आमोद पाटील-आगरी बाणा: पांडवकडा साद घालतोय!!!!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ७ जुलै, २०११

पांडवकडा साद घालतोय!!!!!
(वरील सर्व फोटो गेल्यावर्षी आम्ही गेलो होतो त्यावेळचे आहेत)

   आमच्या निसर्गरम्य रायगड मध्ये सर्व पांडवकडा प्रेमी पर्यटकांचे स्वागत.  

PLACE:
Pandavkada Waterfall,
Kharghar, Panvel,
Raigad.

पांडवकडा साद घालतोय...........
पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत अंगावर हिरवी शाल लपेटलेला. उंच कडेकपारीतून अंगावर जणू शॉवरचा सपाटून मारा करणारा. सर्वागात उत्साहाच वार संचारण्यास भाग पाडणारा. महाभारतील पांडवांच ऐतिहासिक वास्तव्य सांगणारा. ‘पांडवकडा’ पावसाचे तुषार अंगावर झेलत निसर्गाची कुस शोधणा-या पर्यटकांना साद घालू लागला आहे. उंच  कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याची फेसाळलेली शुभ्र आणि थंड धार अंगावर घेत मस्तीत भिजत राहणे, यापेक्षा वेगळा असा आनंद कोणता! नवी मुंबईतील "नायगारा" म्हणून प्रसिध्द असणाऱ्या खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर आता गर्दी होऊ लागली आहे.
जुन-जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळताच मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील पर्यटक येथे येतात. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पोलीस आणि सिडकोने बंदी घातली होती, परंतु हा नैसर्गिक धबधबा पर्यटकांना खुला करण्यासाठी काही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. दोन वर्षांपासून पर्यटक या धबधब्याचा आनंद घेत आहेत. बेलपाडा व खारघर टेकडीच्या पायथ्याशी भारती विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी पावसाळ्यात छोट्या-मोठ्या डोंगरदऱ्यातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत असत. काही ग्रामस्थांकडून या परिसरात पांडवकडा असल्याची माहिती त्यांना मिळाली. तरुणाईची गर्दी येथे होऊ लागल्यावर त्याचे नाव सर्वतोमुखी झाले.

ओळख पांडवकड्याची....
सिडकोने खारघरचा विकास हाती घेतल्यावर खारघर शहराची निसर्गरम्य शहर अशी ओळख करून देताना पांडवकड्याचाही उल्लेख करावा लागतो. या धबधब्याशेजारी धामोला हा आदिवासी पाडा आहे. पावसाळ्यात येथे सव्वाशे फुटावरून डोंगरावरून पानी खाली कोसळते. पनवेल, तळोजा, खारघर परिसरातून हे विलोभनीय दृश्य दिसते. हा धबधबा जणू सर्वाना साद घालत असतो. दहा-पंधरा वर्षापासून येथे पर्यटकांची गर्दी असते. धबधब्याच्या मध्यभागी डोंगरात सगळीकडे काळाकुट्ट अंधार असलेली मोठी गुंफा आहे. या गुंफेतून मुंब्रा, कल्याणपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. धामोला पाड्यातील काही मंडळीनी दीड-दोनशे फुट आत जाऊन पाहिले असल्याचे सांगतात. आत मिट्ट काळोख असून काहीच दिसत नाही. पूर्वी या गुंफात पाच पांडवांनी वास्तव्य केल्याचेही सांगितले जाते. गुंफात जाऊन शांत बसल्यास मुंब्रा येथून जाणाऱ्या रेल्वेचा आवाज देखील कानी पडतो. पूर्वी पांडवकडा म्हणण्याऐवजी आगरी भाषेत "पंडोकरा" असे म्हटले जात असे.

 हिरवे हिरवे गार गालिचे.......
 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ती खेळत होती,
गोड निळ्या वातावरणात - अव्याज मने  होती डोलत,
प्रणयचंचल त्या भृलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी,
याहूनी ठावे काय तियेला? - साध्या भोळ्या त्या फुलराणीला.

पूर विनोदी संध्यावात - डोल डोलवी हिरवे शेत,
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला,
"छानि माझी सोनुकली ती - कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून?
तो रवीकर का गोजिरवाणा - आवडला आमच्या राणीला? "
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी.

स्वर्भूमीचा जुळवीत हात - नाच नाचतो प्रभातवात,
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागली लपावयाला,
आकाशीची गंभीर शांती - मंदमंद ये अवनी वरती,
विरू लागले संशयजाल - संपत ये विरहाचा काल,
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्ष निर्भर नटली अवनी,
स्वप्न संगमी रंगत होती - तरीही अजुनी ती फुलराणी.

तेजोमय नव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशेला,
जिकडे तिकडे उधळीत मोती - दिव्य वऱ्हाडी गगनी येती,
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी,
कुणी बांधिला गुलाबी फेटा - झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोळ चालला - हा वाङनिश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे? - साध्या भोळ्या या फुलराणीचे.

गाऊ लागले मंगल पाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना,
नाचू लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पख्वाज,
नवरदेव सोनेरी रवीकर - नवरी ही फुलराणी सुंदर,
लग्न लागले सावध सारे - सावध पक्षी सावध वारे,
दवमय हा अंतःपाट फिटला - भेटे रवीकर फुलराणीला.
-बालकवी. पांडवकड्या संबंधीत काही  जुन्या दंतकथा
खारघर  परिसरातील सर्वग्रामस्थ भाताचे पिक घेत असत. सर्व परिसर घनदाट पर्नाराजीने व्यापलेला होता. आज पांडवकड्यावरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा सर्वत्र दिसतात. पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. जंगलात वाघ, कोल्हे, ससे असे प्राणी आढळत. घनदाट जंगलामुळे पांडवकडा धबधब्याचा आनंद केवळ गुराखी घेत असत. पूर्वी या धबधब्याजवळ लग्नकार्यासाठी वधू-वरांना लागणारे दागदागिने मिळत, अशीही दंतकथा आहे. लग्नकार्यापूर्वी या ठिकाणी देवीची पूजा केल्यास थोड्या वेळाने दागिने मिळत असत. लग्नकार्य झाले की पूजापाठ करून दागिने परत केले जात असत: परंतु कालांतराने लग्नकार्यासाठी गेलेले दागिने परत न केल्याने ही प्रथा बंद झाल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी काही बुवा मंडळीनी भजन-कीर्तन करून मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला: परंतु त्यात त्यांना यश आले नाही, असे गावातील ग्रामस्थ मंडळी सांगतात. खारघरच्या विकासामुळे पांडवकडा धबधब्याची ओळख सर्वाना झाली. आता तिथे दाट जंगल राहिलेले नाही. त्यामुळे दूरवरून धबधबा दिसतो.


माझी  सिडकोला विनंती
 आमचा मित्र परिवार गेल्या वर्षी पांडवकड्यावर गेला होता. त्यावेळी माझं आजूबाजूला निरीक्षण चालू होत. त्या निरीक्षनांती माझी सिडकोला विनंती असेल की, डोंगरावर एक छोटस धरण बांधल्यास खूप चांगल होईल. कारण धरणात पानी साठून राहील. आणि पांडवकडा पावसाळ्याच्या फक्त ४ महिने न कोसळता पूर्ण वर्षभर कोसळून पर्यटकांना आनंद देत राहील, तसेच तेथील आदिवासी पाड्यांना देखील वर्षभर पाण्याचा मुबलक पुरवठा होईल. धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याच्या वेगावर देखील नियंत्रण करता येईल. आणि काही प्रमाणात अपघातांना थांबवता येईल. ज्या काही धोकादायक दरडी, तसेच मोठमोठे दगड तेथून हटवायला हवेत. पांडवकड्याला जाणाऱ्या पाऊलवाटांची पक्की बांधणी करायला हवी. पांडवकड्याकडे जाताना लागणाऱ्या ओढ्यांवर छोटेसे पक्के कायमस्वरूपी पूल बांधायला हवेत. सुरक्षारक्षक तसेच जीवनरक्षकांची नेमणूक करायला हवी. वाहनतळाची उभारणी खूप दूर करण्यात यावी आणि तिथेच हॉटेल्सची उभारणी करायला हवी. म्हणजे निसर्गाला कोणत्याही स्वरूपाचा धक्का बसणार नाही.


पांडवकड्याला कसे जाणार?
आता  इतकं मस्त-मस्त वाचल्यानंतर, फोटो पाहिल्यानंतर तुम्ही विचारणार ना की, इथे जायचं कसं????
मुंबईहून जाणा-यासाठी हार्बर लाइनने पनवेल गाडी पकडावी लागेल. त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशनला उतरून तिथून खाजगी रिक्षा पकडून जावे लागते. त्यासाठी रिक्षावाले ५० ते ७० रुपये आकारतात. ठाणे, कल्याण डोंबिवलीकरांसाठी ठाण्याहून पनवेल गाडीचा पर्याय खुला झाल्याने त्यांनाही हे ठिकाण सहज गाठता येईल. अन्यथा रेल्वे स्टेशनवर उतरून पायी जाऊ शकता. पण त्यासाठी २ तास चालायची तयारी ठेवावी लागेल.(म्हणजे पुढचे ४ दिवस तंगड्या गळ्यात घेऊन बाहेर निघण्यासाठी तयार, कारण आम्ही ते अनुभवलंय!!!!!) उस्तव चौक मार्गे डाव्या हाताचा नाल्याचा रस्ता पकडून सरळ चालत जायचं.


पांडवकड्याला जाणार असाल तर काही सुचना:
१. पांडवकड्याला जाताना घरात सांगून निघणे.
२. ७-८ जणांच्या ग्रुप बरोबरच जाणे. एकट्या-दुकट्याने जाण्याची शहाणपणा करू नये.
३. बरोबर मोबाईल बाळगणे. खूप डोंगरात असला तरी मोबाईलला खूप रेंज असते. अडीअडचणीच्या वेळी कामास येईल.
४. चप्पल घालून जाणे. कारण कच्ची पाऊलवाट असल्याकारणाने पाय मातीत रुतून बसण्याचा धोका आहे. आणि बूट असतील तर ते अधिक रुतून खराब होतील. तुटलेल्या चपला तिथेच टाकून स्वतःची अक्कल विकायला काढू नये. निसर्गाला घाण करण्याचा तुम्हांला अधिकार नाही. मुकाट्याने ती चप्पल ब्यागेत टाकावी आणि पुढचा मार्ग धरावा.
५. प्रत्येक पाऊल जपून टाकावे. कारण वाट खूप निसरडी आहे. आणि खाली जागो-जागी भले मोठे दगड आहेत. पडलात तर खूप महागात पडेल.
६. वरती सांगितल्या प्रमाणे दोन जणांनी येण्याचा शहाणपणा दाखवू नये. काही प्रेमवीर जर "त्यांच्या" "तिला" स्वर्ग दाखवायला घेऊन येणार असतील, तर तुमच्या स्वर्गाचा मार्ग नरकातून जातो याची नोंद असावी.
७. ही आपली खाजगी प्रॉपर्टी नाही याचं भान असुद्या. बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचे वेष्टन तेथे टाकू नये. तो कचरा स्वतःच्या ब्यागेत टाकावा.
८. धबधब्याच्या प्रवाहात उतरताना पाण्याचा जोर किती आहे, हे जाणून घ्या. प्रवाहाला खूप वेग असल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. या धबधब्यांच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
९. धबधब्याच्या पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या. जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढा येण्याचा संभव असतो.
१०. पाणी वाढल्यामुळे एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यास पाणी उतरेपर्यंत सुरक्षित जागी थांबा. जास्त वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल, मात्र मोठ्या प्रवाहातून पलीकडे जाण्याचे साहस अंगावर बेतू शकते.
११. भुसभुशीत मातीचा अंदाज न आल्याने खाली घसरण्याच्या घटना घडू शकतात.
१२. नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून प्रवाह ओलांडावा.
१३. ग्रुपमधील सगळ्यांनी पाण्यात उतरू नये. स्वत:च्या तसंच, सोबतच्या सामानाच्या सुरक्षेसाठी एक-दोन जणांनी काठावर थांबणं आवश्यक आहे.
१४. अशा ठिकाणी कपड्यांचं भान आवश्यक आहे. मुलीनी विशेष काळजी घ्यावी. ज्या ग्रुप बरोबर जाणार आहात त्या ग्रुप मधली पोरं ओळखीची असावीत. किरकोळ शेरेबाजी, कमेंट्सचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची उदाहरणं घडतात. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी हे भान राखणं आवश्यक आहे.
१५. निसर्गाचा आदर राखून वागणं आवश्यक आहे. नदीच्या परिसरात कचरा टाकू नये, आपल्यासोबतचे बिस्किट, चॉकलेटचे रॅपर आपल्यासोबत परत आणावेत.
१६. दारूच्या बाटल्या पिऊन तमाशे करू नयेत. स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालाल. पांडवकडा हे दारू पिण्याचे ठिकाण नाही. त्या बाटल्या तुमच्या घरी जाऊन आई-वडिलांसमोर ढोसाव्यात आणि तुमचे नको ते रंग दाखवावेत.
१७.. दुदैर्वाने काही अपघात झाल्यास स्थानिक गावकऱ्यांना, गावातील पोलीस पाटीलाला, जवळील पोलीस स्टेशनला कळवावे. अशा वेळी काही जणांनी तरी घटनास्थळी थांबावे.

   निसर्गाचा मान राखून आनंद लुटायला येणार असाल तर एक रायगडवासी या नात्याने आपलं स्वागत आहे.  
आपलाच,
आमोद पाटील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा