घराव दगरा मारून घराची सगली कौला फोरून टाकली, न तेच दगरांशी दोन-चार दगरा रमनशेटचे डोकरे आशीचे न त्याचे पोरीचे लागली. यो रमनशेट दुसरे पार्टीचा मानुस व्हता मनून नाम्यानी त्याचे घराची कौला फोरली. नाम्याला वाटला आता त्याचे पार्टीची लोका त्याला लय मान देतीन, पैसा देतीन.

पुन झाला सगला भलताच, निवरनुका जेल्या चुलीन आसा बोलून सगली गावांची लोका येक झाली. त्याला कारण पुन तसाच व्हता, रमनशेट डोकरी दवाखान्यान शिरीयस व्हती. नय बोलला तरी रमनशेटनी गावाला जवा-जवा मदद लागली तवा-तवा मदद केली व्हती. सगले कोपरोलीचे लोकाइ नाम्या न त्याचे बरब होत ते सगले लोकाना पकरल, मरस्तोव मारल. गावकी जमली, गावांचा शाम नाई बोलवला, न ये सगल्याचं चमनगोट केलं न गांडीव उपटी मारत-मारत गावचे बायेर कारल.

आज नाम्याचे घराचे समोर सगली डोकरी लोका, बायका-बापये, पोरी-पोरा सगलीजना जमली व्हती....इ लोकांची रास गर्दी...गर्दी क झायली असा तुमी इचारताव मनून मी सांगतय....तिरुपतीशी जावून आल्याव गावजेवान नको का घालाला....!!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

आगरी भयकथा: रातीचा खेल (Haunted Story)


आगरी भयकथा:  रातीचा खेल

जुनी डोकरी लोका पयलेपासून सांगतान, आमावसेचे राती जवा सगलीकर कालोख असत, तवा सगली भूता, हारली, मुंजे त्यांची नेमीची रावाची ठिकाना सोरून माणसांचे दुनयेन येतान. आमावसेचे रातीला त्या सगल्यांची ताकत एक होवून जात आन त्या सगल्यांचे ताकतीसमोर माणसाची ताकत कमी व्हत जाते...

रातीचे कालोखान जवा मित्रान बरब फिराला जातून तवा कवरी मजा असत ना. मजा कराची, गानी बोलाची, खावा-पिवाचा असा सगला करताना रस्ता कवा संपून जात समजच नय. पन परत्येक येली या असाच होईल असा नाय. कवा-कवा असा कय व्हत की, कोनालाच समज नाय या कय व्हतय...

समीर न त्याचे मित्रान बरब पन ते राती असाच कयतरी झाला. आजूनशेर त्याचे मनांशी ती घटना बाजूला व्हत नवती. कालेज चे दिवसान मित्रांचे बरब फिराला जावाला सगले पोरांना आवरत. समीर आनी त्याचे मित्रांनी पुन असाच एक प्लान केला की पुरचे शनवार आन रयवारी मंग्याचे गावाला जावाचा. मंग्याचा गाव कोकनान. घराचे बाजूला नारलाची मोठमोठी झारा हायीत, ५ मिनटाव दर्या हाय आनी आता आंबा-काजूचा सीजन पन चालू झालाय. असा सगला इचार करुनुच मंग्याचे गावाला जावाचा इचार फिक्स झाला.

शुकरवारी सांचे ५ वाजता सगलीजना पनवेल वरशी निगाली. कर्नाल्याची खिंड येईस्तोवर गारीन जोरजोरान गप्पा चालू झाल्या. सगलीजना मजेन व्हती. रात व्हत जेली तसा एकेकजन झोपाला लागला. गारी पुन आता रत्नागिरीला माग सोरून सिंधुदुर्गचे रोडला लागली व्हती.

आरदे रातीला गारी एके सुनसान रस्त्याव बंद परली. डायवरनी शाटकट माराचे नादान गारी हायवे सोरून सुनसान रोडवर नेली व्हती. मंग्याला सोरून दुसरे कोनाला ते रोडची कायपून मायती नवती. आजूबाजूचे गावांची लोका ते सगले भागाला भुताचा वारा म्हनुनुच बोलतान. पन ये टायमाला मंग्या त डाराडूर व्हता, त्याला तरी कसा समजाचा डायवरनी काय उद्योग केलन ते.

गारी बंद परल्यावर गारींशी ३-४ लोका डायवरची मदद कराला गारींशी खाली उतारली. गारींशी खाली उतरल्यावर बायेर एगलाच वास येवाला लागला. असा बोलतान की, कायपन कारन नसताना असा वास येवाला लागला की समजाचा वाईट आत्मा आपले आजूबाजूलाच हाय. गारीन बसलेले समीर आनी त्याचे मित्रांना बायेर काय चाललाय या समजत नवता. तवर्यान सगल्यांची नजर गारीचे टायरवर जेली. ते टायर वर रगत लागला व्हता, आजून जुरुसा खाली बगल्यावर टायरचे खाली काली माजर मेलीय या सगल्यांना समाजला.

मंग्याची त जाम टरकली व्हती, काली माजर गारीचे खाली आलीय ह्या एक लय मोठा आपशकुन हाय असा तो सगल्याना सांगाला लागला. पुन दुसरे मित्राई त्याचे बोलन्याला हासावर नेला. सगले जनाना ती फालतू गोष्ट वाटाला लागली. गारींची सगलीजना खाली उतारली. तवर्यान समीर ची नजर एके झाराखाली जेली, एक बाय ते झाराखाली बसली व्हती. लाम्बशी तवरा काय क्लिअर दिसत नवता. पुन त्याला वाटला की, कोनतरी त्याला हात हालवून बोलवतय. सगलीजना डायवरचे जवल जावून त्याला गारी चालू करासाठीच सल्ल देत व्हत. समीर एकटाच तिकर जावाला लागला. जैसा-जैसा समीर तीचे जवल जावाला लागला, तैसा-तैसा तो वास आजून जास्तीच येवाला लागला. त्यानी लांबशीस ते बायला इचारला आया कला बसलीस? त्याव ती कय बोलली नाय, नुसतीच जोर-जोरान हात हालवाला लागली. आता समीरला पुन भिवाला लागला, पुन त्याचे मनान परत इचार आला भूत-बीत त कय नसत ये जगान. लोका त चांदावरशी पुन जावुंशी परत आयलीन मंग आपून कला भिवाचा. ज ते बायला मदद पायजेल असल् त असा इचार करत समीर ते बाय जवल जात. तिनी साधच कपर घातल व्हत आन केस पुन अंबारा बांदला व्हता. आवरा सगला ठीक असताना त्याची नजर तीचे जललेले हाता कर जात. तीच जललेले हात बघुंशी समीर मनांशी पुरा भिला. ती बाय कय तरी बोलाला लागली आन समीर त पुरा कापाला लागला. बगाला जेला त तशी ती बाय साधीच दिसत व्हती, पुन तिचा आवाज मातूर लय डेंजर. तिचा आशेला आवाज आयकून चड्ड्या तयाच वल्या व्हतीन. समीर आता लयूच भिला आन गारीचे कर पला साठी पावला उचलाला लागला, पुन कनचा काय. त्याच पाय त जस एके जागी आरकून परल्यासारख झाल व्हत. समीर जोरजोरान कापत व्हता. ती बाय बोलली, मनाव तुजे बरब झेवून चल, मना आया नय रावाचा. त्या आयकून समीर आजून भिला. तो मंग्याला हाका माराचा परयत्न कराला लागला, पुन कसला काय त्याचे घशांशी आवाज बायेर परत नवता. तवर्यान त्याला आवाज आयकाला आला, समीर चल बस चालू झालीय. आंगांचा सगला जोर करून समीर धावाचा परयत्न कराला लागला, पुन येवेली ते बाय नी त्याच केस पकरल. तरीपून परत सगला जोर कारून तो धावाला लागला. समीर पलत-पलत गारी जवल पोचला पुन त्यानी डोक्याव हात लावल्याव त्याला समाजला की, त्याचे डोक्यावच थोरस केस ते बायनी वरल व्हत, ते तीचे हातान जेल. त्यानी डायवरला तनशी लवकर-लवकर गारी पलवाला सांगली. समीर गारींशी माग बगाला लागला तशी ती बाय जोर जोरान वरडाला लागली, मनाव तुजे बरब झेवून चल...मनाव तुजे बरब झेवून चल...

गारीन समीर नी ती गोष्ट सगल्याना सांगली. पुन कोनीच त्याचाव भरोसा ठेवला नय. तो बाता मारतय असाच सगल्याना वाटत व्हता.

पुन काय जानो का ती बाय आता समीरला सगलेकर दिसत. तो जया-जया जात तया-तया ती त्याचे मंगारी सावली सारखी दिसत आसत. समीर भिलेला असत, पुन कोणाला कय सांग नय. त्याला मायती हाय कोनीपून त्याचे बोलण्याव इश्वास ठेवाचा नाय. डोक्यावच उपटलेल केस आता जैस-जैस उगवाला लागलन तैशी-तैशी ती बाय आजून समीर चे मंगारी-मंगारी जास्तीच फिराला लागलीय. समीर पुन आता आमावसे चे राती उठून जोर जोरान कोकलाला लागलाय. घरांचे लोकाई समीरला डाक्टरचे कर नेला व्हता, डाक्टर बोलला सगला नार्मल हाय, त्याला कय नय झाला. आता ते डाक्टरला तरी काय मायती समीरचे बरब ते राती काय झाला व्हता त्या....

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

© Photo Copyrights: Hrishikesh Thakur


जागतिक महिला दिन विशेष:स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (The Life Of An Indian Women)

१९०८ साली न्यूयॉर्क येथील महिलांनी न्याय, हक्क, सुरक्षितता आणि समान संधी यांची मागणी केली आणि त्यांना त्यांचा हक्क मिळाला. पण, आज २१ व्या शतकात देखील भारतातील महिलांना त्यांचा हक्क नाकारला जातोय.

८ मार्च १८५७ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, या आंदोलनाची तीव्रता इतकी अधिक होती की, जागतिक स्तरावर देखील याचे पडसाद उमटू लागले. १९०८ साली न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर महिलांनी त्यांच्या "कामाच्या जागी सुरक्षितता आणि चांगली वागणूक" या दोन प्रमुख मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने निदर्शने केली.

त्या घटनेनंतरच्या १५६ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही आपल्या भारतात काही अपवाद वगळता त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. कामाच्या ठिकाणी पुरुषांना अधिक मानधन, अधिक मानसन्मान, बढतीमध्ये पुरुषांचा अधिक विचार अश्या गोष्टी अजूनही दिसून येतात. २०१३-१४ च्या वित्तीय अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री श्री.पी.चिदंबरम यांनी खास महिलांसाठी स्वतंत्र बैंकेची घोषणा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करून करून सरकारच्या दृष्टीने सुरक्षित पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्ली बलात्कार घटनेनंतर महिलांबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा घडताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखिल भारतातील विविध राज्यातून महिलांच्या विटंबनेच्या घटना समोर येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार २०१३ या वर्षातील पहिल्या दोन महिन्यात जवळपास १८२ बलात्काराच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी आहे. ही फक्त नोंद केलेल्या घटनांची आकडेवारी आहे. दुर्गम भागात अश्या किती कळ्या दररोज निस्तेज होत असतील याचा विचार करवत नाही. दिल्ली येथे मिडीयाच्या क्रेन्स उपलब्ध असतात त्यामुळे त्या घटनेला जवळपास १०-१२ दिवस २४*७ करून सबसे तेज करून टाकले जाते. महाराष्ट्रात भंडारा येथे घडलेल्या घटनेची १५ दिवसापर्यंत कोणत्याही हिंदी अथवा इंग्लिश मिडीयाने नोंद घेण्याचे कष्ट घेतले नव्हते. जेव्हा लोकसभेत हा प्रश्न मांडला गेला तेव्हाच त्यांचे लक्ष महाराष्ट्रातील घटनेकडे वेधले गेले.

एका बाजूला शहरी भागातील महिलांचा स्त्रियांच्या समान हक्कांसाठी, सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रस्थापित पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध लढा चालू आहे. भारत सरकारचा अंतरिक्ष कार्यक्रम चालू आहे, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. सरकार लढाऊ विमानांसाठी हजारो करोड रुपयांची तरतूद करते, जी अनेक वेळा दुर्घटनाग्रस्त होतात. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील महिला योग्य शिक्षण, दैनंदिन गरजा, आवश्यक स्वच्छता आणि पानी या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत.

महिला आणि मुलींसाठी एक करियर नेहमीच तयारीत असते. त्या संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही मोबदल्याशिवाय पानी भरणे, जेवण बनवणे आणि धुणीभांडी करने ह्यात व्यतीत करतात. शालेय शिक्षण हे तर नावालाच दिले जाते, अनेक भागात शाळा हे प्रकरण लग्नाच्या अगोदर वेळ घालविण्यासाठी केलेली तरतूद इतपतच असते. या प्रकाराला आजच्या काळात अपवाद निर्माण झालेले आहेत. शाळा मागे पडली असली तरीदेखील कॉलेजनंतर लग्न हे देखील याचं प्रकारात मोडतं.

ग्रामीण भागातील बँका आणि ग्रामीण भागाला कर्जपुरवठा हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील धनिकांना SUV वैगेरे खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मुख्य प्रवाहातील बँका महिलांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज अनेक सहकारी बँका पुढे येत आहेत. ठोक विक्रेते, घरगुती नोकर, शेतमजूर अश्या असंघटीत आणि अपरिचित क्षेत्रात ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत आणि ह्याच क्षेत्राला सर्वात जास्त पैशाची गरज असते.

सातारा जिल्ह्यांमध्ये, चेतना गाला सिन्हा यांच्या माणदेशी महिला बँकेच्या आज अनेक ठिकाणी शाखा निर्माण झालेल्या आहेत, ग्रामीण महिला सक्षमीकरण ह्या एकमेव उद्देशाने माणदेशी महिला बँकेची स्थापना करण्यात आली होती. चेतना गाला सिन्हा सांगतात की, "महिलांच्या बँकेला परवानगी मिळणे की काही सोपी गोष्ट नव्हती, आणि प्रामुख्याने त्यातील सदस्य अशिक्षित असताना तर परवानगी मिळवणे कठीण गोष्ट होती. बँकेची नोंदणी करण्यास नकार देण्यात आला. परंतु महिलांनी हार मानली नाही. त्यांनी तेथील व्यवस्थापनातील वाणिज्य शाखेतील पदवीधराना गणकयंत्र(कैलकुलेटर) शिवाय अवघड स्वरूपातील व्याजाची रक्कम काढण्यास सांगितली. परंतु कोणालाही ती रक्कम काढणे जमले नाही याउलट महिलांनी ती रक्कम सहजरीत्या काढली. बँकेला परवानगी देण्यात आली आणि महिलांनी ३ रुपयांच्या अधिक रक्कम ठेव म्हणून ठेवली. अश्या प्रकारे बँक चालविणे नक्कीच सोपे नव्हते."

ग्रामीण भागातील शाळांना सोयीसुविधांचा अभाव आहे, तेथील शिक्षक देखील जबाबदारीने वागताना दिसून येत नाहीत, शाळांच्या इमारती ह्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत, शाळेमध्ये स्वच्छतागृह असणे ही आश्चर्याची गोष्ट असते. घरकाम आणि भावंडांची देखभाल करने या कारणांमुळे मुलींचे शाळेमधून गळती होण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना दिवसाचा भत्ता पुरुषांच्या मनाने खुपच कमी मिळतो आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थावर होतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामधील अनेक आदिवासी जमातीपैकी एक असलेल्या कोरकू जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण देशाच्या इतर भागातील तुलनेत खूप अधिक आहे. पैशाच्या अभावी या महिलांना प्रसुती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतावर कामावर जावे लागते. प्रसूतीनंतर मिळणारी रजा वैगेरे गोष्टी यांच्यासाठी अलिशान मौजमजा या प्रकारात मोडतात. जर त्या महिलांनी काम केलं नाही तर त्या भुकेने व्याकुळ होवून मरून जातील. त्यांची मुले कुपोषित आणि कमी वजनाची जन्माला येतात. यापैकी अनेकजण वर्षभर देखील जगत नाही.

दिल्ली बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या अनेकांना इरोम शर्मिला किंवा सोनी सोरी किंवा यांच्यासारख्या शेकडो महिलांविषयी काहीच माहिती नसते. काश्मीर, उत्तर पूर्वेकडील राज्ये, मावोवादी, नक्षलवादी विभागातील महिलांना सुरक्षा यंत्रणांकडून त्रास सहन करावा लागतो. पण सुरक्षा यंत्रणांच्या धाकामुळे अशा घटना देशासमोर येत नाहीत.

जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात तेव्हा, चकचकीत मिडिया आणि जाहिरात क्षेत्र महिलांमध्ये असलेल्या भीतीचे खाद्य करून स्वतःच्या झोळ्या भरण्याचे उद्योग करत असते. टीव्हीवर कशा प्रकारच्या जाहिराती देत असतात हे आपणा सर्वांना माहिती आहेच. महिलांना शोभेची वस्तू म्हणून वापर घेतला जातो. गरज असो-नसो शोभेच्या बाहुल्या ह्या हव्यातच असा या क्षेत्राचा समज आहे. डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये भपकेबाजपणा.

या भपकेबाज दुनियेत, पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरूद्ध, सामाजिक सुरक्षिततेसाठी, चांगल्या मानधनासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याची वाट बिकट आहे. तरुण पिढी आश्वासक असली तरी, महिलांमधील असुरक्षिततेची भावना सर्व ठिकाणी वाढू लागली आहे. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, लोकलमध्ये, बसमध्ये कधी काय होईल याची कोणीही खात्री देत नाही. सुरक्षा व्यवस्था आश्वासक नाही. गोरे असणे, सडपातळ असणे किंवा तरुण असणे हा  आजच्या गुन्हेगारी आणि निर्दयी जगतात अपराध आहे, अशाच गोष्टी आजूबाजूला घडत आहेत.

अजून काही काळानंतर पेपर स्प्रे सारखे प्रकार महिलांच्या पर्समध्ये सहज दिसू शकतील. पण ह्या प्रकारांची गरजच का भासतेय याचा यंत्रणा कधी विचार करणार आहेत. न्यूयॉर्क येथे साहसी आंदोलन करणाऱ्या महिला आजची परिस्थिती पाहून जरूर निराश असतील. ८ मार्च ह्या एका दिवशी स्त्रियांचे गोडवे गाणारा समाज, वर्षातील ३६४ दिवस मात्र स्त्रियांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक छळ करण्यास मोकळा..........

आपलाच,
आमोद पाटील.