आमोद पाटील-आगरी बाणा: फेब्रुवारी 2012

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२

वैलेंटाइन डे (break up ke baad)



मन्या खुष झाला होता कारण वैलेंटाइन डे जवळ येणार होता. आपण तिला प्रपोझ मारणार आणि ती आपल्याला हो बोलणार या कल्पनेने तो सुखावला होता. गेले काही दिवस तो मस्त मुड मध्ये होता. तसा मन्या बारावी पास पण त्यापुढे शिक्षणाचा खास करून इंग्रजीची भितीने त्याने शिक्षणाला रामराम केला होता. तेव्हापासून कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून नाक्यावर उभे राहणे, सिगारेट फुंकणे असे आयुष्याचा वेळ वाया घालवण्याचे प्रकार तो करू लागला होता. अचानक एके दिवशी त्याला मनी दिसली. लहानपणी तिला पाहिलेली. तिच्यात झालेला बदल पाहून मन्या प्रेमात पडला मनी मन्याच्याचा मोहल्यात राहणारी , रोज सकाळी उठून कॊलेजात जाणारी. तर मन्या रोज सकाळी उठून नाक्यावर उभा राहणारा. दिवसांमागून दिवस जात होते. मन्या मनीला पाहत होता, मनी मन्याला पाहत होती. पण साला मन्याची तिला विचारण्याची हिंम्मत होती. आता काय करावे हा प्रश्न मन्याला सतत सतावत होता ? मग त्याला त्याच्या
नाकेकरी मित्राने सल्ला दिला "अरे मन्या, वैलेंटाइन डे जवळ येतोय. विचारून टाक, हो बोलेलच. यावेळेला कोणीही नाही म्हणत नाही, बिंनधास्त जा. लाईन पक्कीच...." मित्राच्या या बोलण्याने मन्या सुखावला होता, त्याला स्वप्ने पडु लागली होती, आता मनी हो बोलणार, मग आपण सुधारणार, नाका वैगेरे सगळे सोडणार, शिकणार काम करणार. अशा आपल्या आयुष्याच्या कल्पना त्याने रंगवल्या होत्या.

इथे "वैलेंटाइन डे" जवळ येत होता. ग्रीटींग्ज, भेटवस्तूंनी दुकाने सजली होती. मन्याला वाटले आपणही भेटकार्ड आणि छानशी वस्तू मनीला देऊ. वेलेंटाईन डे आला. मन्याने भेटकार्ड आणि वस्तूसाठी आईकडून पैसे घेतले होते. इथे मनी कॊलेजात जायला निघालेली असते. मन्या कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून परफ्युम मारून मनीच्या समोर येतो. "थांब मनी", ती थांबते. इथे मन्या मनातल्या मनात घाबरलेला .
"बोल, काय काम आहे रे ?" मनी म्हणते. मन्या थरथरल्या हातांनी तिला भेटकार्ड भेटवस्तू देतो. आणि म्हणतो,"मला तु खुप आवडतेस , माझे तुझ्यावर प्रेम आहे." इथे मनी भडकते,"तुझी हिंम्मतच कशी झाली, मला विचारायची." असे म्हणुन मन्याच्या श्रीमुखात भडकावते. "चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन." असे म्हणुन ती निघून जाते. इथे मन्या रडकुंडीला आलेला असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. तो जाम भडकतो. त्याचे मित्र त्याचं सांत्वन करत असतात.

याच सुमारास काही ठिकाणी वैलेंटाइन डे ला विरोध होत असल्याची बातमी मन्याच्या कानावर येते . अचानक मन्या पलटतो. ही आपली परंपरा नाही. पाश्चात्य आहे असे तो म्हणू लागतो. नाक्यावरच्या मुलांना घेऊन उठतो. विरोध झालाच पाहीजे, वैलेंटाइन डे हाणुन पाडलाच पाहिजे अशा घोषणा तो देऊ लागतो. ज्या दुकानातून त्याने मनीसाठी भेटवस्तू घेतली असते त्याच दुकानात जाऊन तोडफोड करतो. इथे टीव्हीवर मन्या झळकू लागतो. वैलेंटाइन डे ला विरोध केल्याने त्याला प्रसिध्दी मिळते. ज्या पार्टीने विरोध केला त्याचे वरिष्ट नेतृत्व मन्याची दखल घेते. आपल्या पक्षाची लाज राखल्याबद्द्ल त्याला आगामी पालिका निवड्णूकीत नगरसेवक पदाचे तिकीट देते .मन्या निवडून आलेला असतो. तो यापुढे दरवर्षी वैलेंटाइन डे ला विरोध करणार असतो. आता मनीला मन्याच्या कानफडात मारल्याच्या पश्चाताप होत असतो. पण त्या बिच्चारीला काय महित असते की, आपल्यामुळेच मन्या नावारुपाला आला (इथे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे तंतोतंत लागू पडलेले आहे) मन्याला आमदारकीचे तिकीट मिळणार असते. गल्लीतल्या मन्या आता साहेब झालेला असतो...............

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

प्रश्न आगरी समाजाच्या अस्तित्वाचा (AGRI SAMAJ)


प्रश्न आगरी समाजाच्या अस्तित्वाचा
आगरी. मुंबईचे मूळ मालक. त्यांची अफाट शेतजमीन. विस्तीर्ण मिठागरे. पण, शहरीकरण वाढत वाढत औद्योगिकीकरण झाले नि बघता बघता सारे कसे होत्याचे नव्हते झाले. पैसा खुळखुळला. दारी गाडय़ा आल्या. इंधनाचा धुरळा उडाला. हळदी समारंभ, साखरपुडे झोकात झाले. लग्नाच्या खर्चाची शेखी मिरवली गेली. पण, जमीनजुमला विकून हाती आलेल्या पैशाचे नियोजन करायचे असते हे कुणी शिकवलेच नाही वा शिकून घेण्याचीही कधी गरज भासली नाही. कालौघात हाती आलेला पैसा कुठे गेला हेच कळले नाही. गरिबी वाढली. घरे ओसाड पडली. बघता बघता शेतजमीन गेली. लाडके बैल गेले. श्रमाला प्रतिष्ठा देणारे नांगर थांबले. खिल्लारी बैलांच्या गाडीची चाके कर्जाच्या गाळात रुतली. आता आगरी गावात फेरफटका मारला तर भयावह चित्र दिसतेय. नांगर कोनाडय़ात पडलेत, बैलगाडीची चाखे निखळलीत. जिथे भाताची कोठारे होती, तिथली भात भरडणारी जातीच बंद पडलीत. दगडाच्या खाणी संपल्यात नि डोंगरही भुईसपाट झालेत. काही जमीनमालक आपल्याच जमिनीवर दुर्दैवाने बजावताहेत वॉचमनची डय़ुटी. एकूणच काय भातशेती-मिठागरांचे वैभवी आगर ज्यांच्या ताब्यात आहेत, ते आगरी बांधवच बनलेत भूमिहीन. दयनीय अवस्था. मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगडमधील गावांवर बिल्डर, बडे उद्योजक यांची वक्रदृष्टी पडू लागलीय. एकेकाळचे आगरी समाजाला तारणारे नेते गेले नि आता मारणारे नेते आलेत. काळ तर मोठा कठीण आलाय. आगरी शेती, मिठागरे जात आहेत… हळूहळू आगरबोलीचा जन्मदाता माझा आगरी माणूसही!

आगरी समाजाच्या हक्काची हिरवीगार भातशेती, पुनवेच्या चंदेरी रात्री चमचमणारी मिठागरे यांच्या पूर्वीच्या खाणाखुणा आता लुप्त होत आहेत. बडय़ा कंपन्यांच्या आयोडिनयुक्त मीठनिर्मितीमुळे मिठागरे संपुष्टात येत आहेत. शेतीही फायद्याची ठरत नसल्याने त्याकडेही समाजाने पाठ फिरवली आहे. आगरी समाजाच्या मोक्याच्या जमिनींचे लचके तोडण्यास सुरुवात झाली आहे. कुठे सेझ येतेय… कुठे विमानतळ. फिक्सिंग करण्यात सर्वच नेते आघाडीवर आहेत. बिल्डर्स, बडे कारखानदार, पुढारी, सरकारी बाबू, राज्यकर्ते सारेच मॅनेजर! पैशाच्या वाहत्या गंगेत सारेच हात धुऊन घेत आहेत. गाववाले बसलेत चिडीचूप. पण, शिवेच्या बाहेरचे होताहेत मुजोर, शिरजोर!!

होय, एक काळ होता, आगरी बांधवांचा. त्यांच्या नेत्यांचा. समाजाचा. नाना पाटील (अलिबाग), नारायण नागू पाटील (पोयनाड), माजी खासदार श्री. दि.बा. पाटील(जासई-उरण/पनवेल), ऍड. दत्ता पाटील (अलिबाग) तु.ह. वाजेकर (उरण), सोनूभाऊ बसवंत (वसई), कॉम्रेड जी. एल. पाटील, ग.ल. पाटील (मुंबई), यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्यहक्काचे लढे उभारले. पण, आता काळ बदलला. नेते बदलले. एकेकाळचा बलाढय़ समाज नेत्यांपासून पार दुरावला. पूर्वी आगरी बांधवांना सावकारांनी लुटले, आता नेते ,बिल्डर, उद्योगपती लुटताहेत. एकेकाळचा चरीचा संप आगरी समाजाने सात वर्षे लढविला. `कसेल त्याची जमीन’ हा कायदा समाजाच्याच आंदोलनातून साकारलाय. ५ हुतात्मे झालेल्या जासई येथील साडेबारा टक्केचे आंदोलन आगरी समाजातल्या भ्रष्ट राजकीय नेत्यांनी संपवल्यातच जमा आहे. पण, आता इतिहास कुणालाय हवाय? सार्यांचे लक्ष भूगोलाकडे लागलेय!

आगरी समाजाची मुंबईत गावे होती. घरे होती. शेतजमीन होती. गावात आगरी बांधवांचे वजन होते. तथापि, आता मुंबईच्या नकाशावर, समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात, सत्तेत त्यांचे स्थान अगदी नगण्य बनलेय. पुढील पंचवीस वर्षांत नवी मुंबईच्याही पुढे `तिसरी मुंबई’ वसविण्याची स्वप्ने `वीकेण्ड’वाल्या गर्भश्रीमंतांसाठी खुणावू लागली आहेत. भविष्यात भीती आहे. काय, तर रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण, अलिबाग हे तालुके आणि वडखळ, वाशी, शहाबाज, पोयनाड, पसी ही गावे उद्ध्वस्त होण्याची. वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे आगरी समाजाचे उरलेसुरले अस्तित्व आणि संस्कृतीही नष्ट होऊन भावी पिढीचे भवितव्य अंधःकारमय होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच आता सर्व समाजाने एकत्र आल्याशिवाय आणि आपला राजकीय दबावगट निर्माण केल्याशिवाय आगरी समाजाचा विकास होणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील खासदार आणि नगरसेवक !
मुंबईत आगरी समाजाचे खासदार आहेत संजय पाटील, तर नगरसेवक आहेत विद्या भोईर, रघुनाथ थवई, शीतल म्हात्रे आणि भालचंद्र म्हात्रे. गावाकडे काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच आगरी समाज राजकीयदृष्टय़ा विभागला गेल्याचे दिसून येत आहे. मुंबईत एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 30 टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे.


आगरी बाणा !
तांदळाचे वडे, तांदळाच्या भाकर्या, तांदळाची बोरं, आंबोळ्या, पुरणपोळी, मोदक, घावन, त्याचबरोबर सुक्या माशाचे कालवण. जिताडा, खवली, वरस, चिमणी, निवटय़ा, कोलंब्या, चिंबोर्या, सुक्या जवळ्याची चटणी म्हटलं की आपली खवय्येगिरी जागी होते आणि मग आपसूकच आपली पावले आगर गावाकडे वळतात. आगरी हा मूलतः कष्टकरी, शेतीनिष्ठ समाज. दगडी शिल्पकलेतही माहीर. भातशेती, मिठागरे हेच त्यांचे विश्व आणि जीवनही. आगोटं (पावसाळ्याची सुरुवात), झोलाला (मासे पकडायला), बगला (मासे पकडण्याचे आयुध),  मुरुकली (काळी कोळंबी), इरा (ओढा), कायजून (कोणास ठावे), मंगोला (मातीचा चुला) आखंदा (लहान खडी) अशी आगर बोली बोलणारे ते आगरी.
म्हणजे आगारात राहणारे.
म्हणजे गर्व नसणारे.
री म्हणजे रीतभात जोपासणारे.
म्हणजेच आगरी… मूळ मुंबईकर.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, येथील मूळ समाज म्हणजे आगरी समाज. भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा म्हणजे आगर. त्यावरूनच आगरी हा शब्द प्रचलित झाल्याचे मानण्यात येत आहे. आडनावाविषयी काही आख्यायिका सांगितल्या जात आहेत. आरमाराचा प्रमुख म्हणजे तांडेल, पालखी वाहून नेणारे भोईर, माहुताचे काम करणारे महापात्र म्हणजे म्हात्रे, मठाचा प्रमुख तो मढवी, देवळात पूर्जाअर्चा करणारे भगत, शेतात भात भरडणारे ते घरत. गावचे जमीनदार म्हणजे ठाकूर, गावचे राज्यकर्ते पाटील अशी अनेक उदाहरणे दिली जात आहेत.

आगरी समाजाच्या पोटजाती !
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाडय़ा, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. 1911 मध्ये ठाणे जिल्ह्यात 96 हजार 548 तर पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 711 एवढी लोकसंख्या होती. आता किती आहे याचा अंदाजच केलेला बरा. आगरी समाजाच्या तीन पोटजाती. शुद्ध आगरी, दास आगरी आणि वरप आगरी. शुद्ध आगरी म्हणजे शुद्ध मीठ पिकविण्याची कला अवगत असलेले मूळ आगरी. दास आगरी प्रामुख्याने पालघर तालुक्यात आढळतात. तिथे त्यांना कराडे आगरीही म्हणतात. पण, ते मूळ आगरीच. आधी ख्रिस्त धर्म स्वीकारून पुन्हा आगरी झालेले म्हणजे वरप आगरी. याशिवाय, ढोलवादन करणारे, नृत्य करणारे ढोल आगरी. ढोर मेहनत घेणारे ते ढोर आगरी. कमी मेहनत घेणारे ते सोन आगरी. अलिबाग तालुक्यात जे आगरी राहतात, त्यांना खारकी, खारपाटे म्हणतात. मीठ पिकविणार्या आगरी लोकांना खारवा म्हणतात. बारा, चौदा, बावन्न पाटील!



मुंबईतील आगरी गावे
आगरी समाजाची वस्ती एकेकाळी मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन) शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ आणि बीएआरसी प्रकल्पामुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.


आगरी गावातील परंपरा
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात.

पाटलांनी गाजविली विधानसभा!
माजी खासदार दि.बा. पाटील, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ऍड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते. पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे. आगरी ज्ञाती परिषद (1917), आगरी शिक्षण संस्था (1934), आगरी सेवा संघ, वरळी (1937), अखिल आगरी समाज परिषद यांच्यासह अनेक लहान-मोठय़ा संस्था मुंबईत कार्यरत आहेत. आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपरी-अलिबाग) यांना जातो. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर आता चौफेर आक्रमण सुरू  झाले आहे. विविध संक्रमणातून जात असलेल्या समाजासाठी हा कसोटीचा काळ आहे, एवढे मात्र निश्चित!

सौजन्य:
नवशक्ती