आमोद पाटील-आगरी बाणा: रक्तरंजित होळी.......!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १५ मार्च, २०११

रक्तरंजित होळी.......!!

रक्तरंजित होळी.......!!

पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईच्या घणसोलीत दंगल झाली . स्थानिक आणि उपरे असा अनादी संघर्ष होता त्यामागे . पण तिथे स्थानिकही मराठी होते आणि उपरेही मराठी . त्या दंगलीकडे पाच वर्षांनी वळून पाहताना .... ................. ठाणे - वाशी रस्त्यावरून जाताना घणसोली स्टेशन लागतं . मग सुरू होतात , सिडकोचा टिळा भाळी लावलेल्या टिपिकल नव्या मुंबईच्या एकसाची बिल्डिंगी . पुढचा बसस्टॉप घणसोली गावाचा . हायवेखालून जाणाऱ्या रस्त्यावरून दोनेक मिनिटं चाललं की गाव सुरू होतं . आगरी - कोळ्यांचं गाव म्हटल्यावर ज्या गोष्टी डोळ्यासमोर येतात , तसं मात्र काही दिसत नाही . अपवाद काही एकमजली रंगीत बंगल्यांचा . पटेल , नाकोडा , गुप्ता अशा नावांची दुकानं असलेला लांबलचक कॉस्मोपॉलिटीकरण झालेला रस्ता आणि चौक . चौकात अधूनमधून येणारी एनएमटीची बस . बाकी रिक्षांची रांग . मोठं होर्डिंग . त्यावर दोन फोटो . हुतात्मा जगदीश पाटील आणि हुतात्मा संतोष गुप्ता . १६ मार्च हा हुतात्म्यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम . होळी आली की हे होर्डिंग लागतं .
पाच वर्षांपूवीर्ची होळी घणसोली कशी काय विसरू शकेल ? १५ मार्च २००६ . धुळवडीचा दिवस . चौकातच गावदेवीचं देऊळ आहे . त्यादिशेने पाचेक मिनिटांवर कॉलनी सुरू होते . कॉलनी म्हणजे सिडको वसाहत . धुळवडीच्या रंगबाजीचा जोर ओसरत आला होता . गावातलं एक टोळकं याच रस्त्याने दुपारी रंग लावण्यासाठी कॉलनीत पोहोचलं . कॉलनी म्हणजे सिडको वसाहत . कॉलनी बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर ओळखली जाणारी सिम्प्लेक्स कॉलनी आणि त्यात मिसळलेली घरोंदा कॉलनी , आजुबाजूच्या आणखी काही खासगी बिल्डरांच्या इमारती , याची गोळाबेरीज होऊन बनते ती माथाडी कॉलनी . गावातल्या टोळक्याने कॉलनीत शिरून एका मुलीला रंग लावला . कॉलनीवाले म्हणतात त्यांनी छेड काढली . कॉलनीत वार्ता पसरली . कॉलनीवाले खवळले . बोंबाबोंब झाली . ते गावात आले . पोरांना शोधलं . पोरं गायब होती . तिथे बोंबाबोंब केली . मग गाववाले कॉलनीत गेले . थोडी तोडफोड झाली . हे पोलिसांना माहीत होतं . होळीचा नेहमीचा प्रकार समजून ते गाफिल राहिले . पण प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही . रात्री कॉलनीतल्या दोन - तीनशे जणांचा मॉब गावात आला . पोरांना पुन्हा शोधलं . पोरं तेव्हाही गायब होती . राग खदखदत होता . शिवीगाळ , घोषणाबाजी झाली . गाड्या फोडल्या , घरांच्या काचा फोडल्या , दुकानं तोडली , एवढंच नाही तर फेरीवाल्यांच्या हातगाड्याही सोडल्या नाहीत .
घरात भाऊबंदकीने गळे पकडतील , शेजा - यांशी कोर्टकज्जे करतील पण कोणी गावाच्या विरोधात आले , तर आम्ही एकशेपाच . आगरी - कोळ्यांच्या गावांचं हे चिरपरिचित वागणं . इथे तर गावाचं नाक कापलं गेलं होतं . काल राहायला आलेल्या कॉलनीवाल्यांनी गावावर हल्ला करणं , कसं सहन होणार होतं ? झालं . सकाळीच गाववाले कॉलनीच्या शीवेवर जमा झाले . कॉलनीच्या शेजारी मैदानावर माथाडींची सभाटाइप बैठक सुरू होती . तिथल्या भाषणांची भाषा रांगडी होती . जशास तसं उत्तर देऊ , सत्ता आपली आहे , वगैरे . दोन्हीकडे वातावरण तापलं . तुफान दगडफेक सुरू झाली . दोन्हीकडचा जमाव वीस पंचवीस हजारांचा होता . पोलिसांकडे त्यांना आवरण्याची ताकद नव्हतीच . मुळात पोलिसांना घटनेचं गांभीर्यच समजलं नव्हतं . दहा वाजताच्या सुमारास पोलिसांची कुमकही आली पण तेव्हा खूप उशीर झाला होता . जमाव अनावर झाला होता . गाववाल्यांनी कॉलनीवाल्यांच्या सभेवर हल्ला केला . काठ्या - लाठ्या तयार होत्या . माथाडींचे तिथे असलेले नेते नरेंद पाटील यांच्यावरच थेट हल्ला केला . पाटील जखमी झाले पण वाचले . त्यांचे बॉडीगार्ड ज्ञानदेव बोरगडे यांचा बळी पडला . बोरगडे हे पाटलांचे फक्त बॉडीगार्ड नव्हते , तर गाववाले आणि अगदी जवळचे कार्यकतेर्ही होते . पोलिस दगड झेलत होते . त्यांच्या गाड्यांची मोडतोड सुरू झाली होती . पोलीस म्हणतात , आम्ही विनंती केली . पण जमाव ऐकत नव्हता . पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या . शेवटी गोळीबार केला . गोळीबारात घणसोलीतले किमान पंधराजण जखमी झाले . कोणाच्या मांडीत , हातात तर काहींच्या पोटात , छातीत गोळ्या घुसल्या . त्या दिवशीचा दंगलीचा आकडा होता , तीन ठार आणि सत्तर जखमी . जगदीश पाटील आणि संतोष गुप्ता मृत्युमुखी पडले . दोघंही ऐन विशीतले . संतोषचं नुकतंच लग्न झालं होतं . तो होता फळविक्रेता . हातगाडीवर सीझननुसार फळं लादून तो विकायचा . रात्री कॉलनीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याची हातगाडीही मोडली होती . त्यामुळे तो वैतागला . दगडफेकीत तो सर्वात पुढे होता . पोलिसांच्या गोळीला बळी पडला . जगदीश पाटीलचं पुढच्या महिन्यात अकरा तारखेला लग्न होणार होतं . पण सगळं सुरू होण्याआधीच संपलं . इकडे पोलिस उपायुक्त अमर जाधवांसह अनेक पोलिसांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं . दंगलीची बातमी लागताच वाशीच्या माकेर्टमधून म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीतले माथाडी कामगार कॉलनीत आले . कांदा बटाटा माकेर्ट बंद करून तिथलेही माथाडी पोहोचले . तर कोपरखैरणे , गोठिवली आणि आसपासच्या गावातली मंडळी गाववाल्यांच्या बाजूने उभी राहिली . त्यामुळे एकूण दंगलीला माथाडी विरुद्ध स्थानिक असं स्वरूप आलं . स्थानिक आणि उपरे असा संघर्षाचा जाळ नवी मुंबईला पुढचा आठवडाभर पेटवत राहिला . दंगल सुरू झाली ती घणसोली , कोपरखैरणेत . पण बोनकोडे , जुहू गाव , वाशी गाव , करावे गाव , नेरूळ , शिरवणे , बेलापूर असं अख्ख्या नव्या मुंबईला दंगलीने ग्रासलं . र्कफ्यू लावले . राज्य सरकारने निमलष्करी दल , एसआरपी , रॅपिड अॅक्शन फोर्स अशी ताकद मुंबईच्या रस्त्यांवर आणली . तरीही नेरुळ पोलिस ठाण्यावर शेकडोंच्या जमावाने हल्ला केला . सानपाडा पोलिस चौकीला आग लावली . हायवे बंद , तोडफोड , मारहाणी . स्थानिक आमदार , राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कामगारमंत्री गणेश नाईक यांच्या घरावर महिलांच्या मोर्चाने दगडफेक केली . त्याचा नाईकांनी कायम इन्कार केला . दहावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले . पेट्रोलबॉम्ब ... अश्रुधूर ... हवेतला गोळीबार ... हतबल पोलिस ... नोकरदारांची ससेहोलपट ... टीव्हीवाल्यांच्या ओबी व्हॅनला लावलेली आग ... वर्तमानपत्रांचे ठळक मथळे ... टीव्हीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल ... या गोष्टी नवी मुंबईकर दंगलीमुळे पहिल्यांदाच अनुभवत होते ... भोगत होते . आजपर्यंत नव्या मुंबईत असं काही घडण्याची शक्यताच नव्हती . १९७३ मध्ये नवी मुंबई उभारायला सुरुवात झाली . तेव्हापासून आत्तापर्यंत नवी मुंबईत पहिली दंगल हीच . अगदी ९२ - ९३ ला उभ्या मुंबईत आगडोंब उसळला , पण त्याचा पुसटसा ओरखडाही नवी मुंबईवर उमटला नाही . नवी मुंबई हा प्रतिमुंबई वसवण्याचा प्रयत्न . पण अजूनही ते मुंबईचं उपनगरच आहे . मुंबई परवडत नाही म्हणून मुंबईकर बोरिवली ते डोंबिवलीपर्यंत फाकले . तिथेही जागा नाही म्हणत एकीकडे वसई - विरार आणि दुसरीकडे नवी मुंबईचा पर्याय समोर आला . पण ती स्वस्त नवी मुंबईही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही . वाशी , बेलापूर या मुख्य मुंबईचीही उपनगरं उभी राहिली . ती होती एका दिशेने पेण - पनवेल तर दुसरीकडे घणसोली - कोपरखैरणे . या उपनगरांच्या उपनगरात संघर्ष नव्याने उभा राहिलाय . पण हा नवा संघर्ष नाही . मुंबईच्या विस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक - उपरे असा संघर्ष होताच . कधी छुपा तर कधी उघड . जगभरातल्या शहरीकरणाचा हा अपरिहार्य संघर्ष आहे . तो अनादि आहे . अगदी सिंधुसंस्कृतीतही शहरं उभी राहताना हे झालंच असणार . नवी मुंबई उभारण्यासाठी सिडकोने मुंबईच्या परिघातली आग - यांची गावं विकत घेतली . त्याजागी इमारती उभ्या केल्या . त्यात मुंबईतून लोक भसाभसा येत होते . त्यामध्ये मराठी नोकरदार मोठ्या संख्येने होते . बंगाल्यांपासून मल्याळ्यांपर्यंत सगळ्यांच्या सोसायट्या होत्या . त्यांच्यासाठी गुजराती , मारवाड्यांनी दुकानं उभारली . दुधापासून म्हावऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी भैये आले . या धावपळीत स्थानिक आगरी कोळी गावातल्याही गावठणात आक्रसले . जमिनी हातच्या गेल्या होत्या . त्याबदल्यात स्थानिकांना कवडीमोलाचा मोबदला मिळाला . पण त्याच जागा नवी मुंबईचं लेबल लावून दामदुपटीने लोकांना विकल्या जात होत्या . मिठाच्या भावाने विकलेल्या जमिनीला हि - याचा भाव मिळत होता . पण त्यासाठी त्यांना फक्त चुकचुकण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं . कधीकाळचा इंडस्ट्रियल बेल्ट आता रेसिडेन्सियल हब झाला होता . त्याचा फटकाही स्थानिकांना बसला होता . दहा - बारा वर्षांच्या नोकऱ्या अचानक हातच्या गेल्या . वाशीच्या कॉन्व्हेण्टमधली मुलं गावच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत आणावी लागली . घरच्या परसात चाळी बांधून भाड्याने दिल्या . त्याच्या भाड्यावर नाहीतर रिक्षा चालवून स्थानिकांची गुजराण सुरू झाली .अख्खी नवी मुंबई उरावर येऊन बसली होती . तिच्या लखलखटाने डोळे दिपत होते . शिकल्या सवरलेल्या पोरांना आगरी असल्याची लाज वाटू लागली होती . त्यातल्या त्यात समाधान एकच होतं , नवी मुंबईत गाववाल्यांची वट होती . मागे काहीही बोलतील , पण आगरी म्हटल्यावर बिल्ंडिगवाले हमखास टरकत . आवाज वर चढवला की समोरचा कारे म्हणायचा नाय . भाऊबंदकी असली तरी समाज म्हणून आगरी एकजूट होती . त्यामुळे गावात गाववाल्यांच्या चाळी आणि झोपड्यांमध्ये राहणारा स्थानिक नसला तरी वचकून असायचा . त्याच्या सगळ्या नाड्या गावाच्या हाती असल्याने तो आपसूक गाववाला बनून जायचा . त्यामुळे पार्टी कुठलीही असो , नवी मुंबईतले पुढारी आगरीच असायचे आणि आजही आहेत . पन्नास आणि साठच्या दशकात मुंबईतल्या मराठी माणसासारखी त्याची स्थिती होती . पण हे वर्चस्व फार दिवस चालणार नव्हतंच . नव्या मुंबईची डेमोग्राफी , सगळा नकाशाच मुळापासून बदलला होता . गाववाल्यांच्या तुलनेत तीन - चार माळ्यांच्या बिल्डिंगींमधे राहणारे पटीत वाढत होते . पण दिवसभर कामासाठी मुंबईत आणि रात्री झोपायला नवी मुंबईत येणाऱ्या कातडीबचाव नोकरदारांना कुठलीही झंझट नको होती . त्यातून गाववाल्यांशी अधूनमधून खटके उडत होते . छोट्या मारामाऱ्या , थोडी तोडफोड सुरू असायची . त्याचं कारण होतं स्थानिकांच्या नेतेमंडळींचा बोटचेपेपणा . आगरी कोळ्यांची नवी मुंबईतली लोकसंख्या आजघडीला पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नाही . मात्र इथे महापालिकेपासून विधानसभेपर्यंत राजकीय नेतृत्व सरसकट आगरी आहे . लोकसंख्येचं हे वास्तव मतदानाची गणितं मांडणा - या आगरी पुढा - यांपेक्षा अधिक कोणाला माहीत नाही . त्यामुळे मग गाववाले - बिल्डिंगवाल्यांच्या वादात कालपर्यंत गाववाल्यांसाठी रस्त्यावर उतरणारा पुढारी नेता बनताच गुळमुळीत भूमिका घेतो . त्यांच्या कार्यक्रमांत , उत्सवांत उत्साहाने उतरतो . हे बघून गाववाल्यांचा जोश कमी झाला होता . त्यांना आता समजून चुकलं होतं की आपण फार ताणून धरण्यात अर्थ नाही . त्यामुळे वाशी - बेलापूर पट्ट्यातले वाद थांबले होते . तणावाची स्प्रिंग दाबली गेली होती . गेल्या तीनेक वर्षांत नवी मुंबई ठाण्याच्या दिशेने वाढू लागली होती . एकतर वाशी ठाणे लोकल सुरू झाली होती . बस वाढल्या होत्या . हायवेही व्यवस्थित होता . त्यामुळे वाशी ते बेलापुराची तीच कथा पुन्हा एकदा या नव्या गावांमधे लिहिली जात होती . तीच धुसफूस , तोच राग , तोच संघर्ष आणि तीच समीकरणं . या सगळ्याचा परिणाम म्हणून संयमी मानलं गेलेलं हे शहर पेटून उठलेलं साऱ्या जगानं पाहिलं . पोलिस गाफील राहिले म्हणून दंगल अधिक पेटली , हे खरं असलं तरी त्यामागची कारणं तेवढीच तीव्र होती . तीन जणांचा बळी घेणा - या या गोळीबाराने इथला भूमिपुत्र पेटून उठला . वेळोवेळी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना उफाळून आली . त्यातून आपलं अस्तित्व टिकविण्याची आणि आपली एकी दाखवून देण्याची वेळ आल्याचं स्थानिक गावकऱ्यांनी मनावर घेतलं . घणसोली गावापासून सुरू झालेली ही अस्तित्व टिकवण्याची आणि सार्मथ्य दाखवण्याची लढाई हळूहळू नवी मुंबईतल्या गावागावांत पसरली . या संघर्षात कोणाचंही नेतृत्व नव्हतं , कुणाचं मार्गदर्शनही नव्हतं . पण दगडफेक , जाळपोळ , रास्ता रोको असा गाववाल्यांनी आपला राग व्यक्त केला . एखाद दुसरा अपवाद वगळला तर नवी मुंबईतले नेते या विषयावर कोणतीही भूमिका न घेता शांतच राहिले . गणेश नाईक सर्वात मोठे नेते . त्यामुळे त्यांचं मौन अधिक लक्षात आलं . स्थानिकांच्या प्रस्थापित नेतृत्वाची अशी कुचंबणा नेहमीच होत असते . नव्यांना सामावून घेणं त्यांची मजबुरी असते आणि जुन्यांशी त्यांची नाळ जोडलेली असते . गरिबांनी गरिबांशी कशाला भांडायचं , असं आर . आर . पाटील दंगलीच्या काळात म्हणत होते . पण स्थानिकांना त्यांचं हे म्हणणं बिल्डिंगावाल्यांच्या बाजूचं वाटत होतं .
घणसोलीत माथाडी कामगार समोर होते . ते संघटित होते . त्यांचे वाशी माकेर्टमधले गलेलठ्ठ पगार , गावातल्या जमिनी असूनही मिळालेले स्वस्तातले फ्लॅट . त्यामुळे स्थानिकांचा राग होताच . त्यामुळे तिथे आगरी विरुद्ध माथाडी असा सरळसोट संघर्ष दिसून आला . त्यामुळे राज्यातली मराठी मनं दुखावली . अन्याय झाला म्हणून ओरडण्याच्या आपल्या परंपरागत भूमिकेत मराठी माणूस होताच . भूमिपुत्र , स्थानिक ही परंपरागत नावं त्याच्याकडे होती . पण दुस - या बाजूलाही उपरे म्हणून , परप्रांतीय म्हणून मराठी मातीतली माणसं होती . मराठी विरुद्ध मराठी , कष्टकरी विरुद्ध कष्टकरी असा हा संघर्ष अस्वस्थ करणारा होता . पण माथाडी आणि आगरी अशी वॉटरटाइट कम्पार्टमेंट करण्याजोगी स्थिती नाही . घणसोली गाव बरंच कॉस्मोपॉलिटन आहे . गावात आग - यांएवढीच संख्या उत्तर भारतीय आणि राजस्थानींची असावी असं गावात फिरताना वाटतं . गावदेवीच्या देवळासमोर मल्याळींच्या अय्यप्पा मंडळाचा बोर्ड आहे आणि शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर भय्यांच्या चाळीची रांग आहे , इतकी ही सरमिसळ आहे . त्यामुळेच गाववाला म्हणून दगडफेक करताना पोलिसांच्या गोळीचा बळी ठरलेला संतोष गुप्ता भय्या असल्याचं फारसं कुणाला खटकलं नाही . दुसरीकडे माथाडींनी आपल्या खोल्या सर्रास भाड्याने दिल्या आहेत . तिथेही सगळे माथाडी नाहीत . शिवाय अख्ख्या नव्या मुंबईत दंगल पसरली तिथे सगळीकडे माथाडी नव्हते . त्यामुळे असा सरळसोट संघर्ष मांडण्यात हशील नाही . त्याऐवजी गाववाले आणि बिल्डिंगवाले असं हे मांडायला हवं . दोन्हीकडे मराठी माणसांची संख्या मोठी होती . त्याहीपेक्षा दोन्हीकडचं नेतृत्वही मराठीच होतं . त्यामुळे तो संघर्षही मराठी विरुद्ध मराठी असाच होता , असं म्हणावं लागेल . स्थानिकांना वाटतं बाहेरून आलेले आपल्या अस्तित्वावर घाला घालत आहेत आणि त्यासाठी रितसर आखणी करून वागत आहेत . तेव्हा तो संघर्षाच्या पवित्र्यात येतो . मग ते उपरे कुणीही असोत , वेगळी भाषा बोलणारे किंवा तिच भाषा बोलणारे , वेगळा धर्म असणारे किंवा तोच धर्म सांगणारे . इथे दोनच जाती असतात , दोनच धर्म असतात , दोनच प्रांत असतात , स्थानिक आणि उपरे . स्थानिक आणि उप - यांच्या संघर्षातून खरंच काही घडतं का ? तिथे संघर्ष नाही समन्वय हाच मार्ग असतो . दोघांकडच्या चांगल्याचा संकर नव्या संस्कृती जन्माला घालत असतो . संस्कृतीचा विकास म्हणतात तो हाच . पण त्यात अनेकांच्या हितसंबंधांना हादरा मिळत असतो . ते त्याला विरोध करतात . पण संस्कृतीचा प्रवाह त्यांना थांबवता येत नाही . कारण तो खळाळत पुढे जाणारच असतो . घणसोली गावातल्या वारकऱ्यांनी कॉलनीतल्या जाऊन भागवत सप्ताहात भाग घेतला . कॉलनीतले भाविक गावातल्या साईभक्तांबरोबर शिडीर्च्या पालखीबरोबर पायी गेले . अद्याप संघर्ष संपला नाही , पण अशा प्रयत्नांतून दोघे एकमेकांच्या जवळ आले आहेत . ज्यांच्या डोक्यातली गाठ अद्यापही सुटलेली नाही , तेही शांत आहेत . कारण हिंसा कुणालाच परवडत नसल्याचं त्यांच्याही लक्षात आलं आहे . आपल्या चुका त्यांच्याही लक्षात आल्या आहेत . एकूण नवी मुंबईची वेगळी संस्कृती घडतेय , मुंबईपेक्षा वेगळी , स्वत : ची संस्कृती . त्या संस्कृतीच्या घडण्यात घणसोलीच्या दंगलीचं एक महत्त्वाचं योगदान आहे .
पण या दंगलीच्या निम्मित्ताने हे दिसून आले कि, सर्व राजकीय पक्ष्य स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा हवा तसा वापर करून घेतात. जनता जेव्हा रडत असते तेव्हा हे सर्व राजकीय पक्ष्य अक्षरशा तमाशे पाहत असतात.मराठीच्या नावाने बोंबलणारे राजकीय पक्ष्य तेव्हा कुठे होते?????या मंडळीनी तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटवला होता...स्वतःच्या स्वार्थासाठी...पण जेव्हा नवी मुंबईतला मराठी माणूस अडचणीत होता तेव्हा कुठे होते हे मराठी सम्राट,वाघ अश्या पदव्या मिरवणारी मंडळी????? अहो इतकाच कशाला.....२६/११ च्या त्या भयाण रात्री तरी कुठे होती ही वाघ,सिंह,सम्राट मंडळी????? आपली परिस्थिती गांधीजींच्या माकडासारखी करून ठेवलीय या राजकीय मंडळीनी......!!ते फक्त आदेश देणार अन जनता पालन करणार???? काहींनी मराठी माणसाला "वडा-पाव" च्या गाड्यावर सीमित ठेवला तर काही सध्या रेल्वेच्या स्टोल पुरत सीमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.....!! ही माणसे फक्त निवडनुकांपुर्तीच आपली असतात तेव्हाच यांना माता बहिणी आठवतात....आपण यांना मत देणार आणि हे नंतर अभद्र युत्या करणार स्वतःच्या स्वतःसाठी......या अशा युत्या करताना ज्यांनी तुम्हाला मत दिलंय त्यांचा विचार देखील करत नाही....कारण तेव्हा त्यांना त्यांची सत्ता प्रिय......स्थायी समितीच अध्यक्षपद प्रिय....निवडणुकीपूर्वी ज्यांना शिव्या दिल्या.....त्यांच्याच ताटात जावून जेवणार....!! त्यामुळे आत्ता तरी निट डोळे उघडे ठेवून सर्व पहा....!!
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा