आमोद पाटील-आगरी बाणा: सप्टेंबर 2012

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

प्रकल्पग्रस्त आगरी शेतकऱ्यांचा एकच वाघ (AGRI TIGER)






प्रकल्पग्रस्त आगरी शेतकऱ्यांचा एकच वाघ....लोकनेते श्री.दि.बा.पाटील साहेब.....


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी रचलेला इतिहास संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला स्फुर्ती देतो. शिवरायांच्या रायगड जिल्ह्याला एक आगळावेगळा सोनेरी इतिहास आहे. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वाभिमानाच्या लढाईचा वसा येथील भूमीपुत्र कायम जपत असल्याची बाब जेएनपीटी आंदोलनातून दिसून आली.

शिवरायांचे शौर्य आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून स्फुर्ती घेऊन झालेला जेएनपीटीचा लढा नक्कीच इतिहासाच्या पानावर लिहिला जाण्याजोगा आहे. आपल्या न्यायहक्कासाठी येथील भूमीपुत्र असलेल्या शेतक-‍यांनी उभारलेले अनेक लढे हे रायगड जिल्ह्याच्या इतिहासाची शान वाढविणारे आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्काची लढाई पेटली ती जासईच्या आंदोलनाने. तिथे हौतात्म्य पत्करलेल्या पाच भूमीपुत्रांच्या बलिदानाने. या सर्व लढ्यांची मुहूर्तमेढ रोवली ती लोकनेते दि.बा.पाटील यांनी. आयुष्याची ८० वर्षे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी दिली. या सर्वांना लाल सलाम...!

जेएनपीटी आंदोलनातून महाराष्ट्र आणि देशानेदेखील काही शिकण्यासारखे आहे. जेएनपीटी लढाई मागील २८ वर्षांपासून सुरू आहे. मुळात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्काची लढाई १९७१-७२ सालीच सुरू झाली. सरकारने नवी मुंबई वसविण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हापासूनच या प्रश्‍नाचा जन्म झाला. सरकारने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जमिनी संपादित केल्या.नवी मुंबईत येणार्‍या ठाणे जिल्ह्याच्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तसा सुटलेला आहे. मात्र, नवी मुंबईत मोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुक्याकडे सरकार तितकेसे का गंभीर नाही? हा मोठा प्रश्‍न आहे. यामुळेच पनवेल आणि उरण तालुक्यात मोठी आंदोलने पेटली. त्यापैकीच एक महत्त्वाचे आंदोलन म्हणजे जेएनपीटीतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होय.

नामदेव शंकर घरत, रघुनाथ अर्जुन ठाकूर, केशव महादेव पाटील, महादेव हिरा पाटील, कमलाकर कृष्णा पाटील यांचे हौतात्म्य आणि दि.बा पाटील यांचा त्याग यातून आंदोलकांमध्ये स्फुर्ती आली होती. प्रकल्पग्रस्तांचा हा लढा सामाजिक न्यायहक्कासाठी होता. २८ वर्षापूर्वी दि.बा.पाटील यांनी सुरू केलेले जेएनपीटी आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. ५० वर्षात रायगड जिल्ह्यातील ऐक्य कोणी मोडू शकले नाही. शेतकर्‍यांची ऐक्याची ताकद समाजाला नक्कीच संदेश देणारा आहे. या लढाईचे सर्वेसर्वा असलेले दिबा यांचे शरीर थकलेले आहे. मात्र, आजदेखील त्यांचे मन वाघाचे आहे.

ही बाब भूमीपुत्रांच्या आणि एकूणच समाजातील तरुण पिढीला आदर्शवत ठरणारी आहे. जेएनपीटीची अखेरची लढाई म्हणून दिबांच्या नेतृत्वाखाली जिंकली.